गुलाल ! पार्ट 6
दर्शन आणि आभास सरळ मेसमध्ये गेले. जेवण झाल्यानंतर अभ्यासिकेकडे जाताना त्यांना प्रकाश भेटला. स्कुटीवरून खाली उतरून प्रकाशने दोघांचीही आपुलकीने विचारपूस केली.
" चहा प्यायचा का ? माझ्याकडून ट्रीट. " प्रकाश म्हणाला.
" नको. आताच जेवण केले आम्ही. " दर्शन म्हणाला.
" कोल्ड कॉफी घेऊया. " आभास म्हणाला.
तिघेही जवळच्या कॅफेत गेले आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली.
" दर्पण सरांचे क्लासेस लावले का ?" प्रकाश म्हणाला.
" होय. यशोगाथा. एमपीएससीची असेल खुमखुमी तर यशोगाथा म्हणजेच यशाची हमी. " आभास म्हणाला.
" ओके ओके. चांगलं आहे. " प्रकाश म्हणाला.
" पण मला वाटते दुसरीकडे लावायला हवा होता क्लास. ज्या सरांना स्वतः स्पर्धा परीक्षेत यश मिळाले नाही ते विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार ?" आभास म्हणाला.
" गप बस आभास. तू कितीवेळा त्यांच्याकडे मार्गदर्शन मागायला गेलाय ? आला मोठा शहाणा." दर्शन म्हणाला.
" तस नाही. ते कुणाला सांगत नाही पण ते पीएसआय ऑफिसर होते. " प्रकाश म्हणाला.
" काहीही ह श्री सॉरी प्रकाश. " आभास म्हणाला.
" खरच. हवं तर गुगलवर सर्च करा. दोन वर्षे ते पीएसआय ऑफिसर होते. परंतु भ्रष्टाचार , पॉलिटिकल प्रेशर यांमुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता. मग त्यांनी इतरांना शिकवायला सुरूवात केली. " प्रकाश म्हणाला.
" तुम्ही कसे ओळखता दर्पण सरांना ? ते पण समलैंगिक आहेत की काय ?" आभास म्हणाला.
" नाही. ते स्ट्रेट आहेत. आम्ही सोबतच प्रिप्ररेशन करत होतो. मी लवकर सोडलं एमपीएससी. " प्रकाश म्हणाला.
" मित्र होते तर अहो जावो का करताय ?" आभासने विचारले.
" कारण आता तो शिक्षक आहे ना. आदर तर द्यायलाच हवा. " प्रकाश म्हणाला.
तेवढ्यात आभासला एका मित्राचा फोन आला आणि तो निघून गेला.
" दर्शन , मी तुला फेसबुकवर किती मेसेज केले पण तू कधीच वेळेवर रिप्लाय देत नाहीस. " प्रकाश म्हणाला.
" वेळच मिळत नाही रे फेसबुक वापरायला. फक्त कधीतरी रविवारी कथा पोस्ट करण्यासाठी फेसबुकवर ऑनलाइन येतो. कधी कधी चुकून मेसेज सिन होतो पण रिप्लाय द्यायचा राहून जातो. लोकांना वाटते खूप अहंकार आहे माझ्यात. बऱ्याच जणांनी कसलेच भांडण नसताना अनफ्रेंडही केलं आहे. "
" तुझ्याकडे वेळ नाही म्हणून डायरेक्टच विचारतोय. तू माझा बॉयफ्रेंड बनशील ? पण माझ्याकडे तुला द्यायला महागडी गिफ्ट्स वगैरे नाहीत. फक्त प्रेम आहे. " प्रकाश म्हणाला.
" तुझा स्वभाव चांगला आहे. सर्वात मोठे महागडे गिफ्ट म्हणजे प्रियकराचे प्रेम ! नात्यातला प्रामाणिकपणा. अजून काय हवं ? मला गिफ्ट्स वगैरे नकोत. " दर्शन म्हणाला.
" मग तुझा होकार समजू का ?" प्रकाश म्हणाला.
" आताच नको. मला थोडा वेळ हवाय. " दर्शन म्हणाला.
" ठीक आहे. हा गरीब प्रियकर वाट बघेल तुझ्या होकाराची. " प्रकाश म्हणाला.
" पण माझा मित्र आभास खूप सुंदर आहे दिसायला. त्याला अश्या गोष्टी आवडतात. " दर्शन म्हणाला.
" रिलेशनशिपसाठी आतून फिलिंगस पण जाणवल्या पाहिजेत ना. " प्रकाश म्हणाला.
" ठीक आहे. दर रविवारी भेटत जाऊ. मैत्री ठेवू. बाकीचे नंतर बघू. " दर्शन म्हणाला.
" तुला कसा हवा आहे जोडीदार ?" प्रकाश म्हणाला.
" मला कुणी स्वप्नातला राजकुमार नको. साधा असेल तरी चालेल. फक्त मला समजून घेणारा , माझी काळजी घेणारा हवा. म्हणजे ज्याच्या मांडीवर डोके टेकवून मला सुखाची झोप लागायला पाहिजे. ज्याचा हात हातात घेऊन , ज्याच्या खांद्यावर डोके टेकवून माझं सगळं नैराश्य , थकवा दूर झाला पाहिजे. " दर्शन म्हणाला.
" छान. " प्रकाश म्हणाला.
" तुला कसा हवाय जोडीदार ?" दर्शन म्हणाला.
" तुझ्यासारखा. " प्रकाश म्हणाला.
दर्शन लाजला.
" मी तर तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करतो जेव्हा तुला पाहिलेदेखील नव्हते तेव्हापासून. तुझ्या कथा कविता मला खूप आवडतात. आणि मी कधीच तुला तुझ्या ध्येयापासून दूर करणार नाही. तुला विचलित करणार नाही. तू जितका वेळ देशील तेवढ्यात भरभरून प्रेम देईल तुला. मला तुझा देह नको फक्त सहवास हवा. " प्रकाश म्हणाला.
दर्शनचे डोळे पाणावले. तो उठला.
" चल. उशीर होतोय. मी अभ्यासिकेत जातो. " दर्शन म्हणाला.
" काय झाले ? काही चुकीचे बोललो असेल तर माफ कर. " प्रकाश म्हणाला.
" तस नाही. आजपर्यंत माझ्यावर कुणी प्रेम करू शकते असे कधी वाटलेच नाही. ज्यांना प्रपोज केलं त्यांनी आरश्यात थोबाड बघण्याचा सल्ला दिला. त्यांचाही दोष नाही. मीच दिसायला कुरुप आहे." दर्शन म्हणाला.
" तू खूप सुंदर आहेस. लोकांना तुझे सौंदर्य कळलेच नाही. " प्रकाश म्हणाला.
नकळतपणे दर्शनने प्रकाशला मिठी मारली आणि तो निघून गेला. प्रकाश त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच बसला.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा