हा खेळ प्रेमाचा भाग ५
साकेत ऑफिसला जाण्याची तयारी करत होता. सुलोचनाने विषय काढला.
"साकेत, आज मामी आणि श्वेता येणार आहेत."
तो शांतपणे ऐकत होता.
सुलोचना पुढे बोलू लागली.
"तुमच्या दोघांची लग्नाची तारीख ठरवायची आहे, आज जरा लवकर ये."
त्याच्या मनातली खळबळ चेहऱ्यावर दिसत होती.
सुलोचनाला त्याच्या मनात काय चाललं आहे हे चांगलं कळत होतं.
"आई, मला खरंच लवकर यायला जमणार नाही." असं म्हणत तो निघू लागला.
"साकेत, असं काय करतो आहे? तू नसशील तर काय उपयोग? तुझी उपस्थिती महत्वाची आहे."
"आई, तू आहेसच. तुला जे योग्य वाटतं ते कर. माझी काही हरकत नाही."
"साकेत, आता साक्षीचा विचार सोड. तुझी होणारी बायको श्वेता आहे." ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"आई, मी तुझा मुलगा आहे. तू मला चांगलं ओळखते. मला दुसऱ्याकडून अपेक्षा नाही; पण आई म्हणून तू तरी समजून घ्यावं इतकं वाटतं." त्याचे डोळे पाणावले.
"म्हणूनच तर मी विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. श्वेता माझ्या भावाची मुलगी जरी असली तरी ती पोरगी गुणी आहे, संस्कारी आहे. ती खूप छान संसार करणार बघ. तू माझा मुलगा आहे, तुझं चांगलं व्हावं. तू खुश रहावं इतकं वाटतं."
"आई, तुला असं वाटतं ना की मी खुश रहावं, मग माझं सुख केवळ साक्षीसोबत आहे. प्लिज आई मला श्वेताशी लग्न नाही करायचे. मला माझ्या आयुष्यात साक्षी हवी आहे. आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही दोघांनी मिळून संसाराची स्वप्न पाहिली आहेत. खरंच आई मी तिच्यासोबतच खुश राहू शकतो. तू समजून घे." तो जीव तोडून सांगत होता.
सुलोचना चवताळली.
आता तिचा आवाज वाढला.
"साकेत, पुरे आता. जेव्हा बघावं तेव्हा साक्षी साक्षी. मान्य आहे तुम्ही प्रेम करत होता; पण मी मामाला दिलेलं वचन मोडू शकत नाही. पुन्हा जर साक्षीचा विषय काढला तर याद राख. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन."
"आई, हे काय बोलतेय तू?" त्याने चमकून तिच्याकडे पाहिले.
"बरोबरच बोलतेय. तुझ्या भल्याचा विचार करते आहे." ती ठामपणे म्हणाली.
'आई, तुला कसं समजाऊ ? तू मला जिवंतपणी
मरण देतेय.'
मरण देतेय.'
त्याच्या मनाची घालमेल होत होती.
सुलोचना अश्या पद्धतीने अडून बसली होती की, तिला साकेत आणि साक्षीची तडफड दिसत नव्हती.
तो पुढे काहीच बोलला नाही. निघून गेला.
बाईकवर बसला आणि सुसाट वेगाने बाईक चालवू लागला.
'आई, का अशी वागतेय? का तू मला समजून घेत नाहीये. खरंच आई माझा जीव घुसमटतो आहे. तुझ्या मुलाचे सुख साक्षीतच आहे हे तुला का कळत नाहीये? काय करू मी आई? माझ्या आयुष्यात तू आणि साक्षी दोघीही महत्वाच्या आहात. दोघींशिवाय नाही जगू शकत. देवा! तू काही तरी कर.'
तितक्यात त्याचा फोन वाजला.
बाईक बाजूला उभी केली.
नेहाचा फोन होता.
डोळ्यातील पाणी पुसत त्याने फोन उचलला.
तो काही बोलणार त्याआधीच नेहा मोठया आवाजात बोलू लागली. तिच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता.
"हॅलो साकेत. हे काय लावलं आहेस तू? तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीची हालत काय झाली आहे. साक्षीवर प्रेम केलं होतं ना? मग हे काय मध्येच मामाच्या मुलीसोबत लग्न काढलं आहे.
तू साक्षीचा विचार केला का? हे बघ तुझ्यामुळे जर साक्षीला काही झालं ना तर मी तुला बघून घेईन."
तू साक्षीचा विचार केला का? हे बघ तुझ्यामुळे जर साक्षीला काही झालं ना तर मी तुला बघून घेईन."
ती बोलतच होती. सगळा राग काढत होती.
तो डोळे मिटून सगळं ऐकत होता.
"प्रेम म्हणजे काय मस्करी वाटली का तुला? इतके वर्ष एकमेकांना प्रेमाच्या आणाभाका दिल्या, स्वप्न सजवली आणि असं एका झटक्यात तिला दूर लोटलं. दुधातुन माशी काढावी असंच तू तिला तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं आहेस. तुला कल्पना आहे का तिची अवस्था काय झाली आहे? ती कोलमडून गेली आहे.
त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त तूच आहेस. असं करूच कसं शकतो तू? खरं प्रेम आहे ना? दाखव की धाडस. प्रेम तेव्हाच करावं जेव्हा ती निभावण्याची अंगात धमक असेल. बघ अजुनही वेळ गेलेली नाही. तू निर्णय घे आणि आईला स्पष्टपणे सांग."
"नेहा, माझी बाजू ऐकून तरी घे." तो म्हणाला.
"हे बघ साकेत मला काहीही ऐकायचं नाही. तुझं अति झालं आहे. आता मी तुझ्याशी तेव्हाच बोलणार जेव्हा तू पुन्हा साक्षीला तुझ्या आयुष्यात आणशील."
तिने फोन कट केला.
प्रचंड चिडली होती. नेहाचा स्वभाव त्याला माहित होता. बेधडक असं बोलणारी होती. साक्षीची जिवलग मैत्रीण.
'नेहा, आता मी तुला कसं समजाऊ? मी आईला मनवायचा खूप प्रयत्न करतो आहे, तरी ती ऐकत नाहीये.'
हे सर्व ऐकून त्याला साक्षीचा चेहरा आठवला.
तिला जाऊन भेटावं आणि तिला सावरावं असंच वाटत होतं; पण कोणत्या तोंडाने जाणार होता तो?
किती हतबल झाला होता, खरंतर कात्रीत अडकला होता.
कसा मार्ग निघणार होता?
क्रमशः
अश्विनी ओगले.
ही एक कथामालिका आहे.
कथेचा पुढचा भाग एक ते दोन दिवसात येईल.
कथेला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद.
हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.
एक लाईक जरूर द्या.
२७/०४/२०२५
अश्विनी ओगले.
ही एक कथामालिका आहे.
कथेचा पुढचा भाग एक ते दोन दिवसात येईल.
कथेला भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल धन्यवाद.
हा भाग कसा वाटला कंमेंटमध्ये जरूर सांगा.
एक लाईक जरूर द्या.
२७/०४/२०२५