Login

गुलाल ! पार्ट 1

.
गुलाल ! पार्ट 1

" हा बघ , कसला हॅन्डसम मुलगा आहे. " आभास म्हणाला.

" शांत बस. " दर्शन रिक्षावाल्याकडे इशारा करत म्हणाला.

मग आभासने डोक्यावर हात मारला. तो भानावर आला. आभास आणि दर्शन दोघेही लहानपणीपासूनचे मित्र. पदवीचे शिक्षणही एकाच कॉलेजमधून घेतले. दोघेही समलैंगिक होते आणि दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता पुढे काय करायचे हा प्रश्न दोघांना सतावत होता. दोघांचेही वडील शेतकरी होते. दुष्काळग्रस्त गावात शेती करताना किती अडचणी येतात आणि किती कमी उत्पन्न हाती पडते हे दोघांनाही चांगलेच ठाऊक होते. गावातला एक तरुण पीएसआय झाला होता. तेव्हा त्याचा झालेला सत्कार दोघांनीही पाहिला होता. तेव्हाच त्यांनीही सरकारी अधिकारी होण्याचे ठरवले. दर्शन अभ्यासात हुशार होता. त्याच्या संगतीत आभासही एखादी छोटीमोठी पोस्ट मिळवेल या आशेने आभासच्या घरच्यांनी आभासलाही दर्शनसोबत पुण्याला पाठवले. थोडी शोधाशोध केल्यानंतर दोघांना सदाशिव पेठेच्या जवळच एक फ्लॅट भाड्याने मिळाला.

" नशिबाने चांगला फ्लॅट मिळाला. भाडेही कमी आहे. " दर्शन म्हणाला.

" होय. नाही तर एमपीएससीचे विद्यार्थी किती कमी जागेच्या खोलीत राहतात. " आभास म्हणाला.

" राहतात ? झोपतात म्हण. विद्यार्थ्यांचा पूर्ण दिवस अभ्यासिकेत अभ्यास करण्यात निघून जातो. सकाळी निघून गेलेले रात्रीच घरी येतात. ते पण फक्त झोपायला. "

" हो. डेटिंग अँपवर बघायचं का आसपास कुणी शिकार गवसतोय का ?"

" आभास , आपण इथे या गोष्टी करायला आलो नाही तर अभ्यास करायला आलोय. काही तरी बनायला आणि स्वतःला सिद्ध करायला आलोय. अधिकारी बनायला आलोय. "

" अरे हो रे. पण अजून क्लासेस कुठे सुरू झालेत ? तोपर्यंत थोडी मजा केली तर काय हरकत आहे ? यार पुण्यात इतके देखणे तरुण आहेत. जीवनात तारूण्य एकदाच मिळते. ते वाया घालवायचे नसते. "

" तेच म्हणतोय. तारुण्य एकदाच मिळते. कर्तृत्व गाजवण्याची आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याची संधीही एकदाच असते. जन्माला आलो , वासनेच्या दलदलीत लोळलो आणि मेलो मग आपल्यात आणि कीडामुंग्यात काय फरक उरला ?"

" यार प्रवचन नको देऊस. असो. पर्वा " मन उधाण वाऱ्याचे - समलैंगिक साहित्य समूह " यांचे गेट टूगेदर आहे. तू जाणार आहे का ?"

" अजून ठरलं नाही. पण ऍडमिंनने खूप फोन केलेत. पण एकटे जायला भीती वाटत आहे. "

" अरे मी येतो ना सोबत. तेवढेच पुणे फिरणं होईल. तुझ्या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. तुला तर जायलाच हवं."