Login

गुलाल ! पार्ट 13

.
गुलाल ! पार्ट 13

संध्याकाळचा प्रहर होता. आभासने ठरवले होते की

प्री झाल्यानंतर गावी जायचे. त्यामुळे फ्लॅटची चावी देण्यासाठी तो लायब्ररीत आला. शिवाय गावाकडे निघण्यापूर्वी त्याला दर्शनला भेटायचेही होते. तो दर्शनला चावी देणार इतक्यात काही मुले लायब्ररीत घुसली. त्यांचा नेता " राजवंश गायकवाड " हा होता. राजवंश हा बलदंड शरीरयष्टी लाभलेला , राजस रूप लाभलेला तरुण होता. आभासची नजर त्याच्यावर पडली आणि तो त्या तेजस्वी रूपावर भाळला. कारण राजवंश खरच दिसायला खूप देखणा होता जणू मदनमोहनाचा पुतळा ! असो. राजवंशने आपल्या भारदस्त आवाजात भाषण द्यायला सुरुवात केली.

" भावांनो , तुमच्या कानावर बातमी पडलीच असेल की आता एमपीएससी ही यूपीएससीप्रमाणेच डिस्क्रिपटिव्ह पॅटर्नने होणार आहे. सीलॅबसही बदलणार आहे. या मागचे खरे कारण म्हणजे यूपीएससी क्लासचालकांनी केलेला षड्यंत्र. ओल्ड राजेंद्र नगरमध्ये यूपीएससीचे मोठे मार्केट आहे पण तिथे एक प्रकारचे सॅच्युरेशन आले आहे. त्यामुळे आता त्यांनी पेठेत आपला मोर्चा वळवला आहे. पेठेतले मार्केट आता त्यांना हवं आहे. मला सांगा अस रातोरात पाठ्यक्रम आणि परीक्षा पद्धत कसकाय बदलू शकतात ते? ही परीक्षा पद्धती लागू झाली तर कित्येक वर्षांपासून अभ्यास करणारे आपले मित्र-मैत्रीण स्पर्धेतून बाहेर फेकले जातील. ज्यांना लोकसेवेच्या परीक्षेत यश मिळाले नाही ते सहज राज्यसेवा पास करतील आणि आपल्या हक्काच्या पोस्ट पळवतील. आपण गोरगरीब शेतकरी आणि कामगारांची मुले आहोत. आपल्याला वर्णनात्मकचे क्लासेस परवडणार तरी आहेत का ? हा सरळ सरळ अन्याय आहे. सरकार आपल्याला दुर्लक्ष करून ही परीक्षा पद्धती, हा नवीन पाठ्यक्रम आपल्यावर लादू शकत नाही. म्हणूनच या निर्णयाविरोधात आम्ही रणशिंग फुंकले आहे. लवकरच आम्ही आंदोलन करू. ज्यांना आंदोलनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी नाव आणि व्हाट्सअप्प क्रमांक लिहून द्या. आणि ज्यांना सरकारचा निर्णय मान्य असेल त्यांनी वर्णनात्मकचा अभ्यास करा किंवा कमबाईनवर फोकस करा. जय हिंद जय महाराष्ट्र !"

दर्शन वगळता सर्वांनी आपले नाव आणि नंबर लिहून दिले. राजवंश दर्शनकडे आला.

" तुम्हाला वर्णनात्मक पॅटर्न हवा आहे का ? तुमच्यासारखे तरुण बाहेर पडत नाहीत म्हणून सरकार विद्यार्थ्यांना गृहीत धरते. सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरच क्रांती घडेल. "

" सर , मी पुण्यात पोस्ट काढायला आलोय. आंदोलन करायला नाही. डोंगर चढताना डोंगराच्या हिशोबाने चालावं लागत. डोंगराचा चढ आपल्या सोयीचा नाही म्हणून तक्रार करण्यात अर्थ नसतो. तसच शासनाचा निर्णय मान्य करण्यातच शहाणपण आहे. मी सर्वसामान्य विद्यार्थी कसली क्रांती घडवून आणणार ? माझ्यात तेवढी क्षमता किंवा त्याग करण्याची तयारी नाही. मला फक्त माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. "

" मीही सर्वसामान्य विद्यार्थीच आहे पण मी तुझ्याप्रमाणे अन्याय सहन करणार नाही. क्रांती घडवेल. व्यवस्था बदलेल. "

" व्यवस्था बदलायला निघालेले काही वर्षांनी त्याच व्यवस्थेचे गुलाम होतात. "

राजवंश रागात दर्शनकडे बघत होता. तेवढ्यात आभास पुढे आला.

" हा पुस्तकी किडा आहे. याला काही कळत नाही. पण मी तुमच्यासोबत आहे. कायमच. तुम्ही म्हणाल ती पुर्वदिशा. "

राजवंशच्या मुखावर स्मितहास्य उमटले. थोड्या वेळाने तो निघून गेला आणि आभासने गावाकडे जाणाऱ्या बसची तिकिटे फाडली.

क्रमश...
0

🎭 Series Post

View all