चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(लघुकथा फेरी)
(लघुकथा फेरी)
शीर्षक : गोष्ट समांतर विश्वाची
आग्नेया झोपेतून काहीशी दचकून उठली. चेहरा घामाने ओथंबलेला होता. तिची प्रेयसी पर्णिका तिच्या जवळच बसून, तिचा हात हातात घट्ट पकडून डुलक्या देत होती. कदाचित नुकताच डोळा लागला असावा. आग्नेयाने पाण्याच्या प्याल्यासाठी धडपड केली तशी पर्णिकाला जाग आली. आग्नेयाला बघून पर्णिकाने तिला रडतच घट्ट मिठी मारली.
"अग्नि, तू ठीक आहेस ना? तुला त्रास होतोय का? मी डॉक्टरांना बोलावते आणि आई-बाबांनाही कळवते." पर्णिका आग्नेयाची काळजीने विचारपूस करत होती.
"नाही, नको. आपण इथून पळून जाऊ. ते लोक आपला जीव घेतील." आग्नेया थरथरतच बोलत होती.
"आग्नेया, काय झालं? कोण मारतील आपल्याला? आपण पळून का जायचं?" पर्णिकाने गोंधळून विचारले.
"अगं विसरलीस का? त्यांना आपल्याबद्दल कळलंय, ते आपल्या मागावर आहेत. त्यांना आपलं नातं मान्य नाही. माझं लग्न बळजबरी त्या गुंडाशी, त्या अजयशी करून देतील." आग्नेया म्हणाली. चेहऱ्यावर भीतीचे जाळे पसरले होते.
"अग्नि, शांत हो. असं काही होणार नाही. तुला वाईट स्वप्न पडलंय बहुतेक. असं काहीच होणार नाही. मी असताना कोण तुझ्याशी बळजबरी दुसरं लग्न करेल? आणि कोणाला घाबरतेय तू? आपलं नातं जगजाहीर आहे. तुझ्या घरून, माझ्या घरून, कायद्याकडून आणि देवा-ब्राम्हणांकडूनही आपल्या नात्याला विरोध नाही मग कोणता गुंड तुझ्यावर बळजबरी करेल बरं!" पर्णिका आग्नेयाची समजूत काढत शांतपणे बोलली आणि आग्नेयाला हळूहळू जाणीव झाली की ती तिच्या विश्वात परतली आहे.
तिने पर्णिकाला घट्ट मिठी मारली. पर्णिका तिच्या पाठीवरून सावकाश हात फिरवत होती. थोड्या वेळाने शांत झाल्यावर मिठी सैल करून आग्नेया बोलू लागली.
"तुला माहीत आहे, मी गेल्या आठवडाभरापासून पॅरलल वर्ल्डमध्ये फसले होते." आग्नेया रडतच म्हणाली.
"काय? काहीही काय बोलतेस? एक मिनिट, तुझ्या डोक्याच्या जखमेमुळे तर तू असं बोलत नाहीयेस? मी डॉक्टरांनाच बोलवते." पर्णिका आग्नेयाची जखम निरखून पाहत म्हणाली.
"आपल्या नात्याची शपथ, मी खरं बोलतेय." आग्नेया डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि पर्णिका शांत बसून ऐकू लागली.
"मला वाईट स्वप्न पडलं नव्हतं; पण ते जग एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं, निदान आपल्या नात्यासाठी तरी!" आग्नेया गंभीर स्वरात म्हणाली.
"म्हणजे? नक्की कसं होतं ते जग?" पर्णिकाने आग्नेयाचे अश्रू पुसत विचारले.
"तिथेही आश्विन शके १९४१ सुरू आहे; पण ते लोक सप्टेंबर २०२५ असा उल्लेख करतात. हा एवढासाच फरक नाही तिथे, तर तिथल्या लोकांचे विचारही खूप वेगळे आहेत अगं... म्हणजे आपल्या नात्याला कायद्याचं रक्षण आहे, पोथी-पुराणाचं रक्षण आहे; पण तिथे पालक आणि समाज खोट्या इभ्रतीकरिता स्वतःच्या लेकरांचा आनंद हिरावून घेतात. आपल्यासारखी नाती तिथे समाजासाठी घातक मानली जातात. आपल्यासारख्या लोकांना एकतर बहिष्कृत केलं जातं किंवा बळजबरी होमोसेक्शुअल्सचं हेटरोसेक्शुअल्सशी लग्न करून दिलं जातं." आग्नेया एकेक पैलू सांगत होती आणि पर्णिकाचे डोळे ते ऐकून विस्फारत होते.
"बाप रे! काय हे!" पर्णिकाला आश्चर्याचा धक्काच बसला.
"हो ना! इकडे माझा अपघात झाला आणि कदाचित काही दिवसांसाठी माझी आत्मा तिकडच्या जगात व तिकडच्या जगातल्या आग्नेयाची आत्मा इकडे स्थानांतरित झाली. या एका आठवड्यात खूप काही अनुभवलं मी तिथे. अगदी नकोसा जीव झालेला!" आग्नेयाने परत घाबरून मिठी मारली पर्णिकाला.
"ए मग तिथे पर्णिकाही होती असेल ना? तू तिच्यासोबत..." आग्नेयाची भीती दूर करण्यासाठी पर्णिकाने तिचे लक्ष वळवले.
"काय हे? मी तुला सांगतेय काय आणि तुझं लक्ष कुठे आहे?" आग्नेया वैतागून तिच्या मिठीतून बाहेर पडत म्हणाली. पर्णिका नाटकी रुसली.
"नको नाराज होऊ, आमच्यात तसं काही झालं नाही. म्हणजे पुढाकार तर घेतला नाहीच आम्ही; पण असल्या गोष्टी करण्यासाठी ना वेळ होता, ना संधी." पर्णिकाला नाराज बघून आग्नेयाने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
"म्हणजे?" पर्णिकाने गोंधळून पाहिले.
"अगं त्या आग्नेयाने समाजाला घाबरून, घरच्यांना कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता कदाचित. मला तिकडे शुद्ध आली तर पर्णिका वगळता कोणाला फारसा आनंद झाला नाही. बाबांना तर माझ्या लग्नाची काळजी होती आणि लग्न माझं पर्णिकाशी नव्हे तर अजयशी होणार होतं. आईच्या डोळ्यात थोडी काळजी दिसत होती माझ्यासाठी; पण तिच्याकडे कोणते अधिकार नाहीत, कारण तिथे पितृसत्ताक संरचना आहे. घरातील पुरुष जे म्हणेल तेच होईल, असं काहीसं..." आग्नेया म्हणाली.
"काय सांगतेस! आपल्याकडे तसं नाही. मातृसत्ताक संरचना आहे; पण स्त्री-पुरूष दोघांनाही मत व्यक्त करण्याची परवानगी आहे." पर्णिकाला त्या समांतर विश्वाच्या चालीरिती ऐकून आश्चर्यच वाटत होते.
"हो खरंच! आपलं जग खूप चांगलं आहे. तिथे कसंबसं करून आई-बाबांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, सांगितलं की माझा आनंद पर्णिकाशिवाय इतर कोणात नाही. जर त्यांनी माझं नि पर्णिकाचं नातं स्वीकारलं नाही तर मी परत आत्महत्या करेन आणि देव वारंवार कोणालाही संधी देत नाही. त्यांना त्यांची लेक हवी असेल तर त्यांनी माझ्या नि पर्णिकाच्या नात्याला स्वीकारावं. हे सगळं म्हणाले मी..." आग्नेया बोलत होती की मध्येच पर्णिका तिच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली.
"तुला काय मला सोडून त्या पर्णिकाशी दुसरं लग्न करायचं होतं का?" पर्णिकाने गाल फुगवून विचारले.
"अगं वेडे, तिकडच्या जगातल्या पर्णिका आणि आग्नेयाचं आयुष्य सुरळीत असेल तरच मी इकडे परत येऊ शकणार होते ना! नाहीतर मी सरळ त्या आग्नेयाच्या देहासकट मेले असते की..." कपाळावर हात मारत आग्नेया म्हणाली.
"अरे हो, माझ्या लक्षातच आले नाही." जीभ चावत पर्णिका म्हणाली.
"नशीब! ती पर्णिका तरी हुशार आहे." नकारार्थी मान हलवत आग्नेया म्हणाली.
"तू तिकडे काय झालं ते सांग, त्या पर्णिकाची जास्त वाहवा न करता..." पर्णिका आग्नेयाच्या गळ्यात हात गुंफून काहीशी गाल फुगवून म्हणाली.
"आई-बाबांचं मन पाघळलं आणि त्यांनी समाजाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. माझं लग्न अजयशी ठरलं नव्हतं तर त्याने बळजबरी नातं लादलं होतं. त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात जाणं म्हणजे वाघाला मिठी मारण्यासारखं होतं; पण लेकीसाठी आई-बाबांनी त्यांचे प्राण पणाला लावले. त्यांनी एक योजना आखली. हृदय हेलावणारे पत्र मला लिहायला सांगून अर्ध्या रात्रीच कोणाला काही कळू न देता पर्णिकाबरोबर दूर विदेशात पळून जायला सांगितलं. बिचाऱ्यांना एक मिठीही मारता आली नाही आपल्या लेकीला. खूप हतबल होते ते; पण त्यांना हेही भासवायचं होतं की ते सगळ्या प्रकारापासून वरपक्षाप्रमाणेच अनभिज्ञ आहेत. सगळी योजना काटेकोर होती; तरीही कशीतरी त्यांना कल्पना आली आणि तो माझा न झालेला नवरा— अजय आमचा पाठलाग करत विमानतळापर्यंत आला. अख्खे विमानतळ हादरून गेले होते, त्याच्या चरणस्पर्शाने. त्याला मी दिसले आणि तो मला शूट करणार तोपर्यंत मी फ्लाईटमध्ये बसले होते, तरीही त्याने हवेत गोळीबार केलाच. त्यानंतर पोलीस आले आणि त्याला अटक करून घेऊन गेले. मी आणि पर्णिका अंततः निश्चिंतपणे विसावलो. दुसऱ्या क्षणी मी डोळे उघडले तर इथे आपल्या जगात होते." सुटकेचा श्वास घेत आपबिती सांगून आग्नेया परत पर्णिकाला बिलगली.
"एवढंही वाईट नाही गं ते जग! त्या जगातल्या आग्नेया आणि पर्णिका सुखरूप त्या चक्रव्यूहातून बाहेर पडल्याच ना! त्यांनी तर नवीन आयुष्य सुरू केलेही असेल एव्हाना..." पर्णिका त्या घटनेची दुसरी बाजू प्रकाशझोतात आणत म्हणाली.
"हो; पण हे पर्णिका आणि आग्नेयाच्या बाबतीत घडलं, इतरांचं काय? आग्नेयाच्या आई-बाबांनी समजूतदारपणा दाखवला, म्हणून आग्नेया आणि पर्णिका एकत्र आल्या; पण आई-बाबा आपल्याच हट्टावर ठाम असते तर आग्नेयाचे लग्न त्या अजयशीच झाले असते किंवा मग आग्नेया आणि पर्णिकाने एकत्र जीव दिला असता, कारण तिथे कायदा, पोलिस यांच्यापेक्षा पैशांना जास्त मान आहे. श्रीमंतीनुसार न्याय केला जातो. अक्षरशः श्रीमंतीचे बळ दाखवून संन्याशाला फाशी दिली जाते आणि दुष्टांना कायद्याचे रक्षण मिळते. पालकांना पाल्यांना द्यायला वेळ नाही. म्हातारी वडीलधारी माणसे घरात राहत नसून त्यांच्यासाठी वृद्धाश्रमात सोय केली जाते. गुरूंनाच सर्वसमावेशक ज्ञान नाही, विद्यार्थ्यांना गुरूंचा आदर नाही. भारतीयच असून पाश्चात्यीकरणाचे धडे गिरवतात. लोकशाही तर आहे; पण जनतेचे शोषण दररोज होते. राष्ट्राची अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या चढाओढीत महागाईने शिखर गाठले आहे. शासकीय क्षेत्र असो वा वैद्यकीय क्षेत्र भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्रात होतो. गरिबीतून पुढे आलेला व्यक्तीही श्रीमंत झाल्यावर दानधर्म करत नाही. श्रीमंतांना तर आणखी श्रीमंत होण्याची भूक आहे. मुक्या प्राण्यांची अमानुषपणे कत्तल केली जाते. पुस्तके ग्रंथालय वा घरात कमी आणि रद्दीच्या दुकानात जास्त असतात. तिथल्या जगातले शेतकरी कधी उपासमारीने मरतात, कधी कर्जाच्या डोंगराने मरतात; पण शासनाद्वारे नुकसान भरपाई काही केल्या मिळत नाही. सुशिक्षितांना शेती करावीशी वाटत नाही. काही सुशिक्षित शेतकरी आहेत, झुंज देत आहेत; पण मानवच पर्यावरणाची विल्हेवाट करत असल्याने निसर्ग आणि पाऊसही ऐनवेळी हुलकावणी देतो. एकेकाळी प्रगत संस्कृतीने नटलेल्या तिथल्या भारत राष्ट्राची अशीच दयनीय अवस्था आहे सध्या." एका आठवड्यात आग्नेयाने त्या समांतर विश्वात जे काही अनुभवले ते सर्वकाही सांगून प्याल्यातले पाणी पिऊन ती शांत बसली.
"अरेरे! खूप काही विपरित घडतं गं तिथे!" पर्णिका आग्नेयाच्या हातातला रिकामा प्याला बाजूला ठेवत म्हणाली.
"ह्म्म; पण काही चांगल्या गोष्टीही आहेत. परिवर्तन घडत आहे तिथे सातत्याने. अनेकजण भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहेत, न्यायासाठी झटत आहेत. प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजून जिवंत आहे." आग्नेयाने दुसरी बाजू सांगितली.
"झालं तर मग! म्हणजे वेळ लागेलच गं; पण एक दिवस त्या जगाचीही रूपरेषा बदलेल आणि तिथल्याही लोकांचे विचार आपल्या जगातील लोकांप्रमाणेच प्रगत होतील. तिथेही सुख, समृद्धी आणि संपत्ती नांदेल. कायदा, पोलीस आणि न्यायव्यवस्था पिडीतांची बाजू घेईल आणि एक दिवस श्रीमंतांची नव्हे तर कष्टकऱ्यांची सत्ता राहील. लोकशाही नाममात्र न राहता खऱ्या अर्थाने नावारूपाला येईल. शेतकऱ्यांना मान-सन्मान मिळेल. प्राण्यांची भाषा लोक समजून घेतील. प्रेमाला कशाचेही बंधन नसेल, अगदी लिंगाचेही नाही." पर्णिका आश्वस्त स्वरात म्हणाली.
"असं झालं तर किती भारी ना! पण नक्की होईल ना असं?" आधी आग्नेया खूश झाली; पण लगेच केविलवाण्या स्वरात साशंकपणे तिने विचारले.
"का नाही? तूच म्हणालीस ना तिथे प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजून जिवंत आहे, तर जिथे या दोन गोष्टी शिल्लक आहेत तिथे प्रगती, परिवर्तन आणि प्रबोधन नक्कीच होईल." पर्णिका आग्नेयाच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली. पर्णिकाचे आश्वस्त शब्द ऐकून आग्नेयाची कळी लगेच खुलली.
समाप्त.
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा