Login

गुरुदक्षिणा ( भाग ४ था)

गुरु शिष्याच्या नात्याची अनोखी कथा..
गुरुदक्षिणा (भाग ४ था)

©® आर्या पाटील

पाटील सरांच्या डोळ्यासमोर आठवणीतील ते सुंदर गाव अवतरले.
ओढ्याने वेढलेल्या छोटेखानी डोंगरावर, झाडाझुडपांत वसलेलं दिंडोशी गाव निसर्ग सौंदर्याचा वारसा वर्षभर जपत असायचे. हिरव्यागार निसर्गाची झालर गावाचं रुपडं आणखी उजळवायची. पावसाळ्यात तर धुक्याची चादर पांघरून गाव त्यात गुडूपच व्हायचं. कधी रिमझिम तर कधी धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे गावाच्या सौंदर्याला हिरवी भरती यायची. पावसाळा, हिवाळा वा उन्हाळा कोणताही ऋतू असो हे गाव नेहमी हिरवेगारच असायचे. या दुर्गम भागावर निसर्गदेवतेने रंगांची उधळण केली होती जणू. डोंगरउतारावर रंगीबेरंगी फुलझाडांची आरास सजली की, गावाला नववधूचं रूप यायचं. इथल्या जंगलातील रानमेव्याला तर कशाचीच सर नसायची. जंगलात मिळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींचा वापर करून गावकरी स्वतःला निरोगी ठेवायचे. इथल्या जंगलातल्या रानभाज्यांना तर तालुक्याच्या बाजारात मोठी मागणी असायची. दूरवर पसरलेला हिरवा निसर्ग हाच गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख मार्ग होता. गावकरीही निसर्गाचं हे देणं मनापासून जपायचे. झाडांना देव म्हणून पूजत, त्यांनी जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. थोडक्यात निसर्ग हेच जणू त्यांच विश्व होतं आणि आपल्या या विश्वात ते आनंदी होते.जगापासून अलिप्त राहत हे गाव स्वतःचं अस्तित्व जपत होते.पावसाळ्यात मात्र या नितांत सुंदर गावाला मोठी समस्या भेडसावायची. या भागात पडणारा पाऊस तसा जास्तच आक्रमक असायचा. पाचवीला पुजलेली पक्क्या रस्त्याची समस्या पावसाळ्यात मात्र आणखी तीव्र व्हायची. गावाबाहेर पडतांना डोंगरउतारावरची निसरडी वाट उतरून, दुधडी भरून वाहणारा ओढा ओलांडून आणि मग पुन्हा दुसऱ्या डोंगरावरील चिखलवाट तुडवत वर चढावे लागायचे. जंगलाचा राजा असलेले आदिवासी गावकरी या चढाईत निपुण होते पण लहान लेकरांना सोबत घेऊन जातांना मात्र जीव मेटाकुटीला यायचा. सर्वात मोठी समस्या होती ती, पावसाळ्यादरम्यान प्रसूती कळा सोसणाऱ्या गर्भवती महिलांची.गावात सुईणीकडून बाळंतपण शक्य नसल्यास त्यांना तश्या अवस्थेत तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यात न्यावे लागायचे. आईच्या उदरात वाढणाऱ्या अर्भकाची जन्माला येण्यापूर्वीच जिवंत राहण्यासाठी लढाई सुरू व्हायची. जीवघेणा प्रवास करून वेळेत दवाखान्यात पोहचल्यास ठीक नाहीतर दोन्ही जीव गमवावे लागायचे. वर्षा चार वर्षांतून एकदा तरी गावावर असे संकट ठरलेलेच असायचे. क्रित्येकदा अर्ज करून किंबहुना त्याचा पाठपुरावा करूनही ही समस्या संपत नव्हती. या अश्या काळातच पाटील सरांची बदली दिंडोशीला झाली आणि त्यांच आयुष्याचं बदललं.
दिंडोशीच्या शाळेची ऑर्डर मिळूनही पंधरा दिवसानंतर सर शाळेत रुजू होत होते. दुर्गम भागात काम करणे त्रासदायक असल्याने त्यांनी बदली करून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शेवटी शाळेत हजर न झाल्यास पुढील कारवाई करण्याची नोटिस आली परिणामी इच्छा नसतांनाही त्यांना शाळेत यावेच लागले. आपली पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलाला गावी ठेवत त्यांनी शाळेत रुजू व्हायचा निर्णय घेतला. दिंडोशीला राहणे शक्य नव्हते त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी काही दिवसांपुरता राहायचे ठरवले. तेथून २० किलोमीटर अंतरावर गाव होते पण गावात जायला रस्ताच नसल्याने अलिकडच्या गावापर्यंतच वाहनाने जाता येत होते. पुढचा प्रवास डोंगर उतरून, ओढा ओलांडून आणि दुसरा डोंगर चढूनच पार करावा लागणार होता. पावसाळा संपल्यानंतर बायको आणि मुलाला आपल्यासोबत तालुक्याच्या ठिकाणी राहायला घेऊन यायचे निश्चित करून सरांनी आपलं बस्तान तिकडे हलवलं होतं. त्यादिवशी सर पहिल्यांदा शाळेत जाणार होते. एकटेच राहत असल्याने सगळीच वाताहत होती. सकाळी जमेल तसा नाश्ता करून त्यांनी घर सोडले. बसच्या वेळा ठरलेल्या असल्याने आणि पुन्हा तिथे पोहचण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नसल्याने ते वेळेआधीच बसस्थानकात पोहचले होते. बस मिळताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वळणावळणाच्या रस्त्यावरून मार्गक्रमत बस निघाली. सभोवतालचा अनोळखी परिसर न्याहाळतांना सर पुन्हा विवंचनेत हरवले. निमशहरी भागात राहणाऱ्या त्यांना तो परिसर कमालीचा शांत भासत होता. आपला इथे निभाव कसा लागणार हाच प्रश्न त्यांना सतावत होता. बसमध्ये आदिवासी बांधवांमध्ये चाललेलं बोलीभाषेतील संभाषण ऐकून भाषेचा आणखी एक मोठा प्रश्न दत्त बनून त्यांचासमोर उभा राहिला. मनात निर्माण झालेले नानाविध प्रश्नांचे वादळ थोपवत सरांनी स्वतःला शांत केले. अर्ध्या तासातच बस शेवटच्या थांब्यावर येऊन उभी राहिली. बाहेर पावसाची रिपरीप सुरू झाली होते. छत्री उघडत सर गाडीतून बाहेर आले. पुढचा रस्ता स्वतःला पार करायचा असल्याने त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सहप्रवासी असलेल्या काही आदिवासी बांधवांच्या तोंडून त्यांनी दिंडोशीचे नाव ऐकले होते. रस्ता माहित नसल्याने त्यांची मदत घ्यायचे त्यांनी ठरवले.

" काका, दिंडोशीला जायचा रस्ता कोणता ? तुम्ही तिकडेच चाललेत का?" सरांनी प्रश्न विचारताच ती वयोवृद्ध व्यक्ती हसली.

तिच्या हसण्यावरून सरांना काहीच अर्थ लागत नव्हता. आपलं म्हणणं त्याला समजावं आणि त्याने मार्ग दाखवावा एवढीच त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली.

" कठ चाललास ? दिंडोशीला का ? आम्ही पण तठच राहतो. शाळेवरचा मास्तर आहेस का ?" त्याने प्रश्न केला.

त्याच्या उत्तराने आणि नंतर विचारलेल्या प्रश्नाने मात्र सरांना हायसे वाटले.
समजण्या इतपत तरी त्याची बोलीभाषा सरांना सोपी वाटली. सरांशी अगदी क्लिष्ट कातकरी भाषेत संवाद न साधता त्या व्यक्तीला कळेल अश्या भाषेत बोलणे सुरु केले.

" हो. आज शाळेचा पहिला दिवस." ते उत्तरले.

" पहिला आणि शेवटचा पण. एकदा डोंगर उतरून आनि चरुन गावात गेलास की पुन्हा यायची हिंमत होणार नाय." तो हसत म्हणाला.

सरांना त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात आला होता पण त्याच्या भावना कळत नव्हत्या. गावातल्या शाळेचा शिक्षक घाबरून पळून जाणार म्हणून तो वयोवृद्ध व्यक्ती खूश होता की, दरवेळी प्रमाणे यावेळीही शाळेतील शिक्षक परिस्थितीपुढे हतबल होऊन बदली करून घेणार म्हणून चिंतेत होता हेच कळत नव्हते.

" मास्तर, चल माझ्या मांग. तुझे कापडे सांभाळ. गावात पोहचानशी बंडीचा सफेद रंग तसाच राहिला तर तू जितलास." तो हसत म्हणाला आणि पुढे निघाला.

सरांनी पॅन्ट घालून दुमडली. एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने आपली बॅग सांभाळत ते लगबगीने त्याच्या मागे निघाले.

वयाने वृद्ध असूनही त्याच्या पायाला कमालीची गती होती. अनवाणी पायाने चालतांनाही निसरड्या वाटेवर आपला तोल सांभाळण्यात तो चांगलाच पटाईत होता. सरांना मात्र तारेवरची कसरत करून त्याच्या मागे चालावे लागत होते.

" मास्तर, सांभाळून चाल. तुला रस्त्याची सवय नाय." म्हणत त्याने सरांना सल्ला दिला.

" तुम्ही हळू चला म्हणजे मग मला सांभाळून चालता येईल." सर असे म्हणताच तो जोऱ्याने हसला.

" मास्तरा, मी निसूरच चालत आहे. तु मायासंग नसता तर गावान कवाच पोहचलो पण असतो." त्याने असे म्हणताच सर ओशाळले.

काहीही न बोलता गपगुमानं त्याच्या मागे निघाले. डोंगर उतरताच मात्र त्यांना हायसे वाटले. क्षणभरच की समोरून वाहणारा पाण्याचा ओढा त्यांची चिंता आणखी वाढवून गेला.

" इथून कसे जायचे ?" ते विचारते झाले.

" पाण्यान उतरून. जास्त वंड नाही पाणी. माजे मागं ये." म्हणत तो पाण्यात उतरला.

" पण माझे कपडे ओले होतील ना ?" ते धास्तावत म्हणाले.

" मग कापड काढून घे." म्हणत तो पुन्हा हसला.

" दुसरा काहीच पर्याय नाही का ?" म्हणतांना ते डोक्यावर हात मारते झाले.

" नय. येतोस का मी जाव ?" तो पुढे जाण्याच्या तयारीत बोलला.

" आलो." म्हणत त्यांनी पॅन्ट काढून बॅगेत भरली.

शर्टही काढून बॅगेत ठेवला. पोहता येत होते त्यामुळे पाण्याची भीती नव्हती. ते तसेच त्यामागे निघाले. नुकताच पावसाळा सुरु झाल्याने पाण्याला जास्त प्रवाह नव्हता. बॅग, छत्री सांभाळून पाण्याबाहेर पडतांना मात्र कसरत करावी लागत होती. ओढा पार करताच त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बॅगेतून कपडे काढून त्यांनी ते परिधान केले.

" उद्या परत येणार असशील तर दोन जोडी कापडं झेऊन येस." त्याने न मागता सल्ला दिला.

" हो काका, चला पुढे." सर हात जोडत त्रासिक स्वरात उत्तरले.

दुसरा डोंगर चढून वर जावे लागणार असल्याने नव्याने कसरत करावी लागणार होती. त्या वयोवृद्ध व्यक्तीने मात्र पुन्हा तरुणाला लाजवेल अश्या वेगाने चढाई सुरु केली. सरांना मात्र अर्ध्या रस्त्यातच धाप लागली.

" मास्तर, चल लवकर. असा चालत रायलास तर शाळा सुटल." म्हणत तो पुन्हा हसला.

सर मात्र काहीही न बोलता त्या अग्निदिव्याला सामोरी जात होते. सरतेशेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि ते डोंगरमाथ्यावर पोहचले. गड जिंकल्याचा अविर्भाव मात्र स्वतःचा बदललेला अवतार पाहून क्षणात गळून पडला. चिखल्याने माखलेले पाय आणि मळलेला पांढरा शर्ट पाहून त्यांना कमालीचा राग आला होता. तो वृद्ध व्यक्ती मात्र सरांची अवस्था पाहून मोकळेपणाने हसत होता.

डोंगर चढताच दिंडोशी गावाची वस्ती सुरु झाली. कुडांची घरे लांबूनच दृष्टीस पडली. गावाच्या सुरवातीलाच शाळा होती.

" मास्तर, पोहचलास एकदांचा. ही तुजी शाला." म्हणत त्याने शाळा दाखवली. शाळेचे मोडकळीस आलेले दीनवाणे रूप पाहून सरांनी उभ्या जागी डोक्यावर हात मारला.

त्यांची अवस्था पाहून पुन्हा तसाच जोरात हसत तो वयोवृद्ध व्यक्ती पुढे निघून गेला.

क्रमश:

©® आर्या पाटील

अग्निदिव्याला सामोरी जाऊन गावात पोहचलेले पाटील सर तिथल्या शाळेत काम करतील की आपली बदली करून घेतील ?
वाचा पुढच्या भागात

🎭 Series Post

View all