गोळ्यांचा वाडा भाग-२

This story is about Mr. Gole

भाग - २

हे असं सगळं बघुन गिरीश म्हणाला.. "सर वाडा उघडा कसा..?? चाव्या तर आपल्याकडेच आहेत"

"हो रे.. मलाही तोच प्रश्न पडलाय.. असो.. बघु आत जाऊन.."

ते दोघे उंबरठ्यावर आले मात्र आणि तेव्हाच आतून आवाज आला..

"तिथे अंगणात पाणी आहे.. पाय धुवून आत या.. या वाड्याचं कडक सोवळं आहे.."

दोघेही दचकले. "कोण आहे?" पियुषने आवाज दिला.. तसा आतून एक साधारण सत्तर-पंच्याहत्तरीचा माणूस बाहेर आला. पांढरं धोतर- करडा सदरा, डोक्यावर काळी टोपी, साधारण पाच फुट उंची, गोरापान, घारे डोळे असलेला तो माणुस जसा जवळ आला तसे हे दोघे अजुन घाबरले. 

"आपण कोण??? आणि इथे काय करताय?? आणि हा वाडा बंद असतो ना?"

"मी कोण???" "हं" असं म्हणुन तो माणूस मिश्कीलपणे हसला 

"अहो.. मालक जेव्हा इथे होते तेव्हा मी आहे इथे.. लहानपण इथंच गेलं.. अडाणी मी.. न शिकलेला... वाड्याची साफसफाई करतो, बागकाम, झाडांना पाणी देणे, मालकांची सगळी कामं मीच करायचो... सदु माझं नाव.. म्हणजे नाव तसं सदाशिव... पण सगळे सदुच म्हणतात.."

"अहो पण तुम्ही आत्ता इथे काय करताय??"

"अहो मालक गेले तरी मी असतो इथे..जीव रमलाय इथे.. गुंतलाय.. सोडवत नाही वाडा आता..."

"पण प्रतिक तुमच्याबद्दल काही बोलला नाही किंवा साने पण तुमच्याबद्दल काही बोलले नाहीत"

"कोण?? चिट्टू?? अहो त्याला माहीत नाही मी परत आलेलो" ... सदु काका

"म्हणजे??" .. पियुष

"अहो मी माझ्या पोरीकडे गेलेलो दापोलीला १५ दिवस.. सकाळीच आलो"

"आणि प्रतिक बद्दल बोलाल तर त्याला माहीत असेल तर तो सांगेल ना.. तो अमेरिकेत गेला तो गेला... त्यानंतर इथे मालकांबरोबर कोण आहे? आपले वडील कसे आहेत हे काही त्याला माहीत नाहीय.."

"ते ही आहेच म्हणा.." पियुष पुटपुटला.

"ते असो.. तुम्ही या पाय धुवून आत या... वरच्या खोलीत तुमची सगळी व्यवस्था केली आहे.. जेवण ही तयार आहे.. जेऊन घ्या.. आराम करा.. उद्या कामं करा.."

आधीच विचारात असलेले दोघे एका सुरात बोलले "हो चालेल काका..."

गिरीश आणि पियुष दोघेही हात-पाय धुवून मग वरच्या खोलीत गेले. दोघेही फ्रेश झाले. 

काकडीची कोशिंबीर, वरण, भात, चवळीची उसळ, मऊ लुसलुशीत पोळ्या अस साधं पण चविष्ट जेवण जेऊन दोघे कधी गाढ झोपले त्यांनाही कळलं नाही.

बहुतेक प्रवासाचा थकवा होता.. त्यामुळे संध्याकाळी बऱ्याच उशिरा दोघे उठले.. घरभर धुपाचा सुवास दरवळत होता.. बाहेर रजनी आपले हातपाय पसरत होती..

थोड्याचवेळात काळोख पडला.. गिरीश लाईट लावायला बटणं शोधत होता.. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात त्याने बटण दाबलं.. पण वीज नाही..

"सर.. कसं होणार?? इथे इलेक्ट्रिसिटीच नाहीये"

"अरे.. असं कसं?? मिथिलेश तर म्हणलेला की इकडे सगळ्या सोयी आहेत म्हणुन"

"हो सर.. आपण खाली जाऊन बघु.. कदाचित लोडशेडिंग वगैरे असेल"

दोघे खाली आले.. "सदु काका.. ओ सदु काका.." मात्र हाकेला ओ येत नव्हता..

"हे कुठे गेले".. पियुष

"असतील की इथेच कुठेतरी" .. गिरीश

एवढ्यातच मागे काहीतरी हालचाल जाणवली म्हणुन गिरीश मागे वळला..

"काय मालक??" .. सदु काका

आपल्यामागे कंदील घेऊन अचानक आलेले सदु काका पाहून गिरीश दचकलाच..

"अहो इथंच आहात तर ओ द्यायचा ना" .. गिरीश

"अहो मालक.. वय झालं आता.. ऐकायला कमी येतं".. सदु काका

"इथे लाईट नाहीये??"..पियुष

"नाही" ..सदु काका

"म्हणजे??" .. गिरीश

"अहो वीजेचं बिल भरावं लागतं.. गेल्या वर्षभरात तरी वीजबिल भरलेलं आठवत नाही मला".. सदु काका

"मयुरेशने वेगळंच सांगितलंय पण".. पियुष

"साहेब.. इथे कोण राहतं?? मी की तुमचा मयुरेश??" सदु काकांनी जरा आवाज चढवतच विचारलं.. 

"जेवण वाढून ठेवलंय.. जेऊन घ्या".. सदु काका

"एवढ्या लवकर??".. गिरीश 

"अहो.. हे तुमचं शहर नाही.. आणि इथे माझेच नियम चालतात.. जेऊन घ्या.." सदु काकांनी पुन्हा एकदा आवाज चढवला.. आणि कंदील तिथेच ठेऊन काका तरातरा निघुन गेले.

काकांचं एकंदरीत वागणं बघुन पियुष आणि गिरीश दोघेही गोंधळले होते.. पण बोलुन काही फायदा दिसत नव्हता.. तरी मयुरेशशी बोलावं म्हणुन पियुष ने मयुरेशला फोन लावायला मोबाईल हातात घेतला..

"अरेच्चा.. स्विच ऑफ??" बॅटरी डाऊन झाली बहुतेक असं म्हणुन पियुषने दुसरा मोबाईल काढला.. "अरे?? हा पण बंद?? हे काय गौडबंगाल आहे??"

"सर.. सकाळपासून तुम्ही फोन चार्ज नाही केलाय.. त्यामुळे कदाचित"

"हं असेल तसं.. बरं तुझा दे.. तुझा आहे ना चालु.."

"हो आहे... ना... सर माझा पण ऑफ झालाय"

"अरे आत्तातर चालु होता ना.. त्याच्याच टॉर्चच्या प्रकाशात तर खाली आलो आपण"

दोघांना काहीच कळत नव्हतं.. अचानक दोघांचेही फोन ऑफ कसे झाले तेच कळत नव्हतं.. 

"अरे गिरीश.. इथे लँडलाईन आहे की.." असं म्हणत पियुष लँडलाईन जवळ गेला..

"अरे.. हा पण बंद आहे.. इथून कुणाला कॉन्टॅक्ट कसा करायचा.."

"मी असताना तुम्हांला कशाला कोणाला फोन लावायचाय??" काळोखातून अचानक सदु काका आले.. जेऊन घ्या साहेब.. गार होईल ते..

काकांनी वाढलेलं जेवण जेऊन दोघे खोलीत आले.. थोडावेळ गप्पा मारत बसले.. गप्पांच्या नादात दोघे झोपेच्या आधीन केव्हा झाले ते त्यांनाही कळलं नाही..

पहाटे साधारण ४.३०-५ ला पियुषने गिरीशला झोपेतूनच उठवलं...

"अरे गिरीश मला बाबांचा फोन आला होता.. आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आलाय.. मला निघालं पाहिजे.. तु इथे सगळी पाहणी करून दोन दिवसांत ये मुंबईत... मग आपण बोलु.. सरपोतदारांशी बोलून बाकी सगळं ठरवु... काळजी घे"

"सर तुम्ही नीट जा... मी नंतर येईन काहीतरी ऍडजस्ट करून.. तुम्हाला लवकर पोचलं पाहिजे.. सावकाश जा"

"हो चल येतो मी..."

पियुष गडबडीत निघाला. गिरीश परत झोपला तसंही एवढ्या पहाटे उठुन तो काय करणार होता. पण थोड्याच वेळात घंटेच्या किणकिण अशा आवाजाने त्याला जाग आली. 

"अरे.. इथे कोण पुजा करतंय..." असं म्हणत तो डोळे चोळत उठला.

खाली आला तर सदु काका देवाची पूजा करत होते. 

"काका तुम्ही या घरात बाकी देखभाल करता ना..?
सोबत पुजा पण करता का..??"

"मी असंच करतो आपलं काहीतरी.. तितकंच या बापड्या देवांना बरं वाटतं कुणीतरी लक्ष देतोय म्हणून..." आणि मिश्किल हसत हसत सदुकाका निघुन गेले.. आणि गिरीश त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला..

गिरीशने आंघोळ केली. आणि सकाळचं कोवळं ऊन खायला तो अंगणात येऊन बसला.. सदुकाकांनी त्याला गरमागरम पोहे करुन दिले. चहा झाला..

"काका आता मला वाडा दाखवा.."

"हो चला.. देवघरापासून सुरुवात करू.. हे गोळ्यांचे देव.. हा जुना देव्हारा सागवानी आहे हो.. दीडशे एक वर्षे तरी झाली त्याला.. तेव्हाचं नक्षीकाम बघा कसं कोरीव आणि भरीव.. नाहीतर तुम्ही आताची पोरं.. कितीही शिका रे.. हे नाही येणार तुम्हाला.."

"इकडे या.. हे स्वयंपाकघर.. आता मी एकटाच असतो.. ही मोठी भांडी भरून वर ठेवली.. ही चुल.. आम्ही गॅस नाही वापरत.."
"अहो तिथेच काय थांबलाय.. या इकडे.. पुढे हे माजघर.. त्याला लागून पुढे चार पाच खोल्या आहेत त्या बंद असतात.. त्याच्या चाव्या आत्ता माझ्याकडे नाहीत.."

बोलत बोलत काका बाहेर आले.. "आणि पुढे हे भलं मोठं अंगण.. अंगणातला हे वड आणि पिंपळ बघ कसे एकमेकांना धरून वाढलेत... ही विहीर.. आणि.. आणि हा पुढे अथांग समुद्र.. रात्री इथे बसलात की समुद्राची शांत गाज मनाला छान उभारी देते बघ.."

गिरीश लक्ष देऊन सारं ऐकत होता. एक गोष्ट त्याला राहून राहून खटकत होती. म्हटलं तर हा नोकर माणुस.. मान्य आहे लहानपणापासून इथे असेल.. तरी घराविषयी किती आत्मियतेने बोलतो स्वतःच असल्यासारखं.. 

"अहो साहेब.. ते दुसरे साहेब कुठे?? अजुन उठले नाहीत का??"

"अहो.. त्यांची आई आजारी असल्याचा फोन आला त्यांना पहाटे.. म्हणुन ते पहाटेच गेले मुंबईला परत..."

"काय?? फोन आला?? हा घरातला फोन वाजला आणि मला ऐकु नाही आला??"

"अहो मोबाईलवर आला होता..."

"कसं शक्य आहे?? अहो इथे मोबाईल नाही लागत..."

"हो का??" असं म्हणत त्याने स्वतःचा फोन बघितला तर तो ऑफच होता.. तेव्हा गिरीशच्या रात्रीचं लक्षात आलं.. "अरे रात्री तर सरांचे दोन्ही मोबाईल बंद होते.. मग त्यांना फोन आला कसा??"

विचारातच गिरीशने समोर पाहिलं तर काका नव्हते.. "अरे हे कुठे गेले.."

"ह्यांचं एक वेगळंच गौडबंगाल आहे.. अचानक येतात काय.. जातात काय.."

गिरीश खरंतर पियुषच्या काळजीत होता. "रात्री फोन ऑफ असताना सरांना पहाटे फोन आलाच कसा??" 

कदाचित रिस्टोर झालेल्या एनर्जी ने फोन चालु झाला असेल.. असं म्हणत गिरीश वाड्यात आला..

नंतर तो एकटाच वाडा पाहत होता. वाडा खरच अप्रतिम होता. भले मोठे दरवाजे, त्यावर नाजूक कोरीव काम, मजबूत भिंती, आजूबाजूला सगळ्या प्रकारची झाड, समोर मोठं अंगण आणि अंगणातली ती दगडी , पाण्याने भरलेली विहीर, काही अंतरावर निळाशार समुद्र, आजूबाजूला वेगळे वेगळे पक्षी, शांत वातावरण आणि वातावरणात भरून पावलेली प्रसन्नता...

सगळं डोळ्यांत साठवत.. महत्वाच्या खुणा मार्क करत.. आणि नेमके कुठे काय बदल करायचे त्यांची आपल्या ड्रॉविंग बुक मध्ये नोंद करत तो देवघरात आला. 

आणि सहज त्याने देव्हाऱ्यात नजर टाकली.. 

देवघरात देवच नव्हते.. फुलं नव्हती.. घंटा नव्हती.. आत्ता थोड्यावेळापुर्वी तिथे पुजा झाली अशा काही खुणाच नव्हत्या.. उलट देव्हाऱ्यात त्याला धुळ दिसली..

(क्रमशः)

✍️ प्रियांका सामंत

टीप : कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. 

कथेचे सर्व अधिकार लेखिकाधीन. नावासहित शेअर करण्यास हरकत नाही.