गुलाल ! पार्ट 3
" आभास , ही आहे " अहिल्या लायब्ररी " ! असे म्हणतात एमपीएससीचा कटऑफ इथलेच विद्यार्थी ठरवतात. आजपासून आपण ही लायब्ररी लावायची. सकाळी यायचे आणि रात्रीच घरी जायचे. " दर्शन म्हणाला.
" हो. पण रविवारी ब्रेक घ्यायचा. " आभास म्हणाला.
" नक्कीच. रविवारी फक्त रिवीजन. " दर्शन म्हणाला.
आभासने डोक्याला हात मारला. दोघांनीही लायब्ररीत प्रवेश घेतला.
" फीस वेळेवर भरायची नाही तर ऍडमिशन कॅन्सल करण्यात येईल. तुम्ही फक्त गावाकडचे आहात म्हणून तुम्हाला ऍडमिशन दिले. नाही तर खूप जण तळमळत असतात या अभ्यासिकेत प्रवेश घ्यायला. अभ्यासिकेत अभ्यास सोडून इतर चाळे करायचे नाहीत. एखादी वस्तू हरवली तर आम्ही जबाबदार नाही. अश्लील चाळे चालणार नाहीत. फोन आला की बाहेर जाऊन उचलायचा. एका खुर्चीवर जास्तीत जास्त दोन उश्या वापरू शकता. वायफायवर मुव्हीज डाउनलोड करायचे नाहीत. लेक्चर सोडून चित्रपट किंवा सिरीयल वेब सिरीज बघत बसायचे नाही. " लायब्ररीचा मॅनेजर म्हणाला.
लायब्ररीच्या मॅनेजरची लांबलचक लिस्ट ऐकून आभास जांभळ्या देऊ लागला. दर्शनने त्याच्या पोटात बुक्की मारल्यावर तो भानावर आला.
" हो सर. " दर्शन म्हणाला.
***
थोडा वेळ अभ्यास करून दोघेही चहा प्यायला बाहेर टपरीवर आले. जाताना एका मुलाचा वॉलेट पडलेला दर्शनला दिसला. दर्शनने तो उचलला.
" दर्शन , या वॉलेटमधल्या पैश्यांनी पिझ्झा खाऊन येऊ. " आभास म्हणाला.
" शांत बस. इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तसही चोरी करणे पाप आहे. चल त्या मुलाला देऊन येऊ." दर्शन म्हणाला.
दोघेही त्या मुलाच्या मागे मागे गेले आणि त्या मुलाला त्यांनी वॉलेट दिला. अश्याप्रकारे दोघांनाही लायब्ररीत नवीन मित्र भेटले. सर्वजण चहा पिण्यासाठी एका टपरीवर गेले.
" हॅलो. मी जीवन. थँक्स वॉलेट देण्यासाठी. नाही तर मेसमध्येच भांडी घासावी लागली असती. " जीवन म्हणाला.
सर्वजण हसले. किंचित सुटलेले पोट , थोडेसे गळालेले केस , वाढलेली दाढी , गोलाकार चेहरा असे जीवनचे रूप होते. आयुष्यात आलेल्या सर्व संघर्षाचे दुःख पचवून त्याच्या ओठांवर हास्य कायम असे. शिवाय आसपासच्या लोकांनाही तो कधीच उदास राहू देत नसे. त्याच्या याच स्वभावावर आकांक्षा भाळली होती. दोघेही प्रेमात असले तरी दोघांनीही मर्यादा पार केली नव्हती. दोघेही एकमेकांना अभ्यासात मदत करत होते.
" मी आकांक्षा आणि हा ऋत्विक. कुठे क्लास लावला ?" आकांक्षा म्हणाली.
" यशोगाथा. एमपीएससीची असेल खुमखुमी तर यशोगाथा म्हणजेच यशाची हमी. " आभास टॅगलाईन ऐकवत म्हणाला.
आकांक्षा हसली.
" बघू , किती वर्षे टिकते खुमखुमी ? फक्त पेठेत राहून म्हातारे होऊ नका. सगळे क्लासेस लुटतच असतात विद्यार्थ्यांना. " आकांक्षा म्हणाली.
दर्शन आणि आभासने एकमेकांकडे बघितले. आकांक्षा ही "टॉम बॉय " प्रकारची मुलगी होती. स्पोर्टसमध्ये तिला रस होता आणि ती बॅडमिंटनमध्ये नॅशनल लेव्हल चॅम्पियन होती. मैत्रिणींपेक्षा तिचे मित्रच जास्त होते. घरांशी भांडून अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती पुण्याला आली होती.
" टायपिंगचा क्लास लावून टाका. " ऋत्विक म्हणाला.
" का ?" दर्शनने विचारले.
" ग्रुप सी च्या हजारो जागा निघणार आहेत. "ऋत्विक म्हणाला.
" पण आम्ही मोठे अधिकारी व्हायला आलो आहोत." दर्शन म्हणाला.
" चार-पाच वर्षे अभ्यास करून जेव्हा बेरोजगारीने हैराण होशील आणि घरचे टोमणे मारून मारून कान सुजवतील तेव्हा शिपायाचा जॉबही चांगला वाटेल. बेरोजगारी फार वाईट. देव शत्रुलाही बेरोजगारी देऊ नये. " ऋत्विक म्हणाला.
" चहा आला. बाय द वे. हा चहा विकणाराही दहा वर्षांपूर्वी एमपीएससी करायलाच आला होता पेठेत. आता शिक्षणासाठी गहाण टाकलेली जमीन सोडवण्यासाठी चहा-पोहे विकतोय पेठेत. " जीवन म्हणाला.
सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला. ऋत्विक आणि जीवन हे चार वर्षांपासून एमपीएससी करत होते. आकांक्षा ही जीवनची गर्लफ्रेंड होती आणि तीही एमपीएससीची तयारी करायची. ऋत्विक , जीवन , आकांक्षा , दर्शन आणि आभास हे सर्व लवकरच एकमेकांचे चांगले मित्र बनले.
***
रात्रीचा प्रहर होता. मोहक आणि आभास एकमेकांच्या मिठीत होते. आभास आपल्या बोटांनी मोहनच्या छातीवर रेखोट्या ओढत होता. तेवढ्यात त्याला दर्शनचा फोन आला.
" कुठे आहेस ? कधी येणार आहे ?" दर्शनने विचारले.
" अरे मी माझ्या मित्राकडे आलोय. मला उशीर होईल. तू जेवण करून घे. " आभास म्हणाला.
" अरे पण तू कुठे आहेस ?" दर्शनने पुन्हा विचारले.
आभासने लगेच फोन कट केला.
" हा फोन एक जुना झालाय. धड ऐकूही येत नाही. "
आभास वैतागून म्हणाला.
" इट्स ओके बेबी. मी तुला नवीन मोबाईल घेऊन देतो. " मोहक म्हणाला.
" खरच ?"
" हो. तोही ब्रँडेड. "
" यु आर सो क्युट. "
" पण माझी एक अट आहे. "
" कसली अट ?"
"रात्रभर मला खुश करशील तरच सकाळी गिफ्ट भेटेल. आहे का मंजूर ?"
" अरे पण दर्शन माझी वाट बघत असेल. सकाळी क्लास आहे. तो बुडेल. "
" माझ्यासाठी इतकं पण करू शकत नाही ?" मोहक लटक्या सुरात म्हणाला.
" तस नाही रे. पण.."
मोहकने आभासला घट्ट मिठीत घेतले आणि त्याच्यावर चुंबनाचा वर्षांव केला. वस्त्रांची बंधने गळून पडली आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत विरघळले.
***
सकाळी आभास घरी आला. दर्शनला त्याच्या मानेवर लव्ह बाईट्स दिसले.
" आभास , कुठे होतास रात्रभर ? अरे मला किती काळजी वाटली. फोनही उचलत नव्हतास. " दर्शन म्हणाला.
" मुलगी आहे का मी ?" आभास चिडून म्हणाला.
" तस नाही रे. पण तुझ्या घरच्यांनी तुझी जबाबदारी माझ्यावर दिली आहे. "
" ते सोड. हा बघ. नवीन मोबाईल. " आभास आनंदी होऊन म्हणाला.
" बापरे ! खूप महाग दिसतोय. आता मोबाईल चोरायला शिकला तू ? समोसा , वॉलेटपर्यंत ठीक होते पण चक्क मोबाईल ?"
" अरे बॉयफ्रेंडने दिला मला गिफ्ट. मोहकने. "
" अरे कशाला घेतला ?"
" प्रेम आहे त्याचे माझ्यावर. म्हणून म्हणतोय तू पण एखादा श्रीमंत बॉयफ्रेंड पटवून ठेव. माझ्यावर तर प्रेमाचा गुलाल उडाला आहे आता." आभास म्हणाला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा