Login

हा खेळ प्रेमाचा भाग ४

कथा दोन प्रेम करणाऱ्या जीवांची
साक्षीला तिच्या मैत्रिणीचा नेहाचा कॉल आला.

तिने फोन उचलला नाही. तिला आता कोणाशी काहीच बोलायचं नव्हतं; पण नेहाही काही शांत बसणारी नव्हती. जोपर्यंत साक्षी फोन उचलणार नाही तोपर्यंत ती देखील गप्प बसणार नव्हती.


शेवटी ईच्छा नसतांना कॉल रिसिव्ह केला.

"अगं काय हे साक्षी कधी पासून फोन लावतेय? कुठे होती?"

"बाथरूममध्ये होती."

"बरं ऐक ह्या विकेंडला आपण कॉलेजचे फ्रेंड्स बाहेर जायचा प्लान करत आहो, तर तुलाही यायचं आहे हेच सांगायला फोन केला होता."

"तू जा, माझा मूड नाहीये."


"साक्षी, मी तुला विचारत नाहीये मी सांगतेय."

"नेहा, प्लिज समजून घे माझी खरंच ईच्छा नाहीये."

साक्षी अगदी रडवेली होऊन बोलत होती.

तिच्या आवाजावरूनच नेहाने ओळखलं काही तरी घडलंय.

"घरीच आहेस ना?" नेहा.

"हो घरीच आहे."

"हम्म ठीक आहे. चल बाय."
नेहाने फोन ठेवून दिला.


साक्षी डोळे बंद करून बेडवर आडवी पडली होती. डोळ्यातून येणारे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते.

दहा मिनिटाने कोणीतरी दार वाजवलं. साक्षीने डोळे पुसले.

तोंडावर पाणी मारलं.

दार उघडलं तर समोर पाहते तर काय ? नेहा उभी होती.


"नेहा, तू ? आता?"


"हो, मीच आहे."

तिने साक्षीचा चेहरा निरखुन पहिला.
सुजलेले डोळे बरंच काही सांगत होते.

नेहाने दार लावून घेतलं.

"साक्षी, काय झालं आहे?" तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले.

"काही नाही गं. डोळ्यात कचरा गेला."

"साक्षी, प्लिज मला ही कारणं देऊ नको. पटकन सांग काय झालं आहे."

आता मात्र साक्षीने तिला घट्ट पकडलं आणि रडू लागली.


नेहाला तिची काळजी वाटू लागली.

तिने तिचे डोळे पुसले.

"साक्षी, सांग काय झालं? का रडतेय? तुझ्या आवाजावरूनच मी ओळखलं काही तरी झालंय, म्हणून मी तुला भेटायला आले. सांग ना प्लिज."


"नेहा, सगळं संपलं गं. सर्व स्वप्न धुळीस मिळाली. साकेत.."


तिला पुढे बोलवत नव्हतं.


"साकेतचं काय?"


"साकेतच्या आईने त्याच्या मामाला वचन दिलं आहे की त्याच्या मुलीशी साकेतचं लग्न लावणार. आज साकेतने मला सांगितले."


"काय?"

नेहा डोक्याला हात लावून मटकन खाली बसली.

"नेहा, मला काहीच सुचत नाहीये गं. मला अजूनही विश्वास बसत नाहीये."


"अगं पण साकेतने त्याच्या आईला समजवायला हवं. तो असा कसा तयार झाला लग्नाला?"


"त्याने समजवायचा खूप प्रयत्न केला; पण आई ऐकत नाही म्हणाला."

"मग तुझ्या आणि त्याच्या प्रेमाचं काय? वेड्यासारखं प्रेम केलं आहे एकमेकांवर आणि आता त्या वचनासाठी? हे सगळं इमोशनल विचार करून का निर्णय घेत आहेत? मला इतकंच वाटतं की तुझं लग्न साकेतसोबत व्हायला पाहिजे. काहीतरी मार्ग काढला पाहिजे साक्षी. असं रडून मार्ग मिळणार आहे का? तू साकेतशी बोल. त्याला सांग आईचं मन डायवर्ट कर, काहीही कर म्हणावं त्याला; पण आईचा निर्णय बदल."


"नेहा, तुला माहीत आहे ना तो आईसाठी किती पजेसीव्ह आहे? बाबा नंतर आईच त्याचं जग. आईसाठी तो काहीही करायला तयार असतो."

"आणि तुझं काय? तुझ्यासाठी? साक्षी, तुला कळतय का ? परिस्थिती काय आहे ? असं भावनिक होऊन विचार करत राहिली तर काय होणार? ठीक आहे मीच बोलते त्याच्याशी."

असं बोलत ती त्याला फोन करू लागली.


"नेहा, प्लिज नको काही बोलू. आता काही उपयोग नाही."

"मग काय करायचं? हे असं रडतच राहणार आहेस का? तो कधी लग्न करतो ह्याची वाट बघत बसणार आहेस का?"


"खरंच माझं डोकं चालत नाहीये. मी काय करू समजत नाहीये."


"तुला नाही कळत ना? पण मला कळतयं. सरळ जा आणि साकेतशी बोल. त्याला सूनवुन ये, त्याला स्वतःचे विचार आहेत की नाही? लग्नासारखा निर्णय तो घेऊ शकत नाही? प्रेम केलं ना? मग ते निभावता येत नाही. मी तुझ्या ठिकाणी जर असते ना साक्षी तर मी रडत बसले नसते."


"नेहा, प्लिज हे असं काही बोलू नको. त्याची चूक नाही. सगळं त्याच्या मर्जीच्या विरोधात होत आहे. तो स्वतः दुखी आहे गं. त्याला इतकं हतबल झालेलं मी कधीच पाहीले नाही. हे असं वळण येईल वाटलं देखील नव्हतं."


"इतकं सगळं होऊन तू त्याची बाजू घेतेय? खरंच प्रेम हे आंधळं असतं. तुला खरंच काही दिसत नाहीये. साक्षी, एकदा आरशात बघ स्वतःला. काय अवस्था झाली आहे? ही अवस्था साकेतमुळे झाली आहे."


"नेहा, त्याचा दोष नाही गं. तू त्याला चुकीचं नको समजू. तो सुध्दा त्रासात आहे."


"त्याने हा त्रास स्वतःहून ओढावून घेतला आहे.
स्वतःसाठी स्टँड घ्यायला काय होतंय?"


"आलेली परिस्थिती नेहा. मला माझा साकेत कसा आहे हे चांगलं माहीत आहे. तो स्वतः ह्या परिस्थितीत फसला आहे. त्याला किती त्रास होत आहे हे मला माहित आहे."


"साक्षी, साकेतला काहीही बोललं तरी तू त्याचीच बाजू घेणार; कारण तू त्याच्यावर प्रेम करते. तुझी मैत्रीण म्हणून मला तुझ्यावर दया येतेय आणि रागही येतोय. ठीक आहे तू काळजी घे. निघते मी."


ती निघू लागली.

"नेहा, तूच म्हणायची ना की तू नशिबवान आहे. साकेत तुझ्यावर खूप प्रेम करतो."


"हो मीच म्हणायचे; पण आता जी परिस्थिती आहे ते पाहून माझं मत खरंच बदललं आहे. आता असं वाटतंय तू चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडली आहे. साथ द्यायची वेळ आहे तर तो देत नाहीये. खरंच ह्याला प्रेम म्हणायचे साक्षी? मला इतकंच कळतं प्रेम वेदना देणारं नसतं साक्षी. अर्ध्या वाटेवर सोडून जाणारं नसतं. प्रेम प्रत्येक परिस्थितीत साथ देतं. जे प्रेम असं सोडून जातं, वेदना देतं त्याला प्रेम म्हणायचे? शांत डोक्याने विचार कर."


नेहा निघून गेली.

'नेहा, हे प्रेमच होतं गं. तुला कसं सांगू? परिस्थिती अशी झाली आहे म्हणून मी माझ्या प्रेमावर संदेह नाही करू शकत.'

इतकं सगळं झालं तरी साक्षीचा प्रेमावर जो विश्वास होता तो अजूनही टिकून होता.

तुम्हाला काय वाटतं? नेहाचं म्हणणं बरोबर आहे का? की साक्षी बरोबर आहे?


क्रमशः
अश्विनी ओगले.

आजचा भाग कसा वाटला जरूर सांगा. कथा आवडल्यास एक लाईक जरूर द्या.

ही कथामालिका आहे. कथेचे भाग एक ते दोन दिवसात येतील ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.