Login

गुंफण नात्यांची (गुंता नात्यांचा) भाग 3 -अंतिम

गोष्ट गुंफलेल्या नात्यांची
'खरंच! रूपा अशी आहे? आत्मविश्वासू, सभाधीट, निडर, आपली मतं ठामपणे व्यक्त करणारी..मग घरात अशी का वागते? मी कितीही, काहीही बोलले तरी मनाला लावून घेत नाही. कधी उलट उत्तर देत नाही. माझा राग, तिरस्कार, चीड, स्पर्धा सगळं सहन करते. ती मनातल्या मनात हसत असेल का माझ्यावर? की नवऱ्याची आई, सासू म्हणून विषय सोडून देत असेल?

आजवर या घरात फक्त माझा शब्द प्रमाण मानला गेला. कारण एक स्त्री म्हणून घरासाठी करणारं, लेकाच्या, नवऱ्याच्या पाठीशी उभं राहणार दुसरं असं कोणीच नव्हतं. मग इतकी वर्षे सुहास अन् अनिकेतने मला मान दिला की माझी मर्जी राखण्याचा प्रयत्न केला?

रूपा घरात आल्यावर मला इतकं असुरक्षित का वाटलं? कारण या घरातली माझी जागा ती घेईल, मला मिळणारी किंमत, मान तिला मिळेल म्हणून? आज सर्वांनी कित्ती कौतुक केलं तिचं. हे मी का करू शकले नाही? वयाची, शिक्षणाची, कौटुंबिक वातावरण याची बरोबरी नसताना देखील मी तिच्याशी स्पर्धा का केली?' आश्लेषा ताईंना काहीच कळत नव्हतं. प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. आरशासमोर बसून त्या स्वतःशी बोलत होत्या. मनात आलेल्या विचारांमुळे त्यांच्या चेहऱ्यावर निरनिराळे हावभाव तयार होत होते.

"मग सरप्राईज कसं वाटलं?" सुहास त्यांच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले. तशी त्यांची विचारांची साखळी तुटली.

"छान होतं." ताई कशाबशा उत्तरल्या.

"बस् इतकंच?" सुहास त्यांच्या जवळ बसत म्हणाले.
"आपलीच पोर आहे. थोडं कौतुक दाखव चेहऱ्यावर."

"म्हणजे तुम्हाला माहिती होतं सगळं. मग मला का आधी सांगितलं नाही सुहास?" ताई नाराज होत म्हणाल्या.

"तू सुलेखाकडे गेली होतीस तेव्हा यावर्षी काहीतरी वेगळं करायचं असं ठरवून तुझं महिला मंडळ घरी आलं होतं. खरंतर ही कल्पना अनिकेतची होती. मग सर्वांनीच तुला सरप्राईज द्यायचं असं ठरवून या कल्पनेला मान्यता दिली.
आशू, हा राग सोड आता. मी इतके दिवस काही बोललो नाही. पण सून ही काही स्पर्धा करण्याचं साधन नव्हे. घरची लक्ष्मी असते ती. एक सासू म्हणून तू तिला सन्मानाने वागवलंस तर सारं जग तिचा मान ठेवेल. नाहीतर आपल्या कुटुंबात अंतर पडल्याशिवाय राहणार नाही. आपली मुलं आपल्यापासून दुरावतील. आपलं शरीर थकलं की त्यांची आठवण येईल. जुन्या आठवणी छळतील, आपल्या चुका नव्याने उमगतील."
सुहासच्या बोलण्यापेक्षा आज अनेक वर्षांनी आशू म्हणून मारलेली हाक ताईंच्या हृदयाला भिडली. मन मोकळं करायचं असेल किंवा एखादी गोष्ट समजून सांगायची असेल तर ते अशी हाक मारत असत. ताईंची नजर आपसूकच खाली गेली. डोळ्यांत पाणी तरळलं.

त्या काही बोलणार इतक्यात दरवाजावर थाप पडली.
"आई, कॉफी." रूपा बाहेर उभी होती.

"ये आत." आश्लेषा ताई डोळे पुसत जागेवरून उठल्या. सुहास खिडकीजवळ जाऊन उभे राहिले.

"सॉरी बाबा, मी चुकीच्या वेळी आले का? बाहेर मस्त पाऊस पडतोय. अनिकेतला कॉफी प्यायची इच्छा झाली. दोघांसाठी बनवण्यापेक्षा म्हंटलं तुम्हालाही देऊन येऊ म्हणून आले. तुमची काही वेगळी चर्चा सुरू असेल तर नंतर.."

"बैस इथे." मधेच तिचं बोलणं तोडत ताईंनी तिच्या पुढ्यात खुर्ची सरकवली.

"आई.."

"आजचं सरप्राईज छान होतं. सगळ्यांनी मनापासून कौतुक केलं तुझं. तू नक्की काय काम करतेस, हे मी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे गैरसमज झाला माझा.
पण मला एक प्रश्न पडलाय, घरात तू निराळी वागतेस अन् बाहेर तुझं व्यक्तिमत्व काही वेगळचं आहे. मी तुझ्याशी कशीही वागले तरी तू आपली पायरी सोडली नाहीस. शेवटी तूच बरोबर ठरलीस."

"तसं नाहीय आई. तो माझ्या कामाचा भाग आहे. जिथं ज्याची गरज, तिथं तसंच वागावं असं वाटतं मला. इथे घरात बाबा, अनिकेत, मावशी, विनय काका तुम्हाला खूप मानतात. त्यांनी तुम्ही जशा आहात तसा तुमचा स्वीकार केला आहे. मीही तोच प्रयत्न केला इतकंच.

"इतकं सोपं आहे हे?" ताईंच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्न चिन्ह होतं.

"हो. माणूस जसा असेल तसा त्याचा स्वीकार करावा म्हणजे त्याबद्दल तक्रार करण्याची गरज भासत नाही. केवळ एकाच गोष्टीची खंत वाटते की तुम्ही माझा सून म्हणून अजूनही स्वीकार केला नाहीय. पण आई, मी याची तक्रार करत नाही. तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. मी वाट बघेन. कारण नाती एका बाजूने जोडली जात नाहीत तर त्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न व्हावे लागतात."

"चला, यानिमित्ताने आज पहिल्यांदा तुम्हा दोघींत मनमोकळं बोलणं झालं. पण आपल्या माणसांची पारख होण्यासाठी बाहेरच्या माणसांची मदत लागते, हे आपलं दुर्दैव म्हणायचं. काय आश्लेषा, बरोबर ना? असो, कॉफी गार झाली असेल, मी गरम करून आणतो." सुहास बोलता बोलता बाहेर गेले.

खोलीत एक विचित्र शांतता पसरली.

"आई, तुमच्या मंडळातल्या बऱ्याच जणींनी आमच्या संस्थेसाठी नावं दिली आहेत. काहींनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर काही जणींनी मदत म्हणून थोडी रक्कम देऊ केली." रूपा.

"हो का? माझ्या सगळ्या मैत्रीणी अचानक तुझ्या गटात सामील झाल्या." आश्लेषा ताई हसत म्हणाल्या आणि त्यांनी कपाटातून चेकबुक काढून त्यावर सही करून रूपाच्या हातावर ठेवलं. "मी तुमच्या संस्थेत सहभागी होऊ शकत नाही. पण तुला हवी ती रक्कम यावर टाक. तेवढीच माझ्याकडून मदत होईल."

"आई, मला तुमच्याकडून हे पैसे नकोत. फक्त आशीर्वाद द्या. मला तुमचं प्रेम हवं आहे. आधार, विश्वास, काळजी, आपुलकी, जिव्हाळा, आदर हा भावनिक गुंता आपल्या नात्यात वाढून ते समृध्द व्हावं हीच अपेक्षा आहे." रूपा.

हे ऐकून ताईंना आपल्या अविचारीपणाची लाज वाटली. त्यांनी दिलेला चेक पुन्हा कपाटात ठेवून दिला. 'कुठलीही गोष्ट करण्याआधी मी सारासार विचार करत नाही. आपल्या सुनेला काय हवं आहे, हे मला कधी कळलंच नाही. केवळ स्वतःचा विचार करून सासू म्हणून मान मिळवण्याचा प्रयत्न करत राहिले. माझंच कसं बरोबर आहे, हे गृहीत धरून सर्वांच्या नजरेत चांगलं बनायचा प्रयत्न करत राहिले.' पुन्हा त्या विचारात गुंतल्या.

"आज जेवायला मिळणार आहे की फक्त कॉफीवर भूक भागवावी लागणार?" सुहास पाठोपाठ अनिकेत खोलीत येत म्हणाला.

'कदाचित हा सगळा अतिविचारांचा परिणाम असेल. माणूस केवळ स्वतः चा विचार करत राहिला की तक्रारी करायला सुरुवात करतो. अगदी तसंच झालंय माझं.' ताई अनिकेतच्या प्रश्नाने भानावर आल्या.

"आज काहीतरी गोड होऊन जाऊ दे." सुहासनी लगेचच फर्माईश केली.

तशा आश्लेषा ताई काहीतरी आठवत म्हणाल्या, "मी भाजी अन् पोळ्या करते. रूपा, तू खीर बनव. अगदी मागे बनवली होतीस तशीच! काहीही म्हणा, तुझ्या हाताला माझ्यापेक्षा भारी चव आहे." असं म्हणत दोघी स्वयंपाक घरात आल्या.

हे ऐकून सुहास आणि अनिकेत अर्थपूर्ण नजरेने एकमेकांकडे पाहून हसले. दोघांच्याही चेहऱ्यावर सुटकेची भावना होती. सासू -सुनेने नात्यांचा गुंता सोडविण्याच्या पहिल्या पायरीवर उशीरा का होईना पाऊल टाकले होते.
यासाठी आशेचा, सुखाचा एक -एक धागा विणणे आवश्यक होते. यातूनच नाती फुलणार होती अन् हळूहळू ही नात्याची नाजूक वीण घट्ट होणार होती!