गुंतागुंत अंतिम भाग

अखेर गुंता सुटला की धागा तुटला, तुम्हीच ठरवा.
गुंतागुंत
अंतिम भाग
@ धनश्री भावसार बगाडे

नेहाने एवढ्या वर्षांपासून मनात अव्यक्त असलेल्या भावना व्यक्त केल्या खर्‍या, पण यामुळे ती मोकळी नाही झाली तर उलट एक वेगळच दडपण तिला जाणवू लागलं. नकळत मनात एक अनामिक अपराधी भावना दाटून आली.

‘आपल्याला प्रीतमविषयी वाटणारी ओढ स्वाभाविक असली तरी आपल्या आयुष्यात अशी कोणती कमी आहे जी आपला एवढा वर्षांचा संसार उघड्यावर पाडून पूर्ण होणार आहे?’ या विचाराने ती अधिकच अस्वस्थ झाली.

तिच्या आजारपणात सचिनने घेतलेली काळजी, घरातल्या कटकटींमध्ये तिच्या बाजूने खंबीरपणे उभा राहत त्याने घेतलेला स्टँड, ओवीचं शिक्षण आणि वाढते खर्च यात आर्थिक परिस्थिती याचा विचार करता दोघांनी कमावणं काळाची गरज असली तरी नेहाची तब्येत आणि नोकरी न करता घराकडे लक्षं देण्याच्या तिच्या निर्णयाचा स्वीकार करत तिला सचिनने केलेला पूर्ण सपोर्ट हे सगळं तिला आठवत होतं.

'ओवीच्या वेळी माझी प्रेग्नंसी खूप कठीण आहे, म्हणून डॉक्टरांनी सांगितलं होतं. पूर्ण ६ महिने बेडरेस्ट घ्यावी लागणार हे तिसऱ्या महिन्यातच डॉक्टरांनी सांगितल्याने घरात जरा नाराजीचे वातावरण होते. पण त्यावेळी सचिन माझ्याबाजूने ठामपणे उभा राहिला. मला पूर्ण आराम मिळावा म्हणून माहेरी ठेवलं. पण त्यावेळीही ओढाताण करत का असेना पण रोज न विसरता भेटायला येत. प्रत्येक चेकअपला तो सोबत असणारच याचं डॉक्टरांनाही कौतुक होतं. पाचव्या महिन्यात सोनोग्राफीत कॉम्पलिकेशन्स आले. मुल नॉर्मल निघेल का, याविषयी साशंकता होती. पण काहीही झालं तरी मुल जन्माला घालायचं या माझ्या निर्णयात तो खंबीरपणे सोबत होता, म्हणून अख्ख्या जगाशी लढण्याचं बळ आलं होतं.'

अशा सगळ्या गोष्टी तिला आठवू लागल्या आणि डोळ्यात अश्रू अन् मनात सचिनविषयीचा आदर आणि प्रेम दाटून आलं होतं.

‘संसार म्हणजे याहून वेगळा काय असतो? प्रत्येकच नात्यात नव्याची नवलाई संपली की मग हेच तर असतना एकमेकांना सांभाळून घेणं.’ असा विचार तिचा सुरू होता.

‘मग जर एवढच पुरेसं असेल तर रितेपण कसलं जाणवतं? मनाला का इतर गोष्टींचा ओढा वाटतो?’

अशा प्रश्नांनी ती स्वतःच भावनिक गुंता सोडवण्याच्या विचारात अडकलेली होती.


तो शुक्रवार होता. ओवी शाळेतून आल्यावर शनिवार रविवार सुट्टी म्हणून आजी आजोबांसोबत आत्याच्या घरी गेली होती. सचिनला सुद्धा कमावरून घरी यायला उशीर होणार होता. हिला एकटीला घर खायला उठलं होतं.

तेवढ्यात प्रीतमचा मेसेज आला.

“बोल ना यार काहीतरी. अजून किती दिवस हा अबोला धरणार?”

त्या मेसेजने ती पुन्हा अस्वस्थ झाली. तिने सरळ त्याला फोन लावला.

“हॅलो, प्रीतम”

“थॅंक गॉड. फायनली तुझा आवाज ऐकायला मिळाला.”

तो एकदम खुश होऊन म्हणाला.

“हम्म बोल काय म्हणतोस?”

ती अगदी कोरडेपणाने म्हणाली.

“नेहा सॉरी यार. मला तुला दुखावायचं नव्हतं. फक्त तुझ्याजवळ व्यक्त व्हायचं होतं. आता पुन्हा नाही करणार असं. आपण फक्त मित्र राहुया, खरंच.”

तो तिला समजावत बोलत होता.

“आता आपल्यात फक्त मैत्री उरलेली नाही. आपण परत फक्त मित्र नाही होऊ शकणार.”

ती भावनिक होत म्हणाली.

“अगं खरंच मी माझ्या मर्यादा ओलांडणार नाही. पण आता मी तुझ्याशिवाय नाही गं राहू शकणार.”

तो तिला आर्जवत होता.

“तेच तर. जोवर आपल्यात सर्व अव्यक्त होतं तोवर शंका आणि शक्यतांना वाव होता. आता जेंव्हा दोघांनाही एकमेकांच्या खर्‍या भावना माहिती आहेत तेंव्हा ती पुसटशी रेषा गडद झाली रे. आता ना धड त्या रेषेला ओलांडता येणार ना त्याच्या आत राहता येणार.”

“त्या रेषेवर उभं राहून तारेवरची कसरत करण्याएवढी सक्षम नाही मी. मला एक कुठलीतरी बाजू निवडावीच लागेल.”

ती भावूक होत पण शांतपणे बोलत होती.

“म्हणून मला एकट्याला सोडणार तू?”

प्रीतमने चिडून विचारलं.

“त्यावेळी तू मला एकटीला सोडून गेला नसतास तर आज हा प्रश्नच उद्भवला नसता ना.”

तिनेही तेवढ्याच तडक त्याला उत्तर दिलं.

“पण आता त्याचा बदला म्हणून मी हे बोलत नाहीये. आता पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं आहे. परिस्थिती खूप बदलली आहे. माझी १० वर्षांची मुलगी आहे. तिला जेवढी तिची आई प्रिय आहे तेवढेच बाबाही. फक्त माझ्या एकटीसाठी मी तिची भावनिक, मानसिक ओढाताण करू नाही शकत.”

“तू म्हणतोस तस संसार न मोडता एकमेकांच्या संपर्कात राहण्याचा पर्याय आहेच. पण आता पुन्हा मैत्रीचं लेबल लावून तुझ्यासमोर खोटं वागणं जमणार नाही मला. तर दुसरीकडे जर तुझ्याशी प्रामाणिक राहिले तर सचिनशी प्रतारणा होईल. मला ती सुद्धा मान्य नाही. या सगळ्यात त्याचा काहीच दोष नाही.”

“प्रीतम तू माझ्या आयुष्यातल्या आठवणींच सोनेरी पान आहेस. ते मला तसच चकाकत ठेवायचं आहे. त्याच्या आजूबाजूला काळ्या ढगांची गर्दी नको, मळभ नको. म्हणून आपण इथेच थांबलेलं बरं होईल.”

“मी तुला कधीच विसरू शकणार नाही. तू ही मला विसर असं म्हणणार नाही. पण स्वतःसाठी एक हक्काची चांगली जोडीदार शोध आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.”

“काळजी घे.”

म्हणत तिने फोन कट केला. पलीकडून प्रीतम फक्त ऐकत होता. काहीही बोलला नाही की हिला काही ऐकूनही घ्यायचं नव्हतं. त्याचा नंबर ब्लॉक केला.

ती रात्र नेहाने मनसोक्त रडून घेतलं. दुसर्‍या दिवशी सचिनला सुट्टी असल्याने जरा उशीराच उठली.

सकाळचे साडे आठ वाजले होते. सचिन रात्री उशिरा घरी आल्याने अजून झोपला होता. रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता. पण सकाळी पाऊस थांबून मळभही हटले होते. बर्‍याच दिवसांनी सूर्याचे दर्शन झाले.

हातात कॉफीचा मग घेऊन नेहा बाल्कनीत आली. एक दीर्घ श्वास घेतला. एका स्वच्छ प्रकाशासह सकाळ उजाडली होती. तिने उत्साहात नव्या दिवसाची नवी सुरुवात केली.

समाप्त.

🎭 Series Post

View all