Login

गुरुदक्षिणा (भाग ७ वा)

गुरु शिष्याच्या नात्याची अनोखी कथा..
गुरुदक्षिणा ( भाग ७ वा)

©® आर्या पाटील

पावसाळ्याचे दिवस संपताच गुलाबी थंडी हिवाळ्याचे वेध लावती झाली. दरम्यान पहिले सत्र संपून दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती. पाटील सरांनी घरी जायची तयारी सुरु केली. मुलांना मात्र जवळजवळ महिनाभराची सुट्टी नकोशी वाटू लागली होती. त्यांचे आवडते सर एवढ्या दिवस त्यांच्यासोबत नसणार या जाणीवेने त्यांना रडायला येत होते. बारकूचे तर मुसु मुसु रडणे सुरुही झाले होते. त्याला असे रडतांना पाहून वृंदाला मात्र हसू अनावर झाले.

" गुरुजी, तुम्ही बारकूला सोबत घेऊन जा." ती हसत म्हणाली.

तिच्या बोलण्याने सरांचे लक्ष बारकूवर गेले.

" बारकू, अरे का रडतोस ? इकडे ये पाहू." हातातलं रजिस्टर बाजूला ठेवत सरांनी त्याला जवळ बोलावले.

" काय झालं ? कोणी काही बोललं का तुला ?" ते विचारते झाले.

त्याने फक्त नकारार्थी मान हलवली.

" अरे मग झालं तरी काय ?" उठून उभे राहत त्यांनी प्रश्न केला.

आता मात्र बारकूला स्वतःच्या भावना आवरणे अशक्य झाले. मागचा पुढचा विचार न करता त्याने सरांभोवती मिठी घट्ट केली.

" तुम्ही नका ना जाऊ." तो रडत उत्तरला.

सरांनी त्याला मायेने जवळ घेतले. त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केले.

" बाळा, माझ्या घरचेही माझी आतुरतेने वाट पाहत असतील. तुमच्यासोबत तर मी वर्षभर असणार आहे पण त्यांच्यासोबत खूप कमी वेळ मिळतो. माझं तीन वर्षाचं बाळ त्याच्या बाबाची आठवण काढत असेल.त्यालाही वेळ द्यायला हवा ना ?" सर समजावत म्हणाले.

त्यांचे बोलणे ऐकून बारकूने लगेच आपले डोळे टिपले. त्यांच्याभोवतीची मिठी सोडत तो त्यांच्यासमोर उभा राहिला.

" गुरुजी, तुम्ही जा. आईबाबा सोबत हवेतच. ते नसल्यावर खूप रडायला येते. तुम्ही तुमच्या बाळाजवळ जा." बारकू समजूतदारपणे बोलता झाला.

" बारकू, खूप लवकर मोठा झालास रे बाळा." म्हणत त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

" गुरुजी, तुम्ही परत याल ना ?" लगेचच त्याने भाबडा प्रश्न केला.

" हे काय विचारणं झालं ? मलाही तुमची रोजच आठवण येणार आहे. माझ्या या मुलांशिवाय मलाही करमणार नाही त्यामुळे मी लवकरच परत येईन." सरांनी असे म्हणताच मुलांची रुसलेली कळी पुन्हा खुलली.

" गुरुजी, बाईंना आणि तुमच्या मुलाला इथेच घेऊन या ना राहायला म्हणजे मग त्यांनाही तुम्ही रोज भेटाल." वृंदा सरांजवळ येत म्हणाली.

" चालेल हा चिमणाबाई. तुझ्या निरोप कळवतो बाईंना आणि यशवर्धनला. त्याला तर तुमच्यासोबत राहायला धम्मालच येईल." म्हणत सर हसले.

" मग त्यांना घेऊनच या गुरुजी." बारकूही आतुरतेने सांगता झाला.

" मी सांगेन त्यांना पण तोपर्यंत तुम्ही एकमेकांची आणि आईबाबांची काळजी घ्यायची. दिवाळीच्या सुट्टीत नविन काहीतरी शिकायचे. शाळेकडे दुर्लक्ष करायचे नाही.शुद्धलेखनाचा सराव करायचा." पाटील सरांनी प्रेमळ सूचना दिल्या.

सगळ्यांनी होकारार्थी मान हलवत त्यांचा स्विकार केला.
शाळा बंद करून पाटील सर जेव्हा घरी जाण्यासाठी आपली बॅग घेऊन निघाले तेव्हा सगळीच मुले परत हळवी झाली. सरांचेही पाय जड झाले. मन भरून आलं. ते दृष्टीआड जाईस्तोवर सारीच मुले त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत, तिथेच शाळेजवळ थांबली होती. मघाशी सरांच्या आवाजाने बोलकी असणारी शाळा आता मात्र त्यांना भकास वाटू लागली होती. इकडे मुले दृष्टीआड जाताच पाटील सरांनीही डोळ्यांना रुमाल लावला. मुलांची इतकी सवय झाली होती की, त्यांच्याशिवाय इतके दिवस राहणे त्यांनाही कठिण जाणार होते. काही दिवसांचा हा दुरावा त्यांच नातं आणखी घट्ट करणार होता.

त्या दिवशी सरांना आपल्या घरी पोहचायला रात्र झाली. पाटील मॅडमचा आनंद गगनात मावत नव्हता. छोटा यशवर्धन एव्हाना झोपला होता त्यामुळे सरांची त्याला उचलून घेण्याची, त्याच्याशी मनसोक्त बोलण्याची इच्छा त्या दिवशी तरी अपूर्णच राहिली होती. त्यांच्या घरी येण्याने घराला घरपण आलं होतं. विरहाचा दुरावा काही काळासाठी तरी संपला होता त्यामुळे मॅडम खूपच आनंदात होत्या. सरांनी घरी येणार असल्याचे आधीच कळवल्याने त्यांनी त्यांच्या आवडीचा बेत बनवला होता. पंचपक्वानांचा घास घेताना मात्र सरांना गावच्या रानभाज्यांची आठवण आली. बारकूच्या आजीने बनवलेल्या गरम गरम ज्वारीची भाकरी आठवताच त्यांना भरून आलं. जेमतेम एकदा वाढलेलं संपवून सरांनी आपलं जेवण आटोपलं.

" काय झालं ? जेवण चांगलं नाही झालं का ?" त्यांना असं उदास पाहून मॅडम विचारत्या झाल्या.

" खूप छान झालं आहे जेवण. प्रवासाने थकलो आहे त्यामुळे दोन घास कमी जेवलो." म्हणत ते ताटावरून उठले.

हात धुवून झोपलेल्या यशवर्धन पाशी येऊन बसले. मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतांना मात्र त्यांना पुन्हा एकदा शाळेतली आपली लेकरं आठवली. थोड्याच वेळात मॅडमही रूममध्ये आल्या.

" डोकं दुखत आहे का ? " सरांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत त्यांनी विचारले.

त्यांचा हात हातात घेत सरांनी त्यांना समोर बसवले.

" मी इथे नसतांना तू एकटी घर सांभाळतेस. आई बाबांची काळजी घेतेस. यशचं संगोपन करतेस. तुझ्यामुळे मी निर्धास्तपणे माझी शाळेची जबाबदारी पार पाडतो गं. या साऱ्यांत तुझ्या वाट्याला मात्र नेहमीच विरह आला आहे." ते त्यांच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाले.

" मी फक्त माझी जबाबदारी पार पाडत आहे. दिवसभराचा वेळ जातो पण संध्याकाळची निरव शांतता मनाला कातर करते. तुमची खूप आठवण येते.
नकळत सहवासाच्या आठवणी डोळ्यांत दाटून येतात." आताही बोलता बोलता त्या हळव्या झाल्या.

" आसावरी माफ कर मला. मी नकळतपणे का होईना तुला गृहीत धरलं गं. कर्तव्य निभावतांना जबाबदारीकडे कानाडोळा करत गेलो. आता मात्र मला कर्तव्यासोबत माझी जबाबदारीही तेवढ्याच निष्ठेने पार पाडायची आहे. दादाशी बोलणं झालं आहे.आई-बाबांची व्यवस्था त्याच्याकडे करून मी तुम्हांला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे." मॅडमचा हात हातात घेत ते स्पष्टपणे म्हणाले.

" अहो पण त्या दुर्गम भागात छोट्या यशला घेऊन कसं राहणार ? तो भाग , तिथली माणसं सगळच तर अनोळखी असेल. बाकीच्या सुखसोयी नकोत पण यशची सुरक्षितता मला जास्त महत्त्वाची वाटते." मॅडमचं उत्तर ऐकून मात्र सरांना आश्चर्याचा धक्का बसला.

" दुर्गम भाग असला तरी ती माणसं जीवाभावाची आहेत. तालुक्याच्या ठिकाणी आपण सुरक्षित असूच पण गावात राहिलो तरी कशाचीच भीती नसेल. गावातली सगळीच माणसे यशवर जीव ओवाळून टाकतील. माझ्या शाळेतली मुलं तर त्याची सगळ्यात जास्त काळजी घेतील. आपला यशही छान रुळेल त्यांच्यासोबत." सरांनी मॅडमना समजावले.

" गावातल्या लोकांबद्दल मलाही खात्री आहे. तुम्ही तिथे राहू शकले ते त्यांच्या तुमच्यावरील प्रेमामुळेच पण आई म्हणून माझी काळजी मला तरी रास्त वाटते." त्या सरांना स्पष्टपणे सांगत्या झाल्या.

" मी ही त्याचा बाबा आहे. मलाही त्याची काळजी आहे. त्याच्या सुरक्षेची खात्री असल्याशिवाय का मी हे बोलत असेन ? तसेही आपण तालुक्याच्या गावी राहणार आहोत त्यामुळे तिथे काहीच समस्या नसेल." त्यांनी पुन्हा एकदा आपला मुद्दा पटवून दिला.

" आहो पण तुमच्या त्रासाचं काय ? रोजचं डोंगर चढून आणि उतरून जाणं कठिण आहे हो." त्या काळजीने उत्तरल्या.

" माझ्या बायको आणि मुलासाठी एवढं तर मी नक्कीच करू शकतो." पुन्हा एकदा त्यांच्या मांडीवर डोके टेकवत ते उत्तरले.

सरांशी बोलण्यात जिंकणं मॅडमना तरी शक्य नव्हतं किंबहुना त्यांना जिंकायचही नव्हतं. त्यांचा हा निर्णय मॅडमसाठी सहवासाची पर्वणी घेऊन येणार होता. त्यांच्या दोघांच्या संसाराला नव्याने सुरवात होणार होती. यशला आई बाबा दोघाचं भरभरून प्रेम मिळणार होतं.

ठरल्याप्रमाणे दिवाळीची सुट्टी संपताच सरांनी आपल्या आईवडिलांची व्यवस्था भावाकडे केली आणि आसावरी मॅडम आणि यशला आपल्यासोबत तालुक्याच्या ठिकाणी घेऊन आले. नव्या जागी रुळायला त्या दोघांनाही कठिण गेले. पर्याय नसल्याने मनाला समाजावत मॅडमने त्या वातावरणाशी जुळवून घेतले. यशलाही हळूहळू सगळ्याची सवय होत होती. सरांची मात्र रोजच हैराणी होत होती. गावात काही काम निघाल्यास घरी पोहचायला रात्रही व्हायची.

त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर गावात एक महत्त्वाचे काम निघाले. ते मार्गी लावता लावता रात्र कधी झाली हे सरांच्याही लक्षात आले नाही. एवढ्या रात्री प्रवास करून तालुक्याच्या गावी जायला वाहन मिळणार नव्हते त्यामुळे सरांनी नाइलाजाने तिथेच गावात थांबायचा निर्णय घेतला. संपर्काचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने मॅडमना इथे थांबल्याचे कळवणे शक्य नव्हते. त्या वाट पाहत असतील या काळजीने सरांना तिथे राहवत नव्हते आणि तेथून निघताही येत नव्हते.

रात्र झाली तरी सर घरी न आल्याने मॅडमही घाबरल्या. तिथे नविन असल्याने कोणाकडून मदत घ्यावी हा ही मोठा प्रश्न होता. यशला उराशी कवटाळत त्या सरांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या पण सर आले नाहीत. शेवटी हिंमत एकवटून त्यांनी कॉईन बॉक्सवरून दिराला कॉल केला आणि परिस्थिती सांगितली.

" आसावरी, अगं तो गावात थांबला असेल. गाडी नसेल मिळाली वा कोणतं काम निघालं असणार. तू काळजी नको करूस. येईल तो सकाळी घरी. नाहीतर उद्या सकाळी आम्हीच तिथे पोहचतो." दिराने समजावले.

मॅडमची काळजी मात्र कमी झाली नाही. रात्रभर त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. कधी एकदा सकाळ होते आणि सरांशी संपर्क होतो असे काहीसे त्यांना झाले होते. सरांनाही रात्रभर झोप लागली नाही. शाळेची जबाबदारी बारकूवर सोपवत सकाळ होताच सर घरी निघाले.
त्यांना सुखरूप घरी आलेले पाहून मॅडमचा जीव भांड्यात पडला. त्यांना मिठी मारत त्या खूप रडल्या. त्यांना जाब विचारत्या झाल्या.

" आसावरी, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे मला तिथेच थांबावे लागले. तेवढ्या रात्रीही गाडी मिळाली असती तर डोंगर
पार करून मी घरी पोहचलो असतो गं. तुमच्या काळजीने मी ही घाबरलो होतो." त्यांना जवळ घेत सरही भावनिक झाले.

" एक तर तिथून बदली करून घ्या नाहीतर आमची सोय गावातच करा. आपण तिथेच राहुयात. तुमचा रोजचा त्रास नाही पाहवत." त्या डोळे टिपत म्हणाल्या.

" बदलीचं शक्य नाही." ते परखडपणे उत्तरले.

त्यांच बोलणं ऐकून मॅडमना अश्रू अनावर झाले.

" आसावरी रडू नकोस. मला तुझी काळजी कळते पण बदलीचं अशक्य आहे. तुम्हांला तिथे घेऊन जाणंही अशक्यच वाटतं. त्या वातावरणात रुळायला कठिण जाईल तुम्हांला." ते समजावत म्हणाले.

" तुम्हीच म्हणता ना की, गावातली माणसे जीवाभावाची आहेत. तुमचा त्रास कमी होणार असेल तर राहू आम्ही तिथे." त्याही स्पष्टपणे म्हणाल्या.

" ठिक आहे.गावकऱ्यांनी मला राहायला दिलेल्या त्या घराची, सुरक्षेच्या दृष्टीने डागडुजी करून घेतो आणि मग तुम्हांला घेऊन जातो." त्यांनी मार्ग सुचवला.

खरं तर मॅडमची इच्छा तेथून बदली करून घेण्याची होती पण सरांना ती मान्य नसल्याने त्यांनी परिस्थितीशी समायोजन करण्याचा निर्णय घेतला.

क्रमश:

©® आर्या पाटील
त्या गावात मॅडम आनंदाने संसार करतील का ? की एखादं मोठं संकट त्यांच आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल ? लवकरच कळेल पुढील भागात.

🎭 Series Post

View all