गोंदण (भाग-७)

Struggle of a girl in the desire of tatto.

गोंदण (भाग-७)
स्वाती  बालूरकर देशपांडे, सखी.



दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी पुन्हा नेहमी सारखंच लवकर उठली, लवकर उठून ओसरीत बसली.
आबांना बंबात लाकडे घालताना पाहणे काशी मावशींची झाड झूड अन जनाचा सडा रांगोळी बघणे, आजोबा सोबत पारावरच्या मारुतीचे दर्शन करून येणे मा घरातून अंगणात अन अंगणातून समोरच्या अंगणात भटकणे हे तिचे आवडते रूटीन होते.
कधीकधी आजूबाजूला राहणाऱ्या मुलींसोबत सुद्धा ती खेळायला जायची.
यात्रेतून आणलेली खेळणी दाखवण्यासाठी तिने बाजूच्या दोन तीन मुली गोळा करून आणल्या होत्या. त्यापण किती वेळ तिची खेळणी व दुसर्‍या वस्तु पाहत व गप्पा मारत बसल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी मामीने सरळ सहजच विचारलं, "का ग कावू ? इतकी यात्रा फिरलीस कितीतरी वस्तु पाहिल्यास, काय घ्यावं वाटलं गं तुला?"


" मामी, मला चार-पाच वस्तू घ्यायच्या आहेत."

मामा लगेच- " अरे बापरे ! चार-पाच वस्तू काय गं त्या ?"
" मामा . . माझ्यासाठी नाही काही. . . घरी घेऊन जाईल ना तर आईला छान वाटेल ."
"अग बाई हो का! बरं काय घेणार आहे कावू?"
" हो मामी . . तू पण येणार का आज माझ्यासोबत ? "
"नाही ग बाई ऽ . . मला खू ऽप काम आहे घरात . काशी मावशीं सोबत जाशील का?"
" हो जाईन की !"
" व्यवस्थित जाशील ना? हात सोडायचा नाही. हे तुमचं गाव नाही आणि इथे तुला कोणी ओळखत नाही. आणि एक तू समजा यात्रेत हरवलीस तर . . मग आमचं काही खरं नाही."
मामा मुद्दाम भीती घालण्यासाठी म्हणत होता म्हणजे तिने काळजी पूर्वक काशीबाई सोबत जावं.
" काय हो तुम्ही . . काहितरीच सांगता लेकराला. . . हे बघ कावू चुकामूक झालीच तर आजोबांचं नाव आणि आपला इथला पत्ता सांगायचा. . जहागिरदारांचा वाडा म्हणून ओळखतात सगळेजण. . !"
" नाही. . अगं मामी तुम्ही काळजी नका करू मी नाही हरवणार! मी काशी मावशींना व्यवस्थित घरी घेऊन येईल मग तर झालं. . . !"
हे ऐकून काशीचा नवरा हनमंतही मोठ्याने हसला आणि आजोबाही विनोदावर खूप हसले.
काशीबाई खूप आनंदात होती, मुळात तिला स्वतःला यात्रेत फिरायला आवडायचं. तिच्या घर कामामुळे तिला जाणं व्हायचं नाही.
काशीने हळूच विचारलं ," मालकीणबाई, जनीला पण घेऊन जाऊ का. . यात्रेत फिरायला . . तिला जायचंय तसं काही नाही, मालकीण बाई . . दोघी असल्या म्हणजे बरं पडलं असतं!"

आजीच्या लक्षात आलं की कावेरीमुळे त्यांना संधी मिळतीय यात्रेत मोकळं फिरण्याची. . जाऊ दे बिचार्‍यांना. . असा विचार करून त्या बोलल्या.
" बरं जा, पण जास्त वेळ करू नका आणि हिच्याकडेच लक्ष द्या, यात्रेकडे नाही ."
मग आजीने त्यांना स्वतःच्या जवळचे काही पैसे दिले , त्यांनी पण ते बटव्यात ठेवून, बटवा कमरेत खोसला.
"तुम्हाला दिलेत ते पैसे, बांगड्या भरून घ्या गं दोघीजणी. आणि कावेरीला काही लागलं तर घेवून द्या. "
" आजीऽ माझ्याकडे आहेत दहा रुपये. . काल नेमबाजीत जिंकलेत ना !"
" ते असू दे हो. मी त्यांच्याकडे पैसे दिलेत, काय हवं ते त्यातून घे. कधी जायचं मग ?"
"चार वाजता!"
"बरं!"
दुपार पासून कावेरी चार कधी वाजतील याची वाट बघायला लागली.
" मामी सांग ना, किती वाजले?"
" आजोबा सांगा ना किती वाजले?"
कावेरी अर्ध्या तासाला एकदा यायची व असे विचारून निघून जायची.
चार वाजायच्या आधीच दोघी मावशी छान तयार होऊन आल्या, कावेरी पण मस्त तयार होती.
मामीने तिला खूप छान वेणी घालून दिली होती.
आता कावेरी निघाली यात्रेमध्ये.
आजचा कावेरीचा मूडच काही और होता. कितीतरी दिवसांपासून जे डोक्यात घोळत होतं ते तिला करायला मिळणार होतं आणि यावेळी तिला नको म्हणायला आई किंवा दुसरं कुणी सोबत नाही.
तिघीजणी यात्रेत पोहोचल्या.
जनाबाई आणि काशी मावशी दोघींना तिने पहिले बांगड्या भरायला सांगितले. त्यांनी तिच्यासाठी पण छोटे-छोटे गोट घेतले खड्याचे.
मग कावेरीने त्यांच्याकडून नाही तर आपल्या पैशातून वेगळ्या रंगाच्या रिबीनी, नेल पॉलिश व तिच्या बाहुलीसाठी नेकलेस वगैरे घेतलं. स्वतःच्या पैशातून काहीतरी घेण्याचा आनंदच और!

"रहाटपाळण्यात बसायचं का ? असं मावशीनी विचारलं तर तिने बसायला नकार दिला आणि दुसरा खेळ खेळण्याचे मावशींना इच्छा नव्हती.

मग तिने हळूच विचारलं, "काशीमावशी , देवाजवळ चंदन घासतात ना , लाल दगड , तो मिळेल का इकडे?"
" मिळंल की. . हाय की मालकिणबाईकडं . . कुणासाठी पायजे?"
"ते आजीसाठी काही नाही. . मावशी . . ते आमच्या माईआजी आहेत ना त्यांना पाहिजे. . वेळ मिळेल तेव्हा त्या वाती करतात . . जुना लाल दगड आहे पण आता तर खूप खराब झाला आहे."

" बरं बरं घेवू की. . तुमी सांग काय पायजे. . मी दावते समदं . . !"

मग कावेरीने तिच्या दादासाठी रेवड्या . . व आईसाठी क्लिपा घेतल्या!
मंदिराजवळ माई आजीसाठी सहाण व तिच्या बाबांसाठी चंदन असं काही बाही घेतलं.

सगळ्यांचा विचार करून लहानगी कावेरी मोठ्यांसाठी पण एवढ्या वस्तू घेतीय ,ते पाहून जनाबाईला खूप कौतुक वाटलं.
"शहरात राहती, साळत शिकती. . लईच हुशार बाई आमची कावेरी ताई. . नाई का गं काशे?"


काशीने हसून मान डोलवली.

मग हळूच कसवेरी काशीबाईला म्हणाली," काशी मावशी तिकडे कोपऱ्यात गोंदण वाल्या बायका आहेत . . म्हणालात नं . . जायचं का ?"

"आता बाई गोंदण कोणाला करायचं हाय?"

" हं . . " तिने आशेने पाहिलं.

" तुम्हाला ?"
"हो ना"
" खूप दुखलं म्हणून रडशान पुना . . !"

" पुन्हा. . नाही रडणार! नाही ना मावशी , मी सहन करेन ." ती गयावया करत बोलली.

मग दोघी मावश्या आणि कावेरी त्या गोंदण वाल्या बाई कडे गेल्या.

कावेरीने त्यांच्याकडच्या डिझाईनचा कागद पहिला आणि तिने दुखण्याचा विचार केला.

सगळ्यात सोपं कपाळावरती हे गोल छोटंसं गंधासारखं गोंदण करून घ्यावं. . .
तिने त्या बायकांना विचारलं. . कपाळावर गोंदण नसेल तर देव असं म्हणतो का. . नांदून आली पण गोंदून नाई आली?

" कोन मनलं पोरी तुला ?"

"आमच्या माई आजी म्हणाल्या ना . . हे असं. . देव विचारतो वरती गेल्यावर गोंदून का नाही आली म्हणून. . !" तिच्या पिक्चर सारख्या या वाक्यावर त्या गोंदण वाल्या बायका पण कौतुकाने हसल्या.
" व्हय तर. . ये माय मग!"

एका बाईकडे तिने सांगितलं की मला कपाळावरती छोटासा ठिपका हवा,

" केवढा हरभऱ्याच्या डाळी एवढा ?"

" ते मला नाही माहिती . . "

" भिऊ नको बाई. . बारकं करते ना. . मग काही दुखत नाही !"

दुसर्‍यांचं होईपर्यंत ती पहात बसली.

ती त्या बायकांच्या गप्पा ऐकत राहिली की पूर्वी कसं शाई लावून सुयांनी गोंदवले जायचं .
तिथे सुया टोचायच्या आणि खूप त्रास व्हायचा.
पण आता तसं राहिलं नाही दुकानात भांड्यावर नाव टाकताना मशीन असते. . तशी बॅटरीवर चालणारी मशीन होती .

कावेरी डोळे बंद करून समोर बसली.

कपाळावर कुठल्या जागी असं विचारलं . . अन तिने मशीन चालू केली .
थोडावेळ खूप भीती वाटली.
मुंग्या चावल्यासारखं वाटलं खरं पण तिने हिम्मत गोळा केली . सहन केलं.

" तर ताई . . आता झालं. . घरी जा अन पाणी लावू नको ग बाई. . खोबर्‍याचं तेल लाव."

छोटासा टिपका गोंदवला त्यामुळे इतका जास्त त्रास नाही झाला ,तिने तो सहननही केला.

झालं डोळे उघडून पाहिलं.
कोण आनंद झाला, जणु जीवनातलं काहीतरी लक्ष्य साध्य केल्या प्रमाणे . . वाटायला लागलं.

" मग त्याचे किती पैसे ?"

त्या मावशीने दिले आणि कावेरी घरी परत निघाली.

बाईने त्याला कसलंसं तेल लावून दिलं होतं आणि सांगितला घरी जाऊन खोबऱ्याचं तेल लाव.
जेव्हा वरची कातडी निघून जाईल तेव्हा आतमधे हिरवं गार सुंदर दिसेल. . तेच ते गोंदण!

कावेरी घरी आली आणि तिचा चेहरा पाहताच मामीला कळालं " अरे लबाड. . होय होय कोण गोंदवून आलंयच. . . कावू मी काल म्हटलं तर नाही म्हणालीस ना !"

" मी नाहीच म्हणाले पण काशी मावशी ने खूप आग्रह केला . " कावेरी निरागसतेने.

"एवढ्याशा पोरीला कशाला हो काशी मावशी?"

मामी नाराजीने म्हणाली.

" नाही धाकल्या बाई. जनाबाईनी पण करवून घेतली की तुळस हातावर. . पण आमी काही जोर नाही दिला बरं. . !"

"तुम्ही केलं ना , ती म्हणाली म्हणजे दोघींनी नाही म्हणायचं. . !"

"नाही गं मामी. . त्या गोंदन वाल्या बायका करून घे म्हणाल्या. . मावशी नाही काही!"


" कावू बाळा त्या तर म्हणणारच की गं . . पण चुभलं असेल ना बाळा तुला. . दुखलं असेल!"


" अगदी थोडं मुंग्या चावल्या सारखं झालं बर मामी. "

" असुद्या. . छान दिसतय कपाळावर. . " आजीने सगळं ऐकून जवळ बसून मांडीवर बसून लाड केले , मग मामी ने वाटीत लाडू आणून दिला.

आजोबांनी संध्याकाळी गोंदण पाहिलं आणि तिला दुखत असेल तर नादी लागेल म्हणून दोन-तीन आंबे खायला दिले.

रात्री मामाला तिने सगळ्या आणलेल्या वस्तू दाखवल्या.
बरेच वेळ यात्रेतली चर्चा चालू राहिली.

दोन दिवस कावेरी सतत आरशासमोर जाऊन, केलेले गोंदण कसे दिसत आहे ते पाहत होती.

पहिल्या रात्री थोडीशी सूज आली होती, गोंदणाच्या बाजूचा भाग थोडासा लाल झाला होता.

दोन दिवसानंतर त्यांची कातडी फुगली व तो पापुद्रा काढून टाकल्यावर ते सुंदर हिरवंगार गोंदण कावूच्या कपाळावर उठून दिसायला लागलं.

आता दुखायचं कमी झालं होतं.
तिला वाटलं आपण चंद्रकोर केली तरी चाललं असतं.
पुढच्या वर्षी करूयात पुन्हा किंवा मग मामी सारखं हनुवटीवर टिपके.

ती स्वतःला च सांगत राहिली.

यात्रा दरवर्षी लागते ना मग थोडी मोठी झाल्यावर ते आपल्याला कमी दुखेल.
यावेळची तर उन्हाळ्यातली सुट्टी मार्गी लागली होती.
तिला खूप खूप आनंद झाला होता .

आता इथून तिच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी मामा मामी सोबत तिच्या वडिलांच्या गावाकडे जायचं होतं.

क्रमशः
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक ०३. ०३ . २०२२

🎭 Series Post

View all