गुरुदक्षिणा ( भाग ५ वा)
©® आर्या पाटील
आपले कपडे व्यवस्थित करत पाटील सरांनी दीर्घ श्वास घेतला. आपली बॅग खांद्यावर घेत त्यांची पावले शाळेच्या दिशेने निघाली. लांबून केविलवाणी दिसणारी शाळा तिच्याजवळ जाताच मात्र खुदकन हसली जणू. शाळेच्या छोट्याश्या पटांगणाच्या भोवती निरनिराळी फुलझाडे त्यांच लक्ष वेधून घेती झाली. शाळेचा स्वच्छ परिसर पाहून त्यांचा प्रवासाचा सारा शीण गळून पडाला. शाळेची इमारत जुनी झाली होती तर भिंती मात्र बोलक्या होत्या. त्यावर काढलेली वारली छायाचित्रे खूपच आकर्षक वाटत होती. समोरच्या फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात लिहिलेले सुविचार पाहून सरांना खूप छान वाटले. शाळा न्याहाळत होते तोच दहा वर्षाचा एक मुलगा बादलीत पाणी घेऊन त्यांच्याजवळ येऊन पोहचला.
सावळ्या वर्णाच्या आणि हडकुळी शरीरयष्टी असलेल्या त्याला पाहून सर सावध झाले.
सावळ्या वर्णाच्या आणि हडकुळी शरीरयष्टी असलेल्या त्याला पाहून सर सावध झाले.
" गुरुजी, पाय चिखलाने भरले असतील, कपडे पण खराब झाले असतील ना ? पाय धुवायला पाणी आणलं आहे." बोलतांना त्या मुलाच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता जाणवत होती.
त्याला बोलीभाषेत न बोलता प्रमाणभाषेत बोलतांना पाहून पाटील सरांना आश्चर्य वाटले.
" काय रे ? कोण तू ?" सरांनी त्याच्याकडे पाहत प्रश्न केला.
" मी बारकू ." तो कमी आवाजात म्हणाला.
" बारीक आहेस म्हणून बारकू नाव ठेवलं वाटतं आई बापाने." हसत म्हणत सरांनी पाण्याची बादली त्याच्याकडून घेतली.
बाहेर येत त्यांनी आपले पाय आणि चिखलाने माखलेले कपडे स्वच्छ केले.
रिकामी बादली परत बारकूकडे देतांना मात्र त्याचा पडलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही.
रिकामी बादली परत बारकूकडे देतांना मात्र त्याचा पडलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही.
" काय झालं ? " त्याला शांत झालेले पाहून ते विचारते झाले.
" आये आणि बा नाही मला. गेल्यावर्षी मेले दोघे पण. मी आजीकडे राहतो." तो एका दमात बोलून गेला.
त्याचं बोलणं ऐकून मात्र पाटील सर हळहळले. आता मात्र त्याच्याकडे पाहतांना त्याच्या बारीक आणि दिनवाण्या शरीरयष्टीचं कारण त्यांना कळालं. त्याच्या पाठीवरून हात फिरवत सरांनी जणू मायेचा आधार दिला.
" एवढ्या दुर्गम भागात राहून बोलीभाषेत बोलत नाहीस याचं कौतुक वाटलं." सर त्याची स्तुती करत म्हणाले.
" पावसाळा संपल्यावर आये अन् बा जेव्हा वीट भट्टीवर कामाला जायचे तेव्हा मला पण त्यांच्यासोबत जायला लागायचे. तिथेच वस्तीवर एक सर भोंगाशाळा चालवायचे. मराठी भाषा नीट आली नाही तर शिकवणार नाही असा दमच दिला होता त्यांनी. मला शाळा शिकून आये आणि बाला सुखात ठेवायचे होते म्हणून खूप सराव करून मराठी भाषा शिकून घेतली. गुरुजी मी आपल्या वस्तीवरच्या पोरांनाही ती शिकवली आहे. मग तर तुम्ही आम्हांला सोडून जाणार नाही ना ?" आपली कहाणी सांगून त्याने मात्र त्यांना भावूक प्रश्न विचारला.
त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून सर पुन्हा भावनिक झाले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्याक्षणी त्याला आणि तिथल्या मुलांना शिकवण्याची इच्छा त्यांच्या मनात मूळ घेऊ लागली.
" मी जाऊन पोरांना घेऊन येतो. सगळ्यांना खूप आनंद होईल." म्हणत तो आनंदाने उड्या मारत निघूनही गेला.
" अरे, आधी ऐक तर.." सरांचे शब्द मात्र त्याच्या कानापर्यंत पोहचलेच नाहीत.
आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या येण्याने कोणी विद्यार्थी एवढा खूश झाला होता. त्याचा उत्साह पाहून सरांनाही नवनिर्मितीची चाहूल खुणावू लागली. आत येत त्यांनी वर्गखोली उघडली. जेमतेम दोन वर्गखोल्या असलेली ती शाळा आतून टापटीप पाहून त्यांना पुन्हा आश्चर्य वाटले.
वर्गखोलीत असलेले कपाट उघडत त्यांनी जुनी रजिस्टर्स बाहेर काढली. मागच्या वर्षी मे महिन्यात बंद झालेल्या शाळेत कुणी शिक्षक रुजू झालाच नसल्याने, जून महिन्याच्या शैक्षणिक वर्षाला कागदोपत्री सुरवात झाली नव्हती. एकाच रजिस्टरमध्ये पहिले ते चौथीच्या मुलांची हजेरी घेण्यात आली होती. पावसाळा संपताच पालक वीट भट्टीवर कामाला जात असल्याने स्थलांतरित मुलांचे प्रमाण जास्त होते परिणामी पटावर खूप कमी विद्यार्थी संख्या होती. सर सारी माहिती चाळत असतांनाच दहाबारा मुलांचा घोळका लगबगीने शाळेत येऊन पोहचला. जसे असतील त्या अवस्थेत बारकूने मुलांना जबरदस्तीने शाळेत आणले होते.
वर्गखोलीत असलेले कपाट उघडत त्यांनी जुनी रजिस्टर्स बाहेर काढली. मागच्या वर्षी मे महिन्यात बंद झालेल्या शाळेत कुणी शिक्षक रुजू झालाच नसल्याने, जून महिन्याच्या शैक्षणिक वर्षाला कागदोपत्री सुरवात झाली नव्हती. एकाच रजिस्टरमध्ये पहिले ते चौथीच्या मुलांची हजेरी घेण्यात आली होती. पावसाळा संपताच पालक वीट भट्टीवर कामाला जात असल्याने स्थलांतरित मुलांचे प्रमाण जास्त होते परिणामी पटावर खूप कमी विद्यार्थी संख्या होती. सर सारी माहिती चाळत असतांनाच दहाबारा मुलांचा घोळका लगबगीने शाळेत येऊन पोहचला. जसे असतील त्या अवस्थेत बारकूने मुलांना जबरदस्तीने शाळेत आणले होते.
" गुरुजी, आज एवढीच पोरं आली. उदया आणखी आणतो." तो त्या मुलांकडे पाहत म्हणाला.
" या मुलांनो. आत येऊन बसा." पाटील सरांनी असे म्हणताच ती मुलं एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागली.
त्यातल्या एक लहानगा हिंमत करून पुढे आला आणि वर्गात येऊन बसला. मागोमाग बाकीचेही वर्गात प्रवेश करते झाले. सर्वांत मागे राहिलेला बारकू दबक्या पावलाने सरांजवळ पोहचला. मागे लपवलेला फुलांचा गुच्छा सरांसमोर धरत त्याने बाकीच्या मुलांना उभे राहण्याची खूण केली.
" एकसाथ नमस्ते " असे त्याने म्हणताच बाकीच्या मुलांनी एका लयीत टाळ्या वाजवल्या.
" अरे वा ! खूप खूप धन्यवाद मुलांनो. सगळ्यांनी खाली बसा पाहू." फुलांना न्याहाळत ते म्हणाले.
त्या गुच्छात असलेली रंगीबेरंगी फुले, नानाविध आकाराची हिरवी पाने पाहून त्यांना कमालीचे प्रसन्न वाटले. बारकूच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी त्यांना सुखद धक्का दिला होता. तो फुलांचा गुच्छा बाजूला ठेवत सरांनी मुलांना स्वतःची ओळख करून दिली. मुलांची ओळख करून घेत रजिस्टरमध्ये त्यांची इयत्तेनुसार विभागणी केली.
" बारकू, तू कोणत्या वर्गात आहेस?" ते विचारते झाले.
बऱ्याचदा चाळूनही त्यांना त्याचे नाव काही त्या जुन्या रजिस्टरमध्ये सापडले नाही.
" गुरुजी, यावर्षी मी सहावीला गेलो असतो पण इथे चौथीपर्यंतच वर्ग आहेत. आये नि बा गेल्यानंतर भोंगाशाळाही बंद झाली. गेल्यावर्षी गुरुजीनी इथेच शाळेत मला पाचवीचा अभ्यास शिकवला. गुरुजी गेले ते परत आलेच नाहीत. त्यांनी बदली करून घेतली असे सगळे बोलतात." तो उत्तरला.
" अरे पण नुसतं अभ्यास करून काहीच फायदा नाही. रितसर शाळेत प्रवेश घेऊन अभ्यास करावा लागेल तरच पुढच्या वर्षी नव्या वर्गाला प्रवेश मिळेल. पाचवीपासूनचे वर्ग असलेली शाळा नाही का जवळ ?" सरांनी प्रश्न केला.
" आहे पण तालुक्याच्या ठिकाणी.आजीने गळ घातली आहे मला बाहेर शिकायला न जाण्याची. आये अन् बा गेल्यानंतर तिच माझी आई झाली ." म्हणताना त्याच्या डोळ्यातल्या वेदना तीव्र झाल्या.
" आई बाबांना काय झालं ?" सर दुःखी स्वरात म्हणाले.
" परगावी वीट भट्टीवर कामाला गेले होते. अचानक ते राहत असलेल्या भोंग्याला आग लागली आणि दोघेही जळून मेले." बोलतांना आता त्याला रडू कोसळले.
" बारकू, शांत हो बेटा. आजपासून मला तुझ्या बाबांच्या जागी समज. मी शिकवीन तुला. फक्त त्याबदल्यात तू रोज अशीच मुलं गोळा करून आणायची." सर त्याच्या डोक्यावर हात ठेवत बोलते झाले.
सरांच बोलणं ऐकून बारकू मात्र आणखी गहिवरला. पुढच्याच क्षणी सरांच्या पायावर डोकं ठेवता झाला. त्याला उठून उभं करत सरांनी मायेने जवळ घेतले. पहिल्याच दिवशी सरांच्या रुपात त्याला बापाचा आधार लाभला होता. बसलेल्या मुलांच्याही मनात सरांविषयी आपुलकी निर्माण झाली.
" गुरुजी, आत येवू का ? आये न् बा शेतावर राबत्यात मनून भावाला घेऊन आले. उद्या नाय हाणणार." कडेवर एक दिड वर्षाचं तान्हं लेकरू घेऊन आलेली ती म्हणाली.
" गुरुजी, आधी तिला निट बोलायला सांगा आणि मगच आत घ्या." डोळे पुसत बारकू म्हणाला.
" बारकू, तु नको शिकवू मला. गुरुजी मी निट बोलीन." ती रागातच म्हणाली.
" बोलीन नाही गं वृंदा बोलेन बोलायचं." तो असे बोलताच बाकीचे सगळे हसायला लागले.
" सगळ्यांनी शांत व्हा पाहू. तू वृंदा ना. किती गोड नाव आहे ?" सर तिच्याकडे पाहत म्हणाले.
" गुरुजी, या बारकूने ठेवले आहे. नाही तर सगळे मला फशीच म्हणत्यात." तिने असे सांगताच परत सगळे हसायला लागले.
" अरे ये शांत बसा. बारकू सांगतो तसं नीट मराठी भाषेत बोलावं लागेल. तो तुमचा वर्गप्रमुख असेल ,त्याचं ऐकावं लागेल. " सर स्पष्टच म्हणाले.
" रोज त्याचच तर ऐकतो आम्ही सगळे. शाळेत रोज तोच तर आम्हाला शिकवतो." ती सांगती झाली.
" शाळा सुरू झाल्यापासून गुरुजी येत नव्हते. सगळी पोरं गावात, शेतावर नुसतीच हुंदाडायची म्हणून मग मीच त्यांना इथे शाळेत जे मला येईल ते शिकवायचो." तो मान खाली घालत म्हणाला.
" शाब्बास ! एवढासा तू पण तुझे विचार खूप मोठे आहेत. एक दिवस तू नक्की मोठा व्यक्ती बनणार. तुझ्या आजीचं, शाळेचं आणि तुमच्या गावाचं नाव मोठं करणार." म्हणत सरांनी त्याला शाब्बासकी दिली.
" म्हणजे शिकायचं आपल्या गावात आणि नाव त्याच्या गावाचं काढायचं ?" वृंदा जरा रागातच म्हणाली.
" म्हणजे गं ?" सरांनी प्रश्न विचारताच ती वर्गात आली.
" तो भूईगावचा. आत्या न् मांमजी मेल्यावर इकडं आजीकडं आला." ती जवळ येत उत्तरली.
" म्हणजे मामाकडे राहतोस तू ?" बारकूकडे पाहत सर प्रश्न विचारते झाले.
" मामी पक्की खडूस आहे. तो इकडं आल्यावर तिनं आजीला पण घराबाहेर काढलं. आता दोघेच राहतात झोपडीत." वृंदा हळवं होत म्हणाली.
आता मात्र सरांच्या मनात बारकूविषयी कमालीची आपुलकी निर्माण झाली.
" बारकू, तुला काहीही लागलं तरी मला सांग." सर मायेने म्हणाले.
त्यांच्या बोलण्याने तो उठून सरांजवळ पोहचला.
" गुरुजी, मला काहीही नको फक्त तुम्ही आम्हांला कधीच सोडून जाऊ नका." तो हात जोडत सांगता झाला.
त्याच्या त्या एका मागणीने सरांची शाळा बदली करून घेण्याची इच्छा कायमची मागे पडली. त्या मुलांसाठी आणि विशेष करून बारकूसाठी तरी तिथेच नोकरी करण्याचा निर्धार त्यांनी पक्का केला. मनामध्ये उठलेले जरतरचे वादळ बारकूच्या आगळ्यावेगळ्या मागणीने कायमचे शांत झाले.
क्रमश:
©® आर्या पाटील
सरांच्या येण्याने बारकूच्या आयुष्याची कलाटणी मिळणार का ? कळेल पुढच्या भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा