गुंतागुंत भाग १

स्त्री मनाची गुंतागुंत व्यक्त करणारी एक अव्यक्त प्रेम कथा
गुंतागुंत
भाग १
@धनश्री भावसार बगाडे

पावसाळ्याचे दिवस होते. पण गेले दोन दिवस आभाळ असलं तरी पाऊस नव्हता. जवळच कुठेतरी पाऊस पडत असल्याने गार वारा मात्र होता. रात्रीची जेवणं आणि आवराआवर करून झाली होती. जरा मोकळा श्वास घ्यावा म्हणून नेहा सहजच बाल्कनीत आली. रेलिंगला धरून जरा निवांत होत ढगांच्या आड लपंडाव खेळणार्‍या चंद्राकडे बघत होती.

मंद मंद गार वारा हलकेच तिला शिवून जात होता. त्याने ती मोहरत होती. तिने हलकेच डोळे बंद केले. वातावरणातली ती आल्हाददायकता ती अनुभवत होती. तो गारवा तिला हवाहवासा वाटत होता. तिच्या श्वासाची गती मंदावली पण तेवढीच दीर्घ होऊ लागली. बाहेरचा गारवा आणि श्वासातला उबदारपणा तिला अधिकच रोमांचित करत होता.

वार्‍याच्या एका गार झुळुकेने अंगावरून हलकसं मोरपीस फिरल्यासारखं तिला वाटलं. तिने हलकेच ओठ आत दाबत स्वतःच्याच हातांनी स्वतःला मिठीत घेतलं. तेवढ्यात,

“नेहा, बाहेर काय करतेय? मला जरा दूधहळद दे बरं.”

सचिनने तिला हाक मारली आणि ती भानावर आली.

‘आपण हे काय करत होतो?’

या विचाराने ती जरा ओशाळली आणि काही न बोलता सरळ परत स्वयंपाक खोलीत गेली. तिने दूधहळद करून नवर्‍याला दिलं. मग हळूच विषय काढत म्हणाली,

“सचिन, बघना किती छान वारा सुटलाय. किती रोमॅन्टिक वाटतंय. चलना, थोड्यावेळ बाल्कनीत उभे राहुया आपण.”

“वेडीबिडी आहेस का तू? किती झोंबतोय तो वारा. मला सायनसचा त्रास आहे माहितीये ना तुला? तसंही मला आता टीव्ही बघायचाय.”

सचिन एकदम तुटकपणे म्हणाला. तशी ती जरा हिरमुसली. तिने पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला पण तो टीव्ही बघण्यात मशगुल होता. तिचा मूड गेला. ती उठून आत निघाली. तसा सचिन तिला थांब म्हणाला.

“नको, मी जाते झोपायला.”

म्हणून ती उठली तसा तो एकदम चिडला.

“हे तुझं नेहमीचच असतं. जरा नवर्‍यासोबत बसावं तर तसं नाही. सारखी आपली झोप झोप.”

“अरे मग मी कुठे नाही म्हटलं तुला. उलट तेच म्हणतेय ना चल जरा बाल्कनीत बसू, गप्पा मारू. ठिके तुला बाल्कनी नको तर रूममध्ये चल किंवा टीव्ही बंद कर इथेच गप्पा मारू.”

ती त्याला आर्जवत म्हणत होती.

“झालं सुरू. तुला काय वावडं असतं गं टीव्हीचं? जा बाई, तू जाऊन झोप.”

त्याचा हा वैताग तिला नवीन नव्हता. हे रोजचंच असलं तरी आज तिला त्याचा राग येत होता. तिला आज तो जवळ हवा होता. खरंतर गेले महिनाभर ती वेगवेगळ्या पद्धतीने त्याला हे खुणावत होती. पण कधी त्याला बरं नव्हतं तर कधी हिला. कधी तो दमून आलेला होता तर कधी टीव्हीवर एखादी मॅच किंवा सिनेमा त्याला बघायचा असायचा आणि या सगळ्यातूनही एखादा दिवस वेगळा निघालाच तर

‘ओवीचं काय? तिला तू लवकर झोपवत नाहीस. तिला एकटीला झोपायची पण सवय लावत नाही, मग काय करणार?’

तोंड वाकडं करत असं तिच्यावरच ढकलून तो पुन्हा टीव्ही किंवा फोन बघत बसत होता. आज मात्र ओवीसुद्धा दमून लवकर झोपली होती. पण सचिन यायला तयार नव्हता.

ती रूममध्ये बेडवर आडवी पडणार तेवढ्यात तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. तिने फोन बघितला तर चक्क प्रीतमचा मेसेज होता. नोटिफिकेशनमध्ये प्रीतमचं नाव वाचून तिला जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आश्चर्य वाटलं. कारण तब्बल १२ वर्षांनी हे नाव ती तिच्या फोनच्या स्क्रीनवर बघत होती.

फोन अनलॉक करून मेसेज वाचण्याची उत्सुकता असली तरी तीचं धाडस झालं नाही. एक अनामिक हुरहूर तिला जाणवत होती.

तिने आधी घड्याळात वेळ बघितली. रात्रीचे १० वाजले होते.

‘पहाटे ४ वाजता उठायचं असतं. आता झोपलेलच बरं.’

असा विचार करून तिने फोन बाजूला ठेवला. पण मोबाइल स्क्रीनवरचं प्रीतमच्या नावाचं नोटिफिकेशन काही केल्या डोक्यातून जात नव्हतं.

शेवटी न राहून तिने मेसेज बघितला.

क्रमशः
गुंतागुंत भाग १
धनश्री भावसार बगाडे
सचिन नेहाशी असा तुटक का वागत होता? प्रीतम कोण आहे? नेहा एवढ्या वर्षांनी आलेला त्याचा मेसेज बघायचं का टाळत होती? असं काय असेल त्या मेसेजमध्ये? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all