गृहीत ( भाग एक )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
तुझ्या विषयी माझी काहीच तक्रार नसावी किंवा ती असावी असं तू कधी वागलाच नाही हे तू तूझ्या मनाशी पक्क ठरवूनच टाकलं आहे. त्या मूळे माझी घुसमट तुला कधी समजणारच नाही. तू जे काही वागत होतास ते सर्व माझ्या सुखासाठी करत होतास अशी तूझी पूर्ण खात्री होती. मान्य आहे मला हे सर्व. तू संसारासाठी खूप कष्ट उपसलेस. त्यासाठी रात्रंदिवस काम करत बसायचा. पण कधी माझा विचार केलास का रे कधी की मला पैसा हवा होता की तुझा सहवास. मला पैशाने सुखी करता येईल, आनंदी ठेवता येईल अशी तूझी बालीश बुध्दी. एका शब्दात सांगायचं झालं तर निव्वळ पोरकटपणा.
तसा विचार केला तर तुझ आणि माझं शिक्षण सारखंच. किंबहूना एकाच क्षेत्रातले आहोत, त्या मूळे तू मला समजावून घेशील अशी अपेक्षा होती माझी. आपण दोघंही करीअर ओरिएंटल असल्याने तसं प्रेमात पडण्याचं आपलं वय नव्हतच. विचारही नव्हता. भावने  पेक्षा आपण जास्तच प्रॅक्टीकल होतो असं नाही का तुला. पण तूझ्या घरात तू आणि मी दोघच असणार नव्हते ही गोष्ट माझ्या नजरेआड कशी झाली होती मलाच कळतं नाही.
आपण दोघंही एक घर करून राहणार आहोत. जसा तू कामावर जाशील तशी मी देखील कामावर जाईल. आपण दोघंही संध्याकाळी घरी येत जावू. मग संध्याकाळच्या संधिप्रकाशात चहा घेत घेत निवांतपणे दिवसभर काय काय घडले या बद्दल बोलतं जावू. अर्थात मला तूझ्या आईवडिलांची जबाबदारी टाळायची नव्हती. हे मी तुला कितीही तळमळीनं सांगितलं तरी खरं वाटणारं नाही. पण आता मी माझ्या मनाला जास्त महत्व देते.
तशाही माझ्या फार अवास्तव अपेक्षा आयुष्या कडून नव्हत्याच. तरी त्या देखील पूर्ण होवू नयेत. ज्या गोष्टी इतरांना सहज सुलभ प्राप्त होतात त्या आपल्याला दुर्मीळच नव्हे तर अशक्यच होवून जातील अशी कल्पना देखील मी तुझ्याशी लग्न करतांना केलेली नव्हती.
कारण तुझ्या इतकंच बरोबरीत शिक्षण घेतलेली मी एक एकविसाव्या शतकातील सुशिक्षीत स्त्री होते. खरं म्हणजे मुलगीच म्हणणार होते. पण लग्नानंतर मुलीचं रूपांतर स्त्री मध्ये इतक्या नकळत होवून जाते की तिचं तिलाही ते कळतं नाही. मी देखील या गोष्टीला अपवाद नव्हते. कधी बालपण संपल, कधी तारुण्य आलं, कधी सासुरवाशीण झाले काही म्हणता काही कळलंच नाही.
लग्नही झटपट झालं. अगदी शिक्षण संपलं, चांगले मार्क असल्यामुळे कॅम्पस मधून चांगल्या पॅकेजची नोकरी पण पटकन लागली.
सगळं आयुष्य कसं सुंदर होऊन गेलं. आपल्या शिक्षणासाठी आई-वडिलांना ज्या ज्या गोष्टींचा त्याग करावा लागला होता त्या सगळ्या गोष्टींची भरपाई आपण करून द्यायचं असं मी ठरवलं होतं. पण तुमच्या घरून लग्नासाठी तिसऱ्या माणसा कडून विचारण्यात आलं आणि दुसरा काही विचार करायला विचारच मिळाला नाही. या सगळया गोंधळात आपलं आयुष्य मुक्तपणान जगायचंच राहून गेलं.
शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळावे म्हणून त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जीवघेणे प्रयत्न करून रात्र रात्र जागून अभ्यास करावा लागायचा. अर्थात त्या वेळी पहिला येण्याचा आनंद काही वेगळाच असायचा. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सगळ विसरून जायला व्हायचं. दहावी नंतर तर जीवघेणी स्पर्धा सुरु झाली. मला मराठी लिटरेचर घेवून लेक्चरर व्हायचं होतं. जमलं तर गायनाचा आणि नृत्याचा क्लास करायचा होता.
पण माझ्या ईच्छांपेक्षा आई बाबांची स्वप्न जास्त महत्वाची होती. शेवटी मी माझ्या ईच्छेपेक्षा आई बाबांच्या ईच्छांना जास्त महत्व दिलं आणि इंजिनिअरिंगला एडमिशन घेतली. बघता बघता असेटमेंट्स, शिटस, टूटोरियल, सततच्या परीक्षा यात चार वर्ष कशी निघून गेली कळलच नाही. सामान्य मुलीच्या आयुष्यात नटण मुरडण अश्या ज्या काही गोष्टी असतात त्यांचा तर मी कधी विचारही करत नसे.
कॅम्पस मधून निवड झाली आणि मला वेगळेच पंख फुटल्याचा आनंद झाला.
कसा बसा एक दीड महिना झाला असेल, तुमचं स्थळ सांगून आलं आणि ध्यानी मनी नसताना तुमच्याकडून होकारही आला. माझ्या होकारापेक्षा तुझा होकार जास्त महत्वाचा होता.
परिस्थीती नुसार वाहात जाणे या शिवाय माझ्यापुढे दुसरा कोणताच पर्याय नव्हता.
शेवटी एका शुभ मुहूर्तावर आपलं लग्न झालं.

( क्रमशः )

🎭 Series Post

View all