Login

गुंफण नात्यांची ( गुंता नात्यांचा) भाग 1

गोष्ट गुंफलेल्या नात्यांची
"सुले, सुनेशी अशी काय वागतेस! तिला घरच्या निर्णयात सहभागी करून घेत जा ना. तुझी सून शांत, समंजस आहे. कधी तुझा शब्द डावलत नाही की उलट बोलत नाही." आश्लेषा ताई आपल्या बहिणीला म्हणाल्या.

"आता माझ्या सुनेचं कौतुक तू मला सांगणार? ती कशी आहे, हे मला ठाऊक आहे. पण विनयरावांच्या निवृत्तीचे पैसे कसे अन् कुठे गुंतवायचे हे त्यांनाच ठरवू दे. शेवटी ते त्यांच्या कष्टाचे पैसे आहेत. यात मीही सल्ला देत नाही किंवा तिनेही देऊ नये असं मला वाटतं." सुलेखा काकू काहीशा चिडून बोलल्या.

"रागावू नको. पण शिवानी बँकिंग क्षेत्रात आहे म्हणून म्हणाले मी. निदान माझ्या सुनेपेक्षा ती नक्कीच हुशार आहे. नाहीतर आमची सून म्हणजे काय बोलायची सोयच नाही. कुठल्याशा सामाजिक संस्थेत काम करणं आणि भरपूर पैसा मिळणाऱ्या बँकेत काम करणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे." आश्लेषा ताईंनी डोक्याला हात लावला.

"ताई, तुझ्या आणि माझ्या सुनेची अजिबात तुलना होऊ शकत नाही. दोघीही आपापल्या जागी व्यवस्थित आहेत. तुलाच तुझ्या सुनेची किंमत नाहीय. आता मीही हेच म्हणते, रूपा स्वभावाने शांत आहे. सर्वांचा मान राखणारी, समजून घेणारी आहे. तू तिच्याशी जमवून घेत नाहीस, याचा अर्थ असा नाही की आम्हीही तिच्याशी तुटकपणे वागावं."

"वा! हे बरं आहे, मी शिवानीची बाजू घेतली की तू रुपाला चांगलं म्हणतेस. पण तिने केलेल्या करामती तुला अजून माहिती नाहीत. माझ्याच घरात मी कसे दिवस काढते हे माझं मला माहिती." ताईंनी उसासा सोडला.

"ताई, घरी आलेल्या लक्ष्मीचा अपमान करू नये हे तूच मला शिकवलंस आणि गेली तीन वर्षे तूच मला रूपाच्या तक्रारी, गाऱ्हाणी सतत सांगत राहिलीस. पण तू तिच्याशी कशी वागतेस हे कुठं सांगितलंस? तुझ्या वयाच्या निम्मं देखील वय नाही तिचं अन् तू तिच्याशी स्पर्धा करतेस!
लग्न होऊन सहा महिने झाले नाहीत तोवर रूपाने केस कापले म्हणून तूही तसेच केस कापलेस. ती कुर्ती - लेगिन्स वापरते म्हणून तूही वापरायला सुरुवात केलीस. तिच्या मागोमाग मॉर्निंग वॉकला काय जातेस. ती टकाटक आवरून ऑफिसला जाते म्हणून तूही भिशी, त्या रिकाम टेकड्या बायकांचं कुचाळक्या करणारं मंडळ जवळ केलंस आणि या सगळ्याच स्पष्टीकरण काय दिलंस तर सुनेने आग्रह केला म्हणे!" आज अनेक दिवसांनी सुलेखा काकू मनातलं बोलत होत्या.

"बस् झालं सुले, मोठ्या बहिणीशी अशी बोलतेस? मला मान म्हणून काही आहे की नाही? तू बोलवतेस म्हणून राहायला येते इथं. नाहीतर तुमच्या संसारात कशाला नाक खुपसू मी?" आश्लेषा ताई चिडून बैठकीच्या खोलीत आल्या.

नाही म्हंटलं तरी सून आल्यावर त्यांचा स्वभाव थोडा बदलला होता. मी म्हणेन तेच योग्य. नकळत असा नियम त्यांनी स्वतःला अन् घरातल्या मंडळींना घालून दिला होता. त्यांना जरासा जरी विरोध झाला तर सहन होत नसे.

आतल्या खोलीत हिशोब मांडत असलेले विनयराव दोघी बहिणींच्या आवाजाने स्वयंपाक घरात आले. आपल्या बायकोला 'तू शांत रहा. मी बघतो.' अशी खूण करत ते बाहेर बैठकीच्या खोलीत गेले.
"ताई, सुलेखाचं बोलणं मनावर घेऊ नका. मनाला येईल ते बोलते ती. आमच्या पडत्या काळात तुम्ही साथ, आधार दिलात. याचा विसर कसा पडेल आम्हाला? आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर आहे आणि तो कायम राहील."

"ते तुमच्या मनाचं झालं. पण तिचं काय?" ताई चिडून म्हणाल्या.

आश्लेषा ताईंना समजावणं तसं अवघड काम होतं. एकदा का त्या रागावल्या की दोन - दोन महिने बोलणं टाकत असत. मग चूक आपली असो वा समोरच्या व्यक्तीची!

"सुलेखा, मी पुन्हा एकदा सांगतो, या घरात सुनांच्या तक्रारी बिलकूल मांडायच्या नाहीत." विनयराव विषय बदलत म्हणाले.

"अहो, मी विषय काढला नव्हता. ताई नको तिथं..."

"आता पुरे. चला जेवायला बसू म्हणजे मला बँकेत जाता येईल. माझी कामं मार्गी लागतील."

आजकाल ताईंचा बदलेला स्वभाव विनयरावांच्या पचनी पडत नव्हता. पण आईच्या मायेने आपल्या धाकट्या बहिणीचा संसार सावरण्याचं काम त्यांनी केलं असल्याने त्यांच्याबद्दल मनात आदरभाव कायम होता. मग ताईंना दुखावणार तरी कसं? गोड बोलून ताईंचा स्वभाव बदलायला लावणं आता विनयरावांना देखील अशक्य होतं. अशा गोष्टी केवळ सुहासना जमतात, पण त्यांनी मनावर घ्यायला हवं, असं त्यांना वाटत होतं.

सुलेखा काकूंना मावस सासू म्हणून मान देणाऱ्या रूपाचं आणि शिवानीचं छान जमत होतं. ताईंना मात्र रूपाचा स्वभाव पसंत पडत नव्हता. तिची बाजू कोणी घेतली तर मी कशी चांगली वागते, हे त्या समोरच्याला पटवून देत असत. माझी सून माझ्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून इतरांनी देखील तिला कमी लेखावं असा त्यांचा आग्रह असे. उलट शिवानीचे त्या खूप लाड करत.

आपण आपला हट्ट सोडायचा नाही. उलट इतरांनी आपल्या म्हणण्यानुसार वागायला हवं असा पवित्रा घेणाऱ्या आश्लेषा ताई, रूपा, सुलेखा काकू आणि जवळच्या व्यक्तींच्या नात्यांचा गुंता कसा सुटणार? हे विनयरावांना कळत नव्हतं. कारण ही सारी नाती एकमेकांत गुंफलेली होती.

गुंतलेल्या नात्यांचे बंध विलग करता येत नाहीत. मात्र नात्यांचा गुंता सोडवणे हे मोठं कठीण काम आहे. एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या मनाजोगी वागत नसेल तर ती मुळीच वाईट नसते. यावर विनयराव आणि सुलेखा काकूंचा विश्वास होता.