गुंतागुंत भाग ३

लग्नाच्या अनेक वर्षांनी नात्यात आलेल्या तोचतोपणा कसा दुरावा आणतो आणि नातं नीरस होत जातं याचा भावनिक गुंता.
गुंतागुंत
भाग ३
@ धनश्री भावसार बगाडे

“त्यावेळी आपण जेमतेम २६, २७ वर्षांचे होतो. मी कोणत्याही कमिटमेंटसाठी त्यावेळी तयार नव्हतो. म्हणून तुझ्या विषयी वाटत असलेलं प्रेमही कधी बोलून दाखवलं नाही. त्यात वडिलांना कॅन्सर झाल्याचं समजलं. मी आतून हादरलो होतो. त्यामुळे कसलाच विचार न करता तडक निघून गेलो.”

तो सांगत होता.

“अरे पण एकदा बोलायचंस माझ्याशी. मी तुला किती कॉल केले त्यानंतरही तू कधीच नीट उत्तर नाही दिलं?”

नेहा त्याला विचारत होती.

“त्यावेळी मनस्थिती नव्हती माझी काही बोलण्याची. मुळात तुलासुद्धा माझ्याविषयी भावना निर्माण होत आहेत हे जाणवलं होतं मला आणि तुला दुखावायचं नव्हतं म्हणून तुला टाळत होतो.”

तो खजील होत बोलत होता.

“वाह ! मला दुखावायचं नव्हतं म्हणून एकटं सोडून सरळ निघून गेलास?”

ती रागात म्हणाली. त्यानंतर पुढचे आठ दिवस प्रीतम तिला फक्त सॉरीचे मेसेजेस करत होता. चूक झाली, माफ कर, राग सोड म्हणून मनवत होता.

त्याचं हे तिच्यासाठी झुरणं तिला गोड वाटत होतं. कारण लग्नाच्या ११ वर्षात पहिलं दीड वर्ष सोडलं तर तिच्या संसारात भांडणं, रूसणं, मनवणं आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या हेच सुरू होतं. त्या रूसण्या, मनवण्याचा काही अर्थच उरला नव्हता. घरच्यांना कामं करण्यासाठी आपली गरज आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त ते मनवणं उरलं आहे, असं वाटून ती आतल्या आत कुढत होती.

तिच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री नवर्‍याने बरोबर १२ वाजता तिला झोपेतून उठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एक लाल गुलाबाचं फूल दिलं होतं. त्यावर ती फार खुश झाली. 'थॅंक यू' म्हणत तिने सचिनला मिठी मारली.

काही क्षणातच सचिनने तिला बाजूला करत,

"चला, झोपा आता. उद्या सकाळी लवकर एक मीटिंग आहे. त्यामुळे सकाळी मला लवकरच निघावं लागेल आणि हो, ऐक न रात्री यायलाही उशीर होईल मला. त्यामुळे प्लीज आज जेवला काय बनवू असल्या प्रश्नांसाठी कॉल नको करूस. तुला हवं ते बनव."

असं म्हणत तो बेडवर आडवा झाला. आपला वाढदिवस याला लक्षात आहे, खास शुभेच्छा द्यायला हा एवढ्यावेळ जागला याचा तिला झालेला आनंद क्षणार्धात मावळला. ती विचारात हरवली,

तिला त्याचा वाढदिवस आठवला. तिने त्याच्या वाढदिवसासाठी महिनाभर आधीपासूनच प्लॅन केला होता. त्याच्यासारखं महागड्या वस्तु गिफ्ट नाही करता आलं तरी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत काय स्पेशल करायचं याची यादी तयार करून आदल्या दिवशीच तयारी केलेली होती. त्यानेही त्या दिवशी खास सुट्टी काढली होती.

"आज मी सुट्टी काढलीये. म्हंटलं वाढदिवशी कशाला बाहेरच्या कटकटी. आज पूर्ण आराम करावा. त्यामुळे होम मिनिस्टर आज नो काम, फक्त आराम. मला काहीही काम सांगायचं नाही."

त्याने सोडलेल्या या फर्मानावर ती खुशच झाली. कारण तो दिवसभर घरी तिच्यासोबत असणार होता आणि तिने केलेला खास बेत त्याला गरमागरम खाऊ घालता येणार होता. तिने आनंदाने तो फर्मान स्वीकारला.

पण तिच्या वाढदिवशी मात्र ती घरी एकटी होती. सेलिब्रेशन तर सोडाच साधी कोणाची सोबतही नव्हती. दिवसभरात मित्रमंडळी, नातेवाईक, सोशल मीडियावर शेकडोने लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. पण तिला हवा असणारा व्यक्तीच जवळ नव्हता म्हणून तो संपूर्ण दिवस ती हिरमुसली होती.

हे सगळं आठवत असतानाच परत एकदा तिच्या फोनची मेसेज टोन वाजली. यावेळी पण प्रीतमचाच सॉरीचा मेसेज होता. त्याचे एवढे सॉरीचे मेसेज, काहीतरी बोल न म्हणून केलेली आर्जव तिला सुखावत होती.

कोणीतरी आपल्याशी बोलण्यासाठी झुरतं आहे, आपली कमतरता कोणाला तरी जाणवते आहे, कोणीतरी फक्त आपल्याकडून अटेंशन मागत नाही तर आपल्याला अटेंशन देत आहे या गोष्टी तिला सुखावत होत्या.

म्हणून शेवटी तिनेही राग सोडला आणि त्याला समजून घेत पुन्हा बोलणं सुरू झालं. पण आता या गप्पा निव्वळ मैत्रीच्या न राहता प्रीतम सीरियस फ्लर्ट करण्याचं स्वातंत्र्य घेऊ लागला होता.

एका रात्री त्याने तिला मेसेज केला, पण त्याच्या त्या मेसेजने नेहा अचानक गप्प झाली, विचारात पडली.

क्रमशः
गुंतागुंत भाग ३
धनश्री भावसार बगाडे
असा काय मेसेज केला होता प्रीतमने? नेहा अचानक गप्प का झाली? विचारात पडण्याएवढ काय घडलं असेल? जाणून घ्या पुढील भागात.

🎭 Series Post

View all