गुलाल ! पार्ट 8
रात्रीचा प्रहर होता. जीवन आणि आकांक्षा गच्चीवर होते. गार वारा सुटला होता. नभात पौर्णिमेचा चंद्र शोभून दिसत होता. आकांक्षाने जीवनच्या खांद्यावर डोके टेकवले होते आणि त्याचा हात हातात घेतला होता.
" विचित्र कारभार आहे सगळा. वेळेवर जाहिरात पडत नाहीत , पडली तर जागा कमी असतात , मग वेळेवर परीक्षा होत नाहीत आणि परीक्षा झाली तर निकाल लवकर लागत नाहीत. त्यात उत्तरपत्रिकेत चुका , कोर्ट केस वगैरे. यूपीएससी एका वर्षात सर्व आटोपते. तस आपल्याकडे का होत नाही ? विद्यार्थ्यांची ऐन उमेदीची वर्षे वाया जातात. ताटकळत बसतात बिचारे. देह खंगतो आणि मने तुंबतात. डोक्यावरचे केस गळतात. विद्यार्थी पोहे खाऊन आणि चहा पिऊन दिवस काढतात. चांगले जेवण मिळत नसल्यामुळे किंबहुना परवडत नसल्यामुळे मुले आजारी पडतात. पलंगावरचे ढेकूण तर असतातच संघर्षात भर घालायला. " जीवन म्हणाला.
" जाऊदे रे. आपला संघर्ष तर संपत आला आहे ना. उद्या पर्वा निकाल लागू शकतो म्हणताय कमबाईनचा. " ऑफिसर्स अड्डा " च्या टेलिग्राम चॅनलवर आले आहे." आकांक्षा म्हणाली.
जीवन हसला.
" तीन लाख फॉलोअर्स आहेत त्या चॅनलचे. त्या चॅनलचा अडमिंन माझा मित्र होता. खूप वर्षांपासून तो अभ्यास करतोय. त्याचे काही मित्र एएसओ म्हणून मंत्रालयात लागले आहेत. तिथून त्याला औथेंटीक इन्फॉर्मेशन भेटते. आज त्याने स्वतःच्या कमाईवर बुलेट घेतली आहे. घरी दर महिन्याला तीस हजार पाठवतो. " जीवन म्हणाला.
" इतकी कमाई फक्त चॅनलमुळे ?" आकांक्षा म्हणाली.
" हो. जाहिरातीमुळे इनकम मिळते ना. मी पण सुरू करायला पाहिजे होते. " जीवन म्हणाला.
" आता गरज नाही. उद्या निकाल लागला की दोघेही अधिकारी बनू आणि मग पगार येईलच की. दोन नंबरची कमाई पण होईल. " आकांक्षा म्हणाली.
" नाही ग. मी आयुष्यात कधीच भ्रष्टाचार करणार नाही. " जीवन म्हणाला.
" वाह ! काही अधिकारी भ्रष्टाचार करत नसतात. कधी कधी सिस्टीम त्यांच्याकडून भ्रष्टाचार करवून घेते. असो. अधिकारी झाल्यावर माझ्याशीच लग्न करशील ना ? की कुणी दुसरी बघशील?" आकांक्षा म्हणाली.
" कशाला हवीय दुसरी ? मला मरायचं नाहीये. न्युजपेपरमध्ये बातमी येईल की पेठेत एका मुलीने एका मुलावर केला कोयत्याने हल्ला. " जीवन म्हणाला.
दोघेही हसले.
" माझं जीवन भूगोल आहे. एकदम रुक्ष. तू पॉलिटी आहेस. इंटरेस्टिंग विषय. लक्ष्मीकांत कितीदाही रिवाईज केले तरी बोअर होत नाही तस तुझ्याशी कितीही वेळा भेटलो तरी मन भरत नाही. आपण लग्नापूर्वी एक छोटंसं संविधान बनवून घेऊ. जस की आर्टिकल 14 , आपल्यात Equality असेल. नात्यात कुणी मोठं किंवा छोटं नसेल. आर्टिकल15 आपण दोघेही एकमेकांच्या नातेवाईकांना समान आदर देणार. Discrimination नाही करणार. आर्टिकल 19 Freedom of speech. दोघेही कसलाच संकोच न बाळगता आपलं मन मोकळं करायचं. " जीवन म्हणाला.
" बस बस. वेडा आहेस तू. पॉलिटीचा अभ्यास करण्यापेक्षा सिसॅटकडे लक्ष दे. लास्ट टाईम काठावर पास झाला होतास. " आकांक्षा म्हणाली.
" ते reasoning , कोडी वगैरे सोडवताच येत नाहीत ग. डोकच चालत नाही. तू समोर असल्यावर सोपं वाटते पण तू नसलीस की एखाद्या जंगलात हरवलोय असे वाटते. " जीवन म्हणाला.
" तू भोळा आहेस म्हणून तुला अवघड गोष्टी सहज कळत नाहीत. असो. येते मी. " आकांक्षा म्हणाली.
आकांक्षा निघून गेली.
***
दुसऱ्या दिवशी सर्वजण पोहे खात होते.
" ऋत्विक तू पण दिली होती ना कमबाईन मेन्स ?" दर्शनने विचारले.
" हो. पण आजारी असल्यामुळे पेपर चांगला गेला नव्हता. डेंग्यू झाला होता मला. पण जीवन आणि आकांक्षाचे नक्की होईल सिलेक्शन. मला आजही तो दिवस आठवतो. मी ठाण्याहून पेठेत आलो होतो. माझी पहिली मैत्री या दोघांसोबतच झाली होती. अभ्यास करता करता यांची युती कधी झाली कळलेच नाही. " ऋत्विक म्हणाला.
" या पुणेरी पोह्याला आम्हा नागपूरच्या तर्री पोह्याची चव नाही. " जीवन म्हणाला.
" पोह्याचे सोड फक्त आजच्या निकालाचा विचार करा. मला तर फार टेन्शन आले आहे. माझ्या आईने बारामतीच्या सर्व मंदिरात नवस मागितला आहे. " आकांक्षा म्हणाली.
" तुमचं नक्की होईल सिलेक्शन. " दर्शन म्हणाला.
" बाय द वे. आभास दिसत नाही आजकाल पेठेत ?"
आकांक्षा म्हणाली.
आकांक्षा म्हणाली.
" तो कुठे असतो मलाच माहिती नाही. पेठेपेक्षा त्याला केपी-हिंजवडीमध्येच जास्त इंटरेस्ट असतो. मी त्याला खूप समजवतो. दोन दिवस अभ्यास करतो पण पुन्हा भरकटतो. काय करावं समजत नाही. काही बोललो जास्त तर अंगावर येतो. माझे बोलणे त्याला प्रवचन वाटते. " दर्शन म्हणाला.
" तू त्याची संगत सोड. तो स्वतःचे आयुष्य बरबाद करेलच पण तुझंही आयुष्य बरबाद करेल. संगत खूप महत्त्वाची असते. " आकांक्षा म्हणाली.
" मी त्याची जबाबदारी उचलली आहे. त्याच्या घरच्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. तो चुकला तरी त्याला परत योग्य मार्गावर आणायचं माझं काम आहे. असो. सिलेक्शन झाल्यावर आकांक्षा ताई तुझ्या नोट्स देशील बर. मुलींच्या नोट्स खूप नीटनेटक्या असतात म्हणे. तुझ्या नोट्स पाठ करून माझं पण पुढच्या वर्षी सिलेक्शन होईल. " दर्शन म्हणाला.
" इतरांपेक्षा आईलाच चांगल्या प्रकारे माहिती असते तिची मुले कशी आहेत. तसच नोट्स पण जो बनवतो त्यालाच जास्त समजतात आणि त्यातले ज्ञान डोक्यात घट्ट बसते. तू स्वतःच्या नोट्स रेफर कर. त्याच तुझ्यासाठी बेस्ट असतील." आकांक्षा म्हणाली.
दर्शनने होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने सर्वजण अभ्यासिकेत गेले.
गुरुवार म्हणजे आयोगाचा आवडता दिवस. दुपारी तीन वाजता आयोगाच्या वेबसाईटवर कमबाईनच्या निकालाची पीडीएफ अपलोड झाली. पेठेत फोन वाजू लागले आणि पोतभर गुलालाच्या ऑर्डर देण्यात आल्या.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा