गुलाल ! पार्ट 10
रात्रीचा प्रहर होता. आकांक्षा आणि ऋत्विक जीवनला भेटायला गेले. खोलीचा दरवाजा उघडाच होता. सर्वत्र अंधार होता. दारूच्या दोन-चार रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या. रडून रडून जीवनचे डोळे सुजले होते. केवळ तीन मार्क्स जास्त न पडल्यामुळे जीवन निवडयादीतून बाहेर पडला होता. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अनेकदा नियती शत्रूसम वागते. जीवन कष्ट करण्यात कुठे कमी पडत नव्हता परंतु त्याला यश हुलकावणी देत होते.
" जीवन काय अवस्था बनवून घेतली आहेस स्वतःची ?" ऋत्विक म्हणाला.
" तू माझा खरा मित्र असशील तर विष आणून दे मला. माझ्याकडे विष घेण्याचेही पैसे उरले नाहीत. राज्यसेवेत यश मिळाले नाही किमान कमबाईन तरी निघेल या आशेने तग धरून होतो. आता घरी कोणतं थोबाड घेऊन जाऊ ? कॉलेज संपून पाच वर्षे उलटली. जी मुले सोबत होती ती खूप पुढे गेली. पुन्हा नव्याने सुरुवात करावं म्हणलं तर वय जास्त आणि स्किल शून्य. डिग्री अशी की गल्लीतलं कुत्रं पण विचारत नाही. आयुष्यात आता फक्त अंधार उरला आहे. भविष्यात काय होणार हा विचारपण मनाला शिवत नाही कारण भविष्यच उरले नाही. तुम्ही दोघेही माझ्या जखमेवर मीठ चोळायला आला आहात ना. तुम्हाला माझे दुःख कळणार नाही. " जीवन आक्रोश करत म्हणाला.
" जीवन , एमपीएससी म्हणजे पूर्ण आयुष्य नाही." आकांक्षा म्हणाली.
" तू तर बोलूच नकोस. माझ्याहून पंधरा मार्क्स कमी आहेत तुला. फक्त स्पोर्ट्स सर्टिफिकेटमुळे लागली आहेस. "
" अस का बोलतोय ? म्हणजे मी कष्ट केलेच नाही का ?"
" जाऊदे तुम्हाला नाही कळणार. इतकी वर्षे अभ्यासिकेत चंदनासारखे झिजल्यावरही जेव्हा अपयश पदरी पडते तेव्हा कसे वाटते ते. निघून जा इथून. "
" जीवन तू दुःखात आहेस म्हणून असे काहीही बडबडत आहेत. शांत हो. अजून ग्रुप सी बाकी आहे." आकांक्षा जीवनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली.
जीवनने तिचा हात झटकला.
" स्वतः एसटीआय बनली आणि आता मला क्लर्क बनायला सांगत आहेस. स्पोर्ट सर्टिफिकेटच्या बळावर तू पोस्ट मिळवली. नाही तर तुझी लायकी आहे का एसटीआय बनायची."
" मग तू पण खेळायचा होतास ना लहानपणीपासून. मी नॅशनल लेव्हल चॅम्पियन आहे. तू पण बनायचा होतास. तुला कुणी थांबवलं होतं ? माझा कुठे पहिला अटेम्प्ट आहे ? मी पण घासतच आहे इतकी वर्षे. "
" मला चांगले ठाऊक आहे. तुझ्या बापाने पैसे देऊन फेक स्पोर्ट सर्टिफिकेट बनवले आहे. बिल्डर आहे ना तुझा बाप ? त्याच्यासाठी ही गोष्ट अवघड नाही. "
" जीवन , तू जोपर्यंत माझ्याबद्दल बोलत होतास तोपर्यंत ठीक होते पण बापावर जाऊ नको. "
" का ? सत्य टोचले ? तू आणि हा ऋत्विक पण तसाच. "
" काल तर फार बोलत होतास इक्वालिटी वगैरे. समाजसुधारकांचे कार्य तू फक्त परीक्षेपुरते पाठ केलेस. वास्तवात जेव्हा तुझी प्रेयसी तुझ्या पुढे गेली तेव्हा तुझा पुरुषी अहंकार दुखावला गेला. MCP कुठला. "
" एकदा बोललेले समजत नाही. गेट आउट. "
" चल ऋत्विक. वेडा झालाय हा. माझंच प्रेम कमी पडले असेल. माझ्या प्रेमाचे वटवृक्ष खूप कमकुवत निघालं. निकालाच्या एकाच वादळात मुळासकट उपटून निघालं. "
दोघेही तिथून निघून गेले. जीवन एकटाच रडत बसला. आकांक्षाच्या यशाला जीवनच्या अपयशाचे गालबोट लागले.
पर्वा दिवशी ऋत्विक दर्शन आणि आभासला भेटला. ऋत्विकला घरमालककडून कळले की जीवनने आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि आता तो त्याच्या गावी निघून गेला होता. त्याने ही हकीकत आभास आणि दर्शनला सांगितली.
" काय ? नाव जीवन आहे आणि मृत्यू यावा म्हणून प्रयत्न केला ?" आभास थट्टेत म्हणाला.
" शांत बस आभास. " दर्शन रागाच्या स्वरात म्हणाला.
"दर्शन , आमची युती तुटली. आमच्या मैत्रीचे सरकार पडले. " ऋत्विक म्हणाला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा