गृहीत ( भाग पाचवा )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
एक दिवस अचानक ऑफीस मध्ये मला कारण नसतांना ईतकी मळमळ झाली की मला काही समजलच नाही. पण ऑफीस मधल्या काही चाणाक्ष बायकांना लगेच लक्षात आलं. मी कसाबसा तुला फोन केला. अर्थात तुलाही खूप आनंद झाला होता. संध्याकाळी घरी जातांना आपण प्रेग्नांसी किट घेवून गेलो. मला खूप आनंद होत होता. एका देहात दुसरा देह निर्माण होत होता. किती रोमांचकारी घटना होती ही. एक वेगळेच पंख फुटल्या सारखं वाटतं होतं. लग्न होवून अवघा दीड महिना देखील झालेला नव्हता तेव्हढ्यात परमेश्वराने माझ्या ओटीत कसली सुखाची ओंजळ भरभरून रिकामी केली होती. पण नक्की झाल्या खेरीज कोणालाच सांगायचं नाही असं आपण ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या किट वर लाल भडक दोन ठळक रेषा दिसल्यावर आपला आनंद गगनात मावेनासा झाला होता.
दोन दिवसांनी तूझ्या आईचा वाढदिवस होता. तेंव्हा त्याच दिवशी तिला आपण ही आनंदाची बातमी द्यायची असं आपण ठरवल होत. त्या दोन दिवसात माझ्या मनात कितीतरी स्वप्न त्या येणाऱ्या बाळाभोवती विणली गेली होती. ती बातमी ऐकल्यावर तुझ्या आईला किती आनंद होईल, त्यावेळी तिचा चेहरा कसा दिसेल याची आपण कल्पना करत असायचो.
आणि मला तो दिवस लक्ख आठवतो. त्या दिवशी संध्याकाळी आपण दोघेही कामावरून एकत्र घरी परत आलो. येताना आईसाठी केक घेऊन आलो होतो. त्या केकवर "हॅपी बर्थडे आजी "असं लिहिलं होतं. आपण दोघेही आनंदात घरी परत आलो.
संध्याकाळी वाढदिवसाची तयारी केली आणि आईला सरप्राईज म्हणून केक दाखवला केक वरचं हॅपी बर्थडे आजी अशी अक्षर वाचल्यावर आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसायच्या ऐवजी चिंतेच जाळं पसरलेलं दिसलं एक भलं मोठं प्रश्नार्थक चिन्ह तिच्या चेहऱ्यावरती पसरलेलं होतं. खरं की काय तिने त्या स्वरात विचारलं त्यामधून तिला या गोष्टीचा अजिबात आनंद झालेला नाही हे दिसून येत होतं.
"हे बघ रे बाबा या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच विचार करून ठरवा माझ्या एकटी कडून आता तुमची मुलं सांभाळणं वगैरे गोष्टी होणार नाही तुम्ही तुमच्या भरोशावर जे काही करणार असेल ते करा माझ्याकडून अजिबात धगधग होणार नाही नंतर म्हणू नका की मी तुम्हाला आधी सांगितलं नव्हतं हे ऐकल्यानंतर पुढच्या सगळ्या कार्यक्रमावरती विरजण पडलं कोणताच गोष्ट कोणत्याच गोष्टीचा कोणाला आनंद वाटत नव्हता तसं कसा बसा केक कापण्याचा कार्यक्रम आम्ही पार पडला आणि मी धावतच बेडरूम मध्ये गेले.  पलंगावरती स्वतःला झोकून दिलं . हमसा हमशी रडायला लागली. किती वेळ मी रडत होते मलाच माहीत नव्हतं. रडून रडून माझे डोळे सुजून गेले होते. मध्येच रात्री केव्हा तरी येऊन तू माझ्या बाजूला झोपला होतास. मी सकाळी उदासपणाने उठले. तुही लगेच उठलास. मला समजावत म्हणालास,
" काल आई बोलली याचा तुला खूप वाईट वाटत असेल ना?" मी काहीच बोलली नाही. तूच पुढे म्हणाला, "अगं म्हणू दे ना. अजून तुझं वय काय आहे ? कितीतरी मोठा आयुष्य आपल्यासमोर आहे. बाळ काय यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी होईल. तोपर्यंत तुझ्या कंपनीत तुझं प्रमोशन होईल. अजून चांगलं समृद्ध आयुष्य पण आपल्या बाळाला देऊ शकतो." मला तुझ्या बोलण्याचा रोख कळल्याबरोबर मी एकदम  किंचाळली,
" तू काय बोलतोयस याचं तुला भान आहे काय? कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या बाळाचा बळी दिला जाऊ देणार नाही. नोकरी गेली तरी चालेल."
डबा न घेता मी कामावर निघून गेली. संध्याकाळी सगळं वातावरण तंग होत. मी सासूबाईंना म्हणाली, "आई काय वाटेल ते झालं तरी मी माझं बाळ सांभाळायला खंबीर आहे. मी आजच कंपनीमध्ये नोकरी सोडण्याची तीन महिने अगोदर नोटीस दिलेली आहे."
आई काहीच बोलली नाही. तू देखील गप्प होतास. घरात कोणीच कुणाशी बोलत नव्हतं. त्या दिवशी कोणीच जेवलं नाही.
त्यानंतर आपल्या मधली दरी दिवसेंदिवस वाढू लागली. पोटातलं बाळ देखील हळूहळू वाढत होत.
मानसिक तणावाने माझं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं होतं. कोणतही अन्न मला पचत नसायचं. एक दिवस मी खूप आजारी पडली. काहीतरी विपरीत घडत आहे असं मला जाणवलं. तुला घेऊन मी डॉक्टर कडे धावले. डॉक्टरांनी मला तपासल्यावर सांगितलं, "दुर्दैवाने तुमच्या पिशवीतील पाणी पूर्णपणे गळून गेलेले आहे. अशा अवस्थेत बाळाला काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." दुःखाने मी डोळे गच्च बंद करून घेतले. दुसऱ्याच दिवशी मी पूर्णपणे रिकामी झाली. दोन महिन्यानंतर तर माझ्याजवळ बाळी नव्हतं. नोकरी नव्हती आणि आपल्यातला संवादही नव्हता.
खरे दुर्दैव तर अजून पुढेच होते. फक्त मला माहीत नव्हत इतकंच.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all