Login

गुरुदक्षिणा ( भाग १ ला)

गुरु शिष्याच्या नात्याची आगळी वेगळी कथा
गुरुदक्षिणा ( भाग १ ला)
©® आर्या पाटील

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात रोजसारखीच वर्दळ सुरू होती. कार्यालयाबाहेर लाल दिव्याची गाडी येऊन उभी राहताच, सिक्युरिटी गार्ड लागलीच गाडीजवळ आला. दरवाजा उघडत त्याने आत बसलेल्या कलेक्टर यशवर्धन जाधव यांना अभिवादन केले. स्मितवदनाने त्या अभिवादनाचा स्विकार करत कलेक्टर साहेब गाडीबाहेर आले. उंचेपुरे, सावळ्या वर्णाचे ते रुबाबदार होते. अगदी पस्तिशीत कलेक्टर बनण्याचा त्यांचा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी होता. चेहऱ्यावर आत्मविश्वासाची वेगळीच चमक उठून दिसत होती. कमी वयात एवढ्या मोठ्या हुद्दयापर्यंत पोहचण्याचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नसेल हे त्यांच्या डोळ्यांतील करारीपणावरून निदर्शनास येत होते. त्यांच व्यक्तिमत्व त्यांच्यातील प्रखर नेतृत्वाचे द्योतक होते. रोज सारखंच कार्यालयाच्या पायरीला हाताने स्पर्श करत त्यांनी आत प्रवेश केला.
केबीनमध्ये शिरत आपला कार्यभार हाती घेतला. आपल्या कामावर त्यांची प्रचंड निष्ठा होती. लोकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहण्यावर त्यांचा भर होता. दोन वर्षांपूर्वीच त्यांना स्वतःच्या जिल्ह्यातच कलेक्टर म्हणून नियुक्ती मिळाली आणि आपल्या भागाचा विकास करण्याचं त्यांच ध्येय पूर्ण झालं. पालघरच्या दुर्गम ,आदिवासी भागात पोहचत त्यांनी त्यांच्या असंख्य समस्या सोडवण्यावर भर दिला. शैक्षणिक कामे मार्गी लावत त्यांनी आदिवासी बांधवांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

कामात काही वेळ गेला असेल तोच त्यांचे पीए परवानगी घेत आत आले.

" सर, जिल्हा परिषदेच्या दिंडोशी शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत वनमाळी सर निमंत्रण पत्रिका घेऊन आले आहेत. त्यांना आत पाठवू का ?" परवानगी घेत पीए म्हणाले.

शाळेचे नाव ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले.

" हो. सरांना लगेच आत पाठवा." हातातली फाईल बंद करत ते उत्तरले.

" हो सर." म्हणत पीए केबीनबाहेर पडले.

आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. मनात उठलेलं भावनांच वादळ सांभाळत ते भेटीसाठी तयार झाले. थोड्याच वेळात परवानगी घेत वनमाळी सर आत आले.

" बसा सर. काय करू तुमच्यासाठी ?आज काय काम काढलत ?" यशवर्धन म्हणाले.

" सर, तुम्ही आमच्या शाळेच्या, नव्हे नव्हे संपूर्ण गावाच्या समस्या जातीने लक्ष घालून सोडवल्या. न सांगता सगळच तर केलं आमच्यासाठी." ते हात जोडत म्हणाले.

" हात नका जोडू सर. ते माझं कर्तव्य होतं." कलेक्टर असे म्हणताच वनमाळी सरांना मात्र भरून आले.

" सर, रस्त्याअभावी ज्या गावाचा जिल्ह्याशी, राज्याशी किंबहुना जगाशी संपर्क तुटायचा त्या गावाला तुम्ही रस्त्याने जगाशी जोडले. गेली क्रित्येक वर्षे अर्ज करून, त्याचा पाठपुरावा करून रस्त्याचा जो प्रश्न सुटत नव्हता तो तुम्ही अगदी वर्षा दीड वर्षातच सोडवला. पावसाळ्यात गावाला चारीबाजूने वळसा घालत वाहणारा नदीवजा ओढा, दुथडी भरून वाहू लागल्यावर मात्र गावाबाहेर पडणारी पायवाटही बंद होऊन जायची. काही राजकीय पुढाऱ्यांच्या मते गावाला लागून असलेल्या डोंगरांतून रस्त्या उतरवून,ओढ्यातून मार्ग काढून , पुन्हा दुसरा डोंगर चढून गावापर्यंत रस्ता बनवणे अशक्य होते. आम्ही सगळेच हवालदिल झालो होतो. तुम्ही मात्र त्या खाचखळग्यांच्या वाटेवर भक्कम आधार बनून भेटलात आणि आमचा प्रवास सुखकर केलात. गावात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून प्रयत्न केलेत. शाळेचे डिजिटलायझेशन करून शिक्षणाची नव्याने पायाभरणी केली. तुम्ही देव आहात गावकऱ्यांसाठी. अशिक्षित, अडाणी अश्या आदिवासी समाजाला जगण्याच्या प्रवाहात सामिल करून घेण्यासाठी तुम्ही जे केलं आहे ते खूप मोठं आहे." म्हणत त्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

" सर, जे तुम्ही करत आहात तेच मी केलं. मी या आधीही म्हणालो आहे की, हे माझं कर्तव्य होतं. अगदी तुम्ही शाळेप्रती बजावत आहात अगदी तसच. तुम्हांलाही अश्या दुर्गम भागात काम करण्याची इच्छा नसेलच की ? " कर्तव्याच्या शीर्षकाखाली मोठेपणा नाकारत त्यांनी सरांना प्रश्न केला.

" नव्हती पण पाटील सरांबद्दल ऐकलं आणि मनाने त्याच गावात नोकरी करण्याचं धाडस केलं." ते उत्तरले.

पाटील सरांच नाव ऐकताच यशवर्धन मात्र शांत झाले.

" सरांनी शाळेसाठी, गावासाठी ,तिथल्या आदिवासी बांधवांसाठी जे केलं आहे त्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मला गमावायची नव्हती. तुमच्यासारखेच पाटील सरही गावासाठी देवच होते." वनमाळी सर मनापासून बोलत होते.

" सर, अशी देवाची उपाधी लावून माझी त्यांच्याबरोबर तुलना नका करू. मी परत एकदा सांगतो की, ते माझं कर्तव्य होतं." यशवर्धन हात जोडत म्हणाले.

" बरं, पण आता एक कर्तव्य आम्हांला पार पाडायचे आहे. शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन तुमच्या हातून व्हावे ही साऱ्या गावकऱ्यांची इच्छा आहे." त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

" याची काहीच आवश्यकता नाही सर. गावातील प्रतिष्ठित व्यक्तीला द्या हा सन्मान." कलेक्टर सरांनी मोठ्या मनाने सुचवले.

" सर, मला माहित आहे , तुम्हांला खूप महत्त्वाची कामे असतात. पूर्ण जिल्ह्याचा कार्यभार तुम्हांला सांभाळावा लागतो; पण तरीही हे काम तुमच्याच हातून व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. भूमिपुत्र असल्याने हा मान तुम्हांलाच मिळावा असे मलाही वाटते. प्लिज सर नाही म्हणू नका." हात जोडत, विनंती करत सर उभे राहिले.

" तुम्ही हात नका जोडू. प्लिज खाली बसा. ठिक आहे मी येईन कार्यक्रमासाठी पण माझी एक इच्छा आहे." कलेक्टर म्हणाले.

" बोला सर." ते लगेच विचारते झाले.

" या उद्घाटनाला शाळेचे माजी मुख्याध्यापक विनायक पाटील सरांनाही निमंत्रण देण्यात यावे. त्यांचा पत्ता शोधून त्यांना रितसर तसे कळवावे." आपली इच्छा व्यक्त करत ते म्हणाले.

" सर, आमच्या शाळेच्या सहशिक्षिकेनेही हेच सुचवले किंबहुना गावातील काही वयस्कर मंडळीनीही याला दुजोरा दिला. अशीच एक निमंत्रण पत्रिका त्यांनाही पोस्टाने पाठवली आहे.तारीख निश्चित करून तसं फोनवर कळवू त्यांना. तुम्ही ओळखता पाटील सरांना ?" म्हणत त्यांनी कलेक्टर सरांना प्रश्न केला.

" हो. खूप ऐकून आहे त्यांच्याबद्दल." यशवर्धन उत्तरले.

" उद्घाटनाला पाटील सरही येणार म्हटल्यावर गावकऱ्यांसाठी तो दुग्धशर्करा योगच असणार. कोणती तारीख निश्चित करूया ?" सरांनी प्रश्न केला.

" येत्या गुरुपौर्णिमेला." वेळ न दवडता कलेक्टर म्हणाले.

" म्हणजे येत्या रविवारीच की. खूपच उत्तम मुहूर्त आहे. मी लगेच जाऊन पुढच्या कामाला लागतो." ते आनंदाने म्हणाले.

" नक्कीच. रविवारी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी होणार आहे." म्हणतांना यशवर्धन मात्र क्षणभर विचारात हरवले.

त्यांना असे विचारात पाहून वनमाळी सरांना आश्चर्य वाटले.

" ही निमंत्रण पत्रिका. नक्की या." त्यांच्या समोर पत्र पकडत ते म्हणाले.

वारली चित्राने सुशोषित लिफाफ्याला पाहून कलेक्टर सरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले. लिफाफा हातात घेत त्यांनी तो उघडला. आत सुंदर हस्ताक्षराने लिहलेला निमंत्रणाचा मजकूर वाचून त्यांना मात्र जुने काही नव्याने भेटल्याचा भास झाला. त्या मजकुरावरून हात फिरवत त्यांनी त्या शब्दांना डोळ्यांत साठवले.वळणदार अक्षरांनी मनातल्या आठवणींना जागृत केले.

" सर, आमच्या शाळेतील सहशिक्षिकेने स्वतःच्या हाताने तयार केली आहे ही पत्रिका." वनमाळी सरांच्या बोलण्याने यशवर्धन भानावर आले.

" खूप सुंदर हस्ताक्षर आहे मॅडमचं. वारली चित्रही आकर्षक आहे." मनभरून स्तुती करत ते म्हणाले.

" गुणी आहेत मॅडम. शहरातल्या ठिकाणी मिळालेली शाळा नाकारून त्यांनी स्वतःच्या गावी बदली करून घेतली." सरांनी असे सांगताच यशवर्धन भावनिक झाले.
आपल्या चेहऱ्यावरून हात फिरवत दुसऱ्याच क्षणी मात्र त्यांनी स्वतःला सावरले.

" मग निघू मी सर ?" रजा घेत वनमाळी सर विचारते झाले.

" हो. या तुम्ही. आणखी काही आवश्यकता असेल तर नक्की कळवा." म्हणत त्यांनी सरांना निरोप दिला.

वनमाळी सर निघून गेल्यावर त्यांनी मात्र पुन्हा एकदा ती निमंत्रण पत्रिका उघडली. मजकुरातील अक्षरांची वळणे त्यांना ओळखीच्या गावाला नेऊ पाहत होती. ते ओळखीचं भावनिक गाव आठवून नकळत डोळे ओले झाले. कधी काळी पाहिलेली काही स्वप्ने डोळ्यांतच विरली होती. आज त्या शब्दांतून ती सारीच स्वप्ने पुन्हा एकदा नजरेसमोर तरळली. स्वप्नांच्या गावी जाताच मन मात्र हळवं झालं. भरून आलेलं भावनांच आभाळ डोळ्यांतून ओथंबलं. पुढच्याच क्षणी मात्र डोळ्यांतील पाणी टिपत त्यांनी स्वतःला सावरले.

ती पत्रिका लिफाफ्यात भरत त्यांनी तो आपल्या बॅगेत ठेवला.
पुन्हा एकदा फाईल हातात घेत आठवणींतून बाहेर पडत, स्वतःला शांत केले आणि कामात मश्गूल झाले.

क्रमश:

©® आर्या पाटील

कलेक्टर यशवर्धन जाधव आणि त्या गावाचा काही संबंध असेल का ? त्या लिफाफ्याला, त्यातील हस्ताक्षराला पाहून त्यांना नक्की काय आठवलं असणार ? गुरुपौर्णिमेच्या मुहुर्तावरच शाळेच्या उद्घाटनाचा निर्णय त्यांनी का घेतला असावा ?
यांची उत्तरे कळतील पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all