गृहीत ( भाग चवथा )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
त्या रात्री तू किती चिडला होतास. तुझ्यावर भाळून मी काही प्रेमविवाह नव्हता केला रे. थोडं तू समजावून घ्यायला हवं होतं. अगदी लहापणापासून परपुरुषाला स्पर्श करण्याची बंदी असतांना, अगदी शाळेत देखील गुड टच, बॅड टच शिकवलेल असताना, सगळ्या गोष्टी तुला वाटतील तशा सहज सुलभ होतील अशी अपेक्षा तू ठेवलीच कशी ? ईतक्या वर्षाचे संस्कार ईतक्या सहज गळून पडतील असं वाटलं तुला ? मला वाटलं होतं तू तरी निदान मला समजावून घेशील. नाव-गाव, घर-दार, आई वडीलां सकट सगळे नातेवाईक सोडून मी तूझ्या सोबत आले. ते फक्त या शरीर सुखा साठीच का? मान्य आहे ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. फक्त सैल व्हायला मला थोडा वेळ हवा होता.
पहील्याच रात्री तू नाराज होवून पाठ फिरवून निजून गेलास. मला माहीत होतं की तू झोपलाच नव्हता, कारण मी देखील जागीच होती रे. दुसऱ्या दिवशी माझ्या संकोचाचा तू किती विचित्र अर्थ काढलास. त्या वेळी मला मनसोक्त रडावसं वाटलं. तू म्हणालास,
" तुझ्या मनाविरुध्द लग्न केलस का ग तू ?"
मी तर चकितच झाले.मी काय ऐकते आहे तेचं मला समजेना. काय सांगावं आणि कसं समजवावं तुला. मी कितीही जीव तोडून तुला सांगितलं असतं तरी तुला ते समजलं नसतं. फक्त स्वतःपूरती जग असणारा तू .तुला माझं दुःख कसं कळणार ? अरे अगदी लहानपणापासून एकदा देखील मी माझ्या आई-वडिलांपासून कधी दूर राहिली नव्हती. एकदाच शाळेत असताना एकदाच मी सगळ्या मुलींसोबत ट्रीपला गेली होती. त्यावेळी मला घेण्यासाठी आई आणि बाबा दोन तास अगोदर पासून शाळेमध्ये माझ्या बसची वाट बघत होते. आई-वडिलांपासून दूर होण्याचं  दुःख तुला मी कसं समजावून सांगू ? मान्य आहे काळानुसार ,वयानुसार शरीराच्या, मनाच्या मागण्या बदलत असतात .नवीन नवीन भावना मनात येत असतात. परंतु याचा अर्थ असा तर नव्हे ना की त्यासाठी सगळ्याच संस्कारांचा बळी द्यावा.
तुला मी फार जुनाट विचारांची वाटत असेल पण तसं नाही रे ?  कितीतरी जुनाट आचार विचारांना मी विरोध करते. पण काही शाश्वत गोष्टी असतात त्या जग किती पुढारल ,पुढे गेलं तरी देखील बदलत नसतात.
तू समजतोस तशी मी कठोर नाही. मला देखील भावभावना आहेत. मी देखील खूप प्रेमळ आहे. मला फक्त थोडासा वेळ लागेल तुझ्याबद्दल माझ्या मनात विश्वास निर्माण होण्यासाठी मला फक्त थोडासा वेळ लागेल.
हे सगळं सांगण्याची माझ्याजवळ हिम्मत नव्हती. त्यामुळे हे सगळं मनातच वादळ सुरू होत. अर्थात पूर्णपणे निराश होऊन जसे होतो तसेच आपण घरी परत आलो. कोणाला काही तसं त्याचा पत्ता देखील लागला नाही. नंतर आपलं रुटीन नेहमीप्रमाणे सुरू झालं.
हळूहळू तुझा स्वभाव मला कळायला लागला. तुला देखील माझा स्वभाव समजायला लागला. नकळत मी तुझ्या मध्ये गुंतत गेली. आपण दोघे दोघेही सकाळीच डबा घेऊन कामावर जात असू. घरी मला तशी कामाची सवय नव्हती. तो दोष आईचा नव्हता. उलट मला स्वयंपाक करायला आणि निरनिराळे पदार्थ करून पहायची आवड होती. पण केवळ माझ्या काळजी पोटी, मी थकलेली असेल या विचारांनीच ती मला काम करू देत नसे. घरी आल्याबरोबर माझ्या हातात गरम गरम चहाचा कप ठेवत असे.
पहील्याच दिवशी तू आणि मी दोघंही सोबत घरी आलो. दोघेही थकलेलो होतो. पण सासूबाईंनी मला गोड आवाजात चहा ठेवतेस का असे विचारले. कुठेतरी काळजात कळ आली. मला का कुणास ठाउक खूप थकल्या सारखे वाटत होते. थोडावेळ पडून राहावे असे वाटले. पण ते शक्य नव्हते. मी सासुरवाशीण होते. नाईलाजाने हातपाय धुवून मी चहा ठेवायला घेतला.
" बाई मी खूप थकली आहे ग. असं वाटतं रोज कुणीतरी आपल्याला आयत खायला घालावं. त्या पटवर्धन बाई बघ ना किती नशीबवान आहेत. त्यांची सून त्यांना फुलासारखं जपत असते. " कुठल्या कोण पटवर्धन बाई आणि त्यांची सून यांची माझ्याशी तुलना करून त्यांना काय सुचवायचं होतं तेचं मला समजेना. मी त्यांना म्हणाले, " अहो आई, त्यांची सून कामावर जात नसेल कदाचित. "
" बाई तू पण नको जावूस ना. आपल्याला काही गरज नाही. "
" अहो पण माझं शिक्षण ?" मी तळमळीनं म्हणाले.
" अग बाई, घरात येतांना शिक्षण वगैरे बाहेरच ठेवून येत जा बरं " सासूबाईंचा आवाज ईतका विचित्र येत होता की मला त्या अचानक वेगळ्या वाटायला लागल्या.
बर झालं तू तेंव्हा घरात नव्हतास. मी कारण नसतांना उदास झाली होती. कशातच मन लागत नव्हत. मी तुला विचारून दोन चार दिवसा साठी माहेरी आले. तू सोडायला आला होता. तू गेल्यावर मला आईच्या गळ्यात पडून रडावस वाटलं. उगाच तिला वाईट वाटू नये म्हणून मी काहीच बोलली नाही.
" अग, स्त्रीचं आयुष्य असच असतं. शेवटी तेचं तुझ खरं घर. तू सूखी असली की आम्ही सुखी राहू. " आईचा उपदेश सुरूच होता.
पुन्हा माझं रूटीन सूरू झालं. आणि एकदिवस अचानक....

( क्रमशः)

🎭 Series Post

View all