Login

गुंतवणूक नात्यांमधली भाग १

एका वडीलांना आयुष्याच्या तिन्हीसांजेला झालेला पश्चाताप

गुंतवणूक नात्यांमधली भाग १

"शी आजोबा तुमच्या पिलोला बामचा वास येतोय.  तुम्ही ती वेगळीच ठेवा ना. मला नाही आवडत तो घाणेरडा वास." श्रीधरची आठ वर्षांची नात रिया नाक फुगवून रागाने बोलत होती.  श्रीधर कसनुसा हसला आणि त्याने त्याची उशी स्वतःजवळ घेतली.  सहा महिन्यापूर्वीच श्रीधरची पत्नी सुलभाचे निधन झालं होतं आणि त्याच्या थोरल्या मुलाने म्हणजेच अमरने त्याला आपल्या घरी आणलं होतं.  आज रियाचे बोलणं ऐकून त्याला खूप वाईट वाटलं.  इतकी वर्ष तो आणि त्याची पत्नी सुलभा दोघे मुंबईतच पण दुसऱ्या ठिकाणी वेगळे राहत होते.  दोन्ही मुलांची लग्न होईपर्यंत ते एकत्र वन बीएचके फ्लॅटमध्ये मुंबईच्या उपनगरात कांदिवलीला राहत होते.

श्रीधरची दोन्ही मुलं, अमर आणि कुमार खूप हुशार होती.  श्रीधर एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होता आणि सुलभा महानगर पालिकेमध्ये शिक्षिकेची नोकरी करत होती.  मुलं लहान असताना त्यांना सांभाळायला चोवीस तासासाठी एक मावशी तैनात होत्या.  सुट्टीच्या दिवशी सगळे कुठेतरी फिरायला,  बाहेर जेवायला जायचे. सर्व काही
आलबेल असताना सुद्धा त्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रेमाचा अभाव दिसून येत होता.   मुलं चांगली शिकून सवरून हाताशी आल्यावर श्रीधरला एक मोठ फ्लॅट घ्यावा असं वाटत होतं. परंतु दोन्ही मुलांनी प्रेमविवाह करून वेगळं रहायचं ठरवलं होतं. त्यामुळे श्रीधरचा नाईलाज झाला होता.  दोघेही आता निवृत्तीला आले होते.

श्रीधर आणि सुलभाने अमर आणि कुमारचं लग्न थाटामाटात लावून दिले होते.  लग्नानंतर दोघे वेगळे राहत होते.  अधूनमधून आई बाबांना भेटून जात होते.  कधी ते सपत्नीक यायचे तर कधी एकटेच येऊन आई बाबांच्या हातावर काही रुपये ठेवून जायचे.  कालांतराने श्रीधर आणि सुलभा निवृत्त झाले. त्यांना नातवंड पण झाली.  श्रीधरला वाटायचे की मुलांनी थोडे दिवस तरी आपल्या घरी राहायला बोलवावे किंवा कधी त्यांनी नातवंडांना घेऊन आपल्या घरी राहायला यावं. पण तसं कधी घडलंच नाही.  श्रीधर सुलभाला नातवंडांचा सहवास लाभला नाही त्यामुळे नातवंडांना त्यांच्या बद्दल माया नव्हती.

निवृत्ती नंतर काही वर्षातच सुलभाचे निधन झालं आणि श्रीधर एकाकी जीवन जगू लागला.  तेव्हा तो मुलांना म्हणाला,

" तुमची आई गेल्यामुळे मला आता खूप एकाकी वाटतंय.  अमर तू माझा मोठा मुलगा आहेस, मी तुझ्याकडे येऊन माझं उर्वरित आयुष्य घालवेन."

दोन्ही भावांनी विचार केला आणि श्रीधरचं घर त्याला न विचारताच विकून टाकलं. आलेले पैसे त्यांनी दोघांनी अर्धे अर्धे वाटून घेतले. तेव्हादेखील मुलांच्या स्वार्थीपणाचा त्याला राग आला परंतु त्याचे हात दगडाखाली होते. अमर आणि कुमारने ठरवलं की दोघांकडे सहा सहा महिने बाबांनी रहावे.  श्रीधरला वाटले आपल्या पोटी अशी मुलं का बरं निपजली.

काही कुटुंबांमध्ये किती जिव्हाळा असतो.  मुलं आईबाबांना किती जपतात.  नातवंडामुळे घरात गोकुळ नांदत असतं. आपल्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. कदाचित आपणच कुठेतरी कमी पडलो की काय? ह्या सर्व गोष्टींचा आणि आता रियाच्या बोलण्याचा तो विचार करत असतानाच त्याला त्याच्या डोळ्यासमोरून त्याचं बालपण तरळून गेलं.

(श्रीधरच्या बालपणात असं काय घडलं होतं पाहूया पुढील भागात)