गृहीत ( भाग दुसरा )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
लग्नानंतर आपलं आयुष्य ईतक्या वेगाने कलाटणी घेईल असं कोणी मला सांगितलं असतं तर या गोष्टीवर मी कधी विश्वासचं ठेवला नसता. आई वडीलांना सोडून राहणं. अचानक सगळ्या नव्या गोष्टींना सामोरं जाणं. किती कठीण गोष्ट असते ते तुला कसं समजणार ? अगदी गळ्यात एखाद्याच्या नावाने मंगळसूत्र बांधल्याबरोबर आणि त्याच्या नावाने कपाळावर कुंकू लावल की नावागावा सकट मागचं सगळं बदलून जावू शकत याची मी कल्पनाच केलेली नव्हती.
अगदी लग्नातलीच गोष्ट होती ती. बघ आठवते का तुला ? मी तुमच्या घरातली पहिली सून म्हणून माझं नाव बदलायलाच हवं, असं कोणीतरी म्हटलं. लगेच दुसऱ्या नातेवाईकांनी त्या गोष्टीची री ओढली. मग तुला मॅच होईल असं साजेस माझं नाव बदललं गेलं. लगेच साखरेची वाटी घेवून ते बदलेल नाव तू सगळ्या नातेवाईकांना साखर वाटतं सांगत सुटला. यात मला काय वाटंत या गोष्टीला काही किंमतच नव्हती. ठेवलेलं नाव तरी माझ्या आवडीच आहे का ? मला आवडलं आहे का , याचीही कोणी तसदी घेतली नाही.
अचानक मला कधीतरी वाचलेली एक गोष्ट आठवून गेली. माणसाला त्याचं नाव अत्यंत प्रिय असते.कितीही पैसा दिला तरी कोणीही माणूस सहजा सहजी आपलं नाव कधीचं बदलवून घेतं नाही असं साधू एका श्रीमंत माणसाला सांगतो. तर श्रीमंत माणूस पैशाने काहीही करता येते असं सांगून एका गरीब माणसाला तू नाव बदलल्यास मी तुला दहा डॉलर देईल असं सांगतो. पण तो माणूस नकार देतो. तो माणूसही जिद्दीला पेटतो.त्या नंतर मिळेल त्या माणसाला हवी ती रक्कम देवून नावं बदलवणाऱ्या माणसाचा शोध घेत बसतो. पण ते शक्यच होत नाही.
अर्थात ही गोष्ट आठवण्याची ही वेळ नव्हती. पण सहज आठवून गेली. ईथ माझ्या नावाची पाटी मी किती अलगद पुसून टाकली होती. आणि उलट त्या बद्दल साखर वाटली होती.

या सगळया गोष्टीत माझं शिक्षण, माझी नोकरी या कोणत्याही गोष्टीला काहीही किंमत नव्हती.  यांत्रिक पणाने मी सगळ्या न समजणाऱ्या, बुध्दीला न पटणाऱ्या क्रिया करत होती. मी हे का करत होते तेही मला समजत नव्हतं. आत्याच्या पाया पडल्यावर तिने तर , नशीब काढलंस पोरी म्हणत माझ्या कानावरून बोटं मोडली. मला तशा जास्त मैत्रिणी कोणी नव्हत्याच. त्या मुळे व्यक्तिगत ओळखीचं असं माझं कोणी नव्हतच. माझ्याच कित्येक नातेवाईकांना मीच पहिल्यांदा पाहत होते. ते सगळे लग्नाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे गप्पा मारत एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटत होते. जीच्या जीवनाचा हा सोहळा होता ती मी मात्र एखाद्या शोभेच्या बाहुली सारखी यांत्रिक पणाने सगळ्या गोष्टींना सामोरी जात होते.
अगदी लग्नात म्हटले जाणारे, न समजणाऱ्या भाषेत उच्चारले जाणारे ते पवित्र मंत्र, सगळ काही अनोळखी होतं. मी जे शिक्षण घेतलेलं होतं ते असं नव्हतं. एखादी गोष्ट समजली नाही तर पुनः पुनः विचारण्याला परवानगी होती. पण ईथ तो प्रश्नच नव्हता. माझं एक सोड, पण ईतक शिक्षण घेतलेला तू देखील माझ्या सारखाच ब्लँक होवून सगळया गोष्टी पार पाडत होतास या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटत होतं.
अखेर लग्न आटोपलं. लग्नानंतर पूजा आटोपली. पाहुणे घरोघरी गेले.
नवरा बायको ही संसाराची दोन चाकं आहेत. पण ती समांतर चालतात की सायकलच्या चाकांसारखी मागे पूढे चालतात. माहीत नाही. समांतर तर नक्कीच नसावीत. असली तर सायकलच्या चाका सारखी असावीत. एका चाका मागे दुसरे चाक धावते तशी. आपण कोणत चाक आहोत याचं उत्तर अगदी सोप्पं होतं. मागे धावणार. पुढच्याच्या गतीनुसार धावणार. पुढचं थांबल की आपोआप थांबणार.
तू ठरवलं माझं नावं बदलावायच. मी बडलवल. आडनाव तर आपोआपच बदललं. गाव बदलल. घर बदललं. एका लग्नाने एव्हढ्या गोष्टी बदलतील अशी मला कल्पनाच नव्हती. कुठं तरी एक हुळहुळता प्रश्न डंख मारत होता. लग्न माझं एकटीच नव्हतं झालं तुझं देखील झालेलं होतं. मग सगळे बदल माझ्याच बाबतीत का ? मी आमूलाग्र बदललेली. तू मात्र जसाच्या तसा. मी संसाराच्या दडपणाने काहीशी भांबावलेली तर त्याच्या उलट तू मात्र जास्तच फुललेला.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all