Login

मृत्यूचे गूढ भाग २

गूढ
वैदेही झाली का तयारी ?" नम्रता म्हणाली.

वैदेहीने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. हलकासा मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत होता. खूप गोड दिसत होती. चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. तिला नजर लागू नये म्हणून नम्रताने तिच्या कानामागे काजळाची तीट लावली.


"काकी, मी म्हणाले होते ना वैदेहीला  अशी तयार करेन की, सगळे बघत बसतील" प्रिया म्हणाली.

तितक्यात श्रीधरराव आले. ते देखील वैदेहीला बघतच बसले. खूप भावनिक झाले.


त्यांच्या घरात काम करणाऱ्या लता मावशी आल्या आणि मुलाकडचे  आले आहेत सांगितले.


सगळेच लगबगीने गेले.


मुलाकडच्यांचे छान स्वागत केले गेले. राजवीरची नजर वैदेहीलाच शोधत होती. कधी एकदाचं तिला पाहतो असंच झालं होतं.


ह्या दिवसाची किती आतूरतेने वाट पाहत होता. तो दिवस आला.


तितक्यात वैदेही आली. तिला पाहून तो खुश झाला.
वैदेहीवरून त्याची नजर बाजूला होतच नव्हती.
एकटक तिला न्याहाळत होता. राजवीरचे मित्र त्याला चिडवायची संधी सोडत नव्हते.

राजवीर त्याच्या वैदेहीसाठी छान तयार होऊन आला होता.
उंचपुरा,देखणा असा तो आज अजूनच उठून दिसत होता. वैदेहीच्या प्रेमाची जादूच होती ती.

शहरातील मोठे बिजनेसमॅन आले होते. श्रीधररावांनी मेहनतीने स्वतःच्या कंपनीला अश्या स्थानावर नेलं होतं की त्यांचं नाव मोठ्या लोकांमध्ये सामील होतं.

वैदेही आणि राजवीर दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला.

वैदेही आणि राजवीर दोघांचे फोटोसेशन चालू होते. तितक्यात लता मावशी घाम पुसत आल्या  आणि नम्रताच्या कानात काहीतरी सांगितले.
ते ऐकून नम्रता पळत गेली.

ते वैदेहीने पाहिले.

वैदेही देखील नम्रताच्या मागे गेली.

श्रीधरराव बेडवर पडले होते.

त्यांच्या पोटात सुरी खुपसली होती. चारही बाजूने रक्त होते.

ते दृश्य पाहून वैदेही जोरात किंचाळली

"बाबा."

नम्रता देखील त्यांच्या मृतदेहाजवळ आक्रोश करू लागली.


राजवीर आला.


ही खबर वाऱ्यासारखी पसरली.


काही क्षणापूर्वी आनंदाचे वातावरण होते. आता सारं वातावरण दुखमय झालं.

एकच प्रश्न सर्वांना सतावत होता, तो म्हणजे

"श्रीधररावांचा जीव कोणी घेतला?"

वैदेही चक्कर येऊन पडली.

राजवीरने तिला सावरलं.

कोणी केलं असणार हे?

राजवीरने प्रसंगावधान दाखवून पोलिसांना फोन केला.


लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

"मोरे, चला कामाला लागा."  इन्स्पेक्टर मुक्ता पाटील ह्यांनी सूत्र हातात घेतली.


"मॅडम, तुम्हाला कोणावर संशय?" त्यांनी नम्रताला विचारले.


नम्रता शून्यात नजर लावून होती.

पुन्हा त्यांनी विचारले.

"हे त्या अनिकेतच काम असणार."

"अनिकेत?"

"हो माझ्या नवऱ्याचा जुना मित्र. दोघांनी एकत्रच कंपनीची स्थापना केली. पुढे जाऊन दोघांमध्ये वाद झाले. अनिकेतने कंपनी सोडली. तो नशेच्या आहारी गेला. माझ्या नवऱ्याने बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा, प्रसिद्धी, यश मिळवलं, नाव कमावले. हेच त्याला खुपलं.
त्याचा राग अजूनही गेला नाही. वैदेहीच्या साखरपुड्याला त्याला बोलावले तरी तो आला नाही. मला पूर्ण खात्री आहे हे त्यानेच केलं असणार."

ती ठामपणे म्हणाली.


संशयाची सुई अनिकेतवर फिरली.


"वैदेही मॅडम तुम्हाला कोणावर शंका आहे का?" मुक्ता.


"हो आहे. परेशवर संशय आहे."


"कोण परेश?"


"मी कॉलेजमध्ये होते तिथे परेश देखील शिकायला होता. माझ्याच वर्गात शिकायला होता. ओळख होऊन मैत्री झाली. एक दिवस सर्वांसमोर त्याने मला प्रपोज केलं. मी त्याला नकार दिला; कारण मला तो मित्र म्हणूनच माझ्या आयुष्यात हवा होता. मला त्याने प्रोपोज केलं ते मी आई बाबांना सांगितले होते. मी आई बाबापासून कधीच कोणतीही गोष्ट लपवली नाही. पण..."


ती असं बोलून रडू लागली.

त्यादिवशी मी माझा आणि राजवीरचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला होता.


तो फोटो पाहून परेशने मला मॅसेज केला.


आधी गयावया करू लागला.
मला म्हणत होता की तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही. म्हणत होता काहीही करून लग्न मोड. मी त्याला खूप समजावलं.
माझ्या मनात त्याच्यासाठी कधीच फिलिंग नव्हत्या. हर तऱ्हेने मी त्याला समजावलं; पण तो काही केल्या ऐकत नव्हता. त्याला कोणत्या भाषेत समजवावे मला कळतच नव्हतं. शेवटी मी त्याला म्हणाले माझ्यासाठी माझे आई बाबा महत्वाचे आहेत. ते म्हणतील त्याच मुलाशी मी लग्न करणार. मी तुझा विचार करू शकत नाही. त्याला राग आला. त्याने मला फोन केला. आतापर्यंत गयावया करणारा परेश फार त्वेषाने बोलू लागला. मला म्हणाला तुझे आई बाबा महत्वाचे आहेत ना? तेच जर नसतील तर. मी करतो आता काय करायचे ते."

तिला पुढे काही बोलवत नव्हतं.

खूप रडू लागली.


श्रीधररावांवर जळणार अनिकेत आणि वैदेहीवर एकतर्फी प्रेम करणारा परेश दोघेही कचाट्यात सापडले होते.

दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

कोण असेल गुन्हेगार?  अनिकेत की परेश?

जाणून घेण्यासाठी पुढचा भाग जरूर वाचा.
अश्विनी ओगले.