गृहीत ( भाग तिसरा )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
लग्नाचा दुसरा दिवस. आदल्या दिवसाचा शारीरिक आणि मानसिक खूप थकवा आलेला होता. कामावर जायचे नव्हते. तू लोळत पडला होतास म्हणून मी पण लोळत पडली होती. सहज मनात विचार येत होता, कसा बर आयुष्यात असा अचानक बदल आपण घडवून घेतला.
लग्नाच्या आधी तू मला बऱ्याच वेळा भेटला होतास. आपल्या खूप गप्पा देखील व्हायच्या, पण त्यात चोरून भेटण्या इतपत थ्रिल वाटण्यापेक्षा पुढे येणाऱ्या आयुष्याला कसं सामोर जायचं याबद्दलच आपल्या गप्पा चालायच्या .अर्थात तू फार नीरस होता असं नव्हे, परंतु मलाच माझी आई वडील वडिलांबद्दलची काळजी आणि विचार पूर्णपणे मुक्त वागू द्यायचे नाही.
जसा तू तुझ्या आई-वडिलांसाठी  एकुलता एक होतास तशीच मी देखील माझ्या आई-वडिलांसाठी एकुलती एक होती. माझ्या नंतर त्यांचं काय होणार ,याची मला खूप चिंता लागून राहायची.
मला थोडा देखील उशीर झाला की वारंवार फोन करून स्वतःला त्रास करून घेणारे आणि मला देखील त्रास देणारे बाबा मला आठवायचे. कधी आईला बरं नसलं तर कामावरून आल्या आल्या मी गरम गरम खिचडी करून तिला खाऊ घालायची. पण आता मी गेल्यानंतर त्यांचं कसं होणार याची मला काळजी वाटायची.कारण बाबांना स्वयंपाक घरातलं काहीच येत नसे .इतकंच नव्हे तर त्यांना वस्तू देखील कुठे ठेवलेल्या असायच्या ते देखील माहित नव्हतं. इतके ते माझ्यावर आणि आईवर अवलंबून होते. मी आणि माझे आई-बाबा एवढेच आमचं छोटसं विश्व होतं.
माझा त्यांना प्रचंड अभिमान होता आणि आता तर काय , मी नोकरीवर लागल्यामुळे काय करू आणि काय नाही असं त्यांना होऊन जात असे. त्या गोंधळात माझं लग्न ठरल्यामुळे त्यांच्या आनंदाला तर पारावरच उरलेला नव्हता. परंतु मी गेल्यानंतर त्यांचं काय होईल याबद्दल त्यांनी काही विचारच केला नव्हता. मी या बाबतीत तुझ्याशी बोलली देखील होती .अर्थात ते बोलणं बालिशच होतं म्हणा. मी म्हणाले, खरंच रे ही समाज पद्धती बदलायला हवी.  जसं मुलीने सुनेने आपल्या सासू-सासर्‍यांना आई बाबा म्हणावं अशी त्यांची इच्छा असते तसंच जावयाने देखील आपल्या सासू-सासर्‍यांना आई-बाबा म्हणावं, नुसतच म्हणू नये तर त्यांची तसेच काळजी आणि जबाबदारी देखील घ्यावी अशी अपेक्षा मुलीने ठेवली तर त्यात काय वावगे आहे ? यावर तू नुसताच हसलास. मी तर पुढे म्हणाली देखील ,"नुसता हसू नकोस. मला तर असं वाटतं की जसं मुलींनी सासरी जावून राहावं. त्यांच्यातलाच एक होऊन जावं अशी अपेक्षा असते ना ? तसेच वेळ आली तर मुलांनी देखील सासरी जायला हवं. तिथल्या रीती भाती शिकून घ्यायला हव्यात . तिच्या आई-वडिलांना जपायला हवं."
" अगं मग त्यासाठी खरं तर घर जावईच व्हायला हवं" "मग व्हावं ना. त्यात काय कमीपणा आहे? "मी देखील हट्टाने म्हणाली.
"वेडी आहेस अगदी. अगं वेडाबाई काळजी करू नकोस. तुझे आई बाबा देखील माझ्या आई बाबा सारखे आहेत मी देखील त्यांची पूर्ण काळजी घेईल. काळजी करू नकोस."
"खरं सांगू का मला इतक्यात अजिबात लग्न करायचं नव्हतं. माझ्यावरती आई-वडिलांचे जे काही कर्ज होतं ते मला अगोदर चुकतं करायचे होते."मी काळजीने म्हणाली.
"उगाच काळजी करतेस मी आहे ना"असतो म्हणालास काय उशीर झाला म्हणून मी घराकडे जायला निघाली घरी गेल्यानंतर आई-बाबांचं तेच, "जावई काय म्हणाले स्वभावाने कसे आहेत ?"आता मी त्यांना काय सांगणार?
आणि उद्या पूजा आहे. नंतर कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं. नंतर तू ठरवल असशील तिथे हनीमूनला.
किती सहज मी कुलदेवता पण बदलवली होती. कुठल्या भावना अन कुठलं काय, एखाद्या मशिनी सारख्या माझ्या कडून यांत्रिक गोष्टी होत होत्या.
अखेर तो दिवस उजाडला. आपण थंड हवेच्या ठिकाणी जायला निघालो.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all