Login

गोष्ट साधीच... पण ती जमली पाहिजे

Story About Energetic Women
गोष्ट साधीच...... पण हे जमलं पाहिजे



शारदीय नवरात्र म्हणून शेकडो वर्षांपासून शरद ऋतू मध्ये शक्तीची पूजा केली जाते. घट स्थापन करून अखंड दीप व फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. ही आदिमाया शक्ती की जिच्या पूजनाने तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीचा हा उत्सव...

या आदी मायेला प्रसन्न करून घेत असताना, आपल्या अवतीभवती वावरत असलेल्या प्रत्येक स्त्री मधील शक्तीचं रूप आपण प्रत्यक्षात कधी अनुभवलंय का?


माझी मैत्रीण सुरेखा, नवरात्रीच्या नऊ दिवसातील एक दिवस नऊ सुवासिनींना घरी बोलावून त्यांची ओटी, खणा नारळाने, फळांनी भरून, त्यांना सुंदरशी भेट देऊन, त्यांना देवीचा प्रसाद म्हणून गोडधोड जेवायला घालून स्त्री शक्तीचा जागर करते. या निमित्त आपापल्या क्षेत्रात काम करीत असताना, येणाऱ्या अडचणी, त्या अडचणींचा सामना आपण कसा करतो, इत्यादी संवादांची देवाणघेवाण होते. मैत्रिणींशी मुक्तपणे संवाद साधल्यामुळे मन प्रसन्न होऊन त्या आपापल्या कार्यक्षेत्रात नव्या दमाने कामाला लागतात.
.
यावर्षी सुद्धा तिने नऊ सुवासिनींना घरी आमंत्रित केले. पूजेची संपूर्ण तयारी केली. ओटी भरण्यासाठी चे संपूर्ण साहित्य आणले. घराची सजावट केली. त्यांच्या स्वागताला प्रवेशद्वारावर फुलांच्या माळा घातल्या. घरातिल मंदीरातल्या जगदंबेची पूजा केली.नऊ सुवासिनींच्या आगमनाची आता प्रतीक्षा होती.

एकेक करून सुवासिनी जमल्या. पण सातच सुवासिनी जमल्यामुळे दोघींची वाट पाहण्यात अर्धा तास गेला. शेवटी कंटाळून, जमल्या तेवढ्या मैत्रिणींच्या ओटी, भेट व प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पाडल्या गेला. कारण जमलेल्या त्यांना एवढा वेळ देता येणे जमले नाही.
त्या ठरलेल्या दोघींना फोन करून विचारणा झाली. परंतु त्यांनी असमर्थता दाखविली. आता काय करायचे? आपली मुलगी कॉलेजमध्ये गेलेली... तिने ते साहित्य तसेच ठेवले. कॉलेजमधून पाच वाजता मुलगी आली .
आई! 'हे काय! या दोन ओट्या तशाच आहेत'? का ग! 'आल्या नाहीत का तुझ्या दोन मैत्रिणी'?' तू एवढी तुझ्या कामातून सुट्टी काढून एवढं सगळं केलं ,आणि पूजा अशी अर्धवट राहिली... सुरेखा ला सुद्धा ते बरोबर वाटले नाही. ती गप्पच होती.

तेवढ्यात बाहेर रस्त्यावर एक बाई आवाज देत होती. 'फुलांचे गुच्छ घ्या गुच्छ'! 'दसऱ्याले फुलदाणीत लावाले.'..
तिच्या मुलीने बाहेर गॅलरीत जाऊन पाहिले. त्या स्त्रीच्या कडेवर एक छोटं बाळ भुकेने व्याकुळ असलेलं तिने पाहिलं. त्या बाईने वर पाहिलं.' बाई थोडं पाणी देता का प्यायले'? लगेच तिच्या मुलीने तिला वर बोलाविले . तिला प्यायला पाणी दिले. एक गुच्छ विकत घेतला. आणि आईला म्हणाली, 'बघ, तुझी आठवी सुवासिनी आली तुझ्या दारात.'भर तीची ओटी'...' दे तिला पोटभर जेवण'.सुरेखाला आनंद झाला.
अगं ही नववी ओटी तशीच आहे. आता काय करायचं? सुरेखा मुलीला म्हणाली.
अगं तूच तर ती नववी सुवासिनी. स्त्री शक्ती तुझ्यातही आहेच की.
असे म्हणून त्या मायलेकींनी देवीचे चैतन्य शक्ती स्वरूप अंतःकरणात सामावून घेतले.


छाया राऊत बर्वे