गुरुदक्षिणा ( भाग ८ वा)
©® आर्या पाटील
दिडोंशीला राहण्याचा निर्णय नाईलाजास्तव घेतल्याने सुरवातीचे काही दिवस मॅडमना खूप जड गेले. दुर्गम भागातली शांतता त्यांना भयावह वाटायची आणि रोजची लपंडाव खेळणारी वीज नकोशी. सर सोबत असूनही त्यांना कमालीचा एकटेपणा जाणवायचा. गावकऱ्यांनी मात्र त्यांना गावात जास्त त्रास होऊ नये यासाठी मनापासून प्रयत्न केला. रोजच रानातल्या ताज्या भाज्या त्यांच्या घरी पोहचवल्या जायच्या. गावातील एक आदिवासी महिला त्यांच्या घरातील कामे करण्यासाठी स्वतःहून तयार झाली. मॅडमने मात्र दरमहा तिला काही पैसे देऊ केले. पाणी भरणे, अंगणातला केरकचरा काढणे, त्यांना इतर कामांत मदत करणे हा तिचा रोजचा दिनक्रम होता. तिच्या येण्याने मॅडमचा एकटेपणाही कमी होऊ लागला. तिची बोलीभाषा ऐकतांना त्यांना गंमत वाटायची. ती मात्र अगदी मनमोकळेपणाने घरातल्या तसेच गावातल्या सगळ्याच बातम्या त्यांच्यापर्यंत पोहचवायची. यशला तर तिचा खूप लळा लागला होता. गावात आल्यानंतर त्याचं बालपण समृद्ध होत होतं. सरांचा मुलगा म्हणून शाळेतली सगळी मुले त्याचे खूप लाड करायची. बारकूचा तर त्याच्यावर प्रचंड जीव जडला होता. सरांसोबत शाळेत गेल्यावर यशही बारकूलाच शोधायचा. दादा,दादा करत त्याच्या मागे फिरायचा. ऋणानुबंधातून जडलेलं गोड नातं अनुभवतांना बारकू मात्र भावनिक व्हायचा. बारकूची आजी यशची द्रिष्ट काढायची. सरांसोबत गावात गेल्यावर तर त्याचे सगळेच लाड करायचे. त्यालाही तिथे राहायला खूप आवडू लागले होते. न चुकता तो सरांबरोबर शाळेत जायचा. आता तर बारकू त्याला मुळाक्षरे गिरवायला शिकवू लागला होता. यशही न कंटाळता पाटीवर अक्षरे काढायचा. मुलांसोबत अंक म्हणायचा. सरांच्या मागे जेव्हा मुले कविता म्हणू लागायची, यशही मोठ्याने त्यांना साथ द्यायचा. मॅडम आणि यशला गावात रुळतांना पाहून सरांना मात्र हायसे वाटत होते. गावामध्ये तर त्यांच्या येण्याने नव्या पर्वाला सुरवात झाली होती. सर जेव्हा शाळेच्या कामानिमित्त केंद्रशाळेत जायचे तेव्हा आसावरी मॅडम मुलांना शिकवायच्या. त्या दांपत्यांनी मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी जे जे करता येईल ते सगळच करण्याचा प्रयत्न केला होता.
बारकूच्या बाबतीत तर सरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तो ही कमालीचा हुशार होता. जिद्द , इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर प्रत्येक बाबतीत वरचढ ठरत होता. खेळांमध्येही निपुण असलेल्या त्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे होते. परिस्थितीच्या अंधाऱ्या वाटेवर पाटील सरांच्या रुपात ज्ञानाचा सूर्य उगवला होता आणि हा सूर्य त्याची बिकट वाट सुखावह करत होता. त्याला दुसऱ्या शाळेतून परीक्षेला बसविण्याच्या, सरांच्या प्रयत्नांना यश आले होते. सगळ्यात जास्त गुणांनी पास होत त्याने सरांची मान अभिमानाने ताठ केली होती. सहावीच्या वर्गात गेल्यानंतर तर त्याने अभ्यासाचा वेग आणि वेळही वाढवली होती. शाळा सुटल्यानंतर सर घरीच त्याची शिकवणी घ्यायचे. त्याला गणित, इंग्रजी आणि विज्ञान आणखी सोप्या भाषेत शिकवायचे. तो ही तत्परतेने अभ्यास करायचा. रात्री उशीरापर्यंत शिकवणी चालल्यास मॅडम त्याला जबरदस्तीने जेवायला वाढायच्या. त्याच्या झोपडीत वीज नसल्याने दिव्यावर अभ्यास करावा लागायचा म्हणून मग सरांनीच त्याला रात्री त्यांच्या घरी थांबायला सांगितले. मॅडमनेही सरांच्या निर्णयात होकार भरला. आता तर बारकू सरांच्या घरचा एक महत्त्वाचा सदस्य बनला होता. यशचा मोठा भाऊच जणू. सर आणि मॅडमच्या आपल्यावरील प्रेमाने तो भावनिक व्हायचा. त्याला रडतांना पाहून मात्र छोटा यश त्याच्या मांडीवर येऊन बसायचा आणि त्याचे डोळे पुसायचा.
" दादा, तुला कोणी ओरडले का ? मला सांग मी त्याला रागवेन आणि मारही देईन." हातातली पट्टी त्याच्यापुढे धरत यश निरागसपणे म्हणायचा.
" तू सोबत असतांना कोणीच मला काही करू शकणार नाही. " म्हणत मग तो ही डोळे पुसायचा.
त्या दोघांना एकमेकांत रमतांना पाहून सर मात्र आनंदित व्हायचे.
" आसावरी, लवकरच यशला भाऊ किंवा बहिण आणायला लागेल." सर मॅडमना चिडवायचे.
" तुमचं तर आपलं काहीही. छोटा आहे तो अजून. निदान पाच वर्षांचा तर होऊ द्या." त्या लाजत म्हणायच्या.
" बरं बाई. तू तयार आहेस हेच महत्त्वाचे मग पाच काय दहा वर्षे लागली तरी चालतील." सर असे म्हणताच त्या मात्र लाजत तिथून निघून जायच्या.
सगळच कसं गुण्यागोविंदाने सुरू होतं. नियतीच्या मनात मात्र काहीतरी भलतच आणि भयावह होतं. पावसाळ्याचे दिवस सुरु झाले होते. जुलै महिन्यातला पाऊस जरा जास्तच आक्रमक. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दिडोंशी गावाला पावसाचा हा आक्रमकपणा नविन नव्हता पण का कुणास ठाऊक त्या दिवशी धो धो कोसळणाऱ्या पावसाला पाहून गावकऱ्यांच्या मनात अनाहूत भीती निर्माण झाली. बारकूच्या आजीने तर त्याला घराबाहेर पडण्यास मज्जाव केला होता. आजीचं ऐकेल तो बारकू कसला ? आजीचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्याची स्वारी पाठीवर दप्तर आणि पावसापासून संरक्षणासाठी बनविलेलं इरलं घेऊन घराबाहेर पडलीही. पावसाचा वेग आता प्रचंड वाढला होता. तो भिजून चिंब झाला होता. शाळेला कुलूप पाहून घरी न जाता त्याने मोर्चा पाटील सरांच्या घराकडे वळवला. बाहेरच्या ओटीवर सर यश सोबत खेळत होते.
त्यांना त्याच्यासोबत पाहून बारकूला खूप आनंद झाला. आपल्या वडिलांची आठवण आली पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला खंबीर बनवत तो आल्या पावली मागे वळला. तोच सरांची नजर त्याच्यावर पडली.
त्यांना त्याच्यासोबत पाहून बारकूला खूप आनंद झाला. आपल्या वडिलांची आठवण आली पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला खंबीर बनवत तो आल्या पावली मागे वळला. तोच सरांची नजर त्याच्यावर पडली.
" बारकू, अरे असा आल्या पावली मागे का निघालास ? घरात ये." ते त्याला आवाज देत म्हणाले.
" दादा, ये ना घरात." यशही उठून उभा राहत त्याला आवाज देऊ लागला.
तोवर मॅडमही नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आल्या.
तोवर मॅडमही नाश्त्याची प्लेट घेऊन बाहेर आल्या.
" बारकू, नाश्ता करायला ये." त्यांनी आवाज देताच मात्र तो त्यांच्याजवळ पोहचला.
" नको बाई. मी खूप भिजलो आहे. घरी जातो." म्हणत त्याने नकार दिला.
" तुझे कपडे आहेत आहेत इथे. कपडे बदल आणि आज इथेच अभ्यास कर. सरळव्याजाच्या प्रकरणाचा सराव कर. मी आलोच तुला समजवायला." सरांनी असे म्हणताच मॅडम मात्र रागाने त्यांच्याकडे पाहत्या झाल्या.
" अरे,म्हणजे तू सराव कर. काही अडचण आल्यास मी आहेच." सरांनी सारवासारव केली.
" बारकू, तू आत ये. तुझ्या गुरुजींना कारण लागतं पुस्तक हातात घ्यायला. मला वाटलं आज तरी निवांत वेळ घालवाल पण नाही." मॅडम रागावताच बारकूला मात्र हसू आलं.
" बाई, मी सोडवेन सगळी गणितं. गुरुजी, तुम्ही यश सोबत खेळा." म्हणत तो आत आला आणि कपडे बदलायला मागच्या ओसरीत निघून गेला.
" काय तू आसावरी ? अगं काय वाटेल त्याला ? त्यांच्या गुरुजींवर बायको रागावते ?" ते मॅडमना सतावत म्हणाले.
त्यांनी असे म्हणताच छोटा यशही खुदकन हसला.
" तुम्ही घाबरताच जसे. मी काहीही बोलली तरी तुम्ही पुस्तक हातात न घेता थोडेच राहणार आहात आणि तू रे लब्बाडा. मलाच हसून दाखवतोस. थांबा आता दोघांना जेवायलाच नाही देणार." त्या खोटं खोटं रागावत यशला म्हणाल्या.
" तुम्ही घाबरताच जसे. मी काहीही बोलली तरी तुम्ही पुस्तक हातात न घेता थोडेच राहणार आहात आणि तू रे लब्बाडा. मलाच हसून दाखवतोस. थांबा आता दोघांना जेवायलाच नाही देणार." त्या खोटं खोटं रागावत यशला म्हणाल्या.
" मग मी दादाच्या घरी जाईन जेवायला. आजी देईल मला." तो असे म्हणताच मॅडमने लाडातच त्याचे कान धरले.
" खूप हुशार झाला आहेस. तुझ्या दादालाच मार देते थांब." त्या असे म्हणताच छोटा यश मात्र हळवा झाला.
" त्याला आई नाही मग तूच त्याची आई हो ना. नको मारु त्याला." त्याने असे म्हणताच त्या दोघांनी आपल्या लेकराला जवळ घेतले.
मॅडमने गालगुच्चा घेत त्याला उराशी कवटाळले. सरांना त्याचा अभिमान वाटला. बारकूच्या कानावर जेव्हा ते शब्द पडले तेव्हा तो कमालीचा भावनिक झाला. आयुष्यभर यशला भावासारखे जपायचे या निर्धाराने त्याने स्वतःला त्याच्याशी कायमचे जोडून घेतले. नाश्ता झाल्यानंतर बारकूने गणिताचा सराव सुरु केला. जेव्हा गरज लागेल तेव्हा सरांची मदतही घेतली. दुपारचे जेवण झाल्यानंतर पावसाचा जोर थोडा ओसरला. यशला झोपवून पाटील सर पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसले. त्याने मात्र बळजबरीने त्यांना आराम करायला पाठवून दिले.
पावसाळी वातावरण असल्याने ऐन दुपारी सरांना निवांत झोप लागली. मॅडमही शांत झोपल्या होत्या. संध्याकाळचे पाच वाजले होते. पावसाची रिप रिप थांबली होती. सर आणि मॅडम गाढ झोपेत असतांना यश मात्र उठून बाहेर आला. त्याला उठलेलं पाहून बारकूने त्याचा चेहरा पाण्याने धुतला. त्याला पाणी प्यायला दिले. डब्ब्यातून खाऊ काढत यशने तो बारकूसोबत खाल्ला.
" दादा, मला पाणी बघायचे आहे. चल ना आपण जाऊ." तो हट्ट करू लागला.
" यश, आई बाबा झोपलेत. ते उठल्यावर जाऊ." तो त्याला समजावत म्हणाला.
" मग मी त्यांना उठवतो." म्हणत यश त्यांच्याकडे जाणार तोच त्याने त्याला थांबवले.
" नको उठवूस. त्यांना झोपू दे. आपण जाऊ ओढ्यावर पण हट्ट करायचा नाही. " नाईलाजास्तव बारकू तयार झाला.
यशला खूपच आनंद झाला. गावात, माळरानावर आणि ओढ्यापाशी फिरायला त्याला फार आवडायचे. पाऊस नव्हता पण भरून आलेलं काळकभिन्न आभाळ पाहून बारकूने त्याला रेनकोट घातला. दरवाजा बाहेरून हलकेच ओढून घेत ते दोघेही ओढ्याच्या दिशेने निघाले. घराबाहेर पडताच यशचा उत्साह ओसंडून वाहू लागला. बारकूचा हात सोडत तो ओढ्याच्या दिशेने झपाझप पावले टाकीत निघाला.
" दादा, माझ्या मागे ये." त्याने असे बोलताच बारकूला मात्र हसायला आले.
" यश, गवतातून जाऊ नकोस. माझ्यासोबत चल." म्हणत त्याचा हात पकडण्याचा बारकूचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला.
थोड्याच वेळात ते ओढ्याजवळ येऊन पोहचले. दुथडी भरून वाहणारा ओढा पाहून यश घाबरला आणि बारकूला बिलगला.
" बघितलस किती पाणी आहे ते. परत येशील इकडे ?" बारकूने असे विचारताच, यशने मात्र नकारार्थी मान हलवली.
" नको घाबरू यश. तुझा हा दादा तुला काहीही होऊ देणार नाही." म्हणत त्याला जवळ घेतले.
तसा यश हसला. ओढ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या माळरानावर थोडा वेळ खेळत ते परतीच्या मार्गाला लागले.
" यश आता माझा हात पकड. अंधार झाला आहे. सटकून पडशील." बारकूने असे म्हणताच यशने त्याचा हात पकडला.
पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली. बारकूने चालण्याचा वेग वाढवला. यशला सोबत घेत वाढलेल्या गवतातून मार्ग काढत तो घराकडे निघाला.
तोच यशच्या पायाला काहीतरी लागल्याचे जाणवले. लागलेल्या जागी खाजवत तो तसाच त्याच्या सोबत चालत राहिला. चालता चालताच तो लागलेल्या जागी खाजवत होता.
तोच यशच्या पायाला काहीतरी लागल्याचे जाणवले. लागलेल्या जागी खाजवत तो तसाच त्याच्या सोबत चालत राहिला. चालता चालताच तो लागलेल्या जागी खाजवत होता.
" मी बोललो ना. गवतावर खूप मच्छर असतात पण तू ऐकत नाहीस. चल लवकर नाहीतर अजून चावतील." म्हणत बारकूने त्याला पुढे नेले.
पावसाचा जोर वाढल्याने त्यांना शोधायला सर बाहेर पडले होते. वाटेत त्या दोघांना घराकडे येतांना पाहून सरांचा जीव भांड्यात पडला.
क्रमश:
©® आर्या पाटील
परिस्थितीचं भयावह वास्तव सर आणि मॅडमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणार. काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात ? जाणून घेऊया पुढच्या भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा