Login

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा..

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा..

गोष्ट छोटी डोंगराएवढी..

गुरूने दिला ज्ञानरुपी वसा..


प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा। शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

खरंच, किती सुंदर संस्कृत सुभाषित! आयुष्यात कोणाला गुरू मानावं हे सांगताना गुरूंची महती अगदी सहजपणे मांडणारं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला गुरूंची भेट होत असते. फक्त ते गुरू आपल्याला ओळखता आले पाहिजेत. नतमस्तक होऊन नमन करावंस वाटावं अशी एक तरी पुज्यनिय जागा असावी. गुरुविण आयुष्याला आकार येऊच शकत नाही. आधार मिळू शकत नाही. हेच सत्य.. 

आज मी तुम्हाला माझ्या गुरूंची कथा सांगणार आहे. ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. ज्या व्यक्तींनी मला घडवलं, सुख दुःखात साथ दिली. कोसळून पडताना ज्यांनी मला सावरलं त्या सर्वांना आभार सुमने अर्पण करावीत असं मनापासून वाटत होतं म्हणूनच हे आभार पान..

माझी आई.. माझं पाहिलं दैवत. माझा पहिला गुरू. माझं प्रेरणास्थान. मी आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळेच.. तिने मला तिचे संस्कार दिले. तिच्यासारखं इतरांचा विचार करणारं संवेदनशील मन दिलं. मला तिने मनात मायेचा ओलावा जपायला शिकवलं. आम्ही लहान असताना माझ्या सगळ्या देवांच्या आरत्या तोंडपाठ असायच्या अगदी आजही आहेत. आजही कधी माझ्या बालपणीचा विषय निघाला की आई मोठ्या कौतुकाने सांगते की, "मी लहान असताना ती अंगाईगीते म्हणून सगळ्या देवी देवतांची आरती म्हणायची.’ अगदी तेंव्हा पासूनच ते शब्द कानावर पडत होते. आजही सगळ्या आरत्या तोंडपाठ आहेत. 

आठवतोय मला, तो शाळेचा पहिला दिवस. शाळेचा युनिफॉर्म, पाठीवर दप्तर.. दोन वेण्या, गळ्यात अडकवलेली पाण्याची बाटली, आईचं बोट घट्ट धरून चालणारी मी.. शाळेत मला पहिल्यांदा एकटीला सोडताना आईचे पाण्याने गच्च भरलेले डोळे, आणि मोठमोठ्यानं भोकाड पसरून रडणारी मी.. सगळं सगळं आठवतंय.

इथेच माझी भेट झाली ती माझ्या अतिशय प्रिय वर्गशिक्षका सौ. साळवेबाई ज्यांनी माझ्या बालमनावर संस्कार केले. मातीला आकार द्यावा तसं त्यांनी मला घडवलं. त्या कायम मला आईसारख्या वाटायच्या. ढगांचा गडगडाट सुरू झाला की, मी त्यांच्या पोटाला घट्ट मारलेली मिठी आणि त्यांनी प्रेमाने डोक्यावरून मायेने फिरवलेला हात, ती मायेची ऊब आजही लक्षात आहे. त्यांचा तो आश्वासक स्पर्श आठवला न आजही हुरूप येतो, संकटाशी लढायला बळ येतं. त्या जितक्या प्रेमळ होत्या तितक्याच अभ्यासाच्या बाबतीत कडक होत्या. गृहपाठ नाही केला तर मुलांना वर्गाबाहेर ओणवं उभं करायच्या. त्यांचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. त्यांच्याचमूळे माझंही हस्ताक्षर छान झालं. पाचवीत गेल्यावर इंग्रजी शिकवणाऱ्या सौ. सुप्रिया सावंत मॅडम मला फार आवडायच्या. ज्यांच्यामूळे मी छान इंग्रजी लिहायला, बोलायला शिकले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व तर हवंच पण त्याबरोबर मराठी भाषेवरही तितकंच प्रेम असावं. भाषा शुद्ध असावी हे त्यांच्याच कडून शिकले. त्यांच्यामुळेच निंबध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यात भाग घेऊ लागले. नाटक, एकांकिका यातही भाग घ्यायचे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती होत गेली आणि मी कायम पहिल्या तीन क्रमांकामध्ये राहिले. शाळेतल्या हुशार मुलांमध्ये गणती होऊ लागली. 

पुढे सातवीनंतर सरकारी शाळेतून आठवीसाठी माझी खाजगी शाळेत रवानगी झाली. "विकास हायस्कुल" या शाळेत प्रवेश झाला आणि मग माझा संपुर्ण कायापालट झाला. माझी शाळा बदलली होती पण आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप मात्र तसाच राहिला. त्यावेळीस सरकारी शाळेतून आलेल्या मुलांना खाजगी शाळेतली मुलं "ढ" समजायची. त्यांच्यापासून थोडं लांब लांब असायची. आम्ही पण मग थोडं बुजल्यासारखेच वावरायचो. तेंव्हा पोतदार मॅडम म्हणाल्या होत्या,

“कशाला कोणावर अवलंबून राहायचं? स्वतःला इतकं सक्षम बनवा की आपलं नाव घेताना समोरच्याला आदर वाटलाच पाहिजे.”

त्यांचं ते वाक्य मनावर कोरलं गेलं. तसं गणित आणि विज्ञान माझे नावडते विषय. गणिताच्या तासाला तर मला हमखास झोप यायची. पण मग आठवीच्या वर्गात असताना गणिताच्या तासाला पोतदार मॅडम शिकवण्यासाठी आल्या. त्यांच्यामुळेच मग हळूहळू गणिताविषयी गोडी लागली. विज्ञान शिकवणारे चौधरी सर खूप छान शिकवत पण रसायनशास्त्राविषयी फारसं प्रेम कधी वाटलं नाही. प्रयोगशाळेत विज्ञानाचे प्रात्यक्षिक करताना कायम भंबेरी उडलेली असायची. आजही ते आठवलं की नकळत हसू येतं. दहावीत असताना मराठी शिकवायला देशपांडे मॅडम होत्या. खूप छान मराठी शिकवत. त्यांच्यामुळेच मराठीभाषेविषयी गोडी वाटू लागली. 

एकदा त्या मराठीचा पाठ शिकवत होत्या. त्या शिकवताना नेहमी दैनंदिन आयुष्यातली उदाहरणं देऊन मुलांना समजावून सांगायच्या. त्या म्हणाल्या,

“आपण चांगले आहोत की वाईट हे आपल्याला आपल्या आईवडिलांच्या नजरेत अचूक कळतं.”

हे सांगताना त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं होतं,

“एखादा आज्ञाधारी, नम्र आईवडिलांची काळजी घेणारा मुलगा दिवसभर ऑफिसचं काम करून दमून भागून आलेल्या मुलाला आई मायेने विचारते, बाळा, आलास का? चल मी तुला जेवण वाढते, तू पटकन गरम गरम जेवून घे. पण तेच जर एखादा वात्र, बेशिस्त, दिवसभर उनाडक्या करत फिरणारा मुलगा असेल तर आई कसं बोलेल? या, आलात गाव हुंदडून.. बसा गिळायला.. तेंव्हा आपण चांगले आहोत की वाईट हे समजून घेण्यासाठी फक्त एकदाच आईवडिलांच्या डोळ्यात पहावं.. ”

विनोदाचा भाग सोडला तर त्यांनी सांगितलेली ही गोष्ट कायम मनात राहिली. देशपांडे मॅडममूळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. खूप पुस्तके वाचली. एकदा का पुस्तक हातात घेतलं की, संपेपर्यंत खाली ठेवायचीच नाही. रात्रंदिवस जागून पुस्तकाचा फडशा पाडायचे. लिखाणाची आवड निर्माण झाली. कथालेखन, कविता लिहायला आवडायचं. कलाक्षेत्रात रस वाटू लागला, नाटकं आवडू लागली.

एके दिवशी इतिहास शिकवणारे श्री काळे सर अचानक वर्गात आले आणि इतिहासाचा गृहपाठ तपासू लागले. आदल्या दिवशी नागपंचमीचा सण होता. त्यामुळे त्या धामधूमीत माझा गृहपाठ झालेला नव्हता. त्यांनी ज्यांचा गृहपाठ झाला नाही त्यांना उभं राहायला सांगितलं. हातात त्यांच्या वेताची छडी पाहून मला तर आधीच रडू फुटू लागलं. ते माझ्या बाकाजवळ आले. त्यांनी हात पुढे करायला सांगितलं. मी हात पुढे केला. माझ्या हातावरची मेंदी पाहून ते अजूनच चिडले.

“तुला मेंदी काढायला वेळ होता पण अभ्यासाला नाही.”

असं म्हणत हातावर दोन वेत्याच्या छड्यांचा मार दिला. मी खूप रडले. मनाशी पक्कं ठरवलं यापुढे कधीही गृहपाठ अपूर्ण ठेवायचा नाही. विज्ञान शिकवणाऱ्या देशमुख मॅडम, संस्कृत शिकवणाऱ्या पंडित मॅडम, हिंदी शिकवणाऱ्या गोविलकर मॅडम, सगळ्या गुरुजनांनी जीवन माझं समृद्ध केलं आणि मी नववी मध्ये शाळेतून पहिली आले. सरकारी शाळेतली मुलं "ढ” असतात हा संभ्रम मी मोडून काढला होता. खूप आनंद झाला होता. घरातही सर्वांना आनंद झाला पण सर्वात जास्त आईला. तिचं स्वप्न ती माझ्यात जगत होती. दहावीच्या परीक्षेत पुन्हा चांगल्या गुणांनी पास झाले. मला खूप खूप आनंद झाला. एक एक पायरी चढत होते. यश संपादन करत होते.

आज त्या साऱ्या गुरुजनांची खूप आठवण आली. आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणावल्या. या प्रवासात माझ्या सोबत सहप्रवासी झालेल्या माझ्या सुख दुःखात सामील झालेल्या, माझ्या यशात मोलाचा वाटा असण्याऱ्या, माझ्या गुरुजनांची, मार्गदर्शक बनलेल्या प्रत्येक सोबत्यांची मी मनापासून ऋणी आहे. मी ऋणी आहे त्या प्रत्येक क्षणांची ज्यांनी मला कठीण परिस्थितीत लढायला शिकवलं. त्या वाईट क्षणांचेही मी ऋणी आहे कारण त्यांनी मला माणसं वाचायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी कायम ऋणी आहे ते माझ्या आईचे जिच्यामुळे आजचे हे क्षण मी पाहू शकले. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या आशिर्वादामुळे..

आई, तू माझ्या पंखात बळ निर्माण केलंस आणि ही गरुडझेप घेण्यास सक्षम बनवलंस. तुझ्या या मायेची, प्रेमाची या उपकारांची मी कधीच उतराई होऊ शकत नाही पण आई प्रत्येक वेळीस मला तुझ्याच पोटी जन्म घायचा आहे. मला हे बोलतानाही अश्रु अनावर झालेत पण आई खरंच ग तुझ्यासारखी आई मला लाभली हे माझ्या भाग्यच.. अशीच कायम माझ्या सोबत राहा, आशीर्वाद बनून, कधी माझा श्वास बनून.. आय लव्ह यू आई!! 

समाप्त

©निशा थोरे (अनुप्रिया)