https://m.facebook.com/story.php?story_fbid=1291246214693228&id=581606972323826
मागील भागाची लिंक ☝?
हा खेळ ऊन सावल्यांचा भाग -2
मागील भागात आपण पाहिलं की , काकासाहेबांचा शब्द हा घरातीलच काय तर घराबाहेरील कोणी व्यक्तीही मोडू शकत नव्हते . त्याचमुळे सुयश रियाला भेटण्यासाठी स्वयंपाक घरात जाणार तोच काकासाहेबांच्या कठोर शब्दामुळे , आपले पाऊल मागे खेचत ढेलजेत येऊन बसला. आज आपण पाहणार आहोत की रियाचा यापुढील प्रवास कसा असेल ?
आधुनिक विचाराच्या रियाला मात्र काकासाहेबांची शिस्त म्हणजे विनाकारण लादलेलं जोखड वाटायचं . आणि रियाच्या नशिबी विधवा स्त्री नावाचं ग्रहण लागलं होतं . त्यामुळे रियाला खोलीच्या बाहेरही पडण्याची मुभा नव्हती तसेच नवीन येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर रियाने पाऊल टाकणं घरात रियाची आई सोडून इतर कोणालाच रूचत नव्हतं . रियाची आई रोजच लेकीची होणारी अवहेलना पाहून दुःखी व्हायची . देवाकडे रोज यासाठी प्रार्थना करायची . रियाच्या सगळ्यात लहान काकाच्या मुलीला आज पाहुणे बघायला येणार होते . मग रियाची सावलीही त्या बहिणीवर पडणार नाही म्हणून रियाच्या काकीने चक्क रियाकडून , " दिवसभर रियाने खोलीच्या बाहेर न पडण्याचे वचन मागितले.
काकीच्या या अशा वचन मागण्याचे रियाला खूपच वाईट वाटले होते . \" ज्या घरात मी लहानाची मोठी झाले , माझं बालपण ज्या घरातील सदस्यांनी अनुभवलं त्या घरातल्या लोकांना याआधी कधीच मी अपशकुनी नाही वाटले आणि यांनी माझं लग्न ज्याच्याशी लावून दिलं , तो माणूस आधीपासून आजाराने त्रस्त होता आणि त्यामुळेच तो हे जग सोडून गेला यात माझा दूरदूरवर तरी काही संबंध आहे का ? हे सर्व असं असताना घरातील लोकांना शुभकार्यात माझी सावली एवढी जाचक कशी काय वाटू शकते ? आता तर माझ्या मनाला प्रश्नच पडतोय मी जगतेय कशासाठी ?\" रिया निराश होऊन डोळे मिटून शांत बसली होती . तितक्यात रियाची आई पाण्याने भरलेली छोटी कळशी आणि रियासाठी जेवणाचा डबा घेऊन खोलीत आली . आई रियाकडे पाठ करून उभी होती आणि त्याच स्थितीत उभी राहून रियाला , "जेवण करून घे." म्हणाली . आई अगं तुलाही माझं तोंड नाही पाहायचं का ? माझा चेहरा पाहिल्यावर शुभकार्यात खरचं अनर्थ घडेल असे तुला वाटतेय ? तर मग तु नको पाहू माझा चेहरा . जा तू ." रियाला रडू अनावर झाले .
धावत येऊन आईने रियाला मिठी मारली ." नाही रे सोन्या , माझ्या पोटचा गोळा आहेस तु . कशी असशील तू अपशकुनी ? पण माझ्या लेकराला असं वाळीत टाकलं आणि मी काहीच करू शकत नाही म्हणून मी तुझ्याशी नजर मिळू शकत नव्हते म्हणून नाही पाहिलं गं रिया तुझ्याकडे .मला माफ कर ." आई रडू लागली.
" बसं आई , हेच हवं होतं मला . सगळं जग जरी माझ्याविरुद्ध असेल ना आई , आणि फक्त तुझे आशीर्वाद माझ्या सोबत असतील ना तर मला कुठल्याच गोष्टीची उणीव कधीच भासणार नाही . आई जा आता तू ." रिया आईचे डोळे पुसत म्हणाली .
आई पदराने अश्रू टिपत बाहेर निघून गेली .
पाहुणे आले . मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला . रियाची चुलत बहीण राधा पाहुण्यांना पसंतही पडली . त्यानंतर पाहुण्यांची जेवणे आटोपली . घरातील पुरुष मंडळीची जेवणे पाहुण्यांसोबत उरकली होती . पाहुण्यांना जेवणानंतर पानसुपारीचे विडे आबांनी (म्हणजे मोठ्या काकांनी ) बनवून दिले . पाहुण्यांसोबत आलेल्या स्त्रियांना जेवायला वाढण्यात आले . फक्त पाहुण्यांसोबत आलेल्या स्त्रियांना जेवायला कसं वाढायचं ? त्यांच्या सोबत घरातील दोन स्त्रिया जेवायला बसवायचं ठरलं होतं . तेव्हा सगळेजण रियाच्या आईला आग्रह करू लागले . इच्छा नसतानाही रियाच्या आईला जेवायला बसवलं होतं . त्यांना तो प्रत्येक घास रियाचे स्मरण करून देत होता . बळजबरीने रियाच्या आईने कसेबसे जेवण आटोपले . थोड्यावेळात पाहुण्यांच्या निघण्याची तयारी झाली .
पाहुण्यांचा पाहुणचार स्वीकारून , सगळ्यांचा निरोप घेऊन पाहूणे निघाले होते . तेवढ्यात संकपाळ सरांच्या पत्नी जा स्वतःही पेशाने शिक्षिका होत्या त्या सुयशला घेऊन काकासाहेबांच्या घरी मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आल्या होत्या . काकासाहेबांच्या घरच्या सर्व स्त्रियांना संकपाळ मॅडम ओळखत असल्यामुळे त्या स्वतः जातीने आपल्या मुलीच्या गौरीच्या साखरपुड्याचे निमंत्रण द्यायला आणि साखरपुड्याला सर्वांना मुख्य म्हणजे रियाला आग्रहाने बोलवायला आल्या होत्या . समोर माणसांची गर्दी पाहताच त्या मागच्या दाराने वाड्यात आल्या . संकपाळ मॅडमची चाणाक्ष नजर बंद दरवाजाकडे गेली . संकपाळ मॅडमनी सहज खिडकीतून डोकावून पाहिले तर एका चटईवर डोळे मिटून रिया शांत पडली होती . दहावी बोर्डात पहिली आलेली रिया आयुष्याच्या शर्यतीत मात्र हरली होती . हे संकपाळ मॅडमना माहित होतं . पाहुणे आल्यामुळेच रिया इथे बंद आहे हे न सांगताच मॅडमच्या लक्षात आलं होतं . गावात तीस वर्ष नोकरी केल्यावर गावातील प्रथा , परंपरा यांची पूर्ण ओळख मॅडमना झाली होती .
रियाचं दुःख हलकं करण्यासारखं नसलं तरी निश्चितच बालपणीच्या गंमतीजमती बोलून थोडासा तरी दुःखाचा विसर नक्की पडेल असा विचार करून मॅडमनी दरवाज्याची कडी हळूच वाजवली . रियाच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या . \" पाहुणे गेले वाटतं बहुतेक . म्हणूनच आई दरवाज्याची कडी वाजवतेय .\" हा मनात विचार करून रिया दरवाजाची कडी उघडायला दरवाज्याजवळ पोहोचली . रियाने दरवाज्याची कडी उघडली समोर पाहते तर काय आश्चर्य ! तिचा बालमित्र सुयश आणि ज्यांनी अगदी रियाच्या हाताला धरून बाराखडी गिरवली त्या संकपाळ मॅडम अगदी रियाकडे पाहून स्मितहास्य करत होत्या . रियाला मॅडमनी प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं . रियाला आईनंतर दुसऱ्या कोणीच एवढ्या प्रेमाने मिठीत घेतले नव्हते . मॅडमचा प्रेमळ स्पर्श क्षणभर का होईना रियाचा सकाळपासूनचा ताण हलका करून गेला .
\" मॅडम आत येतील की नाही ?\" हा विचार रियाच्या मनात सुरू असतानाच मॅडम स्वतः म्हणाल्या ," रिया आत नाही बोलावणार का तु आम्हांला ?" गोंधळलेल्या स्थितीत रिया " या ना मॅडम आत या ." असं भीतभीतच म्हणाली . मॅडम आणि सुयश दोघेही रियाने अंथरलेल्या चटईवर बसले . रिया सतत काहीतरी लपवत असल्यासारखी दिसत होती . " रिया , जरा पाणी घेऊन येशील का आमच्यासाठी ?" मॅडम म्हणाल्या.
" हे चालेल ?" रिया आईने आणून ठेवलेल्या छोट्याशा कळशीजवळ जाऊन म्हणाली .
" हो , का नाही चालणार ? " मॅडम रियाला कुठेही अपराधीपणाची भावना वाटू नये हाच विचार करत म्हणाल्या. पण कळशी शेजारी असलेला डबा पाहून मॅडमला रियाची कीव आली . \" ऐश्वर्य , धनसंपदा आणि इतकी माणसं घरात असूनही कोणालाच माणुसकीच्या नात्याने रियाविषयी वाईट वाटलं नसेल का ? जे झालं त्यात त्या बिचारीची काय चूक ? \" मॅडम मनात विचार करत होत्या . अगदी दोन मिनिटही शांत न बसणारी सतत आपल्या निरागस बोलण्यातून सर्वांनाच आपलसं करणारी रिया खरचं हरवली होती .
रियाने मॅडमना आणि सुयशला पाणी दिले . सुयशही पूर्वीची रिया मिस करत होता .
" रिया अगं अशी उभी का आहेस , शिक्षा केल्यासारखी ? बस ना खाली . " सुयश रियाला म्हणाला .
"अरे हो बसते ." म्हणून रिया खाली बसली .
" अगं आपल्या गौरीचं लग्न अचानकच जुळलंय . तिला अभ्यासात विशेष रूची नव्हती , पण तिचा होणारा नवरा एसीपी आहे आणि आपल्या गौरीचं नशीब की , त्या मुलाने आणि त्याच्या घरच्यांनी गौरीला पसंत केलंय . परवा तिचा साखरपुडा आहे आणि तिने आवर्जून तुला तिच्या साखरपुड्याला बोलवलं आहे . आणि म्हणूनच साखरपुड्याचे सस्नेह निमंत्रण द्यायला मी आणि सुयश तुमच्या घरी आलो होतो . दारात पाहुणे दिसले म्हणून मागच्या दारानं आत आलो ." मॅडम म्हणाल्या.
" हो का . छान झालं . अभिनंदन ! सांगा तिला माझ्याकडून. सॉरी , पण मी नाही येऊ शकणार मॅडम ." रिया म्हणाली .
"का नाही येऊ शकणार तू ? तुला यावंच लागेल ." सुयश म्हणाला.
रिया आपले ओघळणारे अश्रू पुसत म्हणाली , " त्या रियामध्ये आणि आताच्या रियामध्ये खूप फरक झाला आहे. आता कुठल्याही शुभ प्रसंगी मी इच्छा असतानाही येऊ शकत नाही . जिथे घरातल्या लोकांना शुभप्रसंगी माझा चेहरा पाहावा वाटत नाही तिथे मैत्रीणीच्या साखरपुड्यात जाऊन मला कोणताही अपशकुन करायचा नाही. " रिया रडत रडत म्हणाली .
रिया जाऊ शकेल का गौरीच्या साखरपुड्याला ? काय होईल पुढे…
पाहूया पुढील भागात क्रमश:
सौ. प्राजक्ता पाटील
कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नावासह शेअर करा आणि हो मला फॉलो करायला विसरू नका. कथा वाचणाऱ्या सर्व वाचक वर्गाचे खूप खूप आभार.
कथा प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.
# साहित्य चोरी करणे हा गुन्ह आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1291246214693228&id=581606972323826
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा