गुलाल ! पार्ट 2
आभास आणि दर्शन दोघेही गेट टुगेदरला गेले. तिथे दर्शनचा सत्कार करण्यात आला. मग दोघेही नाश्ता करायला बसले.
" दर्शन , चार समोसे खिश्यात टाकू का ? रात्री खायला होतील. मेसच्या जेवणाचा कंटाळा आला. वरणात वरण कमी , पाणी जास्त. "
" आभास , आताच मला पुष्पगुच्छ देऊन माझा सत्कार झाला. तू असे चाळे करशील तर जोडे मारून सत्कार करतील. "
तेवढ्यात तिथे एक व्यक्ती आला. तो दिसायला देखणा होता. त्याला मजबूत शरीरयष्टी लाभलेली होती.
" हॅलो. तुम्हीच का दर्शन ?" प्रकाश म्हणाला.
" हो. अरेतुरे केलं तरी चालेल. " दर्शन म्हणाला.
त्याच्या मुखावर स्मितहास्य उमटले.
" माझे नाव प्रकाश. मी तुझ्या कथा वाचल्या आहेत. खूप जीव ओततोस पात्रांमध्ये. तुझ्या कथा खूप सुंदर असतात. " प्रकाश म्हणाला.
" थँक्स. " दर्शन म्हणाला.
" तुम्ही काय करतात ?" आभासने विचारले.
" मी एक शिक्षक आहे. ट्युशन घेतो. " प्रकाश म्हणाला.
आभासचा चेहरा उतरला.
" अरे वाह ! चांगली गोष्ट आहे. " प्रकाश म्हणाला.
" तुम्ही काय करतात? " आभासने विचारले.
" आम्ही एमपीएससी करायला आलोय पुण्यात. आताच ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. आज फ्री होतो म्हणून आलो. " दर्शन म्हणाला.
" छान छान. " प्रकाश म्हणाला.
***
संध्याकाळी दोघेही घरी आले. दोघेही थकलेले होते. त्यामुळे मेसचा डब्बा घरीच मागवला. आभास कुणाशीतरी बोलण्यात व्यग्र होता.
" आभास लवकर ये. खूप भूक लागली आहे. " दर्शन भुकेने व्याकुळ होऊन म्हणाला.
" आलोच. " आभास म्हणाला.
थोड्या वेळाने आभास आला. दोघेही जेवायला बसले.
" आज पुन्हा बटाट्याची भाजी. या मेसच्या मावशीला बटाटे सोडून काही येत नाही का ?" दर्शन नाक मुरडत म्हणाला.
" खा मुकाट्याने. आपण कुठले राजामहाराजा नाही. बाय द वे कुणाशी बोलत होतास?" दर्शन म्हणाला.
" अरे डेटिंग अँपवर एक आयटम भेटला आहे. " मोहक " नाव आहे त्याचे. " आभास म्हणाला.
" मोहक मंगल का ? युट्युबर ?" दर्शन म्हणाला.
" नाही रे. मोहक पाटील. प्रेमातच आहे माझ्या. चांगला जॉब आहे त्याला. तो जर माझा बॉयफ्रेंड बनला ना तर माझी लाईफ सेट होईल. " आभास म्हणाला.
" आभास , या नादाला नको लागू. " दर्शन म्हणाला.
" मी लागतच नाहीये. मी फक्त त्याला माझ्या जाळ्यात ओढणार आणि त्याचे पैसे उधळणार. " आभास म्हणाला.
" आपण इथं अभ्यासाला आलोय आणि अभ्यासच कर. " दर्शन म्हणाला.
" तुझ्या फोनवरही मला प्रकाशचे मिस्ड कॉल्स दिसले. शिक्षक आहे. फार कमवत नसेल. पण मी आहे ना. माझ्या बॉयफ्रेंडचा तू साला असशील म्हणून जीजूला लुटायचा तुला पूर्ण अधिकार आहे. "
आभास म्हणाला.
" वेडा झालाय तू. पहिली गोष्ट कुणी व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत मला फरक पडत नाही. फक्त मनाने , स्वभावाने चांगला असावा. दुसरी गोष्ट मी पुण्यात रिलेशनशिपसाठी नाही तर पोस्ट मिळवण्यासाठी आलोय. या गोष्टींसाठी मला वेळ नाही. " दर्शन म्हणाला.
" बघू बघू. " आभास म्हणाला.
***
दुसऱ्या दिवशी दोघांच्याही क्लासेसचा पहिला दिवस होता. लवकर गेल्यामुळे आभास आणि दर्शनला दुसऱ्या रांगेत जागा मिळाली. मुले गप्पा मारण्यात व्यग्र होती. तेवढ्यात दर्पण सर आले आणि हॉलमध्ये भयाण शांतता पसरली.
" नमस्कार. मी दर्पण पवार. काही वर्षांपूर्वी मीही तुमच्याप्रमाणेच एमपीएससी करायला पुण्यात पेठेत आलो होतो. डोळ्यात खूप सारी स्वप्ने होती. तीन वेळा इंटरव्ह्यू दिला आहे मी एमपीएससीचा. असो. आज तुमचा पहिला दिवस. तुम्हाला दहावी बारावीत किती टक्के मिळाले काही फरक पडत नाही. जो आजपासून मन लावून अभ्यास करेल तोच ही शर्यत जिंकेल. सातत्य , परिश्रम , जिद्द आणि सर्वात महत्वाचं स्मार्टवर्क याशिवाय पर्याय नाही. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणायचे की आपला मेंदू आपला मित्र असू शकतो आणि आपला शत्रूदेखील. तसच मी म्हणेल की आपला हातातला हा मोबाईल आपला मित्रही असू शकेल आणि शत्रू पण. तो आपल्याला घडवू पण शकतो आणि बरबाद पण करू शकतो. फक्त तुमच्यावर डिपेंड आहे मोबाईलचा कसा वापर करायचा. एकच सल्ला देईल पंचवार्षिक योजना बनवू नका. दोन वर्षांत किमान एखादी सरळसेवा तरी उत्तीर्ण व्हा. मी अनेकांना यूपीएससीपासून तलाठीपर्यंतचा प्रवास करताना बघितले आहे. एक पोस्ट भेटली की प्रवास संपत नाही. उलट आर्थिक स्थैर्य येते आणि घरच्यांचे टोमणे बंद होतात. असो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जो अर्जुनासारखा एकाग्र असेल त्याच्याच अंगावर यशाचा गुलाल उधळला जाईल !" दर्पण सर म्हणाले.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा