Login

गुलाबी साडी भाग 1

एक धमाल विनोदी कथा

गुलाबी साडी भाग 1

आज बाजारचा दिवस असल्याने सर्जा सकाळीच लवकर उठला. रामा,शिरपा,गणपा, हानमा सगळे मिळून बाजाराला जायचा त्यांचा नियम होता.

" पारे,पारे चा आण लवकर . बाजाराला जायला उशीर हुतोय . " सर्जा आरशात बघून भांग पाडत होता.


" चिंगे बया त्यो कप निवून दे तिकड. हाफिसात जायला उशेर हुईल."
फिसकन हसत पारू म्हणाली.

" पारे हसू नग. जरा लवकर गेलं की माळव येळेवर खपत्यात ." सर्जा भांग पाडत बोलत होता.

" व्हय,आन मंग गाव कोळपायला मोकळं व्हय ना?" पारू चहाचा कप आदळत म्हणाली.

" गुलाबी साडी आन लाली लाल लाल." सर्जा गाणे म्हणत होता.

" बया कसली गाणी हाये ही." पारू नाक उडवत आत गेली.

सर्जा बाहेर पडला. सगळेजण केव्हाच जमा झाले होते. मंदीदेखील एस. टी साठी उभी होती. मंदी तमासगीर होती. तरीही आपला आब राखून होती. कलेसाठी नाचणे आणि थिल्लरपणा यातला फरक अचूक जाणून तिचे वागणे बोलणे असायचे. त्यामुळे गावातील बायका तिला आदर द्यायच्या.

" गणा,आर आज लयी हिरव दिसतय समदिकड." सर्जा मिशीवर ताव देवून बोलला.

तसे सगळे फिसकन हसले. सर्जा सारखा वांड गडी पारू सारखी खमकी बायको असल्याने गप असायचा. पण अंगातले किडे असे मरत नाही. तारुण्यात प्रवेश केल्यापासून हे पाचही मित्र मंदाच्या आजूबाजूला घिरट्या घालत असत. त्यांनी आतातरी सुधारावे असे मंदाला वाटायचे. पण पालथ्या घड्यावर पाणी.
एकदाची एस. टी आली. सगळेजण आपापली बाचकी सांभाळत आत शिरले. बाजाराची गाडी असल्याने तुडूंब भरली होती.


गुलाबी साडी गाणे एका मुलाच्या मोबाईलवर वाजले आणि सर्जा म्हणाला," गोऱ्या अंगावर गुलाबी साडी लई उठून दिसत असल नव्हं?"

" व्हय तर,पारू वैनीला लई आवडतो गुलाबी रंग." मंदाने पटकन उत्तर दिले आणि सगळ्यांची बोलती बंद झाली.


दोन स्टॉप पुढे गेल्यावर आणखी एक मदनिका गाडीत चढली.

" अय शोभे,अग हिकड बघ." मंदाने आवाज दिला.

तिची साथीदार असलेली शोभा आपल्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी आली होती.

" कुण्या गावाचं आल पाखरू बसलय डौलात आन खुदुखुदू हसतय गालात." शिरपा लावणी मुद्दाम गुणगुणला.

तेवढ्यात सर्जाकडे बघून मधाळ हसत शोभा म्हणाली,"पाटील वाईच जागा द्या की आमाला."

बस तिच्या पाटील ह्या एकाच शब्दावर सर्जा खल्लास झाला. त्याने पाचही मित्रांना बाजूला सारून तिला जागा करून दिली.


बाजाराच्या ठिकाणी एस. टी पोहोचली.आणि सगळे उतरले. शोभा सगळ्यांकडे बघून मधाळ हसली. तिच्या गालावर पडणारी खळी पाहून सगळे वेडे झाले.


" शोभा कशाला बोलती त्या सर्जा संग लाळघोटे मेले. मला लई तरास दिला हाय ह्या समद्यानी." मंदा चिडून बोलत होती.


" अस्स आता बघच ह्यांना चांगली अद्दल घडवते. " शोभा खट्याळ हसून म्हणाली.


" सर्जेराव,आव एक कप चा तरी पाजा." पदराच्या टोकाशी खेळत शोभा लाडिक आवाजात म्हणाली.

" आता, नुसता चा ? चला की चांगली मिसळ खाऊ." सर्जा लाडात आला.

शोभा आणि सोबत सगळी मंडळी हॉटेलात गेली. शोभा प्रत्येकाशी लाडिक बोलत होती. मिसळ खाऊन झाल्यावर शोभा उठली.

" आता पुन्यांदा कवा भेटणार?" शिरपा लाडिक आवाजात म्हणाला.

" मंदा, पावन लई उतावीळ बया. एवढी काय घाई?" मानेला झटका देत शोभा बाहेर पडली.

" आयला नुसता जाळ आन धूर..." हाणमा पचकला .

"अय जाळ आन धूर,चला आता बाजार हुयाचा हाय आजुन." सगळेजण बाहेर पडले. तेवढ्यात एका ठिकाणी गाणे वाजत होते.
गुलाबी साडी आन लाली लाल लाल दिसते मी. छान राजा फोटो माझा काढ.


लाल लाली लावलेली,कंबरेवर नागिणीसारखी रुळणारी वेणी,मोत्यासारखे दात दाखवून हातात गुलाबी गुलाब घेऊन समोरून शोभा चालत येत होती आणि त्याबरोबर मोठ्याने शिट्टी मारल्याचा आवाज झाला.


" बया,सर्जा दाजी हित बाजारात कुणाला शिट्टी मारताय."

ह्या चिरक्या आवाजाने खाडकन पाचही मित्र स्वप्नातून जागे झाले.


कोणाचा असेल हा आवाज?
गुलाबी साडीत शोभा कोणाला भेटेल?

वाचत रहा.
गुलाबी साडी.
©®प्रशांत कुंजीर


🎭 Series Post

View all