Login

गुरुदक्षिणा ( भाग ११ वा)

गुरु शिष्याच्या नात्याची अनोखी कथा
गुरुदक्षिणा (भाग ११ वा)

©® आर्या पाटील

मॅडम सरांच्या आयुष्यात परत आल्या पण त्यांच नातं पूर्ववत झालं नाही. बायको म्हणून त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडली पण सरांना मात्र कधीच माफ केले नाही. संसारात त्या पुन्हा कधी रमल्याच नाहीत. यशच्या आठवणी त्यांचा निर्धार आणखी पक्का करीत होत्या. त्यांची कायमच दुःखाची बुडालेली छबी सरांना मात्र भावनाविवश करून जायची

" आसावरी, मला माफ कर. तुला अश्या अवस्थेत नाही पाहवत." सरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

" माझ्याकडून माफीची अपेक्षा कधीच करू नका. ज्या वेळी मला तुमच्या आधाराची गरज होती तेव्हा तुम्ही मला परकं केलं. तुमच्या बारकू प्रतीच्या कर्तव्याने माझ्या यशचा बळी घेतला." त्या असे म्हणताच सरांना अश्रू अनावर झाले.

" आता आयुष्यभर यशच्या आठवणीत आपल्याला असेच रडावे लागणार आहे. तुम्ही जर त्या शाळेतून बदली करून घेतली असती तर आज माझं हसतं खेळतं गोकुळ अबाधित असतं. तुम्ही केलेल्या गुन्हाला एकच शिक्षा आहे तो म्हणजे हा एकाकीपणा. वडिलांच कर्तव्य निभावायला अपयशी ठरलेल्या व्यक्तीला पुन्हा बाप बनण्याचा मुळीच अधिकार नाही किंबहुना एक आई म्हणून मीच तो तुमच्यापासून हिरावून घेत आहे. बदल्यात मला कायमची सोडचिठ्ठी दिली तरी चालेल." मॅडमने असे सांगताच सरांचे उरले सुरले अवसानही गळून पडले.

त्यांनी मात्र हीच शिक्षा आहे असे मानून मॅडमच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. पुन्हा बाप होण्याची इच्छा मनातच दाबत ते अपत्य शोकात झुरत राहिले ते आजपर्यंत.

आज एवढ्या वर्षांनंतर सरांच्या नजरेसमोर त्यांचा आयुष्यपट पुन्हा एकदा साकार झाला. कटू आठवणी डोळ्यांतून मोकळ्या झाल्या. यशचा निरागस चेहरा आजही त्यांना जसाच्या तसा आठवला. या साऱ्यांत हरवलेला त्यांचा बारकूही नजरेसमोर तरळला. तोच त्यांचा मोबाईल वाजला आणि ते भानावर आले.

" हॅलो, पाटील सर का ? मी दिंडोशी शाळेतून वनमाळी सर बोलत आहे." समोरून वनमाळी सर बोलते झाले.

दिंडोशीचे नाव ऐकताच सरांनी आवंढा गिळला. अश्रू टिपत त्यांनी स्वतःला सावरले.

" हो मी पाटील सर बोलतोय." त्यांनी प्रतिउत्तर दिले.

" सर, आशा आहे तुम्हांला निमंत्रण पत्रिका मिळाली असेल. साऱ्या गावकऱ्यांची आणि पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही तुमच्या हातून शाळेचे उद्घाटन व्हावे अशी इच्छा आहे. तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी उपस्थित राहून हा मान स्वीकारावा." सरांनी पुन्हा एकदा त्यांना विनंती केली.

तोच पाटील मॅडम बाहेर हॉलमध्ये आल्या. त्यांना पाहून सरांनी मात्र बुद्धीचा कौल घेतला.

" खरच त्या शाळेचा शिक्षक म्हणून हा खूप मोठा मान होता पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक महत्त्वाचं काम असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. खूप मनापासून माफी मागतो." नाईलाजास्तव सरांनी नकार कळवला.

सरांच्या बोलण्याचा अर्थ कळायला मॅडमना वेळ लागला नाही. सरांनी त्यांच्यासाठी कार्यक्रमाला जायला नकार दिला हे त्यांना चांगलच माहित होतं. शाळेप्रती त्यांच्या भावनाही त्या चांगल्याच ओळखून होत्या. एवढ्या वर्षानंतरही गावकऱ्यांनी सरांची आठवण ठेवत त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याची जाणीव होताच मनाने नमती बाजू घेतली. या मानावर त्यांचा अधिकार आहे असे बुद्धीने पटवून दिले.

" जेव्हा जायचं नव्हतं तेव्हा हट्टाने शाळेत रुजू झालात आणि आज त्याच परिश्रमाचं चीज होत असतांना त्यांना नकार कळवलात. यशसाठी मी तुम्हांला आणि तुमच्या त्या विद्यार्थ्याला कधीच माफ करणार नाही पण तुमच्या सन्मानाच्या आडही येणार नाही. त्यांना येत असल्याचे कळवा." मॅडमने स्पष्टपणे आपले मत मांडले.

त्यांच्या अनपेक्षित सकारात्मक भूमिकेने सरांना हायसे वाटले. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी मानसिक आनंदाचं कवाड खुलं करून देणार होता. ज्या भागात त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्वात खडतर प्रवास केला होता आज त्याच प्रवासाने त्यांना नव्याने साद घेतली होती. हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता. त्यांच्या विद्यार्थ्यांनी यातून गगन भरारी घेतली होती. मॅडमच्या निर्णयाने सरांना आभाळा एवढा आनंद झाला. त्यांचे हात हातात घेत त्यांनी ते आपल्या डोळ्यांना लावले. अश्रूंचे थेंब हातावर ओघळताच मॅडम हळव्या झाल्या. काही क्षणच की पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला कठोर बनवले.

" पण मला सोबत यायचा आग्रह करू नका. मला ते सहन होणार नाही." म्हणत त्या तडक आत निघून गेल्या.

त्यांच्या या निर्णयाने मात्र सरांना वाईट वाटले. त्यांच्या या प्रवासाची सगळ्यात जास्त झळ मॅडमनाच तर बसली होती. त्यांच्या आईपणाच्या चितेवर क्रित्येक मुलांचे भविष्य उभे राहिले होते. सरांना त्यांनाही या सन्मानात सामील करून घ्यायचे होते किंबहुना साऱ्या गावकऱ्यांची ती इच्छा होती. मॅडमने नकार देऊन त्यांची ही आशा संपुष्टात आणली. पर्याय नव्हता परिणामी सरांनी वनमाळी सरांना कॉल करून ते कार्यक्रमाला येत असल्याची माहिती दिली. वनमाळी सरांपुढे उभे राहिलेले मोठे संकट विनासायास टळले. त्यांनी वृंदाला बोलावून सर गुरुपौर्णिमेला येत असल्याचे कळवले. वृंदाला खूप आनंद झाला. कामातला उत्साह दुणावला. तिच्या तयारीला वेग आला.

तिच्या आठवणींतला तो बारकूचा चेहरा तिला पुन्हा पुन्हा साद घालू लागला. सरांची बदली झाल्यानंतर बारकूचे गावात येणे खूप कमी झाले होते. दिंडोशीला कोणताच आधार नसल्याने सुट्टीत भूईगावलाच काकांकडे तो राहायचा. वृंदाही बाहेरगावी राहत होती. सुट्टीच्या दिवसांत मात्र कोणतीही पूर्वकल्पना नसतांनाही दोघे अनाहूतपणे भेटायचे. वृंदाला भेटण्यासाठी म्हणून तो दिंडोशीला यायचा. ओढ्याकाठी सहवासाचे सोनेरी क्षण ते जगायचे. एकमेकांचा निरोप घेतांना मात्र मन हळवं व्हायचं. दुःखाची व्याप्ती त्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसायची. त्या दिवशी त्यांची भेट झाली ती शेवटचीच.

" वृंदा, कदाचित आता लवकर आपली भेट होणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मी पुण्याला जात आहे. सरांच्या गुरुदक्षिणेसाठी मला कठोर परिश्रम करावे लागतील. यात मला कोणताही अडथळा नको आहे. आपल्या मैत्रीचाही." तो असे म्हणताच वृंदा मात्र भावनिक झाली.

तिच्या मनात फक्त मैत्री नव्हतीच. ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्याच्या परिश्रमात तिला त्याची सावली व्हायचे होते पण त्याला आपण अडथळा वाटतोय या जाणिवेने ती हळवी झाली. त्यांच्यातील प्रेमाला त्याने दिलेले फक्त मैत्रीचे शीर्षक तिच्या दुःखाचे महत्त्वाचे कारण होते.

त्याच्या बोलण्याने तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्याने मात्र आपला निर्णय बदलला नाही. तो तेथून निघून गेला तो कायमचाच. त्यानंतर तो पुन्हा कधीच गावात आला नाही.
आठवणींच्या कल्लोळाने वृंदा पुन्हा एकदा त्याच्यात हरवली.

पाहता पाहता गुरुपौर्णिमेची तारीख जवळ येत होती. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि सारे गावकरी दुप्पट वेगाने कामाला लागले होते. पावसाळा असतांनाही त्यांच्या कामात पावसाचा कोणताही अडथळा येत नव्हता.

कार्यक्रमाला दोन दिवस उरले असतांना पाटील मॅडमना जिल्हाधिकारी कार्यालयातून एक फोन गेला.

" मॅडम, दिंडोशीच्या कार्यक्रमाला तुम्ही सरांसोबत उपस्थित राहावे अशी पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांची इच्छा आहे. नाही म्हणू नका." कलेक्टर साहेबांचा पीए विनंती करत म्हणाला.

कलेक्टर साहेबांची विनंती मॅडम टाळू शकल्या नाहीत.
कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी उठून सर तयार झाले. शाळेने सरांसाठी गाडीची व्यवस्था केली होती. प्रवास लांबचा असल्याने गाडी सकाळी लवकरच त्यांच्या घराजवळ येऊन थांबली. पाटील मॅडमना तयार झालेले पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मॅडमना मात्र पुन्हा त्याच गावात जातांना भावनिक व्हायला होत होते. ज्या गावात त्यांनी त्यांच आयुष्य गमावलं होतं आज तिथेच त्यांना जावे लागत होते. प्रसंग कठिण होता पण सरांसाठी त्या तयार झाल्या होत्या. गाडीचा दरवाजा उघडत ड्रायव्हरने त्यांना आत बसण्याची विनंती केली. मजल दरमजल करत गाडी दिंडोशीच्या दिशेने निघाली. जसे जसे गाव जवळ येऊ लागले त्यांच्या भावनिक आवर्तनांचा वेग वाढला. आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत ते तालुक्याच्या ठिकाणी येऊन पोहचले. मॅडमनी लगेचच डोळ्यांना रुमाल लावला. सरांनी त्यांच्या हातावर थोपटत त्यांना आधार दिला. त्यांनी मात्र खिडकीबाहेर मान वळवत आताही त्यांना माफी नाकारली. ज्या दोन डोंगरांना ओलांडल्याशिवाय गावात पोहचणे अशक्य होते, आज त्याच डोंगरांना विळखे घालत बांधलेल्या डांबरी रस्त्यावरून जेव्हा सरांची गाडी निघाली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. ज्या रस्त्यासाठी त्यांनी लढा दिला होता त्या रस्त्याला प्रत्यक्षात पाहून त्यांना भरून आले होते. पहिला डोंगर उतरून गाडी ओढ्यापाशी आली. ओढ्यावर बांधलेला पूल पाहून सरांनी डोळ्यांना रुमाल लावला. त्या दिवशी यशला दवाखान्यात नेतांना हाच ओढा पार करतांना झालेली कसरत आठवताच ते व्याकूळ झाले. क्षणभर जर तर च्या कल्पनेत मन रमले पण पुढच्याच क्षणी वास्तवाचा स्वीकार करत त्यांनी डोळे टिपले. ओढ्यापाशी गाडी थांबली.

" सर, पुढच्या प्रवास तुम्हांला दुसऱ्या गाडीने करावा लागेल. कलेक्टर साहेबांची तशी इच्छा आहे." म्हणत ड्रायव्हरने दरवाजा उघडला.

सर आणि मॅडम गाडीतून बाहेर पडताच लाल दिव्याची गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली. ड्रायव्हरने दरवाजा उघडत त्यांना आत बसण्याची विनंती केली. कलेक्टर साहेबांनी त्यांच्यासाठी खास गाडी पाठवली होती. साहेबांच्या इच्छेचा मान ठेवत त्यांनी त्या गाडीतून प्रवास केला. इतक्या वर्षांत गावाचा झालेला विकास पाहून सरांना आनंद झाला. त्या क्षणी त्यांना मॅडमशी भरभरून बोलावसं वाटलं पण त्या मात्र भूतकाळाच्या कटू आठवणींत पुरत्या हरवल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी सरांना अगतिक करून गेले. थोड्याच वेळात ते गावात येऊन पोहचले. गाडी शाळेजवळ येऊन थांबली. ड्रायव्हरने दरवाजा उघडताच वनमाळी सर त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. शाळेतील महिला शिक्षिकांनी सर आणि मॅडमना ओवाळले. सरांची नजर मात्र वृंदाला शोधत होती. ती मात्र डोळ्यांतील अश्रू लपवित लांबूनच तिच्या देवाचं दर्शन घेत होती. वनमाळी सरांनी आवाज देताच तिला पुढे यावे लागले. साश्रू नयनांनी सरांना ओवाळणाऱ्या तिला त्यांनी बरोबर ओळखले.

" वृंदा, बाळा कशी आहेस ?" सरांनी असे म्हणताच तिला अश्रू अनावर झाले.

सरांच्या पायांवर डोके टेकवत तिने त्यांचे आशीर्वाद घेतले. सरांना आपल्या विद्यार्थीनीचा सार्थ अभिमान वाटला. मॅडमनेही जवळ घेत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवला. ज्या गावकऱ्यांना सरांचा सहवास लाभला होता त्यांनी हात जोडत आपल्या देवाचे दर्शन घेतले. त्यांना पाहून सरही भावनिक झाले. स्वागत सोहळा आटोपल्यानंतर वनमाळी सरांनी त्यांना शाळेत नेले. रुपडं बदललेलं असलं तरी शाळेची जुनी छबी आठवणीच्या रुपात सरांच्या नजरेसमोर साकार झाली. शाळेच्या पायरीचे दर्शन घेत सरांनी आत प्रवेश केला. शाळेच्या भिंतीवरून हात फिरवतांना ते भूतकाळात रमले. कटू गोड आठवणींची शाळा जणू मनात भरली. गुरुपौर्णिमेच्या त्या दिवशी सरांना आपल्या आवडत्या शिष्याची, बारकूची प्रकर्षणाने आठवण येत होती.

क्रमश:

©® आर्या पाटील
बारकू आणि सरांनी भेट होईल का ? जाणून घ्या पुढच्या भागात

🎭 Series Post

View all