गुलाल ! पार्ट 18 ( अंतिम भाग )
रात्रीचा प्रहर होता. आभासने दर्शनला एका हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावले होते.
" अभ्यास कसा चालू आहे ?" आभास म्हणाला.
" थोडा ब्रेक दिलाय. आताच प्री , मेन्स , सरळसेवा दिल्या. सो एक आठवड्याचा ब्रेक घेतलाय. " दर्शन म्हणाला.
" ऋत्विक , जीवन , आकांक्षा ?" आभास म्हणाला.
" आकांक्षा एसटीआय झाल्यापासून जास्त टचमध्ये नाही. जीवन तर गायब झालाय. ऋत्विक आणि मी सोबत स्टडी करतो. एका सरळसेवा परीक्षेत वेटिंगमध्ये आहे ऋत्विक. " दर्शन म्हणाला.
" राजवंश आहे का टचमध्ये ?" आभास म्हणाला.
" तो तर पार्टीचा युवाअध्यक्ष झालाय. पण त्याला निवडणुकीचे तिकीट हवं होतं ते मिळालं नाही. म्हणून खूप दुःखात होता. पक्षाने त्याचा वापर केला अस म्हणत होता. ऋत्विक मला सर्वकाही सांगतो बळजबरी. " दर्शन म्हणाला.
" मला माफ कर.चुकलं माझं. " आभास म्हणाला.
" जाऊदे. पण काकांचीही माफी माग. अजूनही वेळ गेली नाही. अभ्यास कर आणि अधिकारी बन. " दर्शन म्हणाला.
" काय खाणार ?" आभास म्हणाला.
" मला काही नको. खूप महागडे हॉटेल आहे. " दर्शन म्हणाला.
" अरे तू बिनदास हवे ते ऑर्डर कर. बिल मी पे करेल."
आभास म्हणाला.
आभास म्हणाला.
" ठीक आहे. " दर्शन म्हणाला.
जेवण झाल्यानंतर आभासने दर्शनला त्याच्या स्कुटीवर बसले. शॉर्टकटने घरी पोहोचवतो असे म्हणत एका निर्जन ठिकाणी तो दर्शनला घेऊन गेला. तिथे अंधार होता. आभासने स्कुटी थांबवली.
" इथे का आणले आहे मला ?" दर्शन म्हणाला.
" एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये ट्रीट दिली तुला आता त्याची परतफेड नको ?" आभास कुत्सितपणे हसत म्हणाला.
" म्हणजे ?" दर्शन म्हणाला.
तेव्हा तिथे दोन माणसे आली आणि त्यांनी दर्शनला धरले. दोघेही दर्शनशी जवळीक साधायचा प्रयत्न करत होते. दर्शन त्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता पण त्या दोन मजबूत अंगकाठीच्या पुरुषांसमोर दर्शनचा निभाव लागत नव्हता.
" बलात्कार करा याचा. सर्व माज उतरला पाहिजे भावी अधिकाऱ्याचा. " आभास व्हिडीओ बनवत म्हणाला.
तेव्हा तिथे दोन-तीन किन्नर आले.
" काय चालले आहे इथे ? सोडा याला नाही तर एकेकाला कोयत्याने कापून काढेल. " एकजण समोर येऊन ओरडला.
त्याला घाबरून दोन्ही इसम पळून गेले. मग त्या किन्नरने आभासला धरले.
" मी यशवंता. तुम्ही कथा लिहितात ना ? तुम्हाला कार्यक्रमात बघितले होते. आज इकडं येताना बघितले. काही तरी अनुचित होणारे मन सांगत होते म्हणून मैत्रिणींना घेऊन आलो. " तो किन्नर म्हणाला.
" तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. " दर्शन म्हणाला.
" या माकडाचे काय करायचे ? याला नग्न करून याचा व्हिडीओ काढू. " दुसरा किन्नर म्हणाला.
" सोडून द्या याला. माझा मित्र आहे. गावाकडचा आहे. आभास , मी तुझ्यासारखं खालच्या थराला कधी घसरणार नाही. अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल काही राग असेल तर माफ कर. मी पुण्याला अभ्यास करून पोस्ट काढण्यासाठी आलोय. माझ्या आईसाठी मला काही तरी बनून दाखवायचे आहे. येतो. " दर्शन म्हणाला.
दर्शन तिथून निघून गेला.
***
काही दिवसांनी आकांक्षा दर्शन आणि ऋत्विकला भेटायला आली. तिचे अल्लड व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून गेले होते. ती आता धीरगंभीर , जबाबदार झाली होती. तिघांनी खूप गप्पा मारल्या.
" जीवनसोबत काही बोलणे झाले ?" ऋत्विक म्हणाला.
" नाही. मी खूप प्रयत्न केला पण काही संपर्क होऊ शकला नाही. म्हणून मी मूव्ह ऑन झाले. " आकांक्षा म्हणाली.
" म्हणजे ?" ऋत्विक म्हणाला.
" माझं लग्न ठरलं आहे. तुम्हाला निमंत्रण द्यायला आले आहे. " आकांक्षा म्हणाली.
" अभिनंदन. " ऋत्विक म्हणाला.
" मी संकल्प सरांना भेटायला चालले आहे. तुम्हाला यायचे असेल तर या. " आकांक्षा म्हणाली.
" हो. आम्हीही येतो ना. असेपण मी ऐकले आहे की संकल्प सरांनी नवीन टीचर्स आणले आहेत. हे टीचर्स पेठेत अभ्यास करणारे जुने विद्यार्थीच आहे म्हणे. " ऋत्विक म्हणाला.
" ग्रेट. मग तर भेटायलाच हवं. " आकांक्षा म्हणाली.
तिघेही संकल्प सरांना भेटायला गेले. तिथे त्यांना जीवन भेटला. जीवनला पाहून आकांक्षाचे डोळे पाणावले. दोघेही एकांतात गच्चीवर गेले.
" स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही याचे दुःख होतेच. त्यापेक्षा जास्त दुःख तुला गमावल्याचे होते. अहंकार दुखावला गेला होता माझा. जर माझे सिलेक्शन झाले असते आणि तुझे नाही तर तू सोडून गेली नसती मला. पण मी तुला सोडून गेलो. पुरुषी अहंकार म्हण हवं तर. जमेल ते काम केलं पण मन रमले नाही. संकल्प सर भेटले एकदा. त्यांनी शिक्षक बनण्याचा सल्ला दिला. म्हणून इथं आलो. माझ्या अनुभवातून विद्यार्थी शिकतील. मला माफ कर आकांक्षा. " जीवन म्हणाला.
" माफ केले तुला. " आकांक्षा नेत्रातून आसवे गाळत म्हणाली.
" आज खूप मोठं ओझं उतरले. " जीवन म्हणाला.
" माझं लग्न ठरलंय. " आकांक्षा म्हणाली.
" अभिनंदन. तुला नवीन आयुष्यासाठी खूप शुभेच्छा."
जीवन म्हणाला.
जीवन म्हणाला.
" थँक्स. आता तू पण नव्याने आयुष्याची सुरुवात कर. सुखी रहा. " आकांक्षा म्हणाली.
" हो. " जीवन म्हणाला.
दोघेही रडले आणि दोघांनीही मनातल्या भावनांना वाट मिळवून दिली.
***
आकांक्षा आणि जीवन खाली आले. जीवन दर्शन आणि ऋत्विकला भेटला.
" ऋत्विक, कशाचा अभ्यास चालू आहे आता?" जीवनने विचारले.
" सरळसेवेचा. कमबाईन मेन्स दिलीय पण होईल की नाही माहिती नाही. " ऋत्विक म्हणाला.
अचानक टेलीग्रामवरच्या एमपीएससी ऑफिशियल चॅनलवर निकालाची नोटिफिकेशन आली. कमबाईन मेन्सचा निकाल लागला होता. ऋत्विक आणि दर्शन दोघांचेही एएसओ म्हणून सिलेक्शन झाले होते. दोघांनी लगेच दर्पण सरांचे आशीर्वाद घेतले. दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नव्हता. तो दिवस कसा गेला कळलेच नाही. जीवनही मनसोक्तपणे नाचत होता. अखेरीस दर्शनच्या अंगालाही विजयाचा गुलाल लावला गेला. गुलालाने माखलेल्या चेहऱ्यामागे कितीतरी दिवसांचा संघर्ष होता. एकेकाळी बेरोजगार, आयतोबा म्हणून हिनवणारे नातेवाईक ऋत्विकचे व्हाट्सएपवर स्टेट्स ठेवू लागले. जेव्हा दर्शनच्या आईला ही गोड बातमी कळली तेव्हा तिच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. विद्यार्थ्यांनी भरपूर जल्लोष केला. रात्री दर्शन आणि प्रकाश एका हॉटेलमध्ये गेले.
दर्शनने खिश्यातून प्रकाशसाठी घेतलेली अंगठी काढली आणि ती प्रकाशला घातली.
" प्रकाश , मला अजूनही तुझ्या पैश्याने फरक पडत नाही. तू जसा आहे तसा मला आवडतो. खूप केलं यार तू माझ्यासाठी. थँक्स. " दर्शन म्हणाला.
प्रकाशने आजूबाजूची पर्वा न करता दर्शनला घट्ट मिठीत घेतले.
" आज माझ्याकडून पार्टी. हवं ते ऑर्डर कर. तुला म्हणले होते ना पोस्ट निघाल्यावर पार्टी देईल." दर्शन म्हणाला.
" यार तुला एक गोष्ट सांगायची होती. हे हॉटेल माझ्या वडिलांचेच आहे. " प्रकाश म्हणाला.
" काय?" दर्शन म्हणाला.
" हो. आमचा फॅमिली बिजनेस आहे हॉटेलचा. वडील आजारी पडल्यामुळे मी टेक ओव्हर केला. " प्रकाश म्हणाला.
" पण मग सत्य लपवले का ?" दर्शन म्हणाला.
" यार श्रीमंतीमुळे प्रेम करणारे खूप जण मिळतात. म्हणून गरीब असल्याचे दाखवतो. मला माझ्यावर प्रेम करणारा कुणीतरी हवा आहे. माझ्या पैशावर नाही. " प्रकाश म्हणाला.
जेवण करून दोघेही घरी आले. ऋत्विक आधीच गावाकडे निघाला होता. त्यामुळे फ्लॅटवर कुणीच नव्हते. ती रात्र दोघांच्याही जीवनातील सर्वात सुंदर रात्र होती. मनोमिलन आधीच झाले होते परंतु आज त्यांचे देहही एकमेकांमध्ये मिसळले.
***
दुसऱ्या दिवशी दर्शन गावाकडे जायला निघाला. तो कपडे पॅक करत होता. तेव्हा तिथे आभास आला.
" आभास , हे घे पेढे. माझी पोस्ट निघाली. " दर्शन म्हणाला.
" अभिनंदन यार. तू करून दाखवलं. " आभास म्हणाला.
" श्रीरामाची कृपा. तू इथं कसकाय ?" दर्शन म्हणाला.
" यार त्या आर्यनने धोका दिला. " आभास म्हणाला.
" काय केले त्याने ?" दर्शन म्हणाला.
" फ्लॅटमध्ये चार जणांना बोलावले आणि माझ्यावर बलात्कार करायला लावला. माझा सौदा केला त्याने. अरब होते ते चौघे. खूप त्रास झाला मला. " आभास रडू लागला.
दर्शनने आभासला मिठीत घेतले.
" आभास , सावर स्वतःला. विसरून जा या गोष्टी. वाईट स्वप्न समजून. " दर्शन म्हणाला.
" जे मी तुझ्यासोबत करणार होतो तेच माझ्यासोबत घडले. "आभास म्हणाला.
" जाऊदे. नवीन सुरुवात कर. मी तुला माझ्या नोट्स देतो. अभ्यास कर. " दर्शन म्हणाला.
" आता खूप उशीर झालाय रे. मला एड्स झालाय. मी खूप चुकीचा वागलो. तुझ्यासोबत , माझ्या कुटुंबासोबत. मला माफ कर. माझ्या बाबांना आणि बहिणीला पण सांग मी माफी मागितली ते. प्लिज मला काही झाले तर माझ्या कुटुंबाला सांभाळ. असच यश मिळवत रहा. येतो." आभास म्हणाला.
अचानक आभास गायब झाला. दर्शनला वाटले त्याचा भास झाला आहे.
***
दर्शन गावाकडे आला. तेव्हा त्याचा भव्यदिव्य सत्कार झाला. मिरवणूक निघाली. ही मिरवणूक दर्शनच्या काकाच्या घरासमोर थांबली. दर्शन भूतकाळात गेला. काही वर्षांपूर्वी इथेच त्याची आई रडत होती. जमिनीच्या तुकड्यासाठी भांडत होती. ती जमीन काकांनी कपटाने बळकावली होती. आज सर्वजण दर्शनचे कौतुक करत होते. दर्शनच्या आईचा उर अभिमानाने भरून आला होता. तेव्हाच एक बातमी गावात येऊन धडकली. आभासच्या घरातून रडण्याचा आवाज आला. त्याची बहीण मोठमोठ्याने रडत होती. वडील भावनाशून्य होऊन निपचितपणे एका कोपऱ्यात बसले होते. दर्शन तिथे गेला. त्याला कळले की आभासने आत्महत्या केली आहे. आभासचा मृतदेह गावात आणला गेला. दर्शनच्या आईने ताबडतोब सत्कार थांबवला.
" एका घरचं तरणताठं कोवळं लेकरू मरण पावलं. आम्ही जल्लोष करणं उचित नाही. पाप लागेल. आभास मलाबी लेकरासारखा होता. आमच्याबी घरात सुतक पडेल. " दर्शनची आई उद्गारली.
दर्शनला विश्वास बसत नव्हता की त्याने त्याचा मित्र कायमचा गमावला होता. दिसायला सुंदर असलेला आभास शांतपणे आडवा पडला होता. त्याच्या वडिलांनी थरथरत्या हातांनी आभासच्या चितेला अग्नी दिला.
" माफ करा. मी तुमच्या लेकराला सांभाळू शकलो नाही. नालायक बाप आहे मी जगातला. " आभासचे वडील त्यांच्या मृत बायकोला उद्देशून म्हणाले.
चितेला अग्नीज्वालांनी घेतले. हवेत ज्वाला धडाडू लागल्या. दर्शनला क्षणभर वाटले की चमत्कार व्हावा आणि आभास पुन्हा जिवंत व्हावा. तो भूमीवर कोसळला. त्याला त्या ज्वालात हात हलवत निरोप देणारा आभास दिसला.
©® पार्थ धवन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा