गुलाल ! पार्ट 9
कमबाईनचा निकाल लागला. पेठ गुलालाच्या लाल-गुलाबी रंगाने न्हाउन निघाले. सर्वत्र उत्साह , जल्लोष , आनंद होता. मुले नाचत होती. ऋत्विक पण अंगात वीज संचारल्याप्रमाणे लाऊडस्पीकरवर लावलेल्या गाण्याच्या तालावर नाचत होता. दर्शन आणि आभास दोघेही दुरूनच हा आनंदोत्सव पाहत होते. आभासने ऋत्विकला बाजूला घेऊन विचारले ,
" तुझे तर सिलेक्शन झाले नाही मग तू का नाचतोय एवढा ?"
" माझे नाही झाले म्हणून काय झाले ? माझ्या मित्रांचे तर झालेच की. माझं दुःख त्यांच्या आनंदापेक्षा मोठे ठरले तर मी परीक्षेप्रमाणे मैत्रीतही फेल होईल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे म्हणजे दलदलीत उतरण्यासारखे आहे. माझा वनवास अजून काही काळ आहे पण माझे मित्र यातून सुटले याचा आनंद आहे."
अभ्यासिकेतल्या एका कोपऱ्यात गपचूप अभ्यास करणाऱ्या , कुणाशीही फारसा संवाद न साधणाऱ्या मुलांची अचानक निवड झालेली पाहून अनेकांना धक्का बसला होता. मीडिया टॉपर्सच्या मुलाखती घेत होती. एका विद्यार्थ्याने आपल्या वृद्ध माऊलीला कदाचित मुद्दामहूनच पेठेत बोलावले होते. निकालाच्या यादीत तिच्या मुलाचे नाव होते आणि त्यामुळे त्या माऊलीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहत होते. तिने अभ्यासिकेच्या पायऱ्यांवर आपले डोके टेकवले. या परिक्षा फक्त परीक्षा नसतात तर गोरगरीब तरुणांसाठी एक आशेचा किरण असतो , आपल्या कुटुंबाला चांगले जीवनमान देण्याचा एक मार्ग असतो , एक संधी असते. कदाचित अधिकाऱ्यांची पगार प्रायव्हेटपेक्षा कमी असेलही परंतु ज्या कठीण परिस्थितीत राहून संघर्ष करून त्यांनी पोस्ट मिळवलेली असते त्याला तोड नसते. सरकारी नोकरी मिळवणे हा एक अभिमानाचा क्षण असतो. अनेकांसाठी तो गरिबीवर मिळवलेला विजय असतो. काही टॉपर्स रडत होते तर काही जण टीव्हीवर अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगत होते. गळ्यात पडलेला हार आणि गुलालाने माखलेला देह असाच त्यांचा पेहराव होता. या यशाच्या गुलालात जे अपयशी झाले होते त्यांची आसवे हरवून गेली होती. असो. आकांक्षा ही अभ्यासिकेत होती. दिवसभर ती अस्वस्थ होती. आयोगाच्या ऑफिशिअल टेलिग्राम चॅनलवर निकालाची बातमी आली. आकांक्षाने थरथरतच पीडिएफ उघडली आणि तिला तिचे नाव सापडले. ती " एस टी आय " झाली होती. तिने लगेचच तिच्या वडिलांना फोन लावा. तिचे डोळे पाणावले होते.
" हा बोल बाळा. "
" बाबा माझं सिलेक्शन झाले. "
" खरच ? वाह वाह. चांगलं झाले ग. खूप खूप अभिनंदन. "
आकांक्षाची आई धावत आली.
" बाळा पहिला पेढा हनुमानाच्या मंदिरात ठेव. आज गुरुवार आहे तर स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन ये. तुझा एखादा चांगला फोटो पाठव म्हणजे मी स्टेटस ठेवते. त्या समोरच्या कुलकर्णी बाई मला टोमणे मारत होत्या की मुलीचे लग्न लावून द्या म्हणून. आता दाखवतेच त्यांना. जमलं तर दगडूशेठलाही जाऊन ये. "
तेवढ्यात आकांक्षाच्या बाबांनी फोन हातात घेतला.
" तुझ्या मित्र मैत्रिणींना जिथं सांगतील तिथं पार्टी दे. मी पैसे पाठवतो. आणि उद्या निघून ये. खूप दिवस झाले तुला बघून. पोरी तू आमच्या कष्टाचे सार्थक केलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे. तू आमचं नाव रोशन केलेस. "
फोन कट केल्यावर आकांक्षा अभ्यासिकेत आली तेव्हा सर्वजण उठून तिच्यासाठी टाळ्या वाजवत होते. थोड्याच वेळात तीही गुलालाने माखली गेली.
क्रमश...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा