Login

गुलाबी साडी भाग 3 अंतिम

एक धमाल विनोदी कथा
गुलाबी साडी भाग 3 अंतिम

मागील भागात आपण पाहिले प्रत्येकाने एकेक गुलाबी साडी आणली आहे.शोभा आपल्याच गळाला लागणार याचा आत्मविश्वास प्रत्येकाला आहे. आता पाहूया पुढे.


सकाळी सकाळी सर्जा गाणे गुणगुणत होता. गुलाबी साडी आन लाली लाल लाल... आपल्याच नादात भांग पाडत असताना शोभा मागून आली.

" तुमासनी गुलाबी साडी लईच आवडती वाटतं?"

" नुसती साडी न्हाई, नेसणारी पण." सर्जा हसला.

तेवढ्यात शोभाला फोन आला.

" बोला शिरपतराव काय म्हणता? नाष्टयाला यिवू? कशाला तरास घेता."
तिने लाडिक चाळा करत विचारले.


शेवटी शोभा शिरपाच्या घरी गेली. सर्जा मनातून चिडला तरी बोलला काहीच नाही. फक्त जाताना त्याने तिला आज दुपारी गुलाबी साडी नेस असे सांगून एक पिशवी दिली.


शिरपा अगदी प्राण डोळ्यात आणून वाट बघत होता शोभा घरात शिरायच्या आत त्याने तिला एक पिशवी दिली.

पुढे हानमा, रामा आणि गणपा प्रत्येकाने काहीतरी निमित्त काढले आणि पिशवी पोचवली.

शोभाने प्रत्येकाला निरोप दिला. रात्री मंदाकडे हळदीचा कार्यक्रम होता. तिकडे मी साडी नेसेल तुम्ही तसाच मॅचींग फेटा बांधा.


सगळ्यांच्या मनात नुसते लाडू फुटत होते.

" कारभारी आज संध्याकाळी हळद हाय. आम्ही सगळ्या दुपारीच जाऊ. संध्याकाळी तिकड या."
पारू आवरत सर्जाशी बोलत होती.

सर्जा तिला सोडून आला आणि त्याने आपल्या ट्रंकमधून गुलाबी. फेटा बाहेर काढला.

" आयला, इस्तरी करायला पायजे." त्याने पटका काखेत मारला आणि बाहेर पडला.

" गुलाबी फेटा कुठून आणायचा?"
गणपा डोके खाजवत होता.

तेवढ्यात त्याला आठवले शेजारच्या गावात असेलल्या मित्राकडे फेटा आहे. तो घाईने बाहेर पडला.

" अय गणपा कुणीकड?"
सर्जा मोठ्याने ओरडला.

त्याच्या आवाजाने गणपा गडबडला.

" म्या.. आपल ते हे..हा आठवल सामान संपल हाय हाटीलात. तू आणि कुठं निघाला आन काखत काय हाय?"
गणपा म्हणाला.

" आर चिंगीची कापड हाय इस्तरी करायला चाललो."
सर्जा थाप मारून पुढे गेला.

शिरपा रखमा बाहेर जायची वाट बघत होता. रखमा जाताच त्याने शेजारी चुलत्याचे घर गाठले आणि फेटा घेऊन आला.

रामा आणि हानमा बहाद्दर तालुक्याला जाऊन नवा फेटा घेऊन आले.


घरात बायका नसल्याने चांगल्या घोटून दाढ्या करत मोठ्याने गाणे म्हणत होते.
कोणते?
ओळखा की राव.

तर्र आपले पाचही हिरो मस्त तयार झाले आणि आता शोभा आपल्यालाच पटणार ह्या आनंदात बाहेर पडले.


सगळेजण मंदाच्या घराजवळ गेले.

" काय सर्जेराव समदी गँग एकदम गुलाबी?"
संपतराव मोठ्याने म्हणाले तसे पाचही जण एकमेकांकडे पाहू लागले.


" आव बायका न्हाय का सारख्या साड्या नेसत तस कायतरी आसल."
दुसरा म्हातारा खी खी हसत म्हणाला.

सर्जा प्रचंड चिडला होता पण त्याला काही बोलता येत नव्हते. पाचही जण शोभा कुठे दिसते का पहात होते. त्यातल्या त्यात आपापल्या बायका देखील दिसत नसल्याने जरा निवांत होते.


" अय बँडवाल जोरात वाजवा बरं का?"
नवरदेवाचे मित्र सर्जा आणि त्याच्या मित्रांना जोरात ओरडून म्हणाले.

" सुक्काळीच्या बँडवाल कुणाला म्हणाला र?"
सर्जा दात ओठ खात सरावला तितक्यात मागून आवाज आला.


"बया दाजी तुम्ही लई झ्याक दिसताय ह्या गुलाबी फेट्यात." नकटी सवी मागून ओरडली.

सर्जा कसनुस हसला.

"पर दाजी मला एक कळना?"
सवी हनुवटीवर हात ठेवून विचारू लागली.

तेवढ्यात एक बारके पोरगे सर्जाकडे आले. सर्जा त्याचा निरोप ऐकताच तिथून सटकला.


सर्जा,गणपा,शिरपा, रामा आणि हानमा सगळेजण मांडवाच्या मागच्या बाजुला एकमेकांना दिसणार नाही असे उभे होते.
इतक्यात प्रत्येकाचे डोळे नाजूक हातानी मागून झाकले गेले.


" शोभा काय लोण्यागत मऊ हात हाय तुझा. गुलाबी साडीत तुला बघायचं हाय बघ."
सर्जा हळूच म्हणाला.

" आहाहा! काय नाजूक हात जून सिनमातली नटीच. शोभा आता समोर ये."
रामा हळूच कुजबुजला.

" शोभा कसला हात हाय तुझा जणू मस्का पाव."
गणपा हात चाचपत बोलला.

" ह्यो असला हात काळजावर फिरला तर पिर्तीच पाखरू लई उच जाईल बघ."
शिरपा आनंदाने नाचत होता.

" हाय, असाच तुझा नाजूक हात हातात पायजे शोभा."
हानमा कुजबुजला.

सगळ्यांना एकच उत्तर आले.

" हित नग पुढं चालत रहावा."

पाचही जण अंदाजाने चालत होते.

" गुलाबी साडी आन लाली लाल लाल, दिसते मी छान राजा फोटू माझा काढ."

शोभा गात होती पण आवाज समोरून येत होता. पटकन सगळ्यांनी आपापल्या डोळ्यावर असलेले हात झटकले. समोर आपल्या बायका पाहून पाचही मित्रांना दरदरून घाम फुटला.


" सर्जा दाजी कसा वाटला नकट्या सवीचा धडा."
सवी मागून आली.

" पुरुषाची जातच मेली बोक्यासारखी घरात लोणी आसंल तरीबी बाहेर जाऊन दूध प्यायला तोंड मारणार."
पारू गरजली.


सगळेजण कान धरून माफी मागत होते आणि बाहेर बँजोवर गाणे वाजत होते.


गुलाबी साडी आन लाली लाल लाल.......

टीप: सदर कथा केवळ मनोरंजन ह्या उद्देशाने लिहिली आहे.
©® प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all