"साकेत, तू मला माझ्या आयुष्यात हवा आहेस. प्लिज मला सोडून जाऊ नको." साक्षी त्याचा हात घट्ट पकडून उभी होती.
साकेत खाली मान घालून उभा होता.
"साकेत, हे बघ तू मला वचन दिलं होतं. लग्न करणार तर तुझ्याशीच, मग असं का वागतोय? प्लिज प्लिज साकेत असं करू नको. मी तुझ्या शिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. पाहिजे तर मी तुझ्या आईशी बोलते. नक्की त्या ऐकतील."
ती गयावया करत होती.
तिच्या डोळ्यातील वेदना त्याला दिसत होत्या; पण तो देखील लाचार झाला होता.
त्याची आई म्हणजे सुलोचना तिने भावाला वचन दिलं होतं की, साकेतचं लग्न भावाच्या मुलीशी श्वेताशी करणार. हे सगळं इतक्या घाईत झालं की साकेतला हे सर्व स्वीकारायला खूप जड जात होतं. सुलोचनाचा भाऊ म्हणजे साकेतचा मामा आजाराचे निमित्त होऊन देवाघरी गेले; पण जातांना सुलोचनाकडे श्वेताचे लग्न साकेतसोबत व्हावं ही ईच्छा व्यक्त केली. सुलोचनाने पाणावलेल्या डोळ्याने वचन दिलं.
इथे साकेत आणि साक्षी दोघांनाही धक्का सहन झाला नाही.
साकेतला साक्षी आवडते हे सुलोचनाला माहीत होतं; पण ती निर्णय सांगून मोकळी झाली होती.
____________________________
"इतकं काय निरखुन बघतोय?" साक्षी गालावर आलेले केस मागे सारत म्हणाली.
"तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी किती प्रेम आहे ते बघतोय." साकेत गालातल्या गालात हसत म्हणाला.
"किती आहे प्रेम? सांगशील."
"इतकं प्रेम आहे की ते मोजता येत नाहीये."
तो नजर रोखत म्हणाला.
तो नजर रोखत म्हणाला.
"साकेत, तू आईला सांगितलं का?"
"काय?"
"अरे तुला सांगितले होते ना की आपल्या लग्नाबद्दल बोल." तीने त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला.
"आई गं! साक्षी हा असा अत्याचार करणार असशील तर मी काही सांगणार नाही हं." तो हात चोळत म्हणाला.
"तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही?" ती रागातच म्हणाली.
"अगं हो गं राणी, लग्न तर तुझ्याशीच करणार आहे. थोडा वेळ दे मला. आई गावी गेली आहे. ती आली की पहिलं आपल्या लग्नाविषयी बोलतो."
"खरंच बोलशील ना?"
"तुझी शप्पथ."
आज हे सगळं आठवत होतं. साकेत निघून गेला. तिचे अश्रू गालावर ओघळत होते.
'साकेत, प्लिज थांब ना. नको जाऊ. प्लिज. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. '
तिचं मन आक्रोश करत होतं.
साकेतला देखील एक एक पाऊल घेणं जड जात होतं.
तो देखील इतका लाचार कधीच झाला नव्हता.
पहिलं प्रेम, जिच्यावर जीवपाड प्रेम केलं ती आता आयुष्यात येऊ शकत नव्हती.
त्याचेही हात बांधले होते.
एकीकडे आईने मामाला दिलेलं वचन आणि दुसरीकडे साक्षी होती जिने त्याच्यावर प्रेम केलं होतं.
साकेत आणि साक्षी दोघेही वेगळ्या वाटेने जातील? की त्यांचं प्रेम त्यांना एकत्र आणेल? काय वाटतं तुम्हाला?
कथेचा पहिला भाग कसा वाटला ? जरूर सांगा.
एक नवीन कथामालिका घेऊन आले आहे. आशा आहे नक्कीच तुम्हाला आवडेल.
क्रमशः
अश्विनी ओगले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा