गुलाबी साडी भाग 2
मागील भागात मंदा दिसल्याने जुन्या आठवणी जाग्या झालेली सगळी दोस्त मंडळी शोभाच्या गुलाबी डोळ्यात हरवलेली आपण पहिली. आता पाहूया पुढे.
" सर्जा दाजी वं! "
हा चिरका आवाज घुमला आणि तसे सगळेजण खाडकन जागे झाले.
पारुची जिगरी मैत्रीण सविता जीला सर्जा नकटी सवी म्हणायचा लांबूनच येताना दिसली. यांना काही संधी मिळायच्या आत सविता समोर उभी राहिली.
" दाजी, आव माळव इकायला शिट्टी मारीत्यात व्हय?"
असे म्हणून ती स्वतः च चिरक्या आवाजात हसू लागली.
शेवटी सर्जाने तिला कशीबशी कटवली. सगळा माल विकून झाल्यावर आधी बायकांनी सांगितलेले जिन्नस सगळेजण खरेदी करत होते. तरीही प्रत्येकजण संधीची वाट बघत होता.
" गणा, पारुन चामड्याच्या चपला सांगितल्या व्हत्या आणायला." सर्जा अचानक ओरडला.
" आर आता तिकडूनचं आलो की आपुन." शिरपा म्हणाला.
" व्हय पर म्या जातो की परत." एवढे बोलून सर्जा झपाझप पावले टाकत निघून गेला.
" शिरपा आर मला हिन भेळ आणायला सांगितली हाय." हाणमा अचानक आठवून ओरडला.
" अस्स, मंग व्हय की फूड."
शिरपा मनातून आनंदी होत म्हणाला.
शिरपा मनातून आनंदी होत म्हणाला.
हाणमा जाताच शिरपाने रामाला त्याला जोराची लागली आहे अशी थाप मारली आणि तिथून पोबारा केला.
सगळ्या दोस्तांनी गुपचूप साडीची दुकाने गाठली. एरव्ही बायकोला साडी घ्यायला हजार वेळा रडणारे बहाद्दर आता मात्र भारीतली साडी घेऊन आले.
सगळेजण पुन्हा स्टँडवर हजर झाले. आपापला बाजार घेऊन गावात जाताना प्रत्येकाला एकच काळजी. आता साडीची पिशवी लपवायची कुठे?
घराबाहेर लपवण्यात धोका होता. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरातच साडी लपवायचे ठरवली. जितके हे ठरवायला सोपे होते तितके करायला कठीण.
कारण प्रत्येकाच्या घरात बायको नावाचा सीसीटीव्ही होता. तरीही प्रेमात आणि युद्धात सगळे क्षम्य असते नाही का? तर सर्जा गुपचूप घरात शिरला. त्याने आजूबाजूला कानोसा घेतला तर घरात कोणीच नव्हते.
सर्जाने आनंदात शिळ घातली. एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रावानी खुलला गं !
असे गुणगुणत त्याने पटकन पिशवी लपवली आणि मागे फिरणार इतक्यात पारू आत येताना दिसली आणि सर्जा दचकला. त्याने पटकन साडी एका ठिकाणी लपवली.
पारू आत आली आणि पदराने घाम पुसत म्हणाली," काय झालं असं गडबडला ते?"
" गडबड? कसली गडबड? उगा कायतरी बोलू नग." सर्जा पटकन हात धुवायला गेला.
पारू इकडे तिकडे बघत आत निघून गेली. शिरपाने रखमा नाही असे बघून गोठ्यात साडी लपवली. गणपा याबाबत नशीबवान होता. हॉटेलमध्ये साडी ठेऊन निवांत घरी गेला. रामा आणि हानमा दोघांनी साड्या आपापल्या घरी लपवल्या.
"कारभारी,जेवायला येताय नव्हं? गरम गरम भाकरी करते." पारूने आवाज दिला.
सर्जा पटकन हात धुवून आत आला. गरम भाकरी ताटात वाढत पारू गोड हसली.
" म्या काय म्हणते कारभारी!"
पारूने लावलेला मधाळ स्वर ऐकताच सर्जाला पुढचा अंदाज आला.
तरीही त्याने मान डोलावली.
पारूने लावलेला मधाळ स्वर ऐकताच सर्जाला पुढचा अंदाज आला.
तरीही त्याने मान डोलावली.
"बोल की काय म्हणतीस?"
त्याने शक्य तेवढा नरम आवाज ठेवला.
त्याने शक्य तेवढा नरम आवाज ठेवला.
" मंदीच्या भनीच लगीन हाय. आम्ही समद्या तिला मदतीला जाणार हाय. आता लगीन म्हणलं की काय बाय लागतं. झालं तर तिचं घर मोठं न्हाय. तवा काही पावण आपल्या हित राहात्याल. चाललं नव्हं?"
पारूने गोड हसून कालवण वाढले. सर्जाने त्या पावणे लोकात शोभा असू देत असा नवस बोलत होकार दिला.
सर्जा आनंदाने शीळ घालत ही बातमी द्यायला बाहेर गेला. जाताना त्याला रखमा, संगी आणि सगुणा दिसल्या. त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करत सर्जा निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सर्जा सकाळी शेतात निघून गेला. दुपारी पारू न्याहारी घेऊन येणार नव्हती. सगळी कामे मार्गी लावून तो घराकडे आला दारात असलेल्या जोड्यात एक नाजूक जोडा पाहिला अन् सर्जा मिशीतच हसला.
" काही म्हणा पारू वैनी तुमच्या हाताला लई चव बया."
तो मधाळ आवाज कानात शिरताच सर्जाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या पण चेहऱ्यावर काहीच न दाखवता तो आत शिरला.
तो मधाळ आवाज कानात शिरताच सर्जाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या पण चेहऱ्यावर काहीच न दाखवता तो आत शिरला.
" आव ही शोभा. आपल्या मंदा वन्सची पावणी."
पारू मुद्दाम वन्स शब्दावर जोर देत म्हणाली.
" बरं,जरा पाणी आण." सर्जा म्हणाला.
पारू पाणी आणायला आत गेली.
" मंदा आन म्या मैतर हाय बरं." सर्जा मिश्किल हसला.
" अस्स! आमासनी बी आवडल की मैतर व्हायला." शोभा गोड हसली.
तेवढ्यात पारू आली. इकडे शोभा सर्जाच्या घरी थांबणार ही बातमी मित्र मंडळीना समजली आणि सगळी पलटण लागलीच हजर झाली.
" सर्जेराव,आव सर्जेराव हायसा नव्हं घरात?" शिरपाने मोठ्याने आवाज दिला.
सर्जा काही बोलणार एवढ्यात पारूने आवाज दिला," भावजी हिकड कुठं ह्या वक्ताला? धारा न्हाय काढायच्या व्हय?"
तसे सगळे आत शिरले.
" वैनी भजन ठरवायचं हाय. त्याची जरा चर्चा करायची व्हती." हानमा रेटून म्हणाला.
पारू चहा आणायला आत गेली. नक्कीच काहीतरी पाणी मुरत असल्याचा तिला संशय आलाच. शेवटी जवळपास तासभर रेंगाळून मंडळी निघाली.
शोभा काय करेल पुढे?
गुलाबी साडी कोणाची नेसणार शोभा?
पाहूया अंतिम भागात.
©®प्रशांत कुंजीर.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा