Login

गुरुदक्षिणा ( भाग ३ रा)

गुरु शिष्याच्या नात्याची अनोखी कथा
गुरुदक्षिणा ( भाग ३ रा)

©® आर्या पाटील

शाळेतून रिटायर्ड झाल्यानंतर पाटील सर ठाण्यापासून जवळच असलेल्या आपल्या मूळ गावी पत्नीसोबत स्थायिक झाले होते. दिंडोशीला असतांना शेतकामाची आवड जडली होती. उतारवयात आपली तिच आवड जपत त्यांनी शेतीला प्राधान्य दिले होते. स्वतः शेतावर जाऊन जातीने ते शेतमजूरांकडून काम करून घेत होते. घरासमोर वसलेली छोटेखानी बाग त्यांच्या त्या आवडीतूनच तर फुलली होती. त्यांची सकाळ व्हायची ते बागेतल्या प्राजक्ताच्या झाडावर बसलेल्या चिमण्यांच्या चिवचिवाटाने. त्यांना दाणे टाकताच चिमण्यांचा तो थवा अंगणात उतरायचा. कितीतरी वेळ तिथेच खुर्चीवर बसून ते चिमण्यांना न्याहाळायचे. त्याही न घाबरता दाणे टिपायच्या. त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या त्या ओळखीच्या सोबती बनल्या होत्या. आन्हिके उरकायच्या आधी बागेची सफासफाई ते जातीने करायचे. दिवसभरातील त्यांचा जास्तीत जास्त वेळ याच बागेत जायचा. सरांच्या पत्नी पाटील मॅडम मात्र मितभाषी होत्या. मोजकं बोलणं सोडलं तर दिवसभर त्या शांतच बसलेल्या असायच्या. पाटील सर मात्र त्यांच्याजवळ जात त्यांना बोलतं करण्याचा अयशस्वी प्रयत्न करायचे. शेजाऱ्यांशीही त्या कधी मनमोकळेपणे बोलायच्या नाहीत. त्या एका घटनेने मॅडम अंर्तबाह्य बदलल्या गेल्या त्या कायमच्याच.त्या या घटेनेतून बाहेर पडण्याची शाश्वती नसतांनाही पाटील सर मात्र त्यासाठी प्रयत्नशील असायचे. त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न मॅडमना भावूक करून जायचा. स्वतःला खोलीत बंद करून घेत त्या नशिबाला दोष देत रडायच्या. त्यांच्या या वागण्याने सरांना आणखी अपराधी वाटायचे. दोघांच त्यांच विश्व खूपच रितं होतं. विचारांच्या अधीन राहून दोघांनाही त्रास व्हायचा. एकाकीपणाच्या मॅडमच्या रोगावर देवपूजेच्या औषधाची मात्रा प्रभावी ठरली होती तर आपला छंद जोपासत पाटील सरही स्वतःला सावरत होते.


आजही रोजच्या सवयीप्रमाणे त्यांनी आन्हिके उरकली. तोवर पाटील मॅडमही देवपूजा आवरून त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आल्या.

" अरे वा ! आज कांदेपोह्यांचा बेत दिसतो." मॅडमना बोलते करत ते म्हणाले.

मॅडमनी फक्त मान हलवत प्रतिक्रिया दर्शवली.
पाटील सरांसाठी ते नेहमीचेच होते.

" तू केला का नाश्ता ?" प्लेट हातात घेत त्यांनी विचारले.

" नाही. करते थोड्या वेळात." म्हणत त्या मागे वळल्या.

" आसावरी, तुझ्या गोळ्या सुरु आहेत. नाश्ता वेळेवर करत जा." म्हणत त्यांनी त्यांना थांबवले.

" हम्म." म्हणत त्या पुढे जाणार तोच पाटील सर नाश्त्याची प्लेट त्यांच्या पुढ्यात धरते झाले.

" तू नाश्ता कर मी आणतो दुसरी प्लेट." ते म्हणाले.

त्यांनी असे म्हणताच पाटील मॅडमचे डोळे भरून आले. खुर्चीचा आसरा घेत त्या खाली बसल्या.

" यशलाही पोहे खूप आवडायचे." म्हणत त्यांनी डोळ्यांना पदर लावला.

त्यांच्या बोलण्याने पाटील सरही कातर झाले.
आठवणींचे ढग मनाच्या आकाशात भरून आले आणि डोळ्यांतून बरसू लागले. अपराधीपणाची भावना मनाला पोखरू लागली.

" आसावरी, मला माफ कर." म्हणत त्यांच्या पुढ्यात बसत सरांनी हात जोडले.

पाटील मॅडमना मात्र आपल्या दुःखापुढे त्यांची माफी नगण्य वाटली. ओंजळीत चेहरा झाकून कितीतरी वेळ त्या तश्याच रडत राहिल्या.

" आसावरी , सावर गं स्वतःला. तुझ्याशिवाय माझं या जगात कुणीच तर नाही." म्हणत आता तेही रडू लागले.

त्यांना रडतांना पाहून पाटील मॅडमने मात्र स्वतःला सावरले.
त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांना शांत केले. मनातलं वादळ मनातच थोपावत त्यांनी डोळे टिपले.

" शांत व्हा. मी नाही रडत." उठून उभ्या राहत त्या उत्तरल्या.

" तुम्ही नाश्ता करा. मी आले प्लेट घेऊन." म्हणत आत निघून गेल्या.

पाटील सरांच्या घश्याखालून घास उतरणे अशक्य होते. रुसलेल्या प्रारब्धाला आळवित ते शून्यात नजर रोखते झाले.

" पाटील सर आहेत का घरात ? " म्हणत कोणी दारातून विचारते झाले.

त्या आवाजाने सर भानावर आले. लगबगीने उठून उभे राहत त्यांनी डोळ्यांतले पाणी टिपले. नाश्त्याची प्लेट टेबलवर ठेवत दाराजवळ पोहचले.

" हो बोला." त्याच्या पुढ्यात उभे राहत ते म्हणाले.

" विनायक पाटील ना ? तुमचं पत्र आलं आहे." म्हणत त्याने तो लिफाफा सरांच्या समोर धरला.

" पत्र आणि माझ्यासाठी ? कुठून आलं आहे ?" म्हणत त्यांनी ते हातात घेतले.

" दिंडोशी पालघर. इथे सही करा." त्याने असे म्हणताच सर मात्र स्तब्ध झाले.

आज आठवणींची मांदियाळी पुन्हा पुन्हा मनाच्या गाभाऱ्याला साद घालत होती. त्या गावाशी निगडीत असलेल्या असंख्य आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या. क्षणभर मनाला भोवळ आल्यासारखे वाटले.

" सर करता ना सही ?" तो असे म्हणताच सर भानावर आले.

पेन हातात घेत त्यांनी कागदावर सही केली आणि घरात आले.
ओलेत्या नजरेतही लिफाफ्यावरील ते वारली चित्र त्यांना स्पष्ट दिसले. क्षणाचा अवकाश की, चेहऱ्यावर स्मितहास्य तरळले. त्यांनी किचममधून पाटील मॅडमचा वेध घेतला आणि चोर नजरेनेच तो लिफाफा उघडला.
ओळखीच्या हस्ताक्षराने सुशोभित केलेली निमंत्रण पत्रिका पाहून ते आनंदले.
' वृंदा, तुझच हस्ताक्षर आहे हे. वळणदार आणि आकर्षक. शिक्षिका व्हायचे स्वप्न पूर्ण केलस बेटा. मी खूप खूश आहे आज.' स्वगत होत त्यांचा उर अभिमानाने भरून आला.
तिच्या हस्ताक्षरातील शाळेच्या डिजिटलायझेशनचा मजकूर वाचून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. पुढचा निमंत्रणाचा मजकुर वाचून तर त्यांना कंठ दाटून आला. तोच किचनमधून पाटील मॅडम बाहेर आल्या. त्यांना येतांना पाहून सरांनी मात्र तो लिफाफा पाठीमागे लपवला. त्यांचा केविलवाणा प्रयत्न मॅडमच्या नजरेतून सुटला नाही.

" कोण आलं होतं ? आणि हातात काय आहे ?" त्या स्पष्टपणे विचारत्या झाल्या.

" पोस्टमन होता." त्यांनी असे म्हणताच मॅडमना मात्र आश्चर्य वाटलं.

" कोणाचं पत्र आलं आहे ?" सरांनी मागे लपविलेल्या लिफाफ्याकडे पाहत त्यांनी विचारले.

परिणामाची चिंता न करता, मॅडमपासून काहीही न लपवण्याचा निर्णय घेत सरांनी दीर्घ श्वास घेतला.

" दिंडोशीवरून आलं आहे पत्र." ते मान खाली घालत म्हणाले.

तश्या मॅडम काही न बोलता पुन्हा किचनकडे वळल्या.

" आसावरी, शाळेतून निमंत्रण पत्रिका आली आहे. शाळेच्या नविन इमारतीचं उद्घाटन आपल्या हस्ते व्हावं म्हणून आपल्याला आमंत्रित करण्यात आले आहे." ते एकटक पत्रिकेत पाहत म्हणाले.

" मी तुझ्यानिर्णया विरोधात नाही. जायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल." म्हणत त्यांनी ती पत्रिका लिफाफ्यात भरत समोरच्या टेबलावर ठेवली आणि ते बाहेर निघून गेले.

त्यांना असे जातांना पाहूनही मॅडम शांतच होत्या. बाहेर पडत सर बागेतल्या बाकड्यावर जाऊन बसले. डोळ्यांत पुन्हा गतकाळाच्या आठवणी दाटून आल्या. ज्या गावाशी त्यांची नाळ घट्ट जोडली होती आज त्याच गावातून त्यांना बोलावणं आलं होतं. उद्धाटनाचा मान देऊन आजही गावकऱ्यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. त्या गावाने जोपासलेल्या भावना आज नव्याने भेटीला आल्या होत्या. गावाशी असलेलं वेदनेचं नातं मात्र या भेटीत अडसर ठरत होतं. विचाराधिन असतांनाच मागून मॅडम पोह्यांची प्लेट घेऊन त्यांच्याजवळ पोहचल्या.

" आहो, नाश्ता करून घ्या. गोळ्या घ्यायच्या आहेत." समोर प्लेट धरत त्या म्हणाल्या.

सरांनी मात्र होकारार्थी मान हलवत ती प्लेट हातात घेतली.

" जायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचा असेल पण यासाऱ्यांत मी तुमच्यासोबत आधीही नव्हते आणि आताही नसेन." म्हणत त्या मागे वळल्या.

" आसावरी, बाहेर पड यातून. जे झालं ते आपल्या नशिबाचा भाग होता. गावकऱ्यांना, माझ्या शाळेला दोष देऊन तू अजूनही तिच चूक करत आहेस. मी जे पार पाडलं ते माझं कर्तव्य होतं." सर समजावत म्हणाले.

" मग माझ्याबाबत, आपल्या यशबाबतही तुमची काही कर्तव्ये होती. गावकऱ्यांच्या मुलांसाठी तुम्ही आपल्या बापाच्या भूमिकेला बगल दिली. विद्यार्थांचे पालक झालात पण " पुढचं बोलणं त्यांना अशक्य झालं.
डोळ्यांना पदर लावून त्या रडू लागल्या.

" माझ्यातल्या बापाला दोष देऊ नकोस. आजही त्या घटनेने मी तेवढाच व्याकूळ होतो जेवढी तू होतेस. मी ही तुटतो आतून." ते ही रडकुंडीला येत म्हणाले.

" मग तुमच्या त्या विद्यार्थ्यांना दोष देऊ का ? आपल्या या एकाकीपणाला कोण जबाबदार आहे ? तुम्ही मान, सन्मान कमावला, तुमच्या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य लाभलं ; पण माझं काय ? मी फक्त गमावलं आहे आणि त्याला कारणीभूत तुमची ती शाळा आहे.मी त्यासाठी तुम्हांला कधीच माफ करू शकत नाही." म्हणत त्या रडतच आत निघून गेल्या.

त्यांचे शब्द मात्र सरांच्या वर्मावर घाव घालते झाले. गतकाळातील त्या दुखऱ्या जखमेवर बसलेली, वेळेची खपली निघाली आणि ती जखम पुन्हा भळभळू लागली. डोळ्यांसमोर भूतकाळ जशाच्या तसा साकार झाला. सर भूतकाळात हरवले.

क्रमश:

©® आर्या पाटील

गावासोबत पाटील सरांचे वेदनेचे असे कोणते नाते असेल ?
पाटील मॅडमच्या मनात त्यांच्या शाळेविषयी, गावाविषयी किंबहुना त्यांच्या विद्यार्थ्यांविषयी राग का असेल ? असे काय घडले असेल गतकाळात ?
लवकरच कळेल पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all