Login

गुरुदक्षिणा (भाग अंतिम)

गुरु शिष्याच्या नात्याची एक अनोखी कथा...
गुरुदक्षिणा ( भाग अंतिम)

©® आर्या पाटील

कार्यक्रमाला सुरवात झाली. व्यासपीठावर विराजमान होत पाटील सर कलेक्टर साहेबांच्या वाटेकडे डोळे लावून बसले. गावकऱ्यांशी बोलल्यानंतर साहेबांनी खूप कमी कालावधीत गावाचा कायापालट केल्याचे सरांना कळले होते. गावची परिस्थिती बदलणाऱ्या त्या तरुण आणि उमद्या व्यक्तिमत्वाला पाहण्याची, सरांची किंबहुना सगळ्याच गावकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. वनमाळी सरांनी कलेक्टर साहेबांना उशीर होणार असल्याचे सांगताच पाटील सरांनी मात्र त्यांची वाट पाहण्याचे सुचित केले.

" दिंडोशी गावाच्या क्षितिजावर कलेक्टर साहेबांच्या रुपात बदलाचा सूर्य उगवला आणि बिकट परिस्थितीचा अंधार नामशेष झाला. त्या सूर्याला हा मान मिळायला हवा. या कार्यक्रमासाठी आपण त्यांची वाट पाहूयात." सरांनी स्पष्टपणे सांगितले.

वनमाळी सरांनाही ते योग्य वाटले. कलेक्टर यशवर्धन जाधव ओढ्यापाशी येऊन थांबले होते. गावच्या दिशेने जाणारी वाट त्यांना खुणावत होती पण मनाची तयारी मात्र होत नव्हती. सरतेशेवटी सगळ्यांना ताटकाळत ठेवणे त्यांना चुकीचे वाटले. मनाला सावरत त्यांनी तिथे जाण्याचा आपला निर्धार पक्का केला. गाडी गावच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचले. कलेक्टर आल्याचे कळताच सगळेच त्यांच्या स्वागताला सज्ज झाले. यशवर्धन गाडीतून उतरताच गावकऱ्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. भूतकाळातला त्यांचा बारकू आज कलेक्टर बनून त्याच गावात आलेला पाहून सगळ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. एवढ्या दिवस ज्या कलेक्टर साहेबांचे ते गोडवे गात होते आज त्यांना पाहून सगळेच थक्क झाले होते. त्या साऱ्यांना पाहून यशवर्धननाही भरून आले. हात जोडत त्यांनी गावकऱ्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. व्यासपीठाच्या दिशेने जातांना मात्र पावले वाटेतच अडखळली. समोर पाटील सरांच्या रुपात त्यांना त्यांच्या देवाचे दर्शन घडत होते. त्यांचे रूप हृदयाच्या गाभाऱ्यात पुजतांना डोळ्यांना भावनेची भरती आली होती. त्यांच्या शेजारी बसलेल्या पाटील मॅडमना पाहून मात्र अपराधीपणाची जखम पुन्हा ताजी झाली. मान खाली घालत ते व्यासपीठाकडे निघाले. खुर्चीवर बसलेले पाटील सर उठून उभे राहिले. क्षणाचा अवकाश की नजरानजर झाली. हृदयात ओळखीची घालमेल झाली. श्वासांची गती दुणावली. भावनेच्या सागराला अश्रूंची भरती आली. उर अभिमानाने भरून आला.

" बारकू " नकळत ओठांवर नाव अवतरले.

सरांच्या या उच्चाराने मॅडम चकित झाल्या. समोरून चालत येणारे कलेक्टर म्हणजे बारकूच आहे हे कळायला मॅडमनाही वेळ लागला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या फोनचा संदर्भ लागताच त्या मटकन खाली बसल्या. अंतर संपत होते आणि काळजाचा ठोका चुकत होता. व्यासपीठामागे पडद्याआड उभ्या असलेल्या वृंदाची नजर यशवर्धनवर पडताच तिने समोरचा पडदा नजरेआड ओढला. हृदयाची धडधड तिच्या श्वासांची गती वाढवत होती. हळूच पडदा बाजूला सारत तिने पुन्हा त्याच दिशेने पाहिले. कलेक्टरच्या रुपात आपल्या जीवलगाला पाहून डोळ्यांतून अभिमान ओघळला. त्याचे बदललेले रूप नयनांत साठवत तिने पुन्हा पडदा खेचला. व्यासपीठावर येताच यशवर्धन आधी मॅडमकडे वळले. वाकून त्यांना नमस्कार करतांना डोळ्यांत दाटलेले अश्रू मॅडमच्या नजरेतून लपले नाहीत. नकळत हात त्यांच्या डोक्यावर स्थिरावला. त्यांच्या स्पर्शाने यशवर्धन सुखावले. हात जोडत आजही त्यांनी त्या माऊलीकडून माफीचे दान मागितले. त्या दोघांना एकत्र पाहून सरांना अश्रू अनावर झाले. जागेचे आणि वेळेचे भान राखत त्यांनी मात्र त्यांना डोळ्यांतच रोखले. पुढे जात जेव्हा यशवर्धन सरांपाशी पोहचले, त्या दोघांसाठी सारे जग शून्य झाले. ओलेत्या नजरेला नजरेची भाषा कळली. मूकपणेच ते गुरु शिष्य एकमेकांना कडकडून भेटले जणू. जेव्हा यशवर्धनांनी वाकून सरांना नमस्कार केला तेव्हा सगळे सोपस्कर बाजूला ठेवत त्यांनी त्यांना कडकडून मिठी मारली. उपस्थित सारेच गुरु शिष्याची ती अनोखी भेट पाहून भावनिक झाले. वृंदालाही अश्रू अनावर झाले. लांबूनच तो सुवर्ण क्षण हृदयात साठवत तिने डोळे टिपले. कलेक्टर साहेबांच्या पीएने सांगितल्याप्रमाणे पाटील सरांच्या पाद्यपूजनाची सगळी तयारी आधीच करून ठेवण्यात आली होती. यशवर्धनांनी त्या शाळेत शिकलेल्या आपल्या मोजक्या मित्रांना कळवले होते. ते ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. व्यासपीठावर वनमाळी सरांनी त्या साऱ्यांनाच आमंत्रित केले. सरतेशेवटी वृंदाचं नाव घेत त्यांनी तिलाही या कार्यक्रमात सामील होण्याची विनंती केली. वृंदासाठी हे खूपच भावनिक होतं. यशवर्धनना टाळणाऱ्या तिला सरांच्या पाद्यपूजनाचा सोहळा मात्र टाळायचा नव्हता. मनाला खंबीर बनवत ती मागच्या बाजूने व्यासपीठावर आली. दोघांची नजरानजर झाली आणि भावनिक गुंता असह्य झाला. पुन्हा एकदा वेळेचे भान राखत दोघांनी स्वतःला सावरले. साऱ्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू सरांच्या पाद्यपूजनाचा सोहळा बोलका करत होते. परिस्थितीच्या काटेरी झुडूपातून बाजूला काढत ज्यांच्या भविष्याला त्यांनी फुलांचा मळा बनवला होता तेच आज भक्तीभावाने आपल्या देवाच्या चरणांवर फुले अर्पित होते. सरांनी आजवर स्वीकारलेल्या सन्मानांपैकी हा सर्वोच्च सन्मान होता. त्यांच्या जगण्याचे आज सोने झाले होते. त्यांचा हा सन्मान मॅडमना मात्र कमालीचा भावनिक करून गेला. बापपणाचे जे सुख त्यांनी सरांसाठी कायमचे नाकारले होते तेच आज त्यांच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळतांना पाहून मॅडमना अपराधी वाटू लागले होते. आईपणाच्या शेल्याखाली त्यांनी नाकारलेल्या सरांच्या भावना आज त्यांना छळीत होत्या. कार्यक्रमाची खूपच भावनिक सुरवात झाली. गुरुच्या सन्मानाचा तो सोहळा पार पडल्यानंतर कलेक्टर यशवर्धन त्यांच्या बाजूला बसले. आपल्या लाडक्या विद्यार्थ्याने घेतलेली गगनभरारी सरांचा अभिमान वाढवून गेली. एक एक करत सगळे कार्यक्रम पार पडले. डिजिटल शाळेचे उद्घाटन झाले, भाषणे झाली, विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या सत्कार सोहळा संपन्न झाला. पाहता पाहता कार्यक्रमाची सांगता झाली. त्यानंतर वनमाळी सरांनी सगळ्यांना गावात कलेक्टर साहेबांनी पूर्णत्वास नेलेले काही प्रकल्प दाखवले. त्यापैकीच एक होता आधुनिक सोयीने सुसज्ज असलेल्या दवाखान्याचा प्रकल्प. ज्या ठिकाणी सर आणि मॅडम यशला घेऊन राहत होते तेथेच प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केलेली पाहून मॅडमना अश्रू अनावर झाले. दवाखानातल्या एका खोलीत थांबत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांचा वेध घेत यशवर्धन तेथे आले.

" बाई " त्यांनी नाव उच्चारताच मॅडम त्यांच्या दिशेने सरसावल्या. त्यांना घट्ट मिठी मारत मनभरून रडल्या.

" बाई, आपल्या यशला नाही वाचवता आले पण आता आरोग्य सेवेच्या अभावी दुसरा कोणताही यश आपल्या जीवाला मुकणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. माझी चुक अक्षम्य आहे पण मुलगा समजून माफ करा." जिल्हा सांभाळणारा कलेक्टर त्यांच्यासमोर हात जोडत म्हणाला.

" बाळा, उलट तुच मला माफ कर. तू आणि तुझ्या गुरुजींनी न केलेल्या गुन्हाची खूप मोठी शिक्षा भोगली आहेस. त्यांच्याशी बोल. त्यांना गरज आहे तुझ्या आधाराची." म्हणत मॅडमने डोळ्यांना रुमाल लावला.

मॅडमना शांत करत त्यांनी मात्र सरांना एकांतात गाठले. दोघांची ती भेट खूपच भावनिक ठरली. यशवर्धनच्या चेहऱ्यावरून हात फिरवत सर भावनिक झाले.

" माझा यश. कुठे हरवला होतास एवढे दिवस ? या बापाची एकदाही आठवण आली नाही का ?" त्यांनी असे म्हणताच यशवर्धन हळवे झाले.

" गाव सोडल्यानंतर असा एकही दिवस गेला नाही जेव्हा तुमच्या आठवणींत डोळे पाणावले नाहीत. तुमची बदली झाली आणि आपल्यातील अंतर वाढले किंबहुना मी ते वाढू दिले. बाई तुमच्या सोबत राहू लागल्याचे कळले आणि मनाने खच खाल्ली. तुमच्या सुखी संसारा आड मला परत यायचे नव्हते. माझ्यामुळे तुम्हांला आणखी त्रास होऊ नये म्हणून काळजावर दगड ठेवून मी कायमचा लांब गेलो. तुमच्या गुरुदक्षिणेसाठी अहोरात्र मेहनत केली आणि कलेक्टर झालो. " यशवर्धनांनी असे सांगताच सर हळवे झाले.

" माझ्यासाठी सर्वात मोठे बलिदान तर तू दिलेस. माझ्या गुरुदक्षिणेसाठी जीवाचं रान केलस. माझ्याच सुखासाठी माझ्यापासून दूर होत स्वतःला त्रास करून घेतलास. अथक परिश्रम करत माझी ओंजळ सुखाने भरलीस. आपल्या यशच्या नावाला नावलौकिक मिळवून दिलास. फक्त ऋणानुबंधाच्या गाठी नाहीत या. तुच माझा यशवर्धन आहेस." म्हणत सरांनी त्यांना आलिंगन दिले. त्यांच्या कुशीत शिरत आज एक बापमाणूस मनसोक्त रडला.

" हो मीच तुमचा यशवर्धन आहे. त्याच नात्याने एक शेवटची गोष्ट मागतो. नाही म्हणू नका." त्यांनी असे सांगताच सरांनी डोळे टिपले.

मान हलवत त्याला होकाराची शाश्वती दिली.

" खूप एकटा जगलो पण आता मला माझे आई बाबा सोबत हवे आहेत. यशचं फक्त नाव नको तर त्याची तुमच्या प्रतीची सगळी कर्तव्ये आंदण म्हणून माझ्या झोळीत घाला." यशवर्धन हात जोडत म्हणाले.

त्यांच्या या अनोख्या मागणीने सरांना मात्र कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. एका बापाला याहून वेगळं आणखी काय हवं असणार. डोळ्यांतील अश्रू टिपतांना नजर दरवाज्याकडे गेली. पाटील मॅडमना पाहताच त्यांनी आपली हतबलता दर्शवली. मॅडमने मात्र होकारार्थी मान हलवत त्यांना संमती दिली.

यासोबतच आणखी एक जबाबदारी यशवर्धनना मनापासून पार पाडायची होती. वृंदाप्रतीची तिच्या जीवलगाची जबाबदारी. कार्यक्रम संपल्यानंतर शाळेत वृंदा कोठेच भेटली नाही. यशवर्धन ओढ्याच्या दिशेने निघाले. ओढ्याकाठी नेहमीच्या ठिकाणी तिला पाहताच त्यांचा जीव भांड्यात पडला.

" वृंदा " तिच्याजवळ जात त्यांनी तिला साद घातली.

त्या आवाजाने वृंदाला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. कलेक्टर म्हणून ओळख मागे पडली. तिने आपल्या प्रियकराला गच्च मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी तिला तो अधिकार दिला.

" वृंदा, माफ कर मला. कर्तव्यासाठी मी तुझ्याप्रतीची माझी जबाबदारी नाकारली. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. या प्रेमाचा स्वीकार करशील ? मी आज जो कोणी आहे तो फक्त पाटील सर आणि तुझ्यामुळे. तू नसतीस तर तुझा हा बारकू कधीच नैराश्येच्या गर्तेत अडकून मेला असता." त्यांनी असे म्हणताच तिने त्यांच्या ओठांवर हात ठेवून नकारार्थी मान हलवली.

" माझ्याशी लग्न करशील ? मला पाटील सर आणि मॅडमना त्यांच्या वृद्धपकाळात सुखात ठेवायचे आहे. माझ्या या कर्तव्यात माझी सहचारिणी बनून साथ देशील ?" मोजक्या शब्दांत त्यांनी आपला निर्धार पक्का केला.

तिने मानेनेच होकार देत त्यांच्याभोवतीची आपली मिठी आणखी घट्ट केली. तिच्या प्रेमाला आज खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. तिच्या कपाळावर ओठ टेकवत त्यांनी स्पर्शखूण उमटवली. ज्या ओढ्याकाठी कठिण काळात त्यांनी एकमेकांना सावरले होते आज त्याच ठिकाणी सात जन्माच्या वचनात ते कटिबद्ध होत होते. मावळतीचा सूर्यप्रकाश आज त्यांच्या हळव्या मनाला प्रेमाची उभारी देत होता. ज्या गावाने बारकू पासून सर्वस्व हिरावून घेतले होते आज त्याच गावाने कलेक्टर यशवर्धनांची झोळी मात्र सुखाने भरली होती. माळरानावर जिथे त्यांनी छोट्या यशसोबतचे शेवटचे क्षण घालवले होते तिथे सोनचाफ्याची लागवड केली. त्या चाफ्याला साक्षीला ठेवत ते दोघेही पाटील सर आणि मॅडमच्या सेवेसाठी कटिबद्ध झाले.