Login

हा खेळ प्रेमाचा भाग ३

कथा दोन प्रेम करणाऱ्या जीवांची
साक्षी घरी आली. ती तिच्या तंद्रीतच होती. चेहरा उतरला होता. तिची लहान बहीण मनवा लगेच तीच्या गळ्यात पडली. मनवाला कॉलेजमध्ये काय काय घडलं हे सांगायचे होते. तिची ताई तिच्यासाठी सर्वस्व होती. प्रत्येक गोष्ट ताईसोबत शेयर करायची. आजही ती ताईची वाट बघत बसली होती. कधी एकदाची ताई येते आणि सगळं तिला सांगते असं झालं होतं.

"ताई."

"काय हा पोरकटपणा मनवा. मी आताच आले आहे ऑफिसमधून, मला श्वास तरी घेऊ दे." ती जरा आवाज वाढवत म्हणाली.

"ताई, मी तर.." ती पुढे काही बोलणार तोच साक्षीची आई नम्रता आली.

"मनू, जा बरं अभ्यास कर."


साक्षी सहसा अशी वागत नव्हती.

नम्रताच्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी घडलं आहे.

"साक्षी, बरं वाटत नाही का?" तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.


"मी ठीक आहे आई." तिची आतल्या आत घुसमट होत होती.


साक्षीची आजी सरला हे सगळं दुरून पाहत होती.

तिने नम्रताला डोळ्याने ईशारा केला.
नम्रता पुढे काही बोलली नाही..

"आई, मला भूक नाहीये. मी झोपते, तुम्ही जेवून घ्या." असं बोलून ती रूममध्ये जाऊ लागली.

"बाळा, दोन घास खाऊन घे. असं उपाशीपोटी झोपू नये." आजी म्हणाली.


"आजी, खरंच मला भूक नाही."

ती रुममध्ये गेली. दार आतून लावून घेतलं.

बाथरूमध्ये गेली. मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणं लावलं. शॉवर चालू केला, बराच वेळ तशीच भिजत राहिली. एकाएकी अश्रू ओघळू लागले. अंगातून वीज निघावी असंच काहीसं झालं होतं. साकेतचे शब्द कानात घुमत होते. पक्ष्याचे पंख कापल्यावर जसं होतं, अगदी तसाच त्रास तिला होत होता.
हुंदके देत ती रडत होती. तोंडावर हात ठेवला होता. डोळे मात्र लाल झाले होते. इतक्या वर्षाचं प्रेम असं पटकन कसं सोडून जाऊ शकतं? कितीतरी शपथा घेतल्या होत्या. प्रेमाची पाटी कोरी करता येते का? त्या पाटीवर किती आणि काय लिहिलं होतं,अगदी मनापासून. त्यानेही आणि तिनेही,मग असं पटकन कसं सगळं पुसता येणार होते? एकत्र घालवलेले क्षण, भावना, प्रेम, विश्वास. मनाने तर त्याचीच झाली होती. तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता तो. डोकं बधीर झालं होतं. काहीच सुचत नव्हतं. पुढे फक्त काळोख दिसत होता. कसं चालणार होती त्या मार्गावर. किती सवय झाली होती त्याची. प्रत्येक श्वासात होता साकेत. विचारांचे चक्र थांबण्याचे नाव घेत नव्हते. कोणीतरी धारधार शस्त्राने वार करत आहे असंच वाटत होतं. ती बराच वेळ तशीच बसून राहिली. साकेत खरंच असं बोलला का? हे स्वप्न नाही ना? स्वतःलाच प्रश्न विचारत होती. उत्तर तिला माहीत होतं तरीही तिला काही केल्या चेन पडेना.

'साकेत, मी काय करू? आता कोणत्या वाटेने जाऊ? सांग ना मी काय करू? तू माझा प्राण होता आणि तूच दूर चालला आहे. एकदा येऊन सांग हे सगळं खोटं आहे. सगळं काही खोटं. तू फक्त नी फक्त माझा आहेस. फक्त माझा. तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे. मी खरं प्रेम केलं आहे. जीवापाड प्रेम केलंय. नाही सहन होत मला. असं वाटतंय मला काहीतरी होईल. फार त्रास होतोय, खरंच सहन करण्यापलीकडे आहे. हा धक्का नाही पचवू शकत.


इथे नम्रताला तिची काळजी वाटू लागली.


"आई, बघा ना कशी वागतेय साक्षी?"


"पोरी, दमाने घे. काहीतरी झालं असेल. तिला थोडा वेळ दे."

"आई, सकाळी जातांना तर अगदी व्यवस्थित होती; पण येतांना मात्र तिचा मूड बदलला."

"नम्रता, हे वय असंच असतं. अल्लड असं. मनाविरुद्ध काही घडलं की मुलं अशी वागतात. तिचं डोकं शांत झालं की, ती बोलेल. तू काळजी करू नको."

मनवा देखील तोंड पाडून आली.


"मनू, काय गं असं का तोंड पाडून बसली आहेस?" आजीने विचारलं.


"आजी, मी ताईला काहीच बोलले नाही तरी ती मला ओरडली.".


"मनू, ऑफिसमध्ये कामं कमी असतात का? झाली असेल चिडचिड. तुझी ताई आहे ना, आपण समजून घ्यायचं."

आजी समजावत म्हणाली.

साक्षीचा मूड सहजासहजी ठीक होणार नव्हता.
तिच्या आयुष्यात उलथापालथ झाली होती.
हे सगळं होणारच होतं.

पुढे सगळं नीट होईल की वेगळा टर्न येईल?

साकेत आणि साक्षी दोघेही दुःखी आहे. अधुरं प्रेम हे माणसाला कमकुवत बनवतं. ह्या दोघांचंही असंच झालं आहे. भावनीकरित्या कमजोर झाले आहे. साकेत आणि साक्षी सावरतील? सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. वाचत राहा "हा खेळ प्रेमाचा."