Login

गोष्ट साडीची- भाग 1

.
"साडी आणि सासूबाईंना? अजिबात घेणार नाही.."

"आजकालच्या मुलींना काय करावं काही कळतच नाही, सासू जरा काही बोलली की आयुष्यभर ते कुरवाळत बसतात. अगं असं वागू नये बाळा, काहीही झालं तरी सासूबाई आहेत तुझ्या.."

वृषालीची आई वृषालीला समजावत होती. हे सगळं ऐकून वृषालीसुद्धा चिडली,

"आई तुला माहीत नसेल तर बोलू नकोस काही..उगाच भलतेसलते आरोप नकोत..लांबून काहीतरी बघून लगेच पारख करत जाऊ नकोस, तुला माहीत नाही माझ्यासोबत काय घडलं होतं ते.."

बोलता बोलता वृषालीचं मन भुतकाळात गेलं..

(भूतकाळ)

"वृषाली ऐक माझं, आई इतकी महागडी साडी नेसणार नाही"

"का नाही नेसणार आई? आजपर्यंत तुम्ही किंवा सासरेबुवांनी त्यांना दोन-तीन हजाराच्या वर साडी घेतलीच नाही"

"अगं आईलाच नाही आवडत एवढ्या महाग साड्या घ्यायला..ही तर सहा हजाराला जाईल.."

"आई तुमचा विचार करून नाही म्हणत असतील, पण त्यांना मनातून ईच्छा असेलच ना? ते काही नाही, यावेळी दिवाळीला आईंना हीच साडी देणार.."

"मी काय म्हणतो, ही साडी बघ..मोरपंखी रंगाची, त्याला गुलाबी काठ.. ही छान दिसेल आईला.."

वृषाली ती मोरपंखी रंगाची आणि गुलाबी काठाची साडी न्याहाळून बघू लागली. तिचं सूत, डिझाइन आणि रंग किमतीला अनुसरूनच हलका होता..याउलट तिने निवडलेली साडी आणि त्याचं सूत..प्युअर सिल्कसारखं मऊसूत होतं आणि त्याला शायनिंगही होती.

वृषाली आपल्या नवऱ्याला चांगलीच ओळखून होती, आधीपासूनच कंजूस स्वभाव..पैसे असले तरी नको तिथे खर्च करायचा आणि घरात आया बहिणींना काही घ्यायचं म्हटलं की काटकसर सुचणार. तरी बरं वृषाली कमावती असल्याने तिला स्वतःची हौस पूर्ण करण्यासाठी नवऱ्यापुढे हात पसरवावे लागत नसत.

वृषालीने नवऱ्याकडे पाहिलं, मग साडीवरील प्राइझ टॅग पाहिलं..बाराशे रुपयांची ती साडी बघून वृषालीला अंदाज आलाच की नवरा फक्त किंमत बघून ती साडी घ्यायचा आग्रह करतोय ते..

"मी माझ्या पैशांनी आईंना साडी घेतेय त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका..मी हीच साडी घेणार"

त्यांचा हा वाद दुकानदार बघत होता, तो हसून वृषालीच्या नवऱ्याला म्हणाला,

"अहो साहेब मॅडम म्हणताय तर घेऊद्या की, नशीबवान आहात तुम्ही.. तुमची बायको सासूला चांगली साडी घ्यायला आग्रह करतेय..नाहीतर इथे बायका येतात, स्वस्तातली साडी दाखवा म्हणत आणि त्या उचलून सासरी नेतात"

दुकानदाराच्या बोलण्याने वृषालीच्या नवऱ्याला बरं वाटलं, तो हसला आणि म्हणाला,

"चल घे पटकन, घरी ताई येणार आहे आज.."

"हो हो, ही साडी पॅक करा आणि बिल द्या.."

वृषालीने बिल दिलं, साडीची पिशवी घेतली आणि घरी जायला निघाली. घरी जाताच सासूबाईंना आनंदाने ती साडी दाखवली,

"आई, ही बघा तुमच्यासाठी साडी आणलीये.."

क्रमशः
0

🎭 Series Post

View all