Login

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-7

अखेर सुयशने रियावर असलेले प्रेम व्यक्त केले काय असेल रियाचे उत्तर ?

हा खेळ ऊन सावल्यांचा भाग-7



"रिया,काय म्हणत होता गं सुयश? आईने सहजच विचारले.


रिया आईकडे आश्चर्याने पाहत म्हणाली, "आई तुला कसं समजलं गं सुयशचा फोन होता ते?"


"अगं रिया, तुझा नंबर आहे का दुसऱ्या कोणाकडे? ज्याने तुझी काळजी वाटतेय म्हणून तुला फोन घेऊन दिला, तोच बोलणार ना तुझ्यासोबत इतका वेळ." सुयशचा फोन आला म्हणून आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.  


"हो गं,  मी विसरलेच होते. दुसऱ्या कोणाकडे माझा नंबर नाही ते. आई अगं गौरीचा साखरपुडा, हळदीचा कार्यक्रम आणि लग्नही इथल्याच हॉलमध्ये होणार आहे म्हणून सुयश इथेच आहे. तो मला ये म्हणतोय आणि तुझी परवानगी घेण्यासाठीच तो इथे येतोय आता." रिया म्हणाली.


"काय ? त्याला इथला पत्ता कसा काय ठाऊक?" आई पटकन म्हणाली.


"अगं त्याने आत्ताच पत्ता विचारला मला आणि मग मीच सांगितला." रिया घाबरून म्हणाली.


"कोण हा सुयश?" गौरी कोण? उमा म्हणाली.


आईने उमाला सुयशविषयी सांगायला सुरुवात केली तुला माहितीय उमा, सुयश आणि रिया बालमित्रमैत्रिणी आहेत. तसेच सुयश रियाच्या आवडत्या प्राथमिक शिक्षिकेचा मुलगा असून तो रियाच्या बालमैत्रिणीचा गौरीचा मोठा भाऊ आहे. आज तिचाच लग्नसोहळा आहे. त्यादिवशी मॅडम आणि सुयश गौरीच्या साखरपुड्याचे आमंत्रण द्यायला आमच्या घरी आले होते.सुयशनी आणि मॅडमनी रियाला खोलीत कोंडून ठेवलेलं पाहिलं होतं. सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देव माणसाच्या रूपानं कुठे ना कुठे मदतीला धावून येतात याचं वास्तव दर्शन सुयशमुळेच घडलं. मी घरच्यांना घाबरून सुयशला वाड्याबाहेर जायला सांगितलं होतं तोच माझ्या रियाच्या सुखासाठी तिची सावली बनून साथ देतोय. त्यानेच रियाचा आत्मविश्वास जागृत केला. तिला पुढच्या शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दिले. मॅडमनीही रियाला आधार दिला. परके असले तरी जवळचे वाटू लागले आहेत ते मला आणि रियाला. ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत रियाची आई बोलत होती.


"हो मलाही याच परिस्थितीतून जावं लागलंय. वाईट वेळेत मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणाऱ्यापेक्षा मी तुझ्यासोबत आहे म्हणणारे फार जवळचे वाटतात. पण तू काळजी करू नकोस. होईल सगळं ठीक. चांगल्या माणसांच्या मागे परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात उभा असतो हे अगदी खरंय." रमाचा हात हातात घेऊन उमा म्हणाल्या 


"खरंच उमा मावशी सुयश, मॅडम खूप चांगल्या आहेत." रिया म्हणाली.


तेवढ्यात रियाचा फोन वाजला. 'अननोन नंबरवरून आलेला कॉल घ्यावा का नको?' हा मनात विचार करत असतानाच रमा म्हणाल्या, "उचल रिया फोन. सुयशची इच्छा आहेच तर जा तू गौरीच्या लग्नाला." 


"अगं आई, पण सुयशचा नंबर नाहीये ना हा.अननोन आहे." रिया म्हणाली.


" फोन घे रिया, बघ कोणाचा आहे ? कदाचित सुयशच दुसऱ्या नंबरवरून कॉल करत असेल." उमा म्हणाल्या.


सतत वाजणारा तो फोन अखेर रियाने उचलला."हॅलो." रिया घाबरून म्हणाली. 


" हॅलो.अगं रिया, मी संकपाळ मॅडम बोलतेय.सुयश गाडी चालवतोय म्हणून त्यानेच मला तुला कॉल करायला सांगितले.आम्ही इथे आलोय 'कुणाल मोबाईल शॉपीजवळ' आता नेमके कुठे यायचे ते विचारायचे होते." मॅडम भराभर बोलून मोकळ्या झाल्या.


"मॅडम, मलापण इथली फारशी माहिती नाहीये.एक मिनिट थांबाल मी मावशीला विचारून सांगते." मॅडमचा कॉल रियाने स्पीकरवर टाकल्याने मावशीने रियाकडून फोन घेऊन लगेच मॅडमना त्यांच्या घरी कसे यायचे ते सांगितले.


मॅडम आणि सुयश अगदी पाच मिनिटांत उमा मावशीच्या घरी पोहोचले ही. मॅडम आणि सुयशला पाहून मावशीला साक्षात ईश्वराचे दर्शन घडले असे वाटत होते. खूप आनंद झाला होता घरातील सर्वांना.


घरात पाऊल ठेवतच मॅडम म्हणाल्या, "चला बरं, आवरा पटापट. आम्ही तुम्हाला घ्यायला आलोय. सगळ्यांनी आज गौरीच्या हळदीला कार्यालयात हजर राहायचे आहे."


"मॅडम सगळ्यांना कशाला? रियाला घेऊन जा तुम्ही. तिच्या मैत्रीणीचे लग्न आहे ना." उमा मावशी म्हणाल्या पण मॅडम म्हणाल्या, "अहो, लग्न मंडपाला पाहुणे मंडळींनीच शोभा येते. रिया आणि तुम्ही सगळेजण आलात तर आम्हांला आनंद वाटेल. प्लीज नाही म्हणू नका."


मॅडमच्या आग्रहास्तव सगळेजण हळदीच्या कार्यक्रमाला जायला तयार झाले. चहा नको म्हणून मॅडमनी फक्त साखर आणि पाणी घेतले. रियाच्या आई मॅडमसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. तितक्यात उमा रमाला म्हणाल्या, "रमा एक विचारू?" 


"अगं हो, विचार ना." रमा चटकन म्हणाल्या.


"म्हणजे बघ ना आता रिया शहरात आलीय.पूर्वीच्या सगळ्या कटू आठवणी विसरायचं म्हणतेय तर तिला तिच्या आयुष्यात काही घडलंच नाही असं जगू दे ना." उमा म्हणाल्या.


"अगं हो. मी तिला नाही अडवणार. पण तुला असं का वाटलं?" रमा म्हणाल्या.


चटकन उठून उमा आपल्या खोलीतील कपाटातून एक बॅग घेऊन आल्या. हळूच त्यांनी त्या बॅगमधील सुंदर असा ड्रेस बाहेर काढला. तो रमाला दाखवत त्या म्हणाल्या," हा ड्रेस मला तुझ्या भाऊजींनी एनिवर्सरी गिफ्ट म्हणून दिलाय. पण मी अजून एकदाही नाही घातला. मला वाटतं हा ड्रेस रियाने घालावा. तिच्या सौंदर्यात भरच पडेल बघ. पण तुझी काही हरकत नसेल तर." गंभीर होऊन उमा म्हणाल्या.


"अगं माझी का हरकत असेल? आता रियाला रोज कॉलेजला जाताना ड्रेस घालावा लागेल. रियाला आवडला तर घालू दे तिला हा ड्रेस." स्मितहास्य करत रियाच्या आई उमाला म्हणाल्या.


उमा ड्रेस घेऊन मुलींच्या रुममधे गेल्या.  त्यांनी रियाला ड्रेस घालायला सांगितले. सुरुवातीला नको म्हणणारी रिया मावशीने समजावल्यावर ड्रेस घालायला तयार झाली. तो पोपटी रंगाचा ड्रेस, त्याच्यावरील ते नाजूक वर्क आणि फुल्ल वर्क केलेली ओढणी. आहाहा! रिया अगदी आकाशातून उतरलेली परीच भासत होती. तिने टिकली न लावता हलकाच मेकअप केला होता. हलक्या गुलाबी रंगाच्या लिपस्टिक शेडने तर रोझी लिप्स म्हणतात ते हेच असे भासत होते. श्रेयाने रियाची छान हेअरस्टाइल केली. गळ्यातल्या सेटवर मॅचिंग असलेले मोठाले एअररिंग रियाला श्रेयानेच दिले होते. रिया आणि श्रेया पर्फ्यूम मारून जिना उतरून खाली आल्या. मॅडमनी रियाला जवळ घेऊन आपल्या डोळ्यातील काजळ रियाला कोणाची नजर लागू नये म्हणून तिच्या कानामागे लावलं.


"खूपच सुंदर दिसत आहेस तू रिया." मॅडम म्हणाल्या.


"थॅंक्स मॅडम. याचं सगळं श्रेय सुयशला जातं मॅडम.ज्याने माझ्या मनातील असंख्य प्रश्नांची उकल करून दिली म्हणून आज मी स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ओळखू शकले." रिया सुयशकडे बघून बोलत होती.


"चला उशीर होतोय. गौरी वाट पहात असेल." स्वतः कौतुक ऐकून हुरळून न जाता सुयश नम्रपणे म्हणाला.  


सगळ्यांच्या आग्रहाखातर मॅडम पुढच्या सीटवर बसल्या. गाडीत छान गप्पा चालू होत्या. सुयशची नजर मात्र समोरच्या आरशातून सतत रियाला न्याहाळत होती. मॅडमच्या हे लक्षात येत होतं. 'खरंच माझा सुयश खूप उदार अंतःकरणाचा आहे. समाजाची पर्वा न करता तो रियावर निस्वार्थ प्रेम करतोय. आज मला सुयशची आई असल्याचा अभिमान वाटतोय.' मॅडम मनात विचार करत हसत होत्या.


"आई कार्यालय आलं.उतरा आता." या सुयशच्या वाक्याने मॅडमचे विचारचक्र थांबले.


"अरे हो की. ये रिया चल गौरीकडे घेऊन जाते तुला." असं म्हणून मॅडमनी सुयशकडे पाहिलं आणि लगेच त्या म्हणाल्या, सुयश तू रियाला गौरीकडे घेऊन जा आम्ही काही तयारी बाकी आहे का ते पाहतो." 


सुयशचा चेहरा खुलला होता. 


'आईने अगदी मनातलं ओळखलं म्हणून मनातल्या मनात आईचे आभार मानत होता.' "चल रिया येतेस ना गौरीला भेटायला?" सुयशच्या या प्रश्नावर रियाने आईकडे पाहिले. सगळ्यांनी एका सुरात "अगं जा पटकन." म्हणून सांगितल्यावर रिया आणि सुयश कार्यालयाच्या गार्डन एरियामध्ये असलेल्या ब्रायडल रूममध्ये गेले. गौरी रियाची आतुरतेने वाट पाहत होती. पाहताच क्षणी गौरीने प्रेमाने रियाला मिठी मारली. दोघींचेही डोळे पाणावले होते.


"खूप छान वाटतय तुला इथे पाहून." गौरी रियाला म्हणाली.


"हो. हे सगळं सुयशमुळेच शक्य झालं." रिया म्हणाली.


"काय निर्णय घेतलास मग तू?" गौरी उत्सुकतेने रियाला म्हणाली.


"कशाचा?" रिया घाबरून म्हणाली.


"अगं ती ऍडमिशनचं विचारतेय, हो ना गौरी?" डोळे मोठे करुन सुयश गौरीपुढे उभा राहून म्हणाला.


"हो अगं हो." गौरी म्हणाली.


"झालंय ऍडमिशन." रिया म्हणाली.


"छान झालं." रियाला कोल्ड्रिंक घ्यायला सांगून गौरी सुयशला घेऊन कोपऱ्यात आली आणि म्हणाली, अरे दादा ,तू अजून रियासमोर तुझ्या भावना बोलून दाखवल्या नाहीत का?" 


"नाही. पण लवकरच मी बोलेन.पण तू आत्ता तिला काही बोलणार नाहीस. प्रॉमिस कर मला. आणि चल पटकन. तिला वेगळं नको वाटायला." 


"देर ना हो जाये कहीं.. देर ना हो जाए..। म्हणून छान दिसतेयस एवढं तरी बोलशील ना?" गौरी सुयशला चिडवत म्हणाली.


"काही देर वगैरे होणार नाही. म्हणेन मी तिला ती खूप छान दिसतेय म्हणून. चल आता." 


"दादा, माझ्यासमोर रियाला म्हणायचेय लक्षात असू दे." गौरी पुन्हा म्हणाली.


"हो. म्हणणार तुझ्यासमोर.घाबरतो की काय तुला? चल आता." सुयश चिडून म्हणाला.


"नाही खूप दिवसांपासून प्रेम करतोयस ना रियावर. तेव्हाही बोलू शकला नव्हतास मग आता बोलू शकशील ?" गौरी मुद्दाम सुयशला बोलायला भाग पाडत होती कारण तिलाही रिया तिची वहिनी म्हणून फार आवडायची. सुयशने होकारार्थी मान हालवली. सुयश आणि गौरी रिया ज्या सोफ्यावर बसली होती तिच्याजवळ जाऊन बसले. 


गौरीच्या एका फ्रेंडने गौरीला सेल्फीसाठी बोलावले. गौरी गेली तेवढ्यात रिया सुयशला म्हणाली, "काय म्हणत होती रे गौरी तुला? मला असं का वाटत होतं की ती माझ्याविषयी बोलत होती."


"हो ती तुझ्याविषयीच बोलत होती." सुयश म्हणाला.


गौरी सेल्फी काढून आली होती. तितक्यात सुयश म्हणाला, " रिया तू म्हणालीस ना, काय म्हणत होती रे गौरी तुला?" 


"हं." रिया म्हणाली.


"ऐक तर मग. गौरी म्हणत होती, आज रिया स्वर्गातील अप्सरेसारखी दिसतेय. सौंदर्याची खाण आहे रिया. लहानपणापासून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा ठसा उमटवून ती सगळ्यांना प्रेमात पाडायची. देवी सरस्वती आणि लक्ष्मी दोन्ही तिच्या ठायी निवास करतात.खरंच रिया खूप छान दिसतेय तू." सुयशचे वाक्य पूर्ण होते न होते तोच रिया अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी वेगात बाहेर गेली.


'काय झालं असेल रियाला ? ती रागावली असेल का माझ्यावर? मी काही चुकीचं बोललो का?' सुयश मनात विचार करत होता.


सुयशच्या मनात उद्भवलेल्या असंख्य प्रश्नांवर काय असेल रियाचं उत्तर?


पाहूया पुढील भागात क्रमश :


सौ. प्राजक्ता पाटील 








0

🎭 Series Post

View all