गुंतवणूक नात्यांमधली भाग ३
श्रीधरला जाणवलं की आपल्या नातवंडांना आपला सहवास लाभला नाही त्यामुळे त्यांना आपल्याबद्दल प्रेम वाटत नसावे हे स्वभाविक आहे. परंतु आपल्याला आजी आजोबांच्या प्रेमाचा वरदहस्त लाभला होता. लहान असताना तर आपल्या काही मित्रांना त्याबद्दल आपला हेवा वाटायचा. असं होतं तरी आपण आजीशी किती तुसडेपणाने वागलो. आता रियाच्या बोलण्यामुळे आपल्याला पश्चाताप होतोय.
आपल्या मुलांसमोर आपण आपल्या आईबाबांशी फार काही प्रेमाने वागलो नाही. एकंदरीतच आपण सारी नाती कर्तव्यभावनेने निभावली. कदाचित म्हणून सुद्धा आपली मुलं आपल्याशी तशीच वागत असावीत. ही कोरडेपणाची साखळी कुठेतरी तुटायला हवी. त्यासाठी आता तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. आपण आपल्या मुलांशी प्रेमाने जवळीक साधली असती तर कदाचित आज आपण कोणाकडे रहावं यावरून त्यांच्यात प्रेमळ वाद झाला असता. हे असं प्रेमच जगण्याची उमेद वाढवत असतं. आता तर आपल्या जगण्याला काहीच अर्थ उरला नाही.
श्रीधरने आपल्या दोन्ही मुलांशी बोलायचं ठरवलं. त्याप्रमाणे त्याने अमरला, कुमारला येत्या रविवारी बोलावून घ्यायला सागितलं. त्याने त्या वेळी दोघांच्या पत्नी उपस्थित राहाव्या असा आग्रह धरला. त्याप्रमाणे रविवारी संध्याकाळी कुमार सहपरिवार आला. त्याची पत्नी आणि सात वर्षांचा अमेय आला. अमेय आणि रिया खाली खेळायला गेल्यावर श्रीधरने रिया त्याला काय बोलली ते सर्वांना सांगितलं आणि तो म्हणाला,
"रिया बोलली यात तिची काहीच चुक नाही.
तिच्या बालमनाला जे वाटले ते ती बोलली. याचं मुख्य कारण आहे रियामध्ये आणि माझ्या आणि सुलभा मध्ये तिचं भावनिक नातंच उत्पन्न झालं नाही. तिला काही कारणामुळे आजी आजोबांचा सहवास लाभला नाही." श्रीधरचे बोलणं मध्येच तोडत अमर म्हणाला,
तिच्या बालमनाला जे वाटले ते ती बोलली. याचं मुख्य कारण आहे रियामध्ये आणि माझ्या आणि सुलभा मध्ये तिचं भावनिक नातंच उत्पन्न झालं नाही. तिला काही कारणामुळे आजी आजोबांचा सहवास लाभला नाही." श्रीधरचे बोलणं मध्येच तोडत अमर म्हणाला,
"याला सुद्धा कारण तुम्हीच आहात बाबा. मी आणि कुमारने कधी बोलून दाखवले नाही. आम्हाला पण लहान असताना आजी आजोबांकडे जायचं असायचं पण तुम्ही आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी ह्या क्लासला तर कधी त्या क्लासला जबरदस्तीने जायला लावायचे. आमच्या बरोबरची बाकीची मुलं उन्हाळ्यात खूपच धमाल करायची. तेव्हा आम्हाला खूप वाईट वाटायचं पण तुमच्या समोर बोलायची आमची आणि आईची हिंमतच होत नव्हती. अर्थात मोठं झाल्यावर आम्हाला कळलं की तुम्ही आमच्या भल्यासाठीच सगळं केलं. आमच्या मनात सुद्धा तुमच्याबद्दल प्रेमापेक्षा कर्तव्यभावना जास्त आहे."
"हो ते माझ्या लक्षात आलं आहे म्हणूनच मी तुम्हाला बोलावून घेतलं आहे. आता तुमच्या दोघांची आई तर ह्या जगात नाही. पण ह्या दोघींचे आई बाबा आहेत. तुमच्या मुलाना अधूनमधून त्यांच्याकडे जरूर राहायला पाठवा. कधी त्यांना तुमच्याकडे बोलवा. तुम्हीसुद्धा मुलांसमोर त्यांच्या आजी आजोबांशी प्रेमाने, आदराने वागा. मुलांच्या मनात तरच त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण होईल आणि आज जसं रिया बोलली तसं पुन्हा कधी बोलणार नाही."
"बाबा आम्ही चुकलो. तुम्ही अगदी योग्य वेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली." कुमार अगदी हळव्या स्वरात बोलला.
"अरे खरं तर लहानपणी माझ्या हातून जी चूक घडली ती आज मला पुन्हा नव्याने जाणवली म्हणूनच माझ्या भावना मी तुमच्यासमोर व्यक्त केल्या. लहान मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. काही वेळा तुमच्यात आणि आई वडिलांमध्ये मतभेद असले तरी आपल्या लहान लेकरासाठी ते बाजूला ठेवायला हवेत. लहान मुले अनुकरणप्रिय असतात. तुम्ही तुमच्या आई बाबांशी कसे वागता ते सर्व ते पाहत असतात. म्हणूनच घरात सर्वांनी गुण्यागोविंदाने राहायला हवे. घरातली नाती बेमालूमपणे एकमेकात मिसळलेली असली पाहिजेत. अशा घरात लहान मुलांची वाढ नक्कीच निकोप होते."
"बाबा आज तुम्ही जो लाखमोलाचा सल्ला दिलात तो आम्ही नक्कीच कायम लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागु."
"असं जर घडलं तर आपल्या सर्वांची स्थिती
घरात हसरे तारे असता
पाहू कशाला नभाकडे
मी पाहू कशाला नभाकडे
घरात हसरे तारे असता
पाहू कशाला नभाकडे
मी पाहू कशाला नभाकडे
घरात हसरे तारे असता
अशीच होईल, नाही का!
समाप्त
©️®️ सीमा गंगाधरे