गुलाल ! पार्ट 16
भांडणानंतर आभास आर्यनकडे राहायला गेला.
" तू काही काळजी करू नको. तू इथं बिनदास राहू शकतो. फक्त रेंट थोडं जास्त आहे. "
" हो. ते भरण्यासाठी मी लवकरच जॉब शोधेल. "
" जॉब ? तू इतका सुंदर असून पण जॉब करशील ? खूप त्रास देतात कंपनीवाले. त्यापेक्षा घरी बसून कमाई कर. इथे त्रास देणारे कुणी नाही. " आर्यन हसला.
आभासला समजायचे ते समजले. तो आर्यनच्या फ्लॅटवर देहविक्री करू लागला.
***
प्रीचा निकाल लागला. दर्शनची प्री क्लियर झाली होती. तो दिवसरात्र एक करून मेन्सची तयारी करत होता. या काळात प्रकाशसोबत त्याची भेटही होत नव्हती. रविवारी कधीतरी प्रकाश भेटायला येत. पण तो जास्त वेळ घेत नसत. दर्शन खूप स्वाभिमानी होता. कधी पैसे उधार मागत नव्हता. दर्शनकडे नसलेले एखादे अभ्यासाचे पुस्तक गिफ्ट देणे , दर्शन पैसे वाचवण्यासाठी कधी कधी मेसला जात नसे तर त्याला खायला लाडू , चिवडा असे काही आणून देणे अश्या अनेक पध्दतीने प्रकाश दर्शनची नकळतपणे मदत करायचा. शेवटी मेन्सचा निर्णायक दिवस आला. हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पठण करून दर्शन परीक्षेला गेला. त्याला परिक्षा चांगली गेली. काही महिन्यांनी परिक्षेचा निकाल लागला. काही गुणांनी दर्शन मेन्स पास होऊ शकला नाही. तरीही दर्शनने हार न मानता पुढच्या प्रीची तयारी सुरू केली. यावेळीदेखील त्याची मेन्स क्लियर झाली नाही. दर्शन गावाकडे जायला निघाला. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. प्रकाश तिथे आला.
" इतक्यात हार मानली ?" प्रकाश दर्शनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
" इतक्यात ? दोन-तीन वर्षे तहानभूक विसरून झुंजलोय इथं. तिथं गावाकडे माझ्या आईला रोज माझ्यामुळे टोमणे ऐकावे लागताय. माझ्या वडिलांनी दारूच्या नशेत सर्व जमीन काकाच्या नावावर करून दिली. नंतर दारूच्या नशेतच गटारात पडून त्यांचा मृत्यू झाला. आई इतरांच्या शेतात मोलमजुरी करते. याच आशेने की एकदिवस तिचा मुलगा अधिकारी बनेल. पण मी नालायक ठरलो. लूजर निघालो. " दर्शन म्हणाला.
" लूजर? नालायक ? तू पार्टीमध्ये वगैरे पैसे उधळले नाही. तू अभ्यास केला. कष्ट केले. " प्रकाश म्हणाला.
" जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत स्ट्रगलला काही अर्थ नसतो रे. जीवनदादा इतका का खचला होता आज कळलं. ही परीक्षा करियर खूप कमी जणांचे घडवते आणि वाटोळं जास्त लोकांचे करते. " दर्शन म्हणाला.
" कमबाईन बाकी आहे. अजून लढ. मी काही वर्षांपूर्वी असच हार मानली. जर प्रयत्न केले असते तर आज मी पण अधिकारी असतो. पण मला तुला अधिकारी बनताना बघायचे आहे. प्लिज एकदा माझ्यासाठी सहा महिने थांब. " प्रकाश म्हणाला.
प्रकाशने दर्शनचे डोळे पुसले. त्याला मिठीत घेतले. दर्शन पुन्हा नव्याने लढायला सज्ज झाला.
क्रमश..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा