Login

गुंतागुंत भाग ४

अनेक वर्षांपासून मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेल्या प्रेमाला अखेर व्यक्त होण्याची वाट सापडली.
गुंतागुंत
भाग ४
@ धनश्री भावसार बगाडे

“प्रिये, आजही माझ्या स्वप्नांमध्ये तूच असतेस. चल झोपूया. लवकर ये हं स्वप्नात. आजवर प्रत्यक्षात ज्या गोष्टी करू शकलो नाही, त्या राहिलेल्या इच्छा स्वप्नात भेटून पूर्ण करूया.”

त्याच्या या मेसेजने नेहा अंगभर शहारली. रोमांचित झाली. तिच्या स्त्री सुलभ भावनांना अलवार फुंकर घालणारा तो मेसेज होता. मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी खोल आत दडवून ठेवलेल्या भावना पुन्हा अंकुरल्या. तिच्या चेर्‍यावर पुसटशी लाजेची लाली आली आणि ओठांवर हलकेसे स्मित तिच्याही नकळत उमटले.

फोन घेतच कूस बदलली तर शेजारी झोपलेल्या ओवीकडे तिचं लक्ष गेलं आणि एकदम भानावर आली.

‘आपण हा काय विचार करतोय? नाही! असं वाहवत जाणं बरोबर नाही.’

असं स्वतःलाच सांगत तिने ओवीला कुशीत घेत डोळे घट्ट मिटून घेतले. दुसर्‍या दिवशी पहाटेपासून रोजच्या सारखाच दिवस सुरू झाला. सकाळच्या कामांची धावपळ होतीच. पण आज तीचं चित्त थार्‍यावर नव्हतं.

रात्रीच्या त्या मेसेजमधले शब्द नाही पण त्या ओळींच्या आतल्या अर्थाने तिच्या मनात कसलीतरी कालवा कालव सुरू होती.

सचिनच्या तुटक वागण्याने दुखवलेली ती नकळत प्रीतमकडे आकर्षिली जात होती. पण,

‘आपण विवाहित आहोत. प्रीतम मित्र असला तरी परपुरुष आहे. त्याच्याविषयी अशा काही भावना निर्माण होणं म्हणजे गैर आहे.’

असे टिपिकल भारतीय स्त्रीचे विचार तिचे सुरू होते. जे सामाजिक दृष्टीने अगदी योग्यही होते. पण आई, पत्नी, सून या पलीकडे ती फक्त एक स्त्री पण होती.

प्रीतम सोबत बोलताना ती कोणाचीही आई, पत्नी, सून म्हणून नाही तर फक्त एक स्त्री, व्यक्ती, त्याची मैत्रीण असायची. हेच तिचं कोणत्याही लेबलाशिवाय असणंच तीच त्याच्याकडे आकर्षित होण्याचं खरं कारण ठरत होतं.

पण याचा उलगडा तिलाच झालेला नव्हता. त्यामुळे प्रीतमविषयी वाढणारी ओढ आणि नैतिक अनैतिकतेच्या गोंधळात ती अस्वस्थ झाली होती. त्यातच तिने सकाळची कामं आटोपली आणि बेडवर जरा आडवी पडली. आज फोन हातात घेऊन बघण्याचंही धाडस तिला झालं नाही.

मग शेवटी साधारण दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रीतमचाच कॉल आला.

“हॅलो, कुठे आहात मॅडम आज? सकाळपासून साधा मेसेज नाही? तू तर मेसेज सीन पण केलेले नाहीस? तब्येत वगैरे सगळं ठीक आहे ना?”

नेहाचा “हॅलो” येताच त्याची नॉनस्टॉप गाडी सुटली. त्यावर तिने

“हम्म ठिके सगळं.”

असं उत्तर दिलं.

“काय झालं नेहा? तुला बरं नाहीये का? आवाज का डाउन आहे आज?”

त्याने काळजीने विचारलं.

“नाही बरिये मी.”

तिने पुन्हा तुटकच उत्तर दिलं.

“तुला बोलायचा मूड नाही का? राहू दे मग”

तो जरा नाराजीच्या सुरात बोलला.

“तसं काही नाही.”

तिचं पुन्हा तुटक उत्तर

“तसं नाही तर मग कसं? काय झालय सांग तरी मला.”

त्याचा स्वर जरा चढला. पण त्यातली काळजी तिला जाणवली.

“काल रात्री तू जो मेसेज केला”

ती बोलताना थांबली.

“हम्म मग त्याचं काय? तुला नाही आवडला का?”

त्यावर ती काहीच बोलली नाही. मग तोच म्हणाला,

“तुला नसेल आवडला तर पुन्हा नाही बोलणार असं काही. पण जे मनापासून वाटलं आणि खर्‍या भावना आहेत त्याच बोललो मी. त्या तुझ्याजवळ नाही व्यक्त करणार तर कुठे करणार?”

तिला त्याचं म्हणणं पटत असलं तरी स्वीकारता येत नव्हतं.

“तुझ्या जागी तू बरोबर असलास तरी आता माझं लग्न झालय. हे मला शक्य नाही.”

त्यावर तो लगेच म्हणाला,

“माहितीये मला तुझं लग्न झालय आणि मला तुझ्या सुखी संसाराच्या आड पण यायचं नाही. मी एवढा वाईट माणूस नाही गं की कोणाचा संसार मोडून स्वतःचा थाटेल.”

“मग तो मेसेज?”

तिनेही प्रतिप्रश्न केला.

“तो मेसेज आणि त्या भावना सगळंच खरं होतं. मला तू हवी असतेस माझ्या सोबत, तुला घट्ट मिठीत घेऊन शांत झोपावसं वाटतं मला. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून जगभराच्या काळज्या विसरून जाव्याशा वाटतात.”

तो बोलत होता आणि त्या सर्वच गोष्टी तिला आत खोल सुखावत होत्या. पण त्या स्वीकारू शकत नसल्याची खंतही तिला वाटत होती.

“प्रीतम, हे सगळं खूप गोड आहे. पण मी माझा संसार असा अर्ध्यावर सोडू शकत नाही. सचिनने खूप काही केलं आहे माझ्यासाठी. खूप जपलं आहे मला.”

ती भावनिक होत बोलत होती.

“डियर, सगळं मान्य आहे मला. मी तुला म्हणतही नाही की, तू सगळं सोडून माझ्याकडे ये. पण मला फक्त एकदा सांग, अगदी मनापासून” .

तो बोलताना मध्येच थांबला.

“काय?” तिने विचारलं.

“तू आज ही प्रेम करतेस ना माझ्यावर? तुझा संसार, आपण एकत्र येणं या सगळ्या गोष्टी जरा बाजूला ठेवून फक्त एकदा सांग, तुझं आजही माझ्यावर प्रेम आहे ना?”

तिने डोळे गच्च बंद केले. फोनवरची पकड घट्ट झाली. दुसर्‍या हाताने बेडवरच्या चादरीला धरत मूठ आवळली. तिचा कंठ दाटून आला.

ती काहीच बोलत नाही म्हणून तो पुन्हा म्हणाला,

“बोल ना, सांग ना एकदा.”

त्यावर सगळं बळ एकवटून मोठा श्वास घेत ती “हो” म्हणाली आणि एवढ्या वेळ डोळ्यांच्या कडांच्या आत अडवून ठेवलेले अश्रू बांध तोडून वाहू लागले. तिने फोन कट केला. त्यावर प्रीतमने पुन्हा २,३ वेळा कॉल केला पण तिने उचलला नाही.

मग पुढच्या आठ, दहा दिवस तो पण फक्त गुड नाइट आणि गुड मॉर्निंग एवढेच मेसेज तिला पाठवत होता.

क्रमशः
गुंतागुंत भाग ४
धनश्री भावसार बगाडे
काय होईल नेहाच्या आणि प्रीतमच्या नात्याचं पुढे? एवढे दिवस अव्यक्त असलेल हे प्रेम व्यक्त झाल्यावर निभावू शकेल का ती? मग तिच्या वैवाहिक आयुष्याचं आणि ओवीचं पुढे काय होईल? जाणून घ्या पुढील अंतिम भागात

🎭 Series Post

View all