Login

गुरुदक्षिणा (भाग १० वा)

गुरु शिष्याच्या नात्याची एक अनोखी कथा..
गुरुदक्षिणा (भाग १० वा)

©® आर्या पाटील

आयुष्याने खूप मोठा खेळ खेळला होता सर आणि मॅडम सोबत. यशच्या श्वासांची माळ अशी अचानक तुटली आणि या दोघांच आयुष्य कायमचं विखुरलं गेलं. यश कायमचा मातीआड गेला होता. मागे राहिलेल्या त्याच्या आठवणींना आळवत मॅडम फक्त रडत होत्या. कसलच भान राहिलं नव्हतं. आपल्या दुःखात त्या इतक्या बुडाल्या होत्या की सरांचाही त्यांना विसर पडला होता. पाटील सरांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. काळीज गलबलून सोडणारा त्यांचा आक्रोश खूपच हृदयद्रावक होता. दिवस सरत होते पण त्यांच दुःख आणखी गहिरं होत होतं. पाहता पाहता यश जाऊन आठवडा पूर्ण झाला. यशच्या शेवटच्या विधीला गावातील आदिवासी महिलाही आल्या. बारकूच्या आजीने जाणीवपूर्वक बारकूला सोबत आणले. मॅडम आणि सरांशी बोलल्यावर त्याची मनस्थिती काही प्रमाणात बदलावी एवढीच त्यांची अपेक्षा होती. तो मात्र तिथे जाण्यासाठी तयार नव्हता. आजीने गळ घालत त्याला तयार केले. सरांच्या घरी पोहचल्यावर त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले. यशच्या निरागस तसबिरीवर चढवलेली फुलांची माळ पाहून अश्रू अनावर झाले. सरांच्या मांडीवर डोके ठेवून तो खूप रडला. त्याही परिस्थितीत सरांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आधार दिला. विधी पूर्ण झाल्यावर गावकऱ्यांनी पुन्हा एकदा सरांचे सात्वंन केले. हिंमत करून बारकू आसावरी मॅडमच्या समोर गेला. त्यांच्यासमोर हात जोडतांना त्याला अश्रू अनावर झाले.

" बारकू, त्या दिवशी जर तू यशला ओढ्यावर घेऊन गेला नसतास तर आज माझं लेकरू माझ्या कुशीत असतं. तुझ्या त्या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही." मॅडम रडत म्हणाल्या.

त्यांच्या बोलण्याने बारकू आणखी गहिवरला. अपराधीपणाची दुखरी जखम पुन्हा भळभळून वाहू लागली. हृदय मूकपणेच आक्रोश करू लागले. पुढे येत सरांनी मात्र मॅडमना समजावण्याचा प्रयत्न केला.

" आसावरी, शांत हो. आपल्या प्राक्तनाचा दोष त्याला नको देऊस. यशने हट्ट केला नसता तर कदाचित.." ते पुढचं काही बोलणार तोच मॅडम पुन्हा आक्रमक झाल्या.

" तो एक लहान होता पण याला तर समज होती ना ? पोटचा गोळा गमावूनही तुम्हांला अजून त्याचीच बाजू योग्य वाटते. एवढे निर्दयी कसे वागू शकता ?" म्हणत त्या पुन्हा रडू लागल्या.

" तो माझ्याही काळजाचा तुकडा होता. माझंही दुःख तेवढच तीव्र आहे पण या दुःखाचा दोष एखादया निर्दोष व्यक्तीला देणे मला पटत नाही." रडणाऱ्या बारकूच्या डोक्यावर हात ठेवत ते म्हणाले.

" की बारकूला कोणीही आणि कोणताच दोष दिलेला तुम्हांला चालत नाही ?" त्या असे म्हणताच सर मात्र संतापले.

" आसावरी, स्वतःला सावर. चुकीचं बोलत आहेस तू." सर चिडत म्हणाले.

" गुरुजी, माझीच चुकी झाली. मला माफ करा." मधे पडत बारकूने सरांना शांत केले.

" एक तर बारकूला निवडा नाही तर मला. हा जर तुमच्या आयुष्यात राहणार असेल तर.." त्या पुढचं बोलणार तोच बारकूची आजी मधे पडली.

तिने मॅडमची समजूत काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बारकूनेही पुन्हा एकदा त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची माफी मागितली पण त्यांनी ऐकले नाही. सरांचा नाईलाज झाला. दुःखाचा एवढा मोठा डोंगर कोसळल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांची सर्वात जास्त गरज होती. मन बारकूसाठी झुरत होते. सरांनी मात्र बुद्धीचा कौल स्विकारला किंबहुना त्या क्षणी तेच महत्त्वाचे होते. गावकऱ्यांचा आणि सोबत बारकूचा निरोप घेत कर्तव्याला जवळ केले. सर परत गावात येतील ही आशा आता कायमची मावळली होती. जड अंतःकरणाने सगळेच गावात परतले. त्या प्रसंगाने बारकूचा आत्मविश्वास कायमचा हिरावून घेतला. तो कमालीचा शांत झाला. शाळा, पुस्तके, अभ्यास या त्याला हव्याहव्याशा गोष्टी तो जाणीवपूर्वक टाळू लागला. अथक परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्तीचे दाखले देणारा तो जगण्याची इच्छाही जणू गमावून बसला होता. त्याच्या या परिस्थितीत वृंदा मात्र त्याला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. त्याला पूर्वीसारखं करण्यासाठी मनापासून धडपडत होती. अभ्यासाचं कारण काढून त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती. त्याने मात्र आपल्या जगण्यावर अपराधीपणाचा शेला ओढून घेतला होता. या शेल्याखाली तो रोजच मरत होता. त्याच्या अश्या झुरण्याचा आजीने मात्र चांगलाच धसका घेतला. मॅडमनी बारकूला दिलेला दोष आठवून त्यांच काळीज रोजच रडत होतं. उतारवयात त्यांना वाटत असलेली बारकूची काळजी त्यांच्या जीवावर बेतली. दरम्यानच्या काळात त्या आजारी पडल्या. यशला जाऊन महिनाच झाला होता की आजीनेही आपला देह ठेवला. देवाने बारकूचा शेवटचा आधारही कायमचा हिरावून घेतला. संकटाची ही शृंखला त्याच्या निरोगी मानसिकतेला जेरबंद करती झाली. तो नैराश्येच्या गर्तेत पूर्णपणे अडकला. आई बाबा मग यश आणि आता आजीच्या जाण्याने त्याची जगण्याची इच्छाही कायमची संपली. वृंदा सावलीसारखी त्याच्या सोबत होती म्हणून तो जिवंत तरी होता.
शेवटी गावकऱ्यांनी सरांच्या कानावर ही गोष्ट घालायचे ठरवले. त्या क्षणी तेच त्याला या निराशेतून बाहेर काढू शकणार होते. वृंदाचे वडिल आणि काही गावकरी सरांच्या घरी पोहचले. बारकूच्या आजीबद्दल ऐकताच सर अगतिक झाले. बारकूची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही त्यांना त्या क्षणी नकोशी वाटली. गावकऱ्यांच्या तोंडून जेव्हा त्यांनी बारकू बद्दल ऐकले ते कमालीचे हतबल झाले. गावकऱ्यांनी त्यांना बारकूला भेटण्याची आणि समजावण्याची विनंती केली. सरांनाही खात्री होती की, तेच त्याला यातून बाहेर काढू शकतात. गावकऱ्यांना विश्वास देत लवकरच शाळेत रुजू होण्याचे वचन दिले. गावकऱ्यांना त्या क्षणी सरांच्या रुपात देवाचे दर्शन घडले. मॅडमना हे कळताच त्या कमालीच्या संतापल्या.

" तुम्हांला एक तर मला नाही तर बारकूला निवडावे लागेल. माझ्या मुलाच्या मरणाला कारणीभूत असलेल्या त्याला मी कधीच माफ करू शकणार नाही. तुम्ही त्या शाळेत रुजू झाल्यास आपल्या संबंध कायमचा संपेल." मॅडमने स्पष्टपणे सांगितले.

सरांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सरांनी मग आपला निर्णय घेतला.

" एका मुलाला गमावले आहे पण आता दुसऱ्याला गमावण्याची हिंमत नाही. तू माझ्या आयुष्यात प्रेरणा म्हणून आलीस आणि कायमच राहशील. मला माफ कर पण मला जावे लागेल. बारकू अपराधी नसल्याचे जेव्हा तुला समजेल तेव्हा तुही त्याची आई होशील." सरांनी असे म्हणताच त्या प्रचंड संतापल्या.

त्यांना समजावण्यात अपयशी ठरलेले सर दुसऱ्याच दिवशी दिंडोशीला रवाना झाले. आसावरी मॅडमनेही त्यांच्या निरोप घेतला आणि माहेरी निघून गेल्या त्या कायमच्याच. गावात आल्यावर सर लगेचच बारकूच्या घरी गेले. अंधाऱ्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलेल्या त्याला त्यांनी प्रेमाने साद घातली. त्या सादेने बारकूच्या काळजात ओळखीची घालमेळ झाली. क्षणाचा अवकाश की खोलीबाहेर पडत तो बाहेर आला. समोर सरांना पाहून वायूवेगे त्यांच्या कुशीत शिरला. कितीतरी वेळ त्यांना गच्च बिलगून तो खूप रडला. सरांनीही त्याला मोकळे होऊ दिले.

" बारकू, मी इथे फक्त तुझ्यासाठी आलो आहे. माझ्या या मुलाला असं मरतांना नाही पाहू शकणार. माझ्यासाठी तुला यातून बाहेर पडावे लागेल." सरांनी असे म्हणताच त्याने डोळे टिपले.

त्याच्या निर्धारावर चढलेली परिस्थितीची जळमटे सरांच्या येण्याने कायमची उतरली. त्याने नव्याने जगण्याची लढाई लढायला सुरवात केली. परिस्थितीने केलेला वार सहन करत नव्याने उभारी घेतली. या प्रसंगानंतर त्याची इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम करण्याची तयारी दुणावली होती. अभ्यासाशी एकरूप होत त्याने स्वतःला प्रवाही बनवले. त्याच्यासोबत त्याच्याच घरी राहत सर जणू त्याची सावली झाले. यशच्या जाण्याने आयुष्यात निर्माण झालेली पोकळी बारकूच्या सहवासात तात्पुरती भरून निघत होती पण कातरवेळी मात्र यश आणि मॅडमच्या आठवणींत डोळ्यांतून अश्रू ओघळायचे. मॅडमची अवस्थाही काही वेगळी नव्हती. सरांनी खूपदा त्यांच्या माहेरी जाऊन मॅडमची माफी मागितली, त्यांना परत येण्याची विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही. पाहता पाहता दोन वर्षाचा मोठा कालावधी सरला. बारकूच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था पाहता सरांनी त्याच्याकडून नवोदय परीक्षेचा अभ्यास करून घेतला. तो एकच पर्याय त्यावेळेस त्यांना त्याच्यासाठी योग्य वाटला. बारकूने स्वतःला अभ्यासात झोकून देत तयारी केली. त्याच्या आणि सरांच्या अथक परिश्रमाला यश मिळाले आणि त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. त्या दिवशी परीक्षेचा निकाल त्याच्या हाती पडला. त्यावर लिहिलेले नाव वाचून बारकूने सरांचे पाय धरले.

" गुरुजी, आणखी किती उपकार कराल या अभागी मुलावर ? तुमच्या मुलाचं नाव मला देऊन,तुमच्या ऋणात कायमचं कटिबद्ध करून घेतलत." तो त्यांच्या पायावर डोके ठेवत रडत म्हणाला.

" बाळा, माझा यश तुझ्यातच जिवंत आहे. उलट तुझ्या रुपाने मला माझ्या मुलाचा सहवास लाभला आहे. तुझ्या नावावरून कोणी तुझी खिल्ली उडवलेली मला चालणार नाही. या नावाने तू यशला कायम आपल्या सोबत ठेवशील." त्याला उठवत सर उत्तरले.

त्याने मात्र लगेचच सरांना गच्च मिठी मारली.

" तुमच्या या ऋणांत मी शेवटपर्यंत कटिबद्ध राहीन." तो रडत म्हणाला.

" गुरुदक्षिणा म्हणून आज एक गोष्ट मागायची आहे. चालेल ना ?" सरांनी असे विचारताच त्याने डोळे टिपले.

" तो तुमचा हक्क आहे." तो हात जोडत उत्तरला.

" यशवर्धन, ज्या परिस्थितीने आपल्यापासून आपलं सर्वस्व हिरावून घेतलं ती परिस्थिती बदलण्या इतका नक्की मोठा हो. गावात दवाखाना असता तर आपल्या यशला वेळेत उपचार मिळाला असता. रस्ता असता तर आम्ही वेळेत दवाखान्यात पोहचू शकलो असतो. परिस्थितीच्या सर्पाने त्याला संपवलं रे. जेव्हा गावातली ही परिस्थिती तू बदलशील तेव्हा तीच माझी गुरुदक्षिणा ठरेल." सर निर्धाराने म्हणाले.

सरांना ही गुरुदक्षिणा देण्यासाठी बारकूने मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
तो नवोदयला निघून गेला आणि सर पुन्हा एकाकी पडले. शाळेत मुलांना शिकवण्यात दिवस निघून जायचा पण संध्याकाळ त्यांना कातर करायची.
बारकू गेल्यानंतर वृंदाही सरांच्या हाताखाली चांगली तयार झाली. वीट भट्टीवर काम करण्याच्या निमित्ताने तिच्या आईवडिलांनी गाव सोडले. वृंदाच्या माध्यमिक शिक्षणाची सोय झाली पण सरांचा एकांतवास आणखी तीव्र झाला. सुट्टीत बारकू गावी यायचा. सरांसोबत वेळ घालवायचा. आठवणींच्या शिंपल्यात सहवासाचे मोती जमवून निघून जायचा. मग याच आठवणींना जपत सर जगायचे. काही वर्षानंतर सरांची बदली झाली. गाव सोडून जातांना सरांसोबत सारेच गावकरी रडले. मुलांनीही रडत रडत त्यांचा निरोप घेतला. सर गेल्यानंतर मात्र बारकू कधीच गावात आला नाही. सरांना त्यांच्या मूळ गावाजवळच शाळा मिळाली होती. त्या शाळेत रुळतांना मात्र सरांना खूप कठिण केले. रोजच बारकूची आठवण कातर करायची. दरम्यान नात्यातील वरिष्ठ मंडळीनी आसावरी मॅडमना समज दिली. सरांसोबत राहण्यासाठी तयार केले.


क्रमश:

©® आर्या पाटील

सरांच्या आयुष्यात सगळं पूर्ववत होईल का ? जाणून घ्या पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all