गृहीत ( भाग सहावा )

प्रत्येक गोष्टीत गृहीत धरल्या जाणाऱ्या प्रत्येक गृहिणीची गोष्ट
माझी नोकरी गेल्या नंतर मी कित्येक दिवस माझ्याच खोलीत स्वतःला बंद करून बसत असे. एक दिवस तू संध्याकाळी कामावरून घरी आलास आणि अंगातले कपडे न काढता पलंगावर तू स्वतःला तसाच लोटून दिल. जरी आपण एकमेकांशी बोलत नव्हतो, तरी तुला कसल तरी प्रचंड दुःख झालेल आहे. याची मला जाणीव झाली आणि मी तुझ्या केसात हात फिरवला. त्याबरोबर माझा हात घट्ट धरून तू म्हणालास,
" माझी नोकरी गेली ग. आपण बाळाला येऊ दिलं नाही. याची सजा देवाने आपल्याला दिली. आता तुलाही नोकरी नाही आणि मलाही नोकरी नाही. आमचं डिपार्टमेंट कंपनीने पूर्णपणे बंद करून टाकले." मला तर काय बोलावे ते सुचले नाही. जेव्हा सासुबाईने ही गोष्ट ऐकली त्यावेळी  त्यांनी तुला सहानुभूती देण्याच्या ऐवजी या जगात न आलेल्या माझ्या बाळाला दोष दिला.मग मात्र माझ्या  तळपायाची आग मस्तकाला गेली. माझा पूर्णपणे तोल गेला होता. मनात जे येईल ते मी तुझ्या आईला बोलले आणि माझं सामान गोळा करून कोणालाही न सांगता मिळेल त्या गाडीने माहेरी परत आले. वाटलं होतं दुसऱ्या दिवशी तू मला घ्यायला येशील. परंतु तसं झाल नाही. मी तुझी वाट बघत बसले.
एक दिवस मला दुसऱ्या कंपनीत जॉबची चांगली ऑफर आली. मी तिथे जॉब जॉईन केला. हळूहळू हे नवीन आयुष्य माझ्या वळणी पडू लागले .
आई-वडिलांनी एक दोनदा तुझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तुमच्या बाजूने कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. मला अजूनही प्रश्न पडलेला आहे की तू लग्न नेमकं कशासाठी केल होतस ? तुला शय्यासोबतीला मुलगी हवी होती का घरामध्ये काम करण्यासाठी मोलकरीण हवी होती ? काही समजत नाही. तुझ्या घरात मी कुठे चुकली होती तेही मला समजत नाही आणि समजून घेण्याची इच्छा देखील नाही. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकले प्रत्येक गोष्टीत प्रत्येक बाबतीत तू मात्र मला गृहीत धरलेलं होतंस .एखाद्या माणसाला गृहीत धरण म्हणजे त्या माणसाच अस्तीत्व उघडपणे नाकारण्यासारखंचं असतं. एक प्रकारे ही त्या माणसाची हिंसा असते.
या गोष्टी तुझ्यासाठी खूप साध्या असतील. मी तर असेही ऐकले आहे तू इतरांना असं सांगत असतोस की तुझी नोकरी केल्यामुळे मी तुला सोडले आहे. परंतु खरी गोष्ट मात्र तुझ्या अंत:करणालाच माहित आहे. आणि तरी जर तू नाकारत असेल असशील तर त्याला मी काहीच करू शकत नाही. स्वच्छ कोऱ्या पाटी सारखी मी तुझ्या घरात आली होती. तू मात्र त्या पाटीवरती मला गृहीत धरून तुला हवे तशी अक्षर गिरवीत होतास. त्यामध्ये मला आनंद होत आहे का दुःख होत आहे याची देखील तुला परवा नव्हती. आज आपण एकमेकांना पूर्णपणे अनोळखी अशा वळणावरती उभे आहोत. पुढच्या आयुष्यात आपल्यापुढे काय लिहून ठेवलेले आहे हे आपणाला माहीत नाही. निदान मला तरी नाही. परंतु माझ्या आयुष्यात काय लिहायचे हा अधिकार मी आता मात्र माझ्याजवळ ठेवणार आहे. जरी मी तुझ्या घरी आली तरी तो अधिकार तू गमावला आहेस हे नक्की. निर्णय तुझा आहे. तू मला स्वीकारशील किंवा नाकारशील याची मला आता परवा नाही. पण तू नसताना आयुष्य कसे जगायचे हे मी गृहीत धरलेले आहे.
जाता जाता मला तुला स्पष्ट करून सांगायचे आहे. याबाबतीत मी तुला अंधारात ठेवू इच्छित नाही. मागच्याच आठवड्यात मी जेव्हा पोटात खूप दुखत होते तेव्हा डॉक्टरकडे गेली होती. तेव्हा डॉक्टरांनी मला एक गोष्ट सांगितली. ती तू काळजावर दगड ठेवून ऐक. ज्या बाळाला तू या जगात येण्यासाठी नकार दिला होतास. ते बाळ आता कोणतेही नवीन बाळ माझ्या गर्भाशयातून बाहेर येणार नाही अशी तजवीज करून गेलं आहे .थोडक्यात याच्यानंतर मला कधीही बाळ होणार नाही, हे गृहीत धरूनच तू पुढील पाऊल टाक. तुझीच ( गृहीत )असलेली- नसलेली.

🎭 Series Post

View all