गुंतागुंत
भाग २
धनश्री भावसार बगाडे
भाग २
धनश्री भावसार बगाडे
“हाय नेहा. कशी आहेस? मला ओळखलंस का? मी प्रीतम. प्रीतम साठे.”
तिने मेसेज सीन करताच परत अजून एकदा ‘हाय’ आलं.
‘अरे बापरे, आपण मेसेज बघितल्याबरोबर पुन्हा हाय आलं? मोबाइल धरूनच बसलाय का हा?’
असा विचार करतच तिनेही त्याला “हाय” चा मेसेज केला.
“मी छान आहे. तू कसा आहेस? एवढ्या वर्षांनी माझी आठवण कशी झाली?”
तिच्या या मेसेजवर पुढच्या सेकंदलाच
“डीपी छान आहे तुझा. ही मुलगी का?”
त्याचा मेसेज आला.
त्यावर तिने “हो” एवढाच रिप्लाय केला.
“गोड आहे मुलगी.”
त्यावर तिने हसणारी स्माईली पाठवली. त्याचा लगेच परत मेसेज
“तू ही खूप छान दिसतेस अजूनही. अगदी त्या वेळी दिसायची तशीच.”
हा मेसेज वाचून मात्र तिच्या काळजाचा ठोका चुकला. त्यावर तिने काहीच उत्तर न देता फोन सायलेंट करून बाजूला ठेवून दिला. तिने ओवी शेजारी पाठ टेकवली.
प्रीतम तिचा जुना मित्र होता. एका कामानिमित्त त्यांची ओळख झालेली आणि त्यातूनच मैत्री. त्यावेळी त्यांच्यात मैत्रीच्या पलीकडचं अव्यक्त असं काहीतरी नातं जुळू लागलं होतं. पण दरम्यान अचानकच प्रीतम काही कामाने दिल्लीला निघून गेला, तो कायमचाच. तिने त्याला बर्याचदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण प्रीतमकडून कायम तूटक उत्तर मिळाली. हळूहळू संपर्कही कमी होत बंद झाला. काही महिन्यात नेहाचं पण लग्न ठरलं आणि ती ‘मुव्ह ऑन’ झाली.
डोळे मिटून पडली तर होती खरी, पण तिला त्याचा मेसेज आठवत होता.
“तूही खूप छान दिसतेस अजूनही. अगदी त्यावेळी दिसायची तशीच.”
ओठांच्या कोपर्यातून तिरकस हसत
‘हं, माझा नवरा तर माझ्याकडे बघतही नाही आणि हा म्हणतोय मी अजूनही छान दिसते.’
असा विचार करत तिने कूस बदलली आणि झोपी गेली.
रोजच्या प्रमाणे पहाटेच तिचा दिवस सुरू झाला. सगळी कामं आटोपून सकाळी १० वाजता तिने फोन हातात घेतला तर प्रीतमचे ५,६ मेसेजेस आलेले दिसले. यात
“अगं बोल की, कुठे गायब झालीस, झोपलीस का? गुड नाईट”
पर्यंत रात्रीचे मेसेजेस होते तर सकाळी ७.३० लाच गुड मॉर्निंगचा पण मेसेज होता, एका छान लाल गुलाबांच्या गुच्छासह दोन कॉफी मग असलेल्या फोटोचा.
ते बघून तिला काय रिअॅक्ट व्हावं कळत नव्हतं. एवढ्या दिवसांनी जुन्या मित्राचा संपर्क झाला म्हणून आनंद होताच पण तो असा अचानक का सोडून गेला याचा रागही होताच.
‘पण जाऊ दे, आता एवढ्या वर्षांनंतर काय जुन्या गोष्टी धरून ठेवायच्या.’
असा विचार करून तिनेही त्याला गुड मॉर्निंग मेसेज पाठवला. याबरोबरच जुन्या आठवणींसोबत नव्याने मैत्री होऊ लागली. गुड मॉर्निंग, गुड नाईटबरोबर आता दिवसभरातही त्यांचं बोलणं होऊ लागलं.
नवरा, मुलगा, सासूसासरे अशा भरल्या घरातही तिला जाणवत असलेला एकटेपणा कुठेतरी दूर होत होता. मित्र म्हणून प्रीतमने केलेली विचारपूस तिला सुखावत होती. एके दिवशी तिने त्याला चेष्टेतच म्हटलं
“तू माझ्याशी इतक्या वेळ बोलतोस हे तुझ्या बायकोने बघितलं तर तुझं काही खरं नाही हां.”
त्यावर तो लगेच म्हणाला,
“मी अजून लग्न नाही केलं.”
त्यावर प्रतिक्षिप्त क्रियेने तिने लगेच “का?” विचारलं. त्यावर विषय टाळत तो उलट तिलाच म्हणाला
“माझं सोड, तुझ्या नवर्याला कळलं तर?”
त्यावर कसनुसं हसतच ती म्हणाली,
“त्याला कुठे वेळ आहे एवढा!”
आणि विषय बदलण्यासाठी तिने परत त्याच्या लग्नाचाच विषय काढला. तसा न राहवून तो म्हणाला,
“तुझ्यासारखी दुसरी कोणी नाही भेटली.”
त्याच्या या वाक्याने तिच्या शरीरभर जणू एक वीज चमकली. जुनी सल परत ताजी झाली. पण तो नेहमीसारखा फ्लर्ट करत असणार असं समजून तिने हसण्यावारी नेलं. त्यावर गंभीर होत तोच म्हणाला,
“अगं खरंच! तुझ्यानंतर दुसरी कोणी तशी आवडलीच नाही.”
आता मात्र नेहाचाही संयम सुटला. तिने जुनी सल बोलूनच दाखवली.
“मग तेंव्हा का सोडून गेला मला? आपल्यात कोणतीही कमिटमेंट नव्हती मान्य; पण भावनाही नव्हत्या का?”
त्यावर समजावण्याच्या सुरात येत तो बोलू लागला,
“मला मान्य आहे. मी ज्या पद्धतीने तुला सोडून निघून आलो ते चुकलंच. त्यासाठी खूप सॉरी. अगदी मनापासून सॉरी. पण करणंही तसंच होतं.”
क्रमशः
गुंतागुंत भाग २
धनश्री भावसार बगाडे
नक्की असं काय घडलं होतं? का प्रीतम तिला सोडून गेला होता? काय कारण असेल? तो सांगेल का नेहाला? जाणून घ्या पुढील भागात.
गुंतागुंत भाग २
धनश्री भावसार बगाडे
नक्की असं काय घडलं होतं? का प्रीतम तिला सोडून गेला होता? काय कारण असेल? तो सांगेल का नेहाला? जाणून घ्या पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा